घरफिचर्सदवाखाने नाहीत, ही मरणाची दुकाने

दवाखाने नाहीत, ही मरणाची दुकाने

Subscribe

ठाण्यात आठ बोगस डॉक्टरांवर पोलिसांच्या गुन्हे शाखेने नुकतीच कारवाई केली. ठाणे आणि मुंबई परिसरातही बोगस डॉक्टरांचा प्रश्न गंभीर आहे. मुंबईच्या गुन्हे शाखेनेही मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईतून पाच बोगस डॉक्टरांना अटक केली होती. मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकरण होत आहे. बाहेरच्या राज्यातून लोंढेच्या लोंढे या भागात दाखल होत आहेत. या वस्त्या वणवा पेटल्यासारख्या वाढत असताना अशा वस्त्यांमधल्या गल्लीबोळात बोगस डॉक्टरांकडून ही ‘मरणाची दुकाने’ चालवली जात आहेत. मुंबईतील कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर तसेच ठाण्यातील मुंब्रा, कळवा किंवा भिवंडी या भागात मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आहे. यातील बहुतेक कामगार हे इतर प्रांतातून रोजीरोटीसाठी या भागात दाखल झालेले आहेत. भिवंडीतील हातमाग, कपडा उद्योगांमध्ये कुशल कामगारांची गरज त्यांच्याकडून भागवली जाते. भिवंडीतील कामगार वस्तीत साथीच्या आजारांचा प्रश्न नेहमीच डोके वर काढतो. पावसाळ्यात ही स्थिती आणखी वाईट होते. प्रदूषण, अस्वच्छता आणि डासांची पैदास हे प्रश्न कामगारांच्या वस्तीत नेहमीचेच असतात. त्यामुळे मलेरिया, टॉयफॉईड, डेंग्यूचे रुग्ण या भागात आढळतात. ठाण्यातील उल्हासनगरातही वेगळी परिस्थिती नसते. वाढत्या लोकसंख्येला पुरेशा सुविधा देताना महापालिकांची ओढाताण होत आहे. त्यातच जागांचे दर वाढले आहेत, भ्रष्टाचाराने स्थानिक स्वराज्य संस्था खिळखिळ्या करून टाकल्या आहेत. अशा परिस्थितीत पालिकेकडून पुरेशा आरोग्य सेवा पुरवताना राज्याच्या आरोग्य खात्याची दमछाक होत आहे. शहापूर, जव्हार, मोखाडा यासारख्या ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रांची स्थिती बिकट आहे. डॉक्टर्सचा अपुर्‍या संख्येचा प्रश्न आहेच. ग्रामीण भागात सेवा देण्यासाठी डॉक्टरांचा नकार हे एक कारण आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने स्थानिक गोरगरीब रुग्णांना मुंबई-ठाणे शहराकडे धाव घ्यावी लागत आहे. त्याचा परिणाम मुंबईतील जे.जे., केईएम, सायन यासारख्या हॉस्पिटलमध्ये दररोजच्या बाह्य रुग्ण विभागात हजारो पेशंट्सची गर्दी होत आहे. या सर्व बिकट स्थितीचा गैरफायदा गल्लीबोळातील बोगस डॉक्टर्सकडून उचलला जात आहे.कामगारांच्या वस्त्यांमधल्या एखाद्या गल्लीबोळात हे बोगस डॉक्टर्स आपले दवाखाने थाटून बसलेले असतात. या डॉक्टरांकडून इंजेक्शन देण्याच्या प्रकारासोबतच रुग्णांवर औषधोपचारही केले जात आहेत. कामगार वस्तीतील बहुतांशी कामगार निरक्षर असल्याने किंवा कमी शिकलेले असल्याने ते अशा डॉक्टरांच्या जाळ्यात अडकत आहेत. देवानंतर जीव वाचवणारा देवदूत म्हणून वैद्यकीय सेवेतील डॉक्टरांकडेच पाहिले जाते. त्यामुळे आजारातून बरे होण्याची इच्छा धरून आलेला पेशन्ट डॉक्टरांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्न उपस्थित करण्यास धजावत नाही. दवाखाने किंवा क्लिनिकमध्ये दर्शनी भागावर फ्रेम केलेली डॉक्टरची पदवी पाहण्याची तसदी पेशंटकडून घेतली जात नाही. संबंधित डॉक्टरांनी अशी पदवी फ्रेम करून दवाखान्यात दर्शनी भागावर लावण्याचा नियम असल्याचे गोरगरीब पेशन्ट्सच्या गावीही नसते. काचेच्या बरणीत भरून ठेवलेल्या रंगिबेरंगी गोळ्या, लाल रंगातील अधिकचे चिन्ह, स्पिरिटचा गंध, इंजेक्शन्सच्या ठेवलेल्या सिरिंज, लाल पिवळ्या औषधांच्या बाटल्या आणि तपासणीसाठी असलेला एक बेड आणि गळ्यात स्टेटोस्कोप अडवलेली व्यक्ती म्हणजे डॉक्टर आणि त्यांचा दवाखाना अशी समजूत शिकल्या सवरलेल्यांचीही असते, तिथे गोरगरीब आदिवासी किंवा निरक्षरांची काय कथा? वैद्यकीय सेवेबाबत सर्वसामान्यांना असलेल्या या उदासीनमुळेच बोगस डॉक्टरांचे बळ वाढत असते. गोपनीय मानल्या जाणार्‍या आजारांबाबत माणसांमध्ये जास्तीत जास्त भ्रम पसरलेला आहे. या भ्रमामुळेच अशा आजारांची वाच्यता केली जात नाही. त्यातच त्यामुळे संबंधित रुग्णांवर अशा आजारांबाबत उपचार सुरू असल्याची माहितीही इतर कुणाला नसते. असे आजार गोपनीय ठेवावे लागतात असा भ्रम संबंधित बोगस डॉक्टरांकडून जाणीवपूर्वक पसरला जातो. आपले ‘पितळ’ उघडे पडू नये म्हणून बोगस डॉक्टरांकडून केलेली ती तजवीज असते. कामगार वस्त्यातील शहरांच्या भिंतींवर अशा आजारांपासून मुक्तता मिळवून देणारे पोस्टर अडकवलेले असतात. यात अशा आजारांची भीती दाखवलेली असते आणि दवाखान्यांचे जुजबी पत्ते दिलेले असतात, ज्यात डॉक्टरचे नाव, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर, पदवी, असे काहीही नोंद नसते. बहुतांशी अशा दवाखान्यांतून बोगस डॉक्टर आपली ‘उपचाराची’ कामे करत असतात. डॉक्टरांना वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी आवश्यक परवाना, त्यांनी मिळवलेली वैद्यकीय शिक्षणातील पदवी या गोष्टींबाबत कमालीची अनभिज्ञता सामान्यांमध्येही आढळते. मुंबईतील भायखळा, लोअर परळ सारख्या भागात बोगस डॉक्टर काही महिन्यांपूर्वी पकडले होते. अशा पद्धतीने अधूनमधून कारवाई केल्याच्या बातम्या येत असतात; पण त्या पुरेशा नाहीत. त्यासाठी कडक कायदे करण्याची गरज आहे. अन्न आणि औषध प्रशासन, आरोग्य विभाग, पालिकांच्या आरोग्य यंत्रणा आणि पोलीस अशा सक्षम यंत्रणा असूनही बोगस डॉक्टरकीचा व्यवसाय चालवला जात आहे. मुंबई आणि ठाण्यातील झोपडपट्टी भागात एखाद्या गाळ्यात असा डॉक्टरकीचा धंदा सुरू केला जातो. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी दर्शनी भागावर कुठल्याशा माहितीत नसलेल्या युनिव्हर्सिटीचे बोगस प्रमाणपत्र फ्रेम करून टांगले जाते. वैद्यकीय शिक्षण देणारी ही युनिव्हर्सिटी खरीच अस्तित्वात आहे का, याची खातरजमा करण्याची गरज कुणालाही वाटत नाही. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईत पकडलेल्या बोगस डॉक्टरपैकी काही जणांनी शाळेची पायरीही चढलेली नव्हती. मात्र जडीबुटी, साबुदाण्यासारख्या गोळ्यांनी भरलेल्या बरण्या पाहून गोरगरिबांना हा डॉक्टरचा दवाखानाच असल्याचा भास होतो. हा भास होण्यामागे त्यांची दयनीय परिस्थिती कारण असते. ठाणे, मुंबईतील वोक्हार्ट, फोर्टीस, लिलावती अशी नावे झोपडपट्ट्यात राहणार्‍या कामगारांनी कधीतरी ऐकलेली असतात. या ठिकाणी त्यांना उपचार मिळणार नसतात, मात्र आजारातून बरे व्हायचे असते. गल्लीतल्या कोपर्‍यातला डॉक्टर आपल्याला बरे करेल, हा विश्वास कायम करण्याला त्यांचा असा परिस्थितीजन्य नाईलाज असतो. हा विश्वासच बरा करणारा आणि दिलासा देणारा असल्यामुळे गल्लीबोळात ५० रुपयांत मूठभर गोळ्या देणार्‍या बोगस डॉक्टरांच्या बोगस दवाखान्यांची पायरी चढली जाते. या गोळ्या आपल्या जिवावर बेतू शकतात…अशी पुसटशी शंकाही गोरगरिबांना येत नाही, वैद्यकीय व्यवसायातील डॉक्टर नावाच्या ‘देव’माणसाने निर्माण केलेल्या विश्वासाचा हा मोठा गैरफायदा हा ‘बोगस डॉक्टर’ घेत असतो. समाजातील या बोगस डॉक्टर नावाच्या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -