घरमनोरंजनआत्मार्पण सावरकरांचे चिंतन

आत्मार्पण सावरकरांचे चिंतन

Subscribe

इंग्रजांचे साम्राज्य जेव्हा भारतात होते, तेव्हा देश स्वतंत्र झाला पाहिजे ही त्यावेळच्या सर्व क्रांतिकारकांची, समाजसेवकांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी ते एकत्रही आले होते. अपुर्‍या सुविधांनीशी त्यांनी विरोध केला, त्यात त्यांना यश आले. त्याला कारण म्हणजे देश स्वतंत्र झाला पाहिजे हा एकच ध्यास त्या सर्वांच्या मनात होता; पण त्यातही प्रत्येकाने आपली स्वतंत्र अशी विचारसरणी जपलेली आहे. इतकेच नाही तर त्याचे महत्त्वही पटवून दिलेले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांचे याबाबतीत नाव घ्यावे लागेल. हिंदूंचे अस्तित्त्व हा त्यांचा आत्मिक विषय होता, ज्याच्यासाठी त्यांनी आयुष्यभर हा लढा दिला. वक्ते, देशाभिमानी, कवी मनाचे, लढवय्ये अशी त्यांची जनमाणसातली प्रतिमा आहे. २६ फेब्रुवारी त्यांचा स्मृतीदिन हा ‘आत्मार्पण दिन’ म्हणून ओळखला जातो. त्यांच्या विचारांची, कार्याची दखल घेणारी नाटके रंगमंचावर सुरू आहेत. सावरकरांचे चिंतन अनुभवायला मिळते.

सध्या आपण लोकशाहीचे जीवन जगत असलो तरी हा समृद्धीचा मार्ग खर्‍या अर्थाने मिळवून दिला तो क्रांतिवीरांनी. केवळ घोषणा दिल्या, संघर्ष यात्रेत सहभागी झाले, स्वातंत्र्यलढ्याला सामोरे गेले म्हणजे त्याग केला असा त्याचा अर्थ होत नाही. नेतृत्व करत असताना स्वत:चे विचारही लोकांपर्यंत या क्रांतिवीर, समाजसुधारकांनी पोहोचवलेले आहे. प्रत्येकावर एक स्वतंत्र कलाकृती निर्माण होईल इतका त्याग, संघर्ष या देशभक्तांनी केलेला आहे आणि भविष्यातल्या निर्माता, दिग्दर्शकांनी त्याचा जीवनपट हा नाटकातून, चित्रपटातून चितारलेला आहे. मालिकेच्या माध्यमातूनही या क्रांतिवीरांचे, समाजसुधारकांचे समग्र दर्शन घडेल असे निर्मात्यांनी पाहिलेले आहे. गेल्या काही महिन्यात रंगमंचावर येणार्‍या कलाकृतींचा मागोवा घेतला तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे त्यागपूर्ण कार्य रंगमंचावर अविष्कारित होईल असे काही निर्मात्यांनी, कलाकारांनी पाहिलेले आहे. दिवंगत ज्येष्ठ संगीतकार, गायक सुधीर फडके हे तर सावरकरांच्या विचारांनी प्रभावीत झाले होते. फडकेंना फक्त सावरकरांना जवळून पहाताच आले नाही तर पाणावलेल्या डोळ्यांनी फडकेंना त्यांनी शाबासकीही दिली होती. त्यामुळे कृतीने आणि मनाने देशभक्त असलेल्या फडकेंनी व्यावसायिक दृष्टीकोन बाजूला ठेवून सावरकरांच्या जीवन कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणार्‍या चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यासाठी प्रेक्षकांनाच त्यांनी विश्वासात घेऊन त्या निधीतून हा चित्रपट त्यांनी पूर्ण केला होता.

शिवाजी पार्क इथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक उभे केलेले आहे. या स्मारकाच्या सहकार्याने साऊंड अ‍ॅण्ड लाईट याचा वापर करून प्रेक्षकांसाठी विशेष खेळाचे आयोजन केले जाते. नाट्य व्यवस्थापक म्हणून आपली कारकीर्द सुरू करणार्‍या दिनू पेडणेकरला आता यशस्वी निर्माता म्हणून प्रेक्षकांत ओळख आहे. फक्त नाटकाची निर्मिती तो करत नाही तर त्या नाटकात विचारांची देवाण-घेवाण असायला पाहिजे हा त्याचा आग्रह असतो. आतापर्यंत त्याने जेवढ्या म्हणून नाटकांची निर्मिती केली ती प्रभावी ठरली आहेच; परंतु ‘कोडमंत्र’ हे त्याचे अतिशय गाजलेले नाटक. या प्रवासात दिग्दर्शक, अभिनेता दिग्पाल लांजेकर या लेखकाची ओळख झाली आणि यातून काही भरीव कार्य करण्याच्या उद्देशाने ‘चॅलेंज’ हे नाटक त्याला लिहायला भाग पाडले. त्यात दोन समाजसुधारकांची वैचारिक देवाण-घेवाण आणि त्यातून देशाचा अभिमान असा विषय अधोरेखित केलेला आहे. यातून सावरकरांच्या विचारांची एक स्वतंत्र नाट्यकृती निर्माण होऊ शकेल जी प्रेक्षकांना फक्त भारावून टाकणारी न होता निराश झालेल्या प्रत्येकाला जगायला भाग पाडेल अशी ती कलाकृती म्हणजे ‘हे मृत्यूंजय’ नाटक सांगता येईल. सावरकर स्मारकाच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन या नाटकाची निर्मिती केलेली आहे. अंदमानात मृत्यूशी दिलेल्या थरारक झुंजीची ही मनोबल वाढवणारी यशोगाथा आहे. ‘हे मृत्यूंजय’ हे नाटक अमराठी प्रेक्षकांपर्यंतही पोहोचावे यासाठी हिंदीतूनही हे नाटक सादर केले जाते.

- Advertisement -

‘चॅलेंज’, ‘हे मृत्यूंजय’ ही नाटके प्रेक्षकांसाठी मनोरंजन आणि प्रबोधन करणारी असली तरी निर्मिती करणार्‍या पेडणेकर आणि राष्ट्रीय स्मारकासाठी ही एक चळवळ आहे. जेव्हा सामाजिक कार्य केले जाते तेव्हा आर्थिक उलाढालीचा विचार हा फारसा होत नाही. जी कलाकृती निर्माण केलेली आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली पाहिजे हा एकच हेतू चळवळीमागचा असतो. हिंदी, मराठी या दोन्ही कलाकृती ‘स्वेच्छामूल्य प्रयोग’ म्हणून सादर केल्या जातात. नाट्यगृहाच्या बाहेर पेटी ठेवली जाते. प्रेक्षकांनी विनामूल्य नाटक पहावे आणि त्यातून त्यांना स्वेच्छेने द्यायचे झाले तर ते त्या पेटीत आपले पैसे टाकू शकतात. हा गोळा झालेला निधी पुढच्या प्रयोगाच्या कामी उपयोगात आणला जातो. सावरकरांचे हे समग्र दर्शन फक्त या दोन नाटकांतूनच अविष्कारित होत नाही तर ‘होय मी सावरकर बोलतोय’ या नाटकातूनही होताना दिसतो. अभिजात नाट्यसंस्था ही या नाटकाचे प्रयोग करते. सावरकरांच्या राजकीय जीवनावर हे नाटक आधारलेले आहे. अनंत ओगले हे या नाटकाचे लेखक असून सुनिल जोशी याने त्याचे दिग्दर्शन केलेले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत या नाटकाचे प्रयोग होण्याच्यादृष्टीने ही संस्था प्रयत्न करीत असते. या क्रांतिकारी वाटचालीमध्ये सावरकरांचा जसा वाटा होता तसेच बाबाराव सावरकर, नारायणराव सावरकर यांचा जसा सहभाग होता तसा त्यांच्या पत्नीनेही अनमोल सहकार्य केलेले आहे. त्यांचे धाडस, त्यांचा त्याग याचा मागोवा घेणारे ‘अग्नीशिखा’ हा कार्यक्रम सादर केला होता. या निमित्ताने वीरपत्नींचे देशप्रेम उलगडून सांगितले होते.

दिग्पालचे कार्य महत्त्वाचे
दिग्पाल हा आताच्या पिढीतला लेखक, दिग्दर्शक आहे. व्यावसायिक स्पर्धा तो सध्या अनुभवतो आहे. असं असताना आपली एक सामाजिक बांधिलकी आहे ती जपली पाहिजे याचा ध्यासही त्याने घेतलेला आहे. ‘चॅलेंज’, ‘हे मृत्यूंजय’ ही दोन नाटके त्याच्याच लेखन, दिग्दर्शनात रंगमंचावर अविष्कारित झालेली आहेत. वेशभूषेची जबाबदारीसुद्धा त्यानेच सांभाळलेली आहे. या दोन्ही नाटकांचे प्रयोग स्वेच्छामूल्य होत आहेत म्हटल्यानंतर कराव्या लागणार्‍या तडजोडीला तोही सामोरा गेलेला आहे. यात सहभागी असलेल्या कलाकारांचेसुद्धा कौतुक करावे लागेल. ‘फर्जंद’ या चित्रपटामध्ये कोंडाजी फर्जंद याच्या शौर्याची गाथा पहायला मिळाली होती. त्याचेही दिग्दर्शनही दिग्पालनेच केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -