घरफिचर्सभारतीय वेबसीरीजना ओढ पुराणांची

भारतीय वेबसीरीजना ओढ पुराणांची

Subscribe

अमेझॉन प्राईमवर चर्चेत असलेली ‘पाताल लोक’ नावाची वेब सिरीज आपल्याला पौराणिक कथांचा आणि सद्य:स्थितीचा संबंध सांगते. या सिरिजच्या सुरुवातीलाच एक संवाद आहे, जो आपल्याला पुराणातील कथांबाबत वर्तमानात किती अनभिज्ञता आहे हे सांगतो. हे शास्त्रात लिहिलंय असं सांगून काहीही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शेअर केलं जातं. पाताल लोक ही संकल्पना केंद्रस्थानी ठेऊन त्याच्या अवतीभवती फिरणारी सिरिजची कथा काहीवेळा आपल्याला पुराणातील संदर्भाची आठवण करून देते. या सिरिजचा विषय वेगळा असला तरी हिच्या नावामुळे आणि यात अधोरेखित केलेल्या काही संदर्भामुळे पाताल लोकला पौराणिक कथांचा संदर्भ असलेली सिरीज म्हणता येईल.

भारतीय सिनेमा आणि पौराणिक कथा यांचं नातं फार जुनं आहे, ज्या इंडस्ट्रीची सुरुवातच राजा हरिश्चंद्रपासून झाली, ज्या इंडस्ट्रीमध्ये महाभारत, भक्त प्रल्हाद, शकुंतला, रामायण सारख्या सर्वच सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. त्या इंडस्ट्रीला पौराणिक कथांबद्दल आकर्षण असणे साहजिक आहेच, पण नव्याने या क्षेत्रात आलेल्या वेब सिरीजला देखील याचा मोह आवरला नाही. पौराणिक कथांचा आधार घेऊन सिनेमा बनवणे नवीन नाही, जपान रोम या देशांच्या पौराणिक कथांवर अनेक सिनेमे बनले आहेत. इतर देशांच्या पौराणिक कथांच्या तुलनेत भारतीय कथा कधीही वरचढ ठरतील अशा आहेत, आता या खर्‍या की, खोट्या या खोलात जाणं मला आवश्यक वाटत नाही, पण प्रेक्षकांना आकर्षित करू शकेल इतका दमदार आशय भारतीय पुराणातील कथांमध्ये आपल्याला सापडेल.

जशी सिनेमाची सुरुवात पौराणिक कथा घेऊन झाली, अगदी तसंच आपल्याकडे आलेली पहिली सुपरहिट वेब सिरीज सेक्रेड गेम्समध्ये देखील आपल्याला याच पौराणिक कथांचा संदर्भ आढळेल. या सीरिजच्या एपिसोड्सचे नाव वाचले तरी याचा संदर्भ कळून येतो, अश्वथामा असो अतापि वतापी असो किंवा मग ययाती, त्या सीरिजच्या प्रत्येक एपिसोडच्या मागे एक पौराणिक कथा दडलेली आहे. लोकांचा इंटरेस्ट वाढवेल अशी कथा असेल, तर कलाकृती हिट ठरतेच, जितका सस्पेन्स आणि मसाला आपल्याकडच्या पौराणिक कथा आणि पात्रांमध्ये आहे तेवढा बाहेर कुठेच मिळणे शक्य नाही. म्हणून वेब सीरिजच्या निर्मात्याना देखील पौराणिक कथांचा संदर्भ देण्याचा मोह टाळता आला नाही.

- Advertisement -

महाभारतातील प्रत्येक पात्राची एक वेगळी कथा होती, ती कथा ही अशी की, त्या प्रत्येक पात्रावर सिनेमा बनू शकेल. त्यात सस्पेन्स होता, थ्रिल होतं आणि मसाला देखील. पौराणिक कथांसोबत लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत. काहींना त्या इतिहास वाटतात तर काहींसाठी त्या केवळ दंतकथा, पण तरीदेखील त्यांना विशेष महत्व आहे हे नाकारून चालणार नाही. भारतातील गाजलेल्या वेब सिरीजची यादी केली तर त्यात पौराणिक संदर्भ असलेल्या वेब सिरीजची नावं नक्की येतील. सेक्रेड गेम्स, लैला, असुर, पाताल लोक या त्यापैकीच काही वेब सिरीज आहेत. वेबसिरीज सुपरहिट करण्यासाठी हा पॅटर्न आता बहुतांश निर्मात्यांकडून वापरला जातोय. त्याचा हा पॅटर्न काही ठिकाणी यशस्वी होतो तर काही ठिकाणी तोंडावर आपटतो. उदाहरण द्यायचे झाल्यास नुकत्याच ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या अभिषेक बच्चनच्या ‘ब्रीद इन टू द शॅडोज’मध्ये वापरलेला पौराणिक संदर्भ कुठंही जुळून येत नाही. ब्रीद सीरीजच्या अपयशामागे कथा हे मुख्य कारण होतं, सिरीजमध्ये वापरला गेलेला रावणाचा आणि त्याच्या दहा शिरांचा संदर्भ लवकर कळून येत नाही. निव्वळ पॅटर्न फॉलो करण्याच्या नादात त्यांनी हा पौराणिक संदर्भमध्ये घातला आहे असं वाटतं. कथेत वाव नसतानादेखील जर असा संदर्भ बळजबरी जोडला असेल तर काय होते ? याचे जिवंत उदाहरण म्हणजे ब्रीद इनटू द शॅडोज आहे.

पौराणिक संदर्भाचा अचूक वापर केला आणि त्या दृष्टीनेच कथा लिहिली तर प्रेक्षकांना ती नक्की आवडते, याच उदाहरण आहे असुर नावाची वेब सिरीज, या सिरीजमध्ये पौराणिक संदर्भ, प्रतीकं यांचा वापर अतिशय योग्य पद्धतीने केलाय. फॉरेन्सिक सायन्सवर असलेल्या वेब सिरीजमध्ये अघोरी साधूंचा संदर्भ असो किंवा मूळ खलनायक शुभ जोशीची थियरी. हिरण्यकश्यपपासून ते कलीपर्यंत विविध असुरांचे संदर्भ अगदी योग्य पद्धतीने दिलेत. अजून एक खासियत म्हणजे यात असे काही पौराणिक संदर्भ वापरले आहेत ज्यांची माहिती सामान्य प्रेक्षकांनादेखील नव्हती. अनोळखी असलेले असे पौराणिक संदर्भ वापरल्याने लोकांनी त्याबद्दल जाऊन वाचले आणि त्याचा संदर्भ कथेशी जोडला. ऋषी कश्यपच्या दोन कन्या दिती आणि अदितीचा संदर्भ असो किंवा सर्वात जास्त आवडलेला तो स्टोरी ऑफ अप्रेशनचा संदर्भ सर्व काही लक्षात राहील अशा पध्द्तीने सादर केल्यानं ती वेब सिरीज लोकप्रिय ठरली.

- Advertisement -

पौराणिक संदर्भाच्या बाबतीत अजून एक गोष्ट म्हणजे यांचा अर्थ प्रत्येकजण आपापल्या परीने घेत असतो, जसा की असुरमध्ये स्टोरी ऑफ अप्रेशन शुभसाठी अत्याचाराची कथा होती, तर आपल्याकडे ती न्यायाची कथा म्हणून पाहिली जाते. एकंदरीत काय तर हे पौराणिक संदर्भ तुम्हाला विचार करण्याची मुभा देतात, तुम्ही प्रत्येक घटनेचा आपापल्या परीने संदर्भ लावत जातात. हीच बाब तुम्हाला कलाकृती सोबत जोडून ठेवते. सेक्रेड गेममध्ये पुराणातील कथा फार डिटेलमध्ये सांगितलेल्या नाहीत, एपिसोड्सची नावं वाचून आपण त्यांचा संदर्भ कथेशी जोडत जातो यामुळेच ती वेब सिरीज आवडली आणि लोकांनी त्याला उत्तम प्रतिसाददेखील दिला.

अमेझॉन प्राईमवर चर्चेत असलेली ‘पाताल लोक’ नावाची वेब सिरीज आपल्याला पौराणिक कथांचा आणि सद्य:स्थितीचा संबंध सांगते. या सिरिजच्या सुरुवातीलाच एक संवाद आहे, जो आपल्याला पुराणातील कथांबाबत वर्तमानात किती अनभिज्ञता आहे हे सांगतो. हे शास्त्रात लिहिलंय असं सांगून काहीही व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून शेअर केलं जातं. पाताल लोक ही संकल्पना केंद्रस्थानी ठेऊन त्याच्या अवतीभवती फिरणारी सिरिजची कथा काहीवेळा आपल्याला पुराणातील संदर्भाची आठवण करून देते. या सिरिजचा विषय वेगळा असला तरी हिच्या नावामुळे आणि यात अधोरेखित केलेल्या काही संदर्भामुळे पाताल लोकला पौराणिक कथांचा संदर्भ असलेली सिरीज म्हणता येईल. धर्म, संस्कृती, इतिहास या गोष्टी आपल्याच देशात नाही तर इतर ठिकाणीदेखील अस्मितेचा विषय बनतात.

भारतात पौराणिक कथांचा जो पगडा आपल्यावर आहे, तो चूक की बरोबर याच्या चर्चेत पडण्यात मला रस नाही, परंतु आपण ते मानत नाही असं म्हणून तो प्रभाव नाकारणेदेखील योग्य नाही. कुठलीही कला मुळातच समाजासाठी असते, जिथे या सर्व गोष्टींचा प्रभाव आहे तिकडे कलेवर तो असणे साहजिकच. भारतात पौराणिक कथा सरळ हाताळून त्यावर वेब सिरीज अजून तितकी दमदार बनलेली नाही, पण त्या कथांचा आधार घेऊन ज्या प्रकारे काही सिरीज आपल्याकडे आल्या आहेत त्या नक्कीच चांगल्या आहेत. वर्तमान काळात अशा पौराणिक कथांना पडद्यावर नव्या रुपात आणले तर कदाचित त्यांनादेखील उत्तम प्रतिसाद मिळू शकतो, पण सद्य:स्थितीत संदर्भाचा आधार घेऊन वेब सिरीज बनविण्याचा जो पॅटर्न निर्मात्यांनी हाताळला आहे, तो देखील वाईट नाही.

-अनिकेत म्हस्के 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -