घरफिचर्सकरोना आणि हिंदू संस्कृती

करोना आणि हिंदू संस्कृती

Subscribe

एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करणे किंवा ‘राम राम’ म्हणणे, हा हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भारतातील खेड्यापाड्यांत आजदेखील ही सात्त्विक परंपरा पहायला मिळते. दुर्दैवाने हिंदू संस्कृतीचे पालन करणार्‍यांना भारतात ‘प्रतिगामी’ ठरवले गेले आणि ही परंपरा हळूहळू लोप पावत गेली. आता ‘करोना’च्या निमित्ताने पुन्हा भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले. केवळ हस्तांदोलनाबाबतच नव्हे, तर साम्यवादाचा पगडा असलेल्या चीनने नागरिकांना मांसाहारही न करण्यास सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत शाकाहाराला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. तसेच करोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला, त्यांचे शव अग्नी देऊन दहन करण्याचा निर्णय चीनने घेतला. जगभरात केवळ हिंदू धर्मामध्येच मृतदेहाला अग्नी देऊन त्यांचे दहन करण्याची प्रथा आहे. एकूणच काय तर हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेली वचने, प्रथा, परंपरा किती विज्ञाननिष्ठ, मानवीहितकारक, तसेच निसर्गसहाय्य आहेत याचा अनुभव करोनाच्या निमित्ताने अवघ्या जगाला आला आहे. भारतात मात्र जेथे पिकते तेथे विकत नाही, अशी परिस्थिती आहे. भारतातील बुद्धीवाद्यांना मात्र नमस्कार करणे, शाकाहार करणे यांसारख्या भुरसटलेल्या हास्यास्पद गोष्टी वाटतात, हे भारतीयांचे दुर्दैव म्हणावे लागेल. ,,,,,,,,,,,,,,,

करोना या विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजवला आहे. या जीवघेण्या विषाणूचा जन्म चीनमध्ये झाला, तो कसा झाला याबाबत अनेक संदिग्ध माहिती आहे. ज्या वुहानमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्या वुहानमध्ये विषाणूंवर संशोधन करण्याच्या अनेक प्रयोगशाळा आहेत. त्यातील एका प्रयोगशाळेत म्हणे चीन जैविक शस्त्राची निर्मिती करत होता. त्याचा एक भाग हा करोना विषाणूची निर्मिती होती. मात्र, चीनच्या दुर्दैवाने त्या विषाणूचा वुहानमध्येच प्रादूर्भाव झाला आणि या शहराचे होत्याचे नव्हते झाले. अवघ्या चीनला या विषाणूचा इतका जबरदस्त फटका बसला की, चीनची अर्थव्यवस्था खंडित झाली. तब्बल ७ ते ८ वर्षे चीन मागे गेला, असे जाणकार म्हणत आहेत. दरम्यान, अद्याप केवळ आरोप आहे. त्याची कुठेही स्पष्टता झाली नाही, त्यामुळे करोना हा चीनच्या जैविक शस्त्राच्या निर्मितीचा एक भाग होता का, यावर आज तरी निष्कर्ष काढता येणे शक्य नाही.

दुसरे हा विषाणू साप, वटवाघूळ यांचे सूप चीनमध्ये सेवन केल्याने त्या माध्यमातून तो प्रसारित झाला, असेही म्हटले जात आहे. तर हा विषाणू जलचर प्राण्याचे सेवन केल्याने झाल्याचेही म्हटले जात आहे. खरे तर चीनमध्ये नागरिकांना अन्नपदार्थ खाण्यामध्ये कुठलेही निर्बंध राहिलेले नाही. सरपटणारे, उभयचर, जलचर, आकाशात उडणारे जमिनीवर राहणारे असे कोणतेही पशू-पक्षी चीनमधील नागरिक खातात. ते कधी कच्चे खातात, तर कधी त्या जनावरांचे सेवन केल्याने काय परिणाम होतात, याचा विचार न करता खातात. चीनच्या नागरिकांमध्ये याच दुर्गुणामुळे त्यांना या जीवघेण्या विषाणूने झपाटले आहे, असेही म्हटले जात आहे.

- Advertisement -

सुरुवातीला अवघ्या जगापासून या विषाणूच्या संसर्गाची माहिती लपवून ठेवणार्‍या चीनमध्ये जेव्हा मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत जावू लागली, परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. या विषाणूला थोपवण्यासाठी अनेक प्रयत्न करूनही प्रतिबंधक लस उपलब्ध होत नाही, अशी स्थिती निर्माण झाली, तेव्हा मात्र चीन हादरून गेला आणि जगासमोर ही परिस्थिती मांडू लागला, तोपर्यंत मात्र फार उशीर झाला होता, ज्या दिवशी चीनमध्ये जगासमोर ही वस्तुस्थिती मांडली, तोपर्यंत जगभरातील २३ देशांमध्ये हा विषाणू पोहोचला होता. जर चीनने तात्काळ जगाला विश्वासात घेतले असते, तर आज जागतिक महामारीसारखी परिस्थिती नक्कीच निर्माण झाली नसती.

मात्र, आता ती जर-तर ची गोष्ट बनली आहे. आता तब्बल ६५ देशांमध्ये करोनाचा संसर्ग झाला असून त्यात भारताचाही सामावेश झाला आहे. भारतात रविवारपर्यंत ३१ करोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली होती. चीनमध्ये जेव्हा या विषाणूचा प्रादूर्भाव होऊ लागला, तेव्हा त्याची कुठलीही कल्पना चीनला नव्हती. त्यामुळे हा विषाणू अगदी झपाट्याने पसरला. मात्र, भरतात जेव्हा करोनाग्रस्त रुग्ण आढळले तेव्हा ते सर्व अन्य देशातून आलेले लक्षात आले. त्यामुळे भारतात जोवर हा विषाणू पसरत आला, तोवर या विषाणूविषयी जगभरात जागृती झाली होती. म्हणूनच भारतात याविषयी खबरदारी घेण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देशभरात जनतेमध्ये सूचना करण्यात आल्या. त्यामुळे याचा प्रादुर्भाव भारतात जास्त झाला नाही. मात्र, यानिमित्ताने एक चांगली गोष्ट घडली. अवघ्या जगाने भारतीय अर्थात हिंदू संस्कृतीचे अनुकरण करणे सुरू केले.

- Advertisement -

आधुनिक विज्ञानाची सर्वांत मोठी ठेकेदार असलेली अमेरिका या विषाणूवर अद्याप प्रभावी औषध शोधू शकलेली नाही. जेथे या विषाणूचा उगम झाला, तो चीनही हतबलतेचा सुस्कारा सोडण्यापलीकडे दुसरे काहीही करू शकलेला नाही. यापूर्वीही ‘स्वाईन फ्लू’, ‘ईबोला’ अशा अनेक जीवघेण्या विषाणूंनी हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. त्या त्या वेळी काही तात्कालिक लसींचा शोध लागलाही; पण तो कुचकामी ठरला.‘करोना’वर अद्यापही औषध सापडले नसल्याने त्याचा संसर्ग होऊ न देण्याची खबरदारी जगातील सर्व देश घेत आहेत. तोंडाला ‘मास्क’ बांधणे, एकमेकांशी लांबून बोलणे आदी उपाय योजले जात आहेत; पण एकमेकांशी हस्तांदोलन न करण्याचा खबरदारीचा उपाय हाच प्रभावी असल्याचे जगातील अनेक देशांनी मान्य केले आहे.‘करोना’च्या भीतीपायी मोठमोठ्या लोकांनी हस्तांदोलनाची इतकी धास्ती घेतली आहे की, जर्मनीचे गृहमंत्री हॉर्स्ट सीहोफर यांनी जर्मनीच्या पंतप्रधान अँजेला मर्केल यांच्याशी हस्तांदोलन करण्यास स्पष्ट नकार दिला.

मर्केल यांनीही सीहोफर यांचे वागणे योग्य असल्याचे मोठ्या मनाने मान्य केले. भारतीय राजकारणात असा प्रकार घडला असता, तर वरिष्ठांचा अवमान केल्याचा ठपका ठेवत हस्तांदोलनास नकार देणार्‍यावर अहंकारी नेत्यांनी थेट निलंबनाची कारवाई केली असती ! इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही एका पत्रकार परिषदेत त्यांच्या देशातील नागरिकांना ‘करोना’ विषाणूचा धोका टाळण्यासाठी भारतीय संस्कृतीचा अंगीकार करत एकमेकांशी हस्तांदोलन करण्याऐवजी ‘नमस्कार’ म्हणण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही ‘करोनापासून बचावासाठी एकमेकांशी हस्तांदोलन न करता भारतीय संस्कृतीनुसार ‘नमस्कार’ आणि ‘राम राम’ म्हणावे’, असा सल्ला नागरिकांना दिला आहे.

वास्तविक एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करणे किंवा ‘राम राम’ म्हणणे, हा हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. भारतातील खेड्यापाड्यांत आजही एकमेकांना ‘राम राम’ म्हणण्याची सात्त्विक परंपरा पहायला मिळते. दुर्दैवाने हिंदू संस्कृतीचे पालन करणार्‍यांना भारतात ‘प्रतिगामी’ ठरवले गेले आणि ही परंपरा हळूहळू लोप पावत गेली. आता ‘करोना’च्या निमित्ताने पुन्हा भारतीय संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले. जी स्वतःची प्राचीन हिंदू संस्कृती भारतात अव्हेरली, ती जगाने अंगीकारली अन् ‘करोना’वरील एक प्रभावी औषध बनली! केवळ हस्तांदोलनाबाबतच नव्हे, तर चीनने नागरिकांना मांसाहारही न करण्यास सांगितले आहे. भारतातीय संस्कृतीत शाकाहाराला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. त्यातून स्वत:मध्ये राजसिकता व तामसिकता कमी होऊन सात्विकता वाढते. आज या करोनाच्या निमित्ताने ज्या साम्यवादी विचारांचा पगडा असलेला चीन हा शाकाहाराचा पुरस्कार करून जनतेला भाजीपाला सेवन करण्याचे आवाहन करत आहे. तसेच ज्यांचा मृत्यू करोनामुळे झाला, त्यांचे शव अग्नी देऊन दहन करण्याचा निर्णय चीनने घेतला. जगभरात केवळ हिंदू धर्मामध्येच मृतदेहाला अग्नी देऊन त्यांचे दहन करण्याची प्रथा आहे. करोना व्हायरसची लागण झालेल्या मृतदेहाला जमिनीत जर पुरले तर त्याचा प्रादुर्भाव जमिनीखाली वाढेल, ही भीती लक्षात घेऊन चीनने मृतदेहांचे दहन करण्याचा निर्णय घेतला.

एकूणच काय तर हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेली वचने, प्रथा, परंपरा किती विज्ञाननिष्ठ, मानवीहितकारक, तसेच निसर्गसहाय्य आहेत, याचा करोनाच्या निमित्ताने अवघ्या जगाला आला आहे. भारतात मात्र जेथे पिकते तेथे विकत नाही, अशी परिस्थितीत आहे. भारतातील बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मात्र नमस्कार करणे, शाकाहार करणे यांसारख्या भुरसटलेल्या हास्यास्पद गोष्टी वाटतात, हे भारतीयांचे दुर्दैव म्हणावे लागेल. मोठमोठ्या आजारांवर आयुर्वेद हा प्रभावी ठरलेला आहे, हेही सत्य आहे. मात्र, त्यालाही भारतात अंधश्रद्धेच्या पारड्यात मोजून त्याचा तिरस्कार केला जात आहे. जेव्हा करोना सारख्या भविष्यातील इतर विषाणूंवर प्रतिबंध करण्यात विज्ञान अपयशी ठरेल आणि नाईलाजास्तव अमेरिका, चीनसारखे देश आयुर्वेदाचा प्रयोग करून त्यात यश मिळवतील, तेव्हा मात्र भारतातील हीच बुद्धीप्रामाण्यवादी निमूटपणे ते स्वीकारतील. थोडक्यात ‘हिंदू संस्कृतीनुसार आचरण केल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या रोगराईंपासून दूर राहते’, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले. जगाने हस्तांदोलनाला ‘राम राम’ केला असताना भारतानेही ‘राम राम’शी पुन्हा एकदा हस्तांदोलन करून हिंदू संस्कृतीकडे वळावे आणि निरोगी अन् आनंदी जगावे.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -