घरमनोरंजनसुशांतने ’कूल’ धोनी रंगवला,पण तसं जगला मात्र नाही!

सुशांतने ’कूल’ धोनी रंगवला,पण तसं जगला मात्र नाही!

Subscribe

२०२० हे साल अचानक आलेल्या आपत्तींसाठी कायम लक्षात राहणार आहे. करोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगात हाहा:कार माजवला असताना बॉलीवूडलाही कधीही न भरून निघणार्‍या जखमा सोसाव्या लागल्या आहेत. यापूर्वीच सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार ऋषी कपूर, इरफान खान यांच्या निधनाच्या मोठ्या धक्क्यानंतर बॉलीवूडला आता यंग, डॅशिंग चॉकलेट बॉय अभिनेता सुशांत सिंह राजपूतने अचानक घेतलेल्या एक्झिटचे दुःख सोसावे लागत आहे. सुशांतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बातमी समजताच बॉलीवूडसह त्याच्या चाहत्यांनीही दुःख व्यक्त केले. वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी सुशांतने आपले जीवन संपवणे, हे काही मनाला पटत नाही, अशी भावना आज सर्वत्र व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावरील चित्रपटात त्याने धोनीची भूमिका रंगवली होती. ‘कूल’ धोनी रंगवताना सुशांत जणू धोनी होऊन गेला होता. विशेष म्हणजे आपण मोठ्या पडद्यावर जणू धोनी बघत आहोत, असा भास व्हावा, असा जिवंत अभिनय सुशांतने केला होता. सुरुवातीच्या काळातले धोनीच्या जीवनातील चढउतार सुशांतच्या देहबोलीतून अचूक उतरले होते.

आयुष्यात खूप वेळा निराशेचे क्षण येतात, पण माणूस इनिंग सोडून देत नाही. असंच सुशांत आपल्याला धोनीचा अभिनय करत सांगत होता. ‘सुसाईड इज नॉट ऑप्शन, वुई मस्ट टू फाईट अगेंस्ट…’, ‘छिछोरे’ सिनेमातला सुशांत सिंह राजपूतचाच हा डायलॉग ! आत्महत्येचे विचार कसे टाळायचे हे ज्या व्यक्तीने सांगितले, ज्याने ‘एम.एस.धोनी’मध्ये आयुष्यातली धडपड दाखवली, स्वप्नांचा पाठपुरावा केला त्यानेच आत्महत्या करुन जीवनयात्रा संपवली ही बातमी ऐकणे हेच मुळी धक्कादायक आहे. सुशांत अशा पध्दतीने आयुष्याची विकेट टाकशील असं वाटलं नव्हतं. खूप चुकीचं पाऊल उचललंस तू. राजपूत हो के भी तूने हार कैसे मान ली सुशांत? अशी हळहळ सर्वत्र भरून राहिलीय…

- Advertisement -

आतापर्यंत बॉलीवूडला छोट्या पडद्यातील अनेक कलाकार लाभले आहेत. त्यापैकीच एक सुशांत सिंह राजपूत होता. बिहारच्या पाटणामध्ये २१ जानेवारी १९८६ साली सुशांतचा जन्म झाला. त्याचे वडील सरकारी अधिकारी असून त्यांचे कुटुंब २००० च्या सुरुवातीला दिल्लीला स्थायिक झाले होते. त्याचे सुरुवातीचे पाटणाच्या शिक्षण सेंट कॅरेंस हायस्कूलमध्ये झाले. नंतर दिल्लीच्या कुलाची हंसराज मॉडल स्कूलमध्ये त्याने पुढील शिक्षण पूर्ण केले. दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. २००८ साली ‘किस देस मे हैं मेरा दिल’ या छोट्या पडद्यावरील मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती एकता कपूर यांच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून. या मालिकेतील त्याची सहकलाकार अभिनेत्री अंकिता लोखंडे हिच्यासोबतची त्याची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली. दोन वर्षं सुरू असलेल्या या मालिकेमुळे दोघांमध्ये प्रेमसंबंधही जुळून आले. सुशांत आणि अंकिता रिलेशनशिपमध्ये होते. काही काळानंतर हे नाते संपुष्टात आहे. सुशांत हा उत्तम अभिनेता तर होताच, पण तो चांगला डान्सरही होता. त्याने ‘जरा नच के दिखा’ आणि ‘झलक दिख ला जा सिजन ४’मध्ये नृत्यकौशल्य दाखवले होते. पुढे याचा फायदा त्याला बॉलीवूडमध्येही झाला.

डेलीसोपमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या सुशांतला आता मोठा पडदा खुणावत होता. टीव्ही ते सिल्व्हर स्क्रिनपर्यंत पोहोचायला सुशांतला पाच वर्षं लागली. २०१३ साली ‘काय पो छे’ या चित्रपटातून सुशांत सिंह राजपूतने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अमित साद आणि राजकुमार राव हे त्याचे सहकलाकार होते. मात्र पहिल्याच चित्रपटात सुशांतने प्रेक्षक आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. चित्रपटात सुशांतने एका क्रिकेट कोचची भूमिका केली असून बॉलीवूडमधील त्याची यशस्वी इनिंगच जणू त्याने तिथून सुरू केली होती. पुढे वेगवेगळे चित्रपट करून त्याने ही इनिंग सुरू ठेवली. सुशांतच्या अभिनयाची खरी ओळख पटली ती भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या जीवनावर आधारित ‘एम. एस. धोनी’ या चित्रपटातून.

- Advertisement -

कॅप्टन कूलची व्यक्तिरेखा साकारताना सुशांतने पडद्यावर खराखुरा धोनीच उभा केला. प्रेक्षकांनी रिअलसोबत रिल धोनीलाही पसंती दर्शवली. सुशांतच्या बॉलीवूड इनिंगमध्ये यशाचा टर्निंग पॉईंट आला. त्याशिवाय सुशांतने केदारनाथ, राबता, पीके, सोनचिरीया, डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, शुद्ध देसी रोमान्स, ड्राईव्हसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. छिछोरे हा त्याचा प्रदर्शित झालेला अखेरचा चित्रपट ठरला. तर दिल बेचारा हा सुशांतचा आगामी चित्रपट होता. बॉलीवूडमध्ये अवघ्या दहा चित्रपटांमधून यशस्वी कारकिर्द सुरू करणार्‍या सुशांतने आत्महत्या का केली. हे कोडं अद्याप तरी उलगडलेलं नाही. मात्र सुशांतने अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे बॉलीवूडने एक हरहुन्नरी कलाकार गमावला एवढं मात्र खरं.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -