घरफिचर्सगाणं ऐकणार्‍यांची अशीही जमात!

गाणं ऐकणार्‍यांची अशीही जमात!

Subscribe

गाणं सगळेच ऐकतात, पण गाण्यातल्या बारकाव्यानिशी गाणं ऐकणार्‍यांची एक अल्पसंख्य जमात असते. ही जमात गाणं फारच वेगळ्या पध्दतीने कान देऊन ऐकते. कुणी तरी आणून दिली आहे भेळ म्हणून खाल्ली बकाबका आणि टाकून दिला कागद कचराकुंडीत, अशी या जमातीची गाणं ऐकण्याची पध्दत नसते. तिला गाणं कसं सुरू होतं, ते कसं आणि कुठे संपतं याचा धांडोळा घ्यायचा असतो. तिला गाण्यातला एखादा शब्द कसा उच्चारला गेला आहे, गाण्यात एखाद्या विशिष्ट ठिकाणी सतार कशी वाजली आहे, तबल्याची तिरकिट कशी निनादली आहे, बासरीचे सूर कसे तरळले आहेत यातही रस असतो. ह्या जमातीसाठी गाणं एकदा ऐकून संपत नाही किंबहुना त्यांच्यासाठी गाणं एकदा वाजलं जातच नाही, त्यांच्यासाठी गाणं पुन्हा पुन्हा वाजलं जातं, मनभर, पोटभर वाजवलं जातं.

ही जमात ’जागते रहो’मधलं ’जागो मोहन प्यारे’ ऐकताना आधीची ’जब अंधियारा छाये’ ही गाण्याची लतादिदींनी केलेली आर्त सुरूवात कानाने तर ऐकतेच, पण काळजानेही ऐकते. त्यांनतरचा ’जागो रे जागो रे सब कलियां जागी, जागो रे जागो रे सब गलियां जागी’ हा नादमधूर कोरस ऐकण्यासाठी जीव टाकते. तो पुन्हा पुन्हा ऐकून तो मनात साठवते. तो ऐकताना तिचं मन सुन्न होऊन जातं आणि त्या गाण्याने निर्माण केलेला तो विषण्ण माहोल ते गाणं संपल्यानंतरही बराच काळ तसाच मनात ठेवते.

ही जमात जेव्हा ’गाईड’मधलं ’कांटों से खिंच के ये आंचल’ ऐकते तेव्हा ’आज फिर जीने की तमन्ना है, आज फिर मरने का इरादा हैं’ या दोन ओळींभोवती तिचं मन जरा जास्तच पिंगा घालतं. ’जीने की तमन्ना’ आणि ’मरने का इरादा’ ही जगण्याच्या प्रवासातली दोन टोकं म्हणजे त्या गाण्याच्या सौंदर्याचे दोन परमोच्चबिंदू त्या जमातीला वाटतात.

- Advertisement -

’दिल की गिरह खोल दो, चुप न बैठो, कोई गीत गाओ’ हे मन्ना डे आणि लतादिदींचं अजरामर द्वंद्वगीत ऐकताना तर पुढच्याच ’मेहफिल में अब कौन हैं अजनबी’ ह्या ओळींआधीची ती मनावर गोडवा पसरवतानाच अंगावर अलगद शहारा आणणारी तान संपूच नये असं ह्या जमातीला वाटत राहतं.

’जाइये आप कहां जायेंगे’ ऐकताना ह्या जमातीचं लक्ष ’दूर तक आप के पीछे पीछे’ ह्या ओळीनंतर गाण्याच्या सर्रकन बदललेल्या ंठेक्यावर असतं. ओ.पी. नय्यरच्या त्या गाण्यातल्या अचानक बदलणार्‍या ठेक्याने गाण्यातलं वातावरणच बदलतं, गाण्यातली गंमतच बदलते. ही जमात त्या गंमतीची नोंद घेते. पुन्हा पुन्हा नोंद घेते.

- Advertisement -

’फनाह’मधल्या ’चांद सिफारिश जो करता हमारी’ ह्या गिर्रेबाज र्‍हिदमने गोळीबंद असलेल्या गाण्यात ह्या जमातीचं संपूर्ण लक्ष एकवटतं ते शेवटच्या अंतर्‍यातल्या त्या दोन ओळींवर!…त्या ओळी असतात- ’हैं जो इरादे बता दूं तुम को, शर्मा ही जाओगी तुम; धडकने जो बता दूं तुम को, घबरा ही जाओगी तुम!’…ह्या दोन ओळीतल्या ’शर्मा ही जाओगी’ आणि ’घबरा ही जाओगी’ ह्या दोन्ही भावना गातानाचा अभिनय ऐकताना ह्या जमातीला कानामनात गुदगुल्या केल्यासारखं वाटतं.

…तर सांगायचा मुद्दा हा की गाणं सगळेच ऐकतात, पण एकेका सुरासाठी, एखाद्या ठेक्यासाठी, एखाद्या सुरासाठी, एखाद्या शब्दासाठी, एखाद्या भावनेसाठी एखादं गाणं जीवाचा कान करून ऐकणारी जमात असते. तिला किराणा मालासारखी नुसती गाण्यांची यादी देणारे लोक आवडत नसतात. त्यांच्या लेखी गाणं हा नुसता एक कलाप्रकार नसतो तर गाणं ही भावना असते. इतर जमातींचं माहीत नाही, पण ही जमात मात्र ती भावना जपते, जोपासते, ती गाणं गाणार्‍यांइतकीच गाणं जगते!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -