ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

aashalata wabgaonkar
आशालता वाबगावकर

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर (वय ७९) यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आई माझी काळूबाई या मालिकेच्या सेटवर २७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.

जवळपास ४० हून अधिक वर्षांसाठी त्या रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून काम करत होत्या. तसेच नाट्यसंगीतामधूनही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आशालता या मूळच्या गोव्याच्या असून, त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकनही मिळाले होते. मराठी चित्रपट सृष्टीत उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.

गुणी, चतुरस्त्र कलावंताला मुकलो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या निधनामुळे गुणी आणि चतुरस्त्र अशा कलावंताला मुकलो आहोत,अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, मराठी कुटुंबातून आलेल्या आशालताजींनी मराठी संगीत रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीत आपले असे स्थान निर्माण केले होते. कवयित्री, गायिका, लेखन अशा क्षेत्रात गती असलेल्या आशालता यांनी अजरामर अशा भूमिका साकारल्या. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील या भूमिका केवळ त्यांच्यासाठीच असाव्यात इतक्या त्या उत्कृष्ट अभिनेत्री होत्या. मराठी रंगभुमीही त्यांनी गाजविली. संगीत नाटक आणि व्यावसायिक नाट्यसृष्टीत त्यांचा उत्कृष्ट कलाकार म्हणून दबदबा होता. नव्या होतकरू कलाकारांनाही त्या जवळच्या मार्गदर्शक वाटत. त्यामुळे त्यांनी या पिढीतही जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या निधनामुळे आपण गुणी आणि चतुरस्त्र अशा कलावंताला मुकलो आहोत. त्यांचे कला क्षेत्रातील योगदान विसरता येणार नाही, असेच आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना विनम्र श्रद्धांजली!

हेही वाचा –

Bhiwandi Building Collapse : इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १८; बचावकार्य सुरू