घरफिचर्सजंगल जंगल बात चली हैं

जंगल जंगल बात चली हैं

Subscribe

सह्याद्रीच्या जंगलात गेल्या कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर वाघोबांनी आपली जागा बनवली होती.ऊन,वारा,पाऊस सोसत वाघोबांनी जंगलात स्वत:चं स्थान निर्माण केलं होतं. आता,बस्स ! जंगलाचा राजा होणे ही एकच महत्वाकांक्षा वाघोबांना होती. दिवसरात्र फक्त राजा होण्याची स्वप्न वाघोबांना पडत होती. परंतु,काही केल्या एकट्याच्या जीवावर त्या राजाच्या खुर्चीपर्यंत पोहोचणे शक्य नाही, हे वाघोबांना कळून चुकलं होतं.आता काय करावं बरं? वाघोबांना प्रश्न पडला होता.गीरच्या अभयारण्यातील सिंहाला वाघोबांच्या महत्वाकांक्षेची खबर लागली. सिंहाचीही ‘सोच’ मोठी होती.त्याला आजूबाजूच्या सर्व जंगलांवर ताबा मिळवून स्वत:ला ‘राजेंद्र’ म्हणून घोषीत करायचे होते. सिंहाने या संधीचा फायदा घ्यायचा ठरवला. मैलाचा प्रवास करून सिंहाने वाघोबांची भेट घेतली.‘वाघोबा ! मी तुम्हाला तुमच्या ‘सत्ता ध्येया’पर्यंत पोहोचण्यासाठी मदत करू शकतो,’ सिंह धूर्तपणे म्हणाला. वाघोबांना पण कोणाच्यातरी मदतीची आवश्यकता होती.‘ठीक आहे! तुझी मदत हवीच मला,दोघेही एकदिलाने लढा देवू आणि राजाची खुर्ची हस्तगत करू,’वाघोबांनी जरा जोशात येऊन म्हटले. सिंहानेही होकार दर्शविला.‘पण….एक अट आहे, वाघोबा म्हणाले. ‘कोणती? सिंहाने पण प्रश्न केला. हे बघ तुझी मदत मला हवी आहेच,पण एक लक्षात ठेव जंगलात ‘मी मोठा भाऊ असणार आणि तू लहान भाऊ.’ही अट मान्य असेल तरच…वाघोबांनी आपले म्हणणे रेटले. कित्येक मैलांचा प्रवास करून आलेल्या सिंहाला देखील आता पर्याय नव्हता. त्यानेही अट मान्य केली. दोघेही आता कामाला लागले. दोघांनी अनेक वर्ष जंगलात संघर्ष केला. अनेक हत्ती,कोल्हे,लांडगे यांचा प्रतिकार केला. यश-अपयश दोघांच्या पदरी येत होतं. दोघांनीही लढून जंगलाचा मोठा प्रदेश आता स्वत:च्या नावावर केला होता. मिळणार्‍या यशाने सिंहाची देखील छुपी महत्वाकांक्षा लपून राहिली नव्हती. दरम्यान मोठा काळ लोटला, जंगलात जी रोपं उगवली होती, त्यांचे एव्हाना डेरेदार वृक्ष झाले होते. अनेक वर्षे जंगलात काढल्यानंतर सिंहाची देखील ताकद वाढली होती. या ताकदीच्या बळावर जंगलातले इतर छोटे जीव त्याला वचकून असत. हा वचक कधीकाळी त्याच्या मोठ्या भावाचा होता. मात्र आता परिस्थिती बदलली होती. आता तोच मोठा भाऊ असल्याच्या आवेशात संपूर्ण जंगलात आपली आयाळ हलवून गर्जना करत हिंडत फिरत होता. त्यामुळे त्याचीच सगळीकडे हवा झाली होती.
आता छोटा भाऊ छोटा राहिला नव्हता, जंगलचा राजा होण्याची महत्वाकांक्षा तो आता ठासून मांडू लागला. वाघाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु,त्याचा फार काही फरक पडला नाही. खरंच सिंह एके दिवशी जंगलाचा ‘राजेंद्र’ झाला. आता जंगलाच्या मोठ्या भूभागावर तो हक्क सांगू लागला. वाघोबांनी डरकाळी फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु,त्याने सिंहाची खुर्ची काही तो हादरवू शकला नाही. सिंहाने देखील वाघोबांशी जुळवून घेत, कधी त्यांची मुस्कटदाबी करत आपली तर कधी ‘ब्लॅकमेल’ करत आपली खुर्ची राखून ठेवण्यात यश मिळवले. तरी देखील जंगलाचा राजा होण्याची वाघोबांची महत्वाकांक्षा संपलेली नव्हतीच. मात्र सिंहाच्या ताकदीचा त्याला अंदाज होता. सिंहाची हवाच ओळखून त्यांनी तूर्तास डरकाळी फोडणं थांबवलं होतं. आता यापुढेही ही हवा ओळखून जंगलात गपगुमान राहायची सवय वाघाला लावून घ्यायचीय…अशीच बात सध्या जंगल जंगल चली हैं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -