घरफिचर्सपंडित सत्यदेव दुबे आठवणीतील अवलिया

पंडित सत्यदेव दुबे आठवणीतील अवलिया

Subscribe

असा उल्लेख करायला माझे मन धजावत नाही. लॉकडाऊनपश्चात नव्याने हे सदर सुरू झाले, तेव्हा त्यांचे स्मरण करणारा हा आठवणवजा लेख समयोचित ठरला असता. पण पुनरागमनाचा लेख आधीच लिहून झाला असल्याकारणाने ते शक्य झाले नाही. मात्र, जेव्हा विषय दुबेजींचा असतो, तेव्हा त्यांच्या वाढदिवसाचेच निमित्त हवंय असं अजिबातच नाही. दुबेजी म्हणजे अधून मधून कायमच आठवत राहणारे अवलिया. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांची मी अनुभवलेली एक छटा तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करावी, असं मनोमन वाटले आणि त्यासाठी केलेला हा प्रपंच...

साल 2001-02. हिंदी सिनेमा ‘जजंतरम ममंतरम’चं शूटिंग सुरू असतानाच्या दरम्यान फुरसदीच्या क्षणांमध्ये आम्हा सगळ्या कलाकारांच्या ‘थिएटर’ या विषयाला धरून खूप गप्पा व्हायच्या. माझा मित्र मानव कौल, मधुरा वेलणकर, ग्यानप्रकाश, बंडा जोशी, निशीथ दधीच, सुबोध पवार, कविता मूरकर, अमरजित आमले अशी बरीच नाटकातली मंडळी असल्याने जेव्हा जेव्हा सवड होई तेव्हा तेव्हा प्रत्येकजण नाटकाविषयीचे आपापले अनुभव, गंमतीजमती एकमेकांशी शेअर करत असू. या शेअर करण्यातूनच एक दिवस मला समजले की, सिनेमाचा हिरो मानव दुबेंजीसोबत थिएटर करतो. मी 1997 पासून नाटक या प्रकाराकडे पुरेशा गांभीर्याने आकृष्ट झालो होतो आणि 2001 पर्यंत पंडित सत्यदेव दुबे या माणसाबद्दल बरेच ऐकले होते.

तेव्हा मानव दुबेंजीकडे थिएटर करतो हे कळताच मी त्याला दुबेजींसोबत काम करण्याची माझी इच्छा बोलून दाखवली. त्यानेही फारसे आढेवेढे न घेता मला पृथ्वी थिएटरवर दुबेजींच्या दर मंगळवारी होणार्‍या बैठकींना यायला सांगितले. झालं. त्याने सांगितल्याप्रमाणे मी दर मंगळवारी ‘पृथ्वी’ला जाऊ लागलो. त्यावेळी दुबेजी त्यांनीच लिहीलेलं ‘ब्रम्हा विष्णु महेश’ हे नाटक करत होते. मीटिंगवर मीटिंग होत होत्या. दुबेजी त्यांच्या नाटकाविषयी बोलत. करंट अ़फेयर्सविषयी चर्चा व्हायच्या आणि पुन्हा पुढल्या मंगळवारी भेटू असं सांगत आम्ही एकमेकांचा निरोप घ्यायचो. असं सुरू असताना सुरूवातीचे काही आठवडे दुबेजींचं माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. किंबहुना ते असावं पण त्यांनी तसं कधी जाणवू दिलं नाही.

- Advertisement -

माझं दर मीटिंगमध्ये हजर राहण्यातलं सातत्य पाहून एकेदिवशी मात्र अनपेक्षितपणे ते स्वत:च माझ्याजवळ आले आणि माझी विचारपूस करू लागले. मी काय करतो, याआधी काय केलंय, क्या गो. पु. देशपांडे पढे हो, चेतन से मिले हो असं सगळं विचारून झाल्यावर, ‘मी त्यांच्याकडे का आलो’ असा रोकडा सवाल विचारत सरळ मुद्यावर आले. मीही माझ्या येण्याचा हेतू त्यांना सांगितला. मला त्यांच्यासोबत काम करायचे होते. ते ऐकताच दुबेजी म्हणाले, देखो समीर, तुमसे पहले मेरे पास पंद्रह अ‍ॅक्टर्स है जो कतार में खडे हैं. सीनीयॉरिटी को देखते हुए उनको छोडकर मैं तुम्हें रोल नहीं दे सकता. चाहो तो ‘ब्रम्हा विष्णु महेश’ में तुम शिवगणों के मॉब में काम करते रहो. आगे जैसे जैसे शोज होते रहेंगे, करते रहेंगे. अशाप्रकारे मॉबमध्ये का होईना, दुबेजींच्या नटसंचात माझा चंचुप्रवेश झाला. त्यानंतर मी ‘ब्रम्हा विष्णु महेश’चे बारा-तेरा प्रयोग केले. दुबेजींच्या ‘स्पीच’ आणि ‘फोकस’च्या मात्रा उगाळून काम करणारे त्यांचे मुख्य अ‍ॅक्टर्स पाहत होतो. शिकायचा प्रयत्न करत होतो.

असाच एके दिवशी सकाळी अकरा वाजता पृथ्वीला प्रयोग होता. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी प्रयोगाच्या खूप आधी म्हणजे साडेनऊच्या सुमारास पृथ्वीवर पोहचलो. वॉचमन तिवारीला इतर मुलं आणि दुबेजी कुठे आहेत असं विचारलं. तो म्हणाला, मुलं तर अजून आली नाहीत. पण दुबेजी आतमध्ये आहेत. जातोस तर जा. हे ऐकून आधी आत जाऊ की नको असं म्हणता म्हणता शेवटी आत जाऊनच बसू असा विचार केला. आत गेलो. संपूर्ण प्रेक्षागारात अंधार होता आणि स्टेजसमोरच्या अगदी पहिल्याच सोफ्यावर दुबेजी झोपले होते. त्यांची झोपमोड नको म्हणून मी दबक्या पावलांनी एकेक पायरी चढून जात सर्वात वरच्या सीटवर जाऊन बसलो. अशी साधारण दहाएक मिनिटं गेली असतील, तोच दुबेजी सोफ्यावरून उठून बसल्याचे दिसले. मी अगदी मागे वरच्या सीटवर असल्यामुळे त्यांना दिसलो नाही. आम्हा दोघांव्यतिरीक्त आता ऑडिटोरियममध्ये कुणीच नव्हते. दुबेजी काय करताहेत हे पाहत मी तसाच बसून राहिलो.

- Advertisement -

पाहतो तर काय…दुबेजी समोर पसरलेल्या काळोख्या षटकोनी रंगमंचाशी दोन व्यक्ती रूबरू होऊन बोलतात तसे मंद हातवारे करत बोलत होते…. जे त्यांना इतर कुणाहीसोबत बोलता येत नसावे, शेअर करता येत नसावे, ते कदाचित त्या रिकाम्या अंधार्‍या रंगमंचाशी शेअर करत असावेत…..ते दृश्य पाहून मी मागच्यामागेच सीटमागे लपून राहिलो. हळुहळू जागमाग वाढू लागली. त्यांचे मुख्य नट यायला सुरूवात झाली होती. रंगमंचही जनरलमध्ये उजळून निघाला होता. त्याच्या प्रकाशात जागेवरून सावकाश उठत दुबेजी उजव्या बाजूने विंगेतून बाहेर निघून गेले.

त्यानंतर त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत दुबेजी या ना त्या निमित्ताने भेटत राहिले. त्यांच्यासोबत नाटकाविषयी खूप गप्पा झाल्या. नाटक लिहिण्याविषयीच्या कार्यशाळा झाल्या. नंतरच्या काळात आम्ही स्वतंत्रपणे केलेल्या ‘अंधा युग’ या नाटकाच्या निमित्ताने असो की ‘रंग कारंथ’ हा आम्ही केलेला कारंथजींचा सांगितीक प्रवास दाखवणारा प्रयोग असो…दुबेजी कायम संपर्क राखून होते. नवं काय चाललंय याची आवर्जून चौकशी करत होते. पण इतके जवळ असूनही दुबेजींच्या मी साक्षीदार असलेल्या त्या अत्यंत खाजगी क्षणाविषयी त्यांच्याशी बोलायला मी कधीही धजावू शकलो नाही. शेवटपर्यंत ! तो त्यांचा खाजगी क्षण होता. मी अगदी अनपेक्षितपणे त्या क्षणाचा साक्षीदार झालो होतो. मात्र, ते जाईपर्यंत मी याचा उच्चार कुणाजवळही केला नव्हता. कुणाशीही शेअर केलं नव्हतं. आज ते या सदराच्या माध्यमातून करतो आहे.
गेल्या पंधरा तारखेला दुबेजींचा वाढदिवस होता. त्यांना ही स्मरणांजली !

-समीर दळवी 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -