घरमनोरंजनस्त्री,हाकामारीच्या भयाला विनोदाचा तडका

स्त्री,हाकामारीच्या भयाला विनोदाचा तडका

Subscribe

‘ब्लॅक कॉमेडी’त विदारक वास्तव वेदनेला विनोदी अंगानं समोर आणलं जातं. मात्र वेदना विनोदातून साकारणं कठिण असतं. त्यातून एकतर वेदनेची थट्टा होण्याचा धोका असतो. त्यामुळे हिंदी पडद्यावरील कसलेले दिग्दर्शकच ही जोखीम पत्करतात. अशीच जोखीम कॉमेडीतून भयपट सादर करण्यातही असते. प्रियदर्शनला हे भुलभुलय्यात जमलं होतं. त्यामुळे भुलभुलय्या यशस्वी झाला. त्यानंतर दिग्दर्शक अमर कौशिकने केलेला स्त्री हा प्रयत्न त्याच्या पुढचा टप्पा आहे.

स्त्री हॉररपट आहे. पण त्यातलं भूत किंवा रुहानी ताकद रामसे पटातल्यासारखी सरधोपट नाही. तसंच भुलभुलय्यासारखा मानसिक आजारावर आधारलेला स्त्री हा विज्ञानपटही हा नाही. वेगाने फिरणार्‍या कॅमेर्‍याचे कोन, मुद्देसूद बांधलेली पटकथा आणि अभिनय यामुळे अमर कौशिकचा स्त्री लक्षात राहतो.पडद्यावरची सुरुवात भिंतीवर वटवाघळाच्या रक्तानं लिहलेल्या स्त्री कल आना या वाक्यानं होते. असं का लिहलं जातं, त्यामागचं कारणं शोधण्यासाठीचे पुढील १२७ मिनिटं म्हणजे स्त्री हा चित्रपट. या प्रश्नाच्या उत्तरासाठी घेतलेल्या शोधामुळे सस्पेन्स कायम राहतो, हे उत्तर काय असतं ते पहायला थिएटरात जायला हवं. मात्र या प्रश्नाचा उलगडा झाल्यावरही स्त्रीचं कथानक हा प्रश्न का निर्माण झाला, या दुसर्‍या प्रश्नाकडे वळतं. त्यातून पुढचा प्रश्न निर्माण होतो. मग हे एकामागोमाग आलेले अनालकलनीय भीतीचे प्रश्न सोडवण्याची खटपट म्हणजे हा चित्रपट. ही खटपट विनोदी असली तरी कंटाळवाणी झालेली नाही. दुसरीकडे विनोदामुळे पडद्यावरच्या स्त्री च्या गूढ भीतीला तडा जात नाही, हे दिग्दर्शकाचं यश आहे. स्त्री कोण आहे? ती कशी दिसते, ती बेचैन आत्मा, भूत का आणखी काही आहे? याचा शोध घेताना दिग्दर्शकानं पटकथेवरची पकड सुटू दिलेली नाही. अचानक समोर येणार्‍या आकृत्या, आवाज, रातकिड्यांची किरकिर, दूरहून जवळ येणार्‍या किंकाळ्या, पडकं खिंडार त्याच्या जोडीला सचिन संध्व आणि केतन सोधाचं अंधार गडद करणारं पार्श्वसंगीत असं भयपटाला आवश्यक ते सगळं स्त्री मध्ये पुरेपूर आहे. मात्र बुवा, काळ्या जादूवर मात करणारी दैवी शक्ती, अंगारे धुपारे लावलेला बाबा-बुवा, असली सरधोपट वाट अमर कौशिकनं कटाक्षानं टाळली आहे. त्यासाठी त्याचं कौतूक करायला हवं.

एका गाववजा शहरात स्त्री चं कथानक घडतं. कर्नाटक आणि महाराष्ट्रातही रात्रीच्या वेळी आवर्जून भीती आणि उत्सुकतेचा अनुभव म्हणून पारावर, चावडीत मोठ्या घरात जागरणात जमलेल्या मंडळींकडून वेणी कापलेल्या हाकामारीची गूढ कहाणी कुतूहल म्हणून ऐकवली जाते. एका गावासारख्या शहरात स्त्री च्या कथानकाची सुरुवात या कथेतूनच होते. या शहरात महिलांचे कपडे शिवणारा टेलर हा नायक असतो. त्याच्या आयुष्यात घडलेल्या एकामागोमाग एक अनाकलनीय प्रसंगाचा पट म्हणजे स्त्री चा पडदा. इथंही भूतपटातल्या अविश्वसनीय प्रसंगांच्या खोलात जाण्याची गरज नसते. त्यामुळे केवळ भीती, विनोदाचा अनुभव घेण्यासाठी स्त्री पहायला हरकत नाही. त्यामुळेच हॉरर,सस्पेन्स आणि विनोदाचं संतुलन कायम ठेवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला असला तरी चित्रपटातील प्रसंगात असं होऊ शकतं का ? असंच झालंच कसं, असले कार्यकारणभाव शोधणारे प्रश्न प्रेक्षकांनी बाजूला ठेवायला हवेत. मध्यंतरानंतर चित्रपटाची कथा वेग घेते. मात्र त्याआधीची काही मिनिटं कमालीची रेंगाळली आहेत. त्यामागचं कारण पडद्यावर समजत नाही.

- Advertisement -

शहरातून गायब होणारी माणसं कुठं जातात. हे समजण्यासाठी जे ठोकताळे वापरले आहेत. ते विश्वसनीय नसतात. यातील घटना इतक्या भीतीदायक असतानाही कथानक घडणार्‍या गावातल्या माणसांचं जगणं इतकं नियमित, उदासीन कसं असू शकतं ? स्त्री पाहताना असले प्रश्न डोक्यातून काढून टाकायला हवेत. चित्रपट भयपट असल्यानं हसत हसत अचानक घाबरून जायचं असले तर स्त्री पहावा. अचानक पांढरे होणारे डोळे, अधांतरी चालणारी आकृती असं सगळं स्त्री मध्येही आहे. पण त्याचा ओव्हरडोस देणं कौशिकनं टाळलं आहे. दिग्दर्शक रामगोपाल वर्माने रात आणि भूतमधून असाच अनुभव काही वर्षांपूर्वी दिला होता. त्यानंतर पडद्यावरच्या वाड्यातल्या भिंतीवर चढणारी उलट्या पायांची भुताटकी अनेकांनी दाखवली. पण भितीतून विनोदाचा येणारा वेगळा अनुभव स्त्री मध्ये आहे. राजकुमार रावने या गूढ भीतीमध्ये विनोद गुंतवण्याचं कठिण काम सहज अभिनयातून लिलया पेललं आहे. श्रद्धा कपूरनेही आपलं काम चोख बजावलं आहे. टेलर झालेल्या राजकुमारचे मित्रही पडद्यावर धम्माल आणतात. एकूणच स्त्री मध्ये दिग्दर्शक अमर कौशिक भयपटाला विनोदाचा तडका देण्यात बर्‍यापैकी यशस्वी झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -