घरफिचर्सबुक रिव्ह्यू : रिंगणनाट्य

बुक रिव्ह्यू : रिंगणनाट्य

Subscribe

दाभोलकरांच्या हत्येनंतर अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी त्यांचे विचार पुढे नेऊन रिंगणनाट्य सादर करायला सुरुवात केली. त्याच्याच प्रसार आणि प्रचारासाठी या पुस्तकाची निर्मिती झाली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध ‘महाराष्ट्र अंनिस’ लोकरंगमंचच्या कार्यकर्त्यांनी सनदशीर आणि सर्जनशील मार्गाने केला. रिंगणनाट्याच्या माध्यमातून ठिकठिकाणी हा निषेध करण्यात आला. या रिंगणनाट्याच्या निर्मितीसाठी ज्या कार्यशाळा अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी घेतल्या, त्या कार्यशाळांचा आणि रिंगणनाट्यांचा वेध रिंगणनाट्य या पुस्तकात घेण्यात आला आहे. अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी कार्यकर्त्यांच्या वेदनेचा विलाप या रिंगणातून व्यक्त केला. या रिंगणासाठी त्यांनी पाच कार्यशाळा घेतल्या. त्यानंतर जागोजागी त्यांनी हे रिंगणाचे विश्व उभे केले. विवेकाने काम करणाऱ्या व्यक्तींनी आपले विचार यामधून मांडले आहेत. या रिंगण कार्यशाळेचे आयोजन बऱ्याच ठिकाणी करण्यात आले. त्यामध्ये पुणे, पनवले, मुंबई, चाकण, पिंपरी – चिंचवड, इस्लामपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, नंदुरबार, लातूर आणि सोलापूर या ठिकाणाहून कार्यकर्ते निवडण्यात आले होते. प्रशिक्षणार्थींची संख्या ही मर्यादितच असते. त्यामुळे संवाद साधणे अतिशय सोपे जाते. तसेच कार्यशाळेचे स्थळ हे गावापासून दूर आणि शांत ठिकाणीच निवडण्यात येते. जेथे प्रशिक्षणासाठी ऐसपैस वर्ग, राहण्याच्या खोल्या, जेवणखाणाची सोय, स्वच्छतागृहे इत्यादी पुरेशा आणि योग्य सुविधा करण्याचा नक्कीच अतुल पेठे आणि इनामदारांचा आग्रह असतो. यामधूनच रिंगण नाट्यनिर्मिती करून सर्व प्रशिक्षणार्थींना कार्यशाळेत शिकविले जाते. यामध्ये नवीन प्रशिक्षक तयार करण्यात येतात. या कार्यशाळेत मोबाईल बंद असतो. याशिवाय वेळ पाळली जाते. आपापली कामे आपण कशी करावी हेदेखील यामध्ये शिकवण्यात येते.

डॉ. दाभोलकरांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा लेखकांचा मानस आहे. या नाटकामधील संवादातून त्यांचे प्रखर विचार जाणवतात. सध्याच्या वातावरणात, अर्थात भेदाभेद करण्याच्या काळामध्ये प्रत्येकाने ठामपणे उभे राहणे आवश्यक आहे. माणसामाणसातील भेद हे राजकीय हेतून प्रेरित असतात. बहुतेक ठिकाणी सध्या हिंसा जास्त प्रमाणात जाणवत आहे. बलात्कार, चोरीचकारीच्या घटनांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची निर्घृण हत्या झाली, मात्र मारेकरी अजूनही मोकाटच आहेत. दाभोलकरांसारख्या विवेकी माणसाची हत्या झाल्यानंतरही आपण काहीही करू शकत नाही हे शल्य मनात टोचू लागल्यानंतर रिंगण या नाट्याचा जन्म झाला असे लेखकांनी पुस्तकामध्ये नमूद केले आहे. रिंगण हे नाट्य हा पथनाट्याजवळीलच प्रकार आहे. पथनाट्याची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची भाषा. ती बोलीभाषा तर हवीच पण ती लोकांना समजायला हवी. कमीत कमी वेळामध्ये लोकांशी योग्य प्रकारे संवाद साधता आला पाहिजे. रस्त्यातला कोणताही माणूस अर्थात गाडीवाला, विद्यार्थी, गृहिणी, कष्टकरी, हमाल हा कोणीही प्रेक्षक असू शकतो. त्यामुळे तो प्रत्येक माणूस यामध्ये गुंतून जायला हवा ही सर्वस्वी लेखकाची जबाबदारी असते आणि लेखकानंतर ही जबाबदारी असते ती ते पथनाट्य रंगवणाऱ्या कलाकारांची. त्यांना सर्व गोष्टींची जाण असणे अत्यंत आवश्यक असते.

- Advertisement -

हे रिंगण अतिशय संवेदनशील आणि एका विचाराने प्रेरित असते. तो विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी आपणही तितकंच संवेदनशील असणे महत्त्वाचे असते. रिंगण हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक जाहीर विधान आहे. लोकांचे प्रामुख्याने प्रबोधन करणे हाच त्याचा मुख्य उद्देश आहे. रिंगणच्या माध्यामातून अतुल पेठे आणि राजू इनामदार हे अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाच्या व्यापकतेवर भर देऊन विचार परिवर्तन करण्याचे काम करत आहेत.
भारतातील सामाजिक न्यायाचे प्रश्न आणि समस्या व्यापक आहेत. सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सर्व वंचितांना समान संधी आणि दर्जा देण्याचा. त्यासाठी सर्व दुर्बल घटकांना समाजाच्या मध्य प्रवाहात आणण्याचं सर्वसमावेशक काम करावे लागते. लेखक सध्या तेच काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. एखाद्या संघटनेने इतक्या कमी कालावधीमध्ये इतकी मजल मारणे हे खचितच. तत्कालिन राजकारण, समाजकारण यांच्यापासून मराठी नाटक कधीही लांब नव्हते. परिस्थितीचे पडसाद नाटकांमधूनच नेहमीच दिसत आले आहेत. रिंगणही त्याला अपवाद नाही. वास्तविक रिंगण या नाटकामध्ये हा धागा जास्तच घट्ट दिसतो. सुरुवातीला यासंदर्भात लेखकांनादेखील आत्मविश्वास नव्हता. पण नंतर लोकांचा प्रतिसाद बघून आपण योग्य दिशेने जात असल्याचे त्यांनाही जाणवले.

- Advertisement -

अजूनही दाभोलकर, कलबुर्गी, पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध आणि तपास सुरु आहे. कोणताही धागा नीट हाती नाही. पण रिंगणच्या माध्यमातून अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी सुरु ठेवलेले कार्य हे अप्रतिमच आहे. वास्तविक मारेकरी मिळण्यासाठी हा एक प्रकारचा लढाच आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -