घरफिचर्समंदिर फुरसत से, पहले सरकार, हीच यांची खरी पुकार!

मंदिर फुरसत से, पहले सरकार, हीच यांची खरी पुकार!

Subscribe

मुंबईतले दोन श्रीरामसैनिक नेहमीप्रमाणे ट्रेनमध्ये चेपलेले, चौथ्या सीटवर आता पडतोय की नंतर, अशा अवस्थेत बसलेले किंवा ‘नंबर लावून’ चाळीच्या कठड्याला रेलून मुखपत्र चाळता चाळता बोलतायत…

सैनिक 1. : मी काय ओल्तो भावा, साहेबांनी काय शॉलेट गेम केला यार लोटस गँगचा… अपुन तो भई फुल फिदा.
सैनिक 2 : काय गेम केला?
सै. 1 : अरे भाई, अयोध्येत जाऊन आवाज टाकला, काय खाऊचं काम आहे का?
सै. 2 : आवाज टाकणं आणि नुसतं आवाजच टाकणं हे तसं खाऊचंच काम आहे की रे.
सै. 1 : काय ओल्तो तू यार! आधी मंदिर फिर सरकार, असं सांगून कोपच्यात घेतला ना भाई शेठला. आपल्याला तर मोठ्या साहेबांचीच याद आली…
सै. 2 : ती कशी?
सै. 1 : मोठ्या साहेबांनी पण डेअरिंग करून नायन्टी टूच्या मॅटरची रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती का घेतली…
सै. 2 : नव्हती घेतली.
सै. 1 : काय ओल्तो तू. ती पाडणार्‍या सैनिकांचा अभिमान आहे बोलले ते भावा. विसरलास का?
सै. 2 : ते म्हणाले बाबरी तोडणारे जर शिवसैनिक असतील, तर त्यांचा मला अभिमानच वाटेल. आम्ही तोडली आणि त्याचा अभिमान आहे, असं म्हणणं वेगळं आणि जर असले तर अभिमान वाटतो, असं म्हणणं वेगळं… त्यातून ते आपले सैनिक होते आणि त्यांचा मोठ्या साहेबांना अभिमान वाटत होता, अशी समजून निर्माण झाली हे खरं आहे मात्र. तोच त्यांचा हेतूही असणार.
सै. 1 : तू लै वकील टाइप बोलतो यार! एवढा तरी मानशील की छोटे साहेब बाहेर पडले, अयोध्येला गेले आणि तिथे त्यांनी आवाज टाकला म्हणून शेठच्या सरकारला आता हालचाल करायला लागेल…
सै. 2 : काय करतील ते हालचाल करून? प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. चेंडू कोर्टात आहे. तो निकाल काय येतो, त्यावर सगळं अवलंबून आहे. सरकारच्या हातात काही नाही. हे छोट्या साहेबांनाही माहिती आहे.
सै. 1 : मंग काय ते तिकडे हवा खायला गेले का? पार्लमेंटमध्ये एकदा फैसला झाला तर कोर्टाला विचारतो कोण?
सै. 2 : असं असेल तर शेठ काय छोट्या साहेबांच्या अयोध्याभेटीसाठी थांबून राहतील का रे! त्यांना कॅमेरा समोर असला तर सोबत स्पॉटनानापण चालत नाय… सगळा फोकस त्यांच्यावर पाहिजे… ते यांना फुटेज देतील का रे… शेठनी रिजर्व बँकेला साइडला करून नोटबंदी केली, राममंदिरात ते आपल्या साहेबांना जवळ करतील काय?
सै. 1 : अरे भाई, मग हा सगळा गेम काय? छोट्या साहेबांनी एवढा माहौल कशाला तयार केला?
सै. 2 : त्यांच्या सध्याच्या मोठ्या साहेबांसाठी… शेठसाठी.
सै. 1 : तू कायपण ओल्तो राव.
सै. 2 : अरे, जी गोष्ट आपल्या हातात नाही, ती गोष्ट आपण करतो आहोत, तिच्यासाठी केवढे प्रयत्न करतो आहोत, असं दाखवायला लागतं. सोन्याची अंडी देणारी कोंबडी कोण कापून खातो का? मंदिराचा मॅटर सोडला तर सांगायला काही आहे का दुसरं आपल्याकडे? आपल्या राज्यात आणि काँग्रेसच्या राज्यात फरक काय? तेव्हा पब्लिक शिव्या तरी घालू शकत होती. आता मारुतीच्या बेंबीतलं बोट गार म्हणायला लागतंय. मुंबईत आपण काय दिवे लावतो, तिकडे वर शेठच्या दिव्याखाली किती अंधार आहे, ते पब्लिकला कळत नाही का? आता इलेक्शन जवळ आली म्हणून ‘जय लक्ष्मीमाते’च्या जागी ‘जय श्रीराम’चा नारा आलाय. मंदिर बांधलं तर आम्ही बांधलं, नाही बांधलं तर कोर्टानी नाही बांधू दिलं, असा हा गेम आहे.
सै. 1 : अरे भाई, पण छोट्या साहेबांचा रोल काय याच्यात?
सै. 2 : जो परंपरेने आहे तोच. ज्या गोष्टी शेठ करू शकणार नाहीत, त्या करून टाकायच्या. जुन्या काळातले आपले शेठ वेगळे होते, आताचे वेगळे आहेत, एवढंच. शेठला कोर्टावर प्रेशर आणायचंय, कोर्टामुळे मॅटर लटकलाय असं दाखवायचंय, मंदिराच्या मार्गात कोर्ट आहे आणि कोर्टाच्या मागेही नेहरूच आहेत, अशी समजूत करून द्यायचीये. मग तिकडून मिशीवाले काका म्हणणार, कोर्टबिर्ट आम्ही ओळखत नाही, त्यांचा संबंध काय? इकडून आपले साहेब म्हणणार, सरकारने काहीतरी केलं पाहिजे. मध्ये कोर्ट आहे, याची दखलच नाही. लोकांना वाटतं आता मंदिर झाल्याशिवाय राहात नाही…
सै. 1 : अरे भाई, म्हणजे हिंदूची पुकार बिकार सगळं झूठ…
सै. 2 : अरे, ती तरी सगळ्या हिंदूंची आहे का? सगळे काय वेडे आहेत का? शिक्षण, चांगलं राहणीमान, चांगल्या संधी, शांत जीवन हे सगळं हवं असतं ना लोकांना? सगळ्यांना नाही कुठल्याच मंदिरात रस… यांची पुकार एकच आहे… पहिले सरकार, मग मंदिर… ते होईल सावकाश दोनपाचशे वर्षांत कधीतरी… घाई काय आहे?
सै. 1 : आयला भाई, तू ओल्तो ते कडू ओल्तो, पण सही ओल्तो यार, सही ओल्तो.

- Advertisement -

मुकेश माचकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -