घरफिचर्सक्रिकेटपटूंचं दुसरं प्रेम!

क्रिकेटपटूंचं दुसरं प्रेम!

Subscribe

क्रिकेटच्या विश्वचषकाचे सामने एकापाठोपाठ रंगात येत आहेत. अनेक क्रिकेटपटूंचं क्रिकेट हे पहिलं प्रेम असलं तरी संगीत हे त्यांचं दुसरं प्रेम असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. पद्माकर शिवलकरांनी गायलेलं, हा चेंडू दैवगतीचा, हे गाणं मनाचा ठाव घेऊन जातं, तर विक्रमवीर सुनील गावसकरांनी गायलेलं, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला, हे जीवनाचं वास्तव सांगून जातं.

क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे. हळूहळू क्रिकेटचा ज्वर वातावरणात वाढू लागेल, विशेषत: आपल्यासारख्या क्रिकेटप्रधान देशात तर तो जास्तच वाढतो. आपल्यासारख्या देशाला कृषीप्रधान देश म्हणतात हे खरं आहे; पण तो आता किती क्रिकेटप्रधानही झाला आहे हे आयपीएलच्या मोसमात तर सरळ सरळ दिसतं.

असो, तर या क्रिकेटप्रधान देशातली क्रिकेट खेळणारी मंडळी क्रिकेटच्या विकेटवर मग्न असतात आणि क्रिकेट हे त्यांचं पहिलं प्रेम असलं तरी त्यातल्या बहुतेकांचं, संगीत हे दुसरं प्रेम असतं हे वेळोवेळी दिसून आलं आहे.

- Advertisement -

अलिकडेच माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकरचं ‘इम्पर्फेक्ट’ हे आत्मकथन बाजारात आलं आहे. या पुस्तकात संजय मांजरेकरने आपल्याला असलेल्या संगीताच्या आवडीचा खास उल्लेख केला आहे. तो म्हणतो, आज क्रिकेटमधून पत्करलेल्या निवृत्तीनंतर माझ्या आजूबाजूची माणसं फुटबॉल किंवा टेनिसवर गप्पा मारायला लागतात तेव्हा एक आंतरराष्ट्रीय खेळाडू असूनही मी खोलीतल्या एका कोपर्‍यात बसून असतो. पण किशोरकुमार, लता मंगेशकर, मेहदी हसन किंवा नुसरत फतेह अली खान यांचा विषय काढा, तासन्तास आपल्या गप्पा रंगतील.

संजय मांजरेकरचं हे म्हणणं हे खरंच आहे. संगीत या गोष्टीवर त्याचं अपरंपार प्रेम आहे. मला आठवतंय, महाराष्ट्राचा लाडका पार्श्वगायक सुरेश वाडकरच्या संगीत शाळेसाठी निधी उभारण्याच्या उद्देशाने 14 एप्रिल 1993 ला कोल्हापूरमध्ये क्रिकेटपटू एक मदतनिधी सामना खेळले होते. त्या सामन्याच्या आदल्या दिवशी एका हॉटेलात स्वत: सुरेश वाडकरने एक मैफल आयोजित केली होती. या मैफलीत स्वत: सुरेश वाडकरने त्याची स्वत:ची गाणी सादर केल्यानंतर संजय मांजरेकरने आपल्या ठेवणीतली काही खास गाणी पेश केली होती. त्यातल्या ‘पल पल दिल के पास तुम रहती हो’ आणि ‘रातकली एक ख्वाब में आयी’ या दोन गाण्यांनी अख्खी मैफल संजय मांजरेकरने भारावून टाकली होती.

- Advertisement -

संजय मांजरेकरने ती गाणी ज्या नजाकतीत पेश केली होती त्यावरून त्याची गाण्याबद्दलची आवड तर कळून येत होतीच; पण त्याच्याकडे असलेला गाता गळाही दिसून येत होता. संजय मांजरेकरला मराठी भावगीतांचीही तितकीच आवड आहे. लता मंगेशकरांनी त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या आणि पार्ले टिळक विद्यामंदिराच्या प्रांगणात ठेवलेल्या एका कार्यक्रमाला त्याने त्यासाठी आवर्जून हजेरी लावली होती.

गाण्यांचा विषय क्रिकेट आणि क्रिकेटपटूंशी जोडल्यावर हमखास आठवणारं नाव म्हणजे पद्माकर शिवलकर! एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये त्यांनी आपला एक काळ दणाणून सोडला होता. त्या काळच्या ज्या बलाढ्य मुंबई संघातून ते खेळायचे त्या मुंबई संघाला त्यांनी आपल्या फिरकी गोलंदाजीच्या जोरावर कित्येक वेळा एकहाती जिंकून दिलेलं होतं. भारतीय संघात स्थान मिळवण्याइतकं कर्तृत्व त्यांनी वारंवार मैदानात दाखवून दिलं होतं. पण भारतीय संघात बिशनसिंग बेदीने आधीच स्थान पटकावल्याने पद्माकर शिवलकरांसाठी भारतीय संघाचं दार कधीच किलकिलंही झालं नाही. खुद्द पद्माकर शिवलकरांइतकंच ते शल्य त्यांच्या चाहत्यांच्याही मनात कायम राहिलं.

पण अशा वेळी पद्माकर शिवलकरांनी त्यांच्या गळ्यातल्या गाण्याचा आधार घेतला. हार्मोनियम समोर ठेवून त्यांनी आपल्या गाण्याचा रियाझ चालू ठेवला. महंमद रफींची गाणी हा त्यांचा हळवा कोपरा. रफींची गाणी ते अधेमधे ऑर्केस्ट्रातूनही गात राहिले. पुढे ध्वनिमुद्रिकांच्या जमान्यात त्यांनी गायलेलं गाणं रेकॉर्ड होण्याची एक संधी त्यांच्याकडे चालून आली. त्या गाण्याचे शब्द गीतकार शांताराम नांदगांवकर यांनी लिहिले होते. ते शब्द होते- हा चेंडू दैवगतीचा, फिरत असे असा उसळून, कुणाचे जीवन उधळी, दे कुणास यश उधळून!…पद्माकर शिवलकर यांच्या क्रिकेटच्या मैदानावरच्या जीवनगाथेवरच हे शब्द बेतलेले होते. पद्माकर शिवलकरांनी ते गाणं अगदी जीव लावून गायलं. आजही ते गाणं अधुनमधून आकाशवाणीवरच्या काही कार्यक्रमांमध्ये वाजवलं जातं.

शिवलकरांनी गायलेल्या या गाण्याची ध्वनिमुद्रिका त्यावेळी बाजारात आली तेव्हा त्या ध्वनिमुद्रिकेचं एक आगळंवेगळं वैशिष्ठ्यं होतं ते असं की त्या ध्वनिमुद्रिकेच्या दुसर्‍या बाजूला विक्रमवीर सुनील गावसकरांनी गायलेलं गाणं होतं…आणि त्या गाण्याचे शब्द होते- हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. हे गाणंही शांताराम नांदगांवकरांनीच लिहिलेलं होतं. सुनील गावसकरांनी गायलेलं हे गाणंही बर्‍याचदा त्या काळात आकाशवाणीवर वाजलं जायचं.

सुनील गावसकरांच्या गाण्याचा विषय निघालाच आहे म्हणून एक गोष्ट सांगायलाच हवी. त्या काळातल्या एका नियतकालिकात त्यांच्या गाण्याच्या आवडीनिवडीबाबत छापून आलं होतं आणि त्यात त्यांनी आपल्याला आवडलेलं गाणं सांगितलं होतं ते मुकेशचं – चांद सी मेहबुबा हो मेरी कब ऐसा मैने सोचा था, हां तुम बिलकुल वैसी हो जैसा मैने सोचा था…

…आणि आता मुकेशच्या गाण्याचा विषय निघाला आहे तर त्या काळचा फिरकीपटू चंद्रशेखरबद्दल काही सांगायलाच हवं. हो, चंद्रशेखर मुकेशचा आणि मुकेशच्या गाण्यांचा खूप मोठा चाहता होता. त्यावेळी कसोटी सामने पहायला येताना त्या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपल्यासोबत काही लोक छोटामोठा ट्रान्झिस्टरही घेऊन येत असत. अशा वेळी त्या ट्रान्झिस्टरवर जर समजा एखाद्या वेळी एखाद्याने विविध भारती लावली आणि त्याच वेळी मुकेशचं गाणं लागलं तर चंद्रशेखरचं लक्ष त्या गाण्याकडे हमखास जात असे.

भारतीय संघाचा कोच म्हणून काम केलेल्या आणि कोणे एके काळी न्यूझिलंड क्रिकेट संघाचं कप्तानपद भुषवलेल्या जॉन राइटबद्दल एक गोष्ट सांगितली जाते की, जॉन राइट आपल्या मनावरचा ताणतणाव आणि शरीरावरचा थकवा घालवण्यासाठी हॉटेलमधल्या आपल्या रूमवर जाऊन आपली गिटार काढून तिच्या तारा अलगद छेडत बसे.

…तर क्रिकेटचा विश्वचषक सुरू झाला आहे. त्यानिमित्ताने क्रिकेटपटूंना असलेला संगीताचा लळा सांगावासा वाटला इतकंच!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -