घरफिचर्सफुटी चाय

फुटी चाय

Subscribe

काय गंमत आहे ना ! एखाद्या पदार्थांला इंग्रजी नाव ठेवलं, त्याला छान वेगळ्या क्रोकरी सेटमधून सर्व्ह केलं की त्याचं मूल्य किती वाढतं ना! हा ब्लॅक टी खरंच छान लागत होता. चहा पावडर आणि साखर योग्य प्रमाणात आणि बरोबर चहापत्ती. मित्राची आणि माझी चर्चा संपली आम्ही आपापल्या घरी निघालो. ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आलो ट्रेनची वाट बघत विचार करत होतो तो ‘ब्लॅक टी’चा नव्हे ‘फुटी चाय’चा.

हल्ली महिन्याभरापूर्वीचा प्रसंग. काही निमित्ताने एका शालेय मित्राला भेटायचे होते. मी कॉलेजमधली नित्याची कामे आटोपून मित्राला कुठे भेटायचं याबाबत फोनाफोनी करून कॉलेजमधून निघालो. अर्ध्या-पाऊण तासात मी ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो. माझा मित्र आधीच तिथे पोचला होता. छान बर्‍यापैकी रेस्टॉरंट होतं. पहिली औपचारिकतेची नौबत झडली. आमच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी वेटरला ऑर्डर काय द्यायची ? मी जेवून आलो होतो. मित्र जेवणार होता, त्याने जेवणाची ऑर्डर दिली. मला सूप, कॉफी असं काही घेण्यासाठी आग्रह करत होता, पण माझी खरंच तशी इच्छा नव्हती. तरी मित्र म्हणाला ” अरे जेवणानंतर ब्लॅक टी घे. मस्त लागेल”. मी होकार दिला. वेटर ऑर्डर घेऊन गेला. आमची चर्चा सुरू झाली. मित्राच्या जेवणाची ऑर्डर आली पाठोपाठ माझी ब्लॅक टी आली. गप्पा मारता मारता मी पहिला घोट घेतला तर ही ब्लॅक टी कुठली? ……. ही तर फुटी चाय !

काय गंमत आहे ना ! एखाद्या पदार्थांला इंग्रजी नाव ठेवलं, त्याला छान वेगळ्या क्रोकरी सेटमधून सर्व्ह केलं की त्याचं मूल्य किती वाढतं ना! हा ब्लॅक टी खरंच छान लागत होता. चहा पावडर आणि साखर योग्य प्रमाणात आणि बरोबर चहापत्ती. मित्राची आणि माझी चर्चा संपली आम्ही आपापल्या घरी निघालो. ठाणे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर आलो ट्रेनची वाट बघत विचार करत होतो तो ‘ब्लॅक टी’चा नव्हे ‘फुटी चाय’चा.

- Advertisement -

लहानपणी गावी आमचं घर सोडलं तर गावातल्या इतर घरात दूध नसायचे, घरात कोणी पावना आलाच तर ही मंडळी आमच्याकडून पावण्यासाठी दूध घेऊन जायची. सकाळच्या वेळी म्हणजे सकाळी साधारण ६/६.३० वाजता कोण गडी यायचे, कोण शेतीचं अवजार मागायला यायचं, कोण विहिरीवर पाणी भरायला जाताना सहज डोकावून जायच्या. पण हे सगळे सकाळी चहा पिऊन जायचे, माझी काकी भाकरी थापता थापता आल्या गेल्या प्रत्येकाला चहा द्यायची, आमच्या घरी कोकणातल्या गावठी गाई त्या दूध किती देणार त्यामुळे बहुतेक आलेले लोक फुटी चहा पिऊन जायचे. फुटी चाय म्हणजे थोडक्यात बिनदुधाचा चहा. कोकणात दुधाचं नेहमीच दुर्भिक्ष्य. सामान्य शेतकरी जोताच्या बैलजोडीशिवाय तिसरं जनावर ठेवायच्या मानसिकतेत कधीच नव्हता. घरोघरी लहान मुलांसाठी दुधाच्या पावडरचे डबे असायचे.

पण फुटी चहा मात्र फेमस, नाव कमावून होती. या फुटी चायच्या जोरावर लोकांनी डोंगरएव्हढे कष्ट केले असतील. म्हणजे आगारात, गाळवात झाडांना माती घालणं असो. लाकडं करणं असो किंवा खोपीत लाकडं भरणं असो, गोठ्यात गवतं भरणं असो सगळ्या जड कामाला गडी माणसं यायची, सकाळी कामं करायच्या वेळी फुटी चाय नी सोबत मूठभर फरसाण दिलं की माणसं खूश होऊन जायची आणि जोमाने काम करायची. तोपर्यंत गाव तसं दिसायला सज्जन होतं कारण इंग्लिश किंवा देशी मद्य लोक सहज चारचौघात पीत नसत. या देशी आणि इंग्रजीच्या सहज वावरात फुटी चाय कुठे मागे पडली हे कळलंच नाही.

- Advertisement -

या फुट्या चायचे किस्से पण चांगलेच हसू फुटायला लावायचे. गावचा बाबू पटेल म्हणजे अट्टलबेवडा, पण त्याचा उपसर्ग कोणाला नव्हता. तो सकाळी एका हातात विडी आणि दुसर्‍या बाजूला काचेच्या ग्लासातून फुटी चाय घेऊन घराच्या पेळेवर बसला होता, ती चहा म्हणजे लांबून कोणालासुद्धा मद्य वाटावं. तिकडून आबा खोत जात होते त्यांचं लक्ष त्या ग्लासाकडे गेलं आणि त्यांनी पुढचा मागचा विचार न करता “बाबू रातची उतारली नाय तर सकाळी घेवक बसलंस” त्यावर बाबू चिडला आणि आबांच्या पुढ्यात जाऊन त्याने ग्लास धरुन ” घेवा चव घेवन बघा ” असं म्हणत जवळपास तो ग्लास त्यांच्या तोंडाकडे घेवन गेला. आबांनी तिथून पळ काढला आणि ज्याला त्याला बाबूने मला सकाळी जबरदस्ती दारू पाजली अशी बोंबाबोंब केली. शेवटी चार जाणती माणसं बाबूच्या घरी गेली. चौकशी केली आणि खरा प्रकार शोधून काढला.

असाच पंधराएक वर्षापूर्वी श्रावण महिन्यात गावी गेलो होतो. त्यावेळी मधल्यावेळेची एसटी पकडली आणि मामाकडे म्हणजे करंज्याला गेलो. मामाकडे दुपारचं जेवण झाले, दुपारची वामकुक्षी झाली आणि मामाचा मुलगा म्हणाला “चल भिरवंड्याला शकुताईकडे जाऊ, इथून चालत पाऊण तासात पोचू” मला देखील श्रावणात चालत जाण्यातली मौज अनुभवायची होती. चहा घेऊन मी आणि मामाचा मुलगा शकुताईच्या घरची वाट चालू लागलो, पाऊण एक तासात ताईच्या गावी पोचलो, आम्ही चहा फराळ करून निघालो तेवढ्यात संध्याकाळी झाली. मामेभावाकडे बॅटरी होती म्हणून काळजी नव्हती. ताईच्या घराची आणि वाडीची हद्द ओलांडली आणि निसर्गाचं रूप पालटलं. जोरात पाऊस सुरू झाला. पावसाची अपेक्षा नव्हती.

माझ्याकडे छोटी छत्री होती. आम्ही दोघे छत्रीतून अर्धे भिजत अर्धे पावसात असे एखादं किलोमीटर चाललो आणि कोकणातल्या त्या तडाखेबंद पावसात माझ्या छत्रीने मान टाकली, दोन काड्या मोडल्या आणि छत्री म्यान करून शेवटी एका झाडाखाली उभे राहिलो. पाऊस काही कमी होईना. शेवटी आम्ही दोघे रस्त्याच्या कडेने चालू लागलो. दोघेही नखशिखांत भिजलो. थंडीने हुडहुडी भरली, पण पर्याय नव्हता. वाटेत ओळखीचं कोणाचं घर नव्हतं. पाऊस बंद झाला तरी संपूर्ण अंग भिजल्याने थंडी कमी होईना. कुठे हॉटेलदेखील मिळेना. लांब कुठे तरी बारीकंस हॉटेल दिसत होतं. आम्ही दोघे तिकडे गेलो. एक वयस्कर स्त्री हॉटेलात होती.”आवशी चाय आसा काय गे ?”

“आसा पण फुटी चाय आसा, आता पावस इलो तवा वरचे कामगार चाय पिवक इले हुते. फुटी चाय देव ”
“चलात पण लवकर दी”

आजीबाईनी पटकन चहा बनवायला घेतला. आम्ही हॉटेलात आत बाकड्यावर बसलो तोपर्यंत आजीने फुटी चाय बनवली. मी चायचा पहिला घोट घेतला आणि तृप्त झालो. कढत चहा तोदेखील पात घातलेला. अंगात उबारी आली. त्या दिवशी त्या फुट्या चायने पुढील संकटातून वाचवले नाहीतर घरी पोचेपर्यंत थंडीने हुडहुडत आजारी पडलो असतो खास ! त्यादिवशची ती फुटी चाय कायम स्मरणात राहिली.

कधीकधी गावी थोरल्या काकीने घावणे किंवा पोळ्या केल्या की मला न चुकता बोलवायची आणि फुट्या चहाबरोबर देत म्हणायची, “घावणे पोळयो फुट्या चायतसुन बर्‍यो लागतत.” काकीने अशी तारीफ केल्यावर तिथे बाकी अपील नाही. पण घावणे आणि पोळ्या खरंच फुट्या चायमधूनच छान लागतात.

आज कोकणात शक्यतो फुटी चाय कोणाला देत नाहीत, कोणाला मधुमेह आहे कळल्यावर कमी साखर किंवा बिन साखर किंवा मग अगदीच कोणाला हवी असेल तर फुटी चाय. कोणाच्या घरात मयत झालं की स्मशानभूमीतून मंडळी परत घरात आली की, त्यांना फुटी चाय दिली जाते. एवढंच काय तो फुट्या चायचा संबंध उरलाय. या फुट्या चायने गाव जोडला. माणसं जोडली. ही फुटी चाय म्हणजे एक प्रकारचं औषधचं होतं. गुणकारी होतं. थोडी पावडर आणि चहा पात यांची मात्रा वाढवली की सर्दी, ताप, खोकला याचं गुणकारी औषध ठरायचं. आता गावागावात दुधाच्या पिशव्या मिळतात त्यामुळे गोठ्यात दुभती जनावरं नसली तरी फुटी चाय मिळणं जरा अवघड आहे. त्यापेक्षा मुंबईसारख्या शहरात नेहमीच्या चहाच्या तिप्पट किंमत मोजून ” ब्लॅक टी’ तरी मिळेल…..

– प्रा. वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -