घरफिचर्सअभिनयाचा एक मुख्य पैलू : स्पर्श

अभिनयाचा एक मुख्य पैलू : स्पर्श

Subscribe

हाच तो "स्पर्श" जो मायेचा, विश्वासाचा, आपलेपणाचा, आपुलकीचा, सद्विवेकाचा, चेतना निर्माण करणारा, अंगावर रोमांच उभे करणारा असतो, जी संवेदना ‘कला’च निर्माण करू शकते. हा स्पर्श ‘माणुसकीचा’ असतो. जे हे रोमांच आपण रंगमंचावर अनुभवतो तेच आपल्या वैयक्तिक आयुष्यात, प्रत्येक नात्यात अनुभवण्यास मिळाले तर जीवन किती सुंदर होऊन जाते! हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजणार नाही.

मानवीय संवेदनांमधील सर्वात सुंदर आणि मोहक भावना म्हणजे स्पर्श!
या स्पर्शाने कितीतरी आयुष्ये बहरली, मोहरली, फळास आली, सार्थकी लागली.
स्पर्श, मग तो त्वचेचा असो वा नजरेचा
भावनिक असो वा चेतनेचा…

स्पर्श ही एक अशी भावना आहे, जी अनुभवण्यासाठी उत्सुकता असते, मात्र त्याविषयी फारसे खुलून बोलले जात नाही. व्यावहारिक जीवनात विविध स्पर्श एकमेकांच्या वाट्याला येत असतात; पण आजही स्पर्श या संज्ञेविषयी योग्य ती जाणीव व जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे. मी अशा सृजनात्मक, सात्विक स्पर्शाविषयी बोलत आहे जो स्पर्श प्रत्येक कलाकार अनुभवण्यासाठी अक्षरशः उतावीळ असतो, उत्सुक असतो, तो स्पर्श त्याला एक वेगळी ताकद देणार असतो आणि तो म्हणजे आपल्या रंगभूमीचा स्पर्श!!

- Advertisement -

नऊ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आई जशी आपल्या बालकाला कवेत घेण्यास उत्सुक असते तसेच काहीसे नाते आणि उत्सुकता पहिल्यांदा रंगमंचावर येताना असते, नव्हे ती दर प्रयोगांगणिक असतेच! कलाकार आणि रंगभूमीचं नातं हे स्पर्शाने खुलते, वाढत जाते. रंगभूमी ज्या मायेने कवेत घेते, कलाकार बागडायला मोकळा!

ही सगळी प्रस्तावना मांडण्याचे कारण असे की आपण आपल्याच विश्वात असतो. मात्र ते विश्व अलौकिक जगाशी कमी व्यावहारिक जगाशीच जास्त जोडलेले असते आणि व्यवहार आपल्या संवेदना, भावना, नाजूक क्षण कधी आणि कसे ओरबाडतो हे बर्‍याचदा समजतही नाही. आपण ठरवल्याप्रमाणे साचेबद्ध आयुष्य जगत राहतो; पण एकत्र जगण्याचा अभ्यास करून का जगू नये… एक भूमिका बजावताना दुसरी भूमिका, जबाबदारी राहून जात असेल तर थोडं थांबावं, विचार करावा आणि मग पुढे जावं, थोडं थांबल्याने काही नुकसान होत नाही उलट तो काळ, ते क्षण दोघेही सोबत जगत जातात. आयुष्यात अनेक सुखद क्षण डोकावून जातात; पण त्यांचे स्वागत कसे करावे हे मात्र कोणत्याच पुस्तकात कधी सांगितले जात नाही, हे महत्त्वाचे क्षण हातचे सुटू नये यासाठी व्यवहार आणि संवेदना यांची सांगड कायमस्वरूपी घालण्यासाठी उपयोगी येते माणुसकीची प्रक्रिया! जी हळूवार धाग्यातून मायेच्या स्पर्शाची पखरणही करते आणि मुळात त्याची जाणीव आपल्यापर्यंत पोहचते.

- Advertisement -

“थिएटर ऑफ रेलेवन्स” च्या जीवननाट्य प्रक्रियेत मी एक कलाकार म्हणून नाते, स्पर्श, संवाद, संवेदना, व्हायब्रेशन्स याविषयी अभ्यासत आणि अनुभवत असताना ‘दृश्य’ आणि ‘अदृश्य’ जाणिवांविषयी देखील अनुभवू लागले आणि या जाणिवा ‘कलाकार’ म्हणून वाढत असताना, ‘माणूस’ म्हणून प्रत्येक नात्यातही बहरत गेल्या.

दर प्रयोगाआधी रंगमंचावर फिरून आणि आलाप प्रक्रियेने रंगमंच आणि कलाकाराचे नाते घट्ट केले जाते. त्याचप्रमाणे दुरावलेल्या नात्यांनाही वेळ, संवाद, साधनेचे खतपाणी घालून भक्कम करता येते हे नव्याने समजले. प्रत्येक प्रयोगाआधी तर मंचाच्या मध्यभागी सर्व कलाकार गोलाकार फिरून आणि मग झोपून आलाप आणि साधना करत सकारात्मक व्हायब्रेशन्स निर्माण करताना मी अनुभवले आहे आणि त्यानंतरचा प्रयोग हा नेहमीच घट्ट बांधणीने एकत्र रचनात्मक स्वरूपात सादर होतो. त्यात शिस्त असते, सावधानी असते, अलर्टनेस असतो आणि मुख्य म्हणजे एका अदृश्य तरंगाने सर्व कलाकार एकमेकांशी आणि लेखक-दिग्दर्शकाशी, रंगभूमीशी आणि मुख्यतः प्रेक्षकांशी व्हायब्रेशनली जोडले जातात. मला या प्रक्रियेचे हेच अप्रूप वाटते की जसे कलाकाराचे मंचाशी नाते घट्ट होत जाते तसा तो स्वतःच्याही अधिक जवळ जातो आणि ही प्रक्रिया मानवीय संवेदना भक्कम करून मानवी नातीही घट्ट विणत जाते.

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित अनहद नाद- Unheard Sounds Of Universe नाटकाच्या प्रयोगादरम्यान रंगभूमीच्या स्पर्शाची एक ओजस्वी अनुभूती मी अनुभवली. आजही तो क्षण आठवून अंगावर रोमांच उभे राहतात. असे अनुभव उत्तम कलाकृती सादर होत असताना प्रत्येक संवेदनशील कलाकाराला येतात आणि येत असावेत…एक अशी धुंदी, एक अशी टाळी लागते सादरीकरणा दरम्यान की आपण तिथे नसतोच, एका वेगळ्याच विश्वात फिरून येतो जे आपण कधी पाहिले वा अनुभवलेही नसते, तो क्षण फक्त माझा आणि त्या कलाकृतीचा होता यालाच एकरूप होणं म्हणत असावेत आणि यात महत्त्वाचा त्रिकोण हा जोडता येतो की कलाकार रंगमंचावर असताना जे रोमांच अनुभवतो ते फक्त त्याच्यापुरतेच सीमित नसतात तेच व्हायब्रेशन्स त्याच क्षणी प्रेक्षकांपर्यंतही पोहचत असतात आणि म्हणूनच ते या सुखद क्षणांचे साक्षीदार होतात आणि अनुभूतीचे समाधान त्यांच्यापर्यंतही पोहचते. हीच आहे कलेची ताकद, कलेतील कलात्मकता जी अदृश्य स्वरूपातही आपली दृश्य अनुभूती देते!!

या तत्वांशी संबंधित रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित बोध ही कविता सोबत जोडत आहे.

बोध
-मंजुल भारद्वाज
स्पर्श, गंध, भाव
है जीवन बोध
मीत, प्रीत, रीत
है संसार बोध
आकर्षक, मोहक, अदा
है सौन्दर्य बोध
चाहत, सहवास, त्याग
है प्रेम बोध
ज्ञान, संज्ञान, विज्ञान
है दृष्टि बोध
दृष्टि जैसी सृष्टि
है संकल्प बोध
सत्य, निष्ठा, न्याय
है मानवता बोध
जड़,चेतन,जन्म
है सृजन बोध
निरिक्षण, धारण, सम्प्रेष्ण
है कला बोध
अर्पण, समर्पण, तर्पण
है मुक्ति बोध!

मुळात हे रेझोनेशन, हे तरंग व त्याचा शोध हा एक वैज्ञानिक भाग आहे. या वैज्ञानिक तत्वाला थिएटर ऑफ रेलेवन्स मानवीय तत्वांशी जोडतं. जसा “अनहद नाद” कोणत्याही दोन वस्तूंच्या घर्षणाशिवाय निर्माण होतो जो अदृश्य वा अमूर्त स्वरूपात जाणवतो, तसा हा “अनहद स्पर्श” कोणत्याही स्पर्शाशिवाय शिवून जातो, आपल्याशी संवाद करून जातो. रंध्रारंध्रातून रोमांच उभे करतो आणि आपण इथे असूनही या जगात नसतो!

हाच तो “स्पर्श” जो मायेचा, विश्वासाचा, आपलेपणाचा, आपुलकीचा, सद्विवेकाचा, चेतना निर्माण करणारा, अंगावर रोमांच उभे करणारा असतो जी संवेदना ‘कला’च निर्माण करू शकते. हा स्पर्श ‘माणुसकीचा’ असतो. जे हे रोमांच आपण रंगमंचावर अनुभवतो तेच आपल्या वैयक्तिक आयुष्यात, प्रत्येक नात्यात अनुभवण्यास मिळाले तर जीवन किती सुंदर होऊन जाते! हे प्रत्यक्ष अनुभवल्याशिवाय समजणार नाही. ते सत्व, ती सात्विकता तेव्हाच निर्माण होते जेव्हा समर्पण असते, विश्वास असतो, आपुलकी असते! आज या भावना, संवेदना, जाणिवा कुठेतरी हरवत जात आहेत त्या जपणं हे एक ‘कलाकार’ आणि एक ‘माणूस’ म्हणून आपली जबाबदारी आहे.

चार वर्षांपूर्वी मराठी रंगभूमीवर निर्माण झालेल्या अनहद नाद – Unheard Sounds Of Universe या नाटकाच्या माध्यमातून कलात्मक मानवीय तरंग रेझोनेट करण्यात आले.

दादर येथील श्री शिवाजी नाट्य मंदिरात सकाळ, दुपार, संध्याकाळ या नाटकाचे प्रयोग झाले आणि त्यातून अशा वैचारिक नाटकांची चर्चा होण्यास सुरुवात झाली आणि त्यातून रंगभूमीचा तत्वांशी संबंध आहे या विचाराचे पुनर्मंथन सुरू झाले.

‘अनहद नाद’चे कलात्मक स्पर्श, तरंग, व्हायब्रेशन्स नाट्यगृहापासून प्रेक्षकांना आणि कलाकारांपासून ते आपल्या रंगभूमीला अधिकाधिक समृद्ध करत आहेत.

-योगिनी चौक (रंगकर्मी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -