घरताज्या घडामोडीप्रख्यात गायक बडे गुलाम अली खाँ

प्रख्यात गायक बडे गुलाम अली खाँ

Subscribe

बडे गुलाम अली खाँ हे अखिल भारतीय कीर्तीचे पतियाळा घराण्याचे प्रख्यात गायक होते. त्यांचा जन्म 2 एप्रिल 1902 रोजी लाहोर येथे झाला. त्यांचे घराणे गायकवादकांचे असून ते मूळ कसूर (जि.लाहोर) गावचे राहणारे होते. पतियाळा घराण्याच्या आकर्षक व विविध अंगांनी परिपूर्ण अशा गायकीचा परिचय भारतात सर्वत्र करून देण्यात बडे गुलाम अली खाँ यांचा वाटा फार मोठा आहे. त्यांचे वडील अलीबक्ष व चुलते काले खाँ हे दोघेही पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक फतेह अली यांचे शिष्य. अलीबक्ष गायनही करीत व दिलरूबाही उत्तम तर्‍हेने वाजवीत असत. अलीबक्ष काश्मीरच्या महाराजांचे दरबारी गायक होते. बडे गुलाम अली खाँ व त्यांचे कनिष्ठ बंधू बरकत अली खाँ हे दोघेही वडिलांजवळच संगीताचे पहिले पाठ शिकले. १९१९ मध्ये लाहोर संगीत संमेलनात त्यांनी पहिल्यांदा जाहीर गायन केले. गुलाम अली खाँ यांचा आवाज गोड व ग्रहणशक्ती तीव्र असल्यामुळे ते वयाच्या विसाव्या वर्षांपासूनच उत्तम तर्‍हेने गाऊ लागले. त्यानंतर कोलकाता व अलाहाबाद येथील संगीत संमेलनातील त्यांचे सादरीकरण गाजले. स्वतंत्र मैफली करून, गायक म्हणून त्यांना १९२७ नंतर कीर्ती मिळू लागली.

पंजाबमधील तसेच कोलकाता येथील संगीत परिषदांमध्ये १९४०-४२ पर्यंत त्यांनी चांगलेच नाव कमविले. १९४४ साली भरलेल्या ‘विक्रम संगीत परिषदे’त त्यांनी आपल्या कलेने मुंबईकरांना थक्क करून सोडले. देशाच्या फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले होते; मात्र पुन्हा ते भारतात परतले व मुंबईत येऊन राहिले. ख्याल, ठुमरी, भजने इ. प्रकार सारख्याच समर्थपणाने व गोडव्याने गाणारे सर्वढंगी व अद्वितीय गायक म्हणून त्यांची कीर्ती सर्व देशभर पसरली. विशेषतः पंजाबी ढंगाचे ठुमरी गायक म्हणून त्यांचा खास लौकीक होता. अशा या महान गायकाचे २३ एप्रिल १९६८ रोजी निधन झाले.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -