स्टाईलचा Swag, Attitude चा वाघ ‘टर्री’चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित

तरुण रक्तात नेहमीच एक चैतन्य सळसळत असतं. काहीतरी करून दाखविण्याची धमक या वयात नसानसांमध्ये भिनलेली असते. आयुष्यातला असा काळ ज्यात प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याची प्रबळ इच्छा असते. चुकीचं घडताना त्याच्याविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद असते. हाच अंदाज आपल्याला अभिनेता ललित प्रभाकरच्या रूपाने आगामी ‘टर्री या मराठी चित्रपटातून पहायला मिळणार आहे.

‘टर्री’ हा शब्द पाळणारा, खरी मैत्री जोपासणारा..कोणतीही जबाबदारी स्वीकारणारा पण गरम रक्ताच्या ‘टर्री’ मध्ये हळवेपणा आहे. अस्सल ग्रामीण बाज घेऊन रांगड्या अंदाजात ‘टर्री’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. ललित प्रभाकर प्रथमच अशा ‘टेरर स्वॅग’ मध्ये मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे.

नुकतंच ‘टर्री’चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात ललित प्रभाकरची अॅक्शन पाहायला मिळत आहे.‘टर्री’ चित्रपटात ललित सोबत गौरी नलावडे दिसणार असून शशांक शेंडे, अनिल नगरकर आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे छायांकन अमोल गोळे यांनी केले असून संकलन प्रवीण जहागीरदार, श्रीराम बडवे यांचे आहे. संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर-स्वप्नील गोडबोले आहेत. गायक अवधूत गुप्ते, रोहित राऊत, शरयू दाते यांच्या आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबध्द करण्यात आली आहेत. एजाज गुलाब हे या चित्रपटाचे अॅक्शन डिरेक्टर आहेत.

‘टर्री’ चित्रपटाच्या निमित्ताने आजवर केलेल्या भूमिकांपेक्षा अगदी वेगळी भूमिका करायला मिळाल्याचं ललित आवर्जून सांगतो. वर्षभर या भूमिकेसाठी मी मेहनत घेतली असून चित्रपटातील माझा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास अभिनेता ललित प्रभाकर ने व्यक्त केला. येत्या १७ फेब्रुवारीला ‘टर्री’ चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपटाचे वितरण पॅनोरमा स्टुडिओ करणार आहे.


हेही वाचा :

बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’चा जलवा; 6 दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी