घरमुंबईकेडीएमसीत अपंग शिक्षक नोकर भरतीत घोटाळा?

केडीएमसीत अपंग शिक्षक नोकर भरतीत घोटाळा?

Subscribe

अपंगाचे बोगस प्रमाणपत्र असल्याचा आरोप

कल्याण-डोंंबिवली महापालिकेत अनेक घोटाळे गाजत असतानाच आता अपंग भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. अपंगाचे बोगस प्रमाणपत्र देऊन पाच जणांनी नोकरी मिळवली असल्याचे प्रकरण प्रहार संघटनेने उजेडात आणले आहे. त्यामुळे पालिकेतील नवीन घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तीन वर्षांपूर्वी महापालिकेतील अंध अपंग संवर्गासाठी शिक्षक सेवकपदी पाच अपंग शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. या नोकर भरतीत अटी शर्थींची पायमल्ली करण्यात आली असून अपंगत्वाचे खोटे दाखले देऊन दिशाभूल करण्यात आल्याची तक्रार प्रहार संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

- Advertisement -

बाजीराव साळूंखे (अल्पदृष्टी), भगवंत बिरादार (अस्थिव्यंग), अकिल बजीर (अल्पदृष्टी), स्वेता शिरशिल्ले (अल्पदृष्टी), सुरेखा खानापुरे (अल्पदृष्टी) या पाच अपंग शिक्षकांच्या भरतीवर आक्षेप घेण्यात आला असून या पाचही उमेदवारांमध्ये कोणतेही व्यंग आढळत नसून त्यांच्याकडून बोगस प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष एस.एल. पाटील यांनी केला आहे. तसेच भगवंत बिरादार हे कर्नाटकचे रहिवासी असताना त्यांना अपंगत्वाचा दाखला औरंगाबाद जिल्हा रुग्णालयातून मिळाला कसा?

असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. बोगस शिक्षक भरती रद्द करून दोषींवर कारवाई करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून ते पाठपुरावा करीत आहेत. मात्र पालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष एस.एल. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी संघटनेच्यावतीने महापालिकेच्या शेजारील शिवाजी चौकात उपोषण छेडण्यात आले होते. या भरती प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. पालिका प्रशासनाकडून उपोषणाची दखल घेत उपायुक्त मिलिंद धाट यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन दोषींची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -