घरफिचर्ससंशयाचा महाभयंकर करोना

संशयाचा महाभयंकर करोना

Subscribe

करोनाला रोखण्यासाठी सध्या शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत; पण मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही भागात त्याचा वाढत जाणारा प्रभाव हा लोकांचे सामाजिक आणि मानसिक स्वास्थ यासाठीही घातक ठरताना दिसत आहे. वाढत्या प्रसारामुळे आता आपले काय होणार अशी शंका लोकांच्या मनात निर्माण होते. अशा असुरक्षित मनस्थितीत जर का संशयाचे वातावरण निर्माण करणारे एखादे वृत्त पसरले तर त्यातून भयानक प्रकार घडू शकतात. कारण तशा दोन घटना पालघर येथे घडल्या. अशा घटना पुन्हा राज्यात आणि देशात कुठे होऊ नयेत, यासाठी करोना विषाणूला शरीराचा ताबा घेण्यापासून रोखताना अशा संशयाच्या विषाणूला आपल्या मनाचा ताबा घेण्यापासून रोखायला हवे. कारण करोनाच्या भीतीच्या नावाखाली काळ सोकावता कामा नये.

सध्या जगभरात करोना विषाणूने थैमान घातले असून त्याचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चालला आहे. चीनमध्ये वुहान शहरात उगम झाल्यानंतर तिथे या विषाणूची अनेकांना लागण झाली. लोकांना त्यांच्या घरांमध्ये कोंडून ठेवून बाहेरून पोलिसांनी टाळी ठोकण्याची वेळ आली. लोक उंचच उंच इमारतींमधून आपल्याला वाचवण्यासाठी धावा करताना दिसत होते. तसे व्हिडिओ आपल्याला दिसत होते; पण ते आपण दूरुन पाहत होतो. पुढे हा विषाणू भारतापर्यंत पोहोचेल आणि आपले भयानक रुप दाखवेल असे वाटत नव्हते. पण त्याने ते करून दाखवले आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये या विषाणूचा दिवसेंदिवस प्रसार वाढत आहे. अनेकांना त्याची लागण होत आहे. आशेचा किरण म्हणजे लागण झालेले रुग्ण बरेही होत आहे. पण वाईट गोष्ट म्हणजे लॉकडाऊन जाहीर करूनदेखील लागण होण्याचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. एका बाजूला करोनाचे आक्रमण आणि दुसर्‍या बाजूला करोनाविषयीचा संशय या कोंडीत सध्या लोक सापडलेले आहेत. कारण हा आजार संपर्कात आल्यानंतर होतो. पण समोरच्याला या आजाराची लागण झालेली आहे की, नाही तेही कळत नाही. त्यामुळे या आजाराविषयी संशयकल्लोळ सुरू झालेला आहे.

एखादी प्राणघातक प्रवृत्ती समाजात बोकाळली की, प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. कारण निसर्गाच्या नियमांप्रमाणे प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो. दहशतवाद्यांच्या टोळीने मुंबई शहरावर आक्रमण करावे आणि प्रत्येकाला आता काय होईल, याची भीती वाटावी अशी परिस्थिती झालेली आहे. मग ती पाकिस्तानातून आलेली कसाबची टोळी असो नाही तर बावन्न वर्षांपूर्वीची रामन राघवन या मारेकर्‍यांची दहशत असो. रामन राघवन आपल्याकडील वाकड्या लोखंडी हत्याराने रात्रीच्या वेळी हत्या करत असे. पण हा रामन राघवन कुणाला सापडत नसे. पोलिसांनाही तो चकवा देत असे. पण त्याच्या दहशतीने लोक प्रचंड घाबरलेले असत. संध्याकाळ होऊन अंधार झाला की आपोआप संचारबंदी लागू होत असे. लोक आपापल्या घरात स्वत:ला बंद करून घेत असत. कारण रामन राघवनच्या अदृश्य भीतीची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर लटकत असे. शेवटी पोलिसांनी मोठ्या हुशारीने राघवनला पकडला. शेवटी तो मनोविकृत ठरल्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. सध्या करोना या विषाणूच्या दहशतीची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. पण कुठल्याही गोष्टीच्या भीतीने मनाचा ताबा घेतला की, माणूस स्वत:च्या सावलीलाही घाबरू लागतो. त्याला सगळ्याच गोष्टींविषयी संशय वाटू लागतो.

- Advertisement -

या संशयामुळे माणसांना इतके असुरक्षित वाटू लागते की, त्यांच्या तावडीत चोर सोडून बरेच वेळा संन्याशी सापडतो आणि त्यालाच लोक झोडपून काढतात, त्यात संन्याशाचा जीव जातो. करोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर पालघरमध्ये ज्या दोन घटना घडल्या त्या या संशयातून घडल्या असे त्यांच्या प्राथमिक निरीक्षणावरून दिसून येते. लॉकडाऊनचा फायदा घेऊन पालघरमध्ये लुटारूंची टोळी लोकांना लुटत आहे, तसेच मुले पळवणार्‍यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत, अशी अफवा पसरली आहे. जेव्हा माणसाच्या जीवनात अगोदरच असुरक्षितता निर्माण आलेली असते, तेव्हा तो मानसिकदृष्ठ्या नाजूक झालेला असतो. त्यामुळे नाजूक स्थितीत त्याच्या मनावर अफवेचा पटकन परिणाम होतो. त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी तो शीघ्र कृती करतो. त्याचे पुढे काय परिणाम होतील, याचा तो त्याक्षणी विचार करत नाही. पालघरमध्ये अगोदर मदतकार्य करण्यास गेलेल्या पथकावरच स्थानिक लोकांनी चोर, लुटारू समजून हल्ला केला. त्यातून ते वाचले. पण पुन्हा तशीच घटना घडली. दोन साधू आणि त्यांच्या गाडीच्या चालकाला पोलिसांच्या उपस्थितीत स्थानिक लोकांनी काठीने बडवून ठार मारले. त्याप्रकरणी शंभर लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येत आहे.

मनात अगोदरपासून असलेली करोना विषाणूची भीती, त्यामुळे सगळ्या बाजूंनी झालेली कोंडी, त्यात पुन्हा चोरांच्या टोळ्यांचा सुळसुळाट ही अफवा पसरली. त्यामुळे लोकांनी आक्रमक होऊन पोलिसांना न जुमानता साधूंना प्रचंड मारले, त्यात त्यांचा जीव गेला. आता या प्रकरणातील दोषींवर कारवाई होऊन शिक्षा होईल; पण या मारहाणीत ज्यांचा नाहक जीव गेला ते काही पुन्हा जिवंत होऊ शकणार नाहीत. समूहाची मानसिकता ही भयंकर असते, हे अनेक वेळा दिसून आलेले आहे. ज्यावेळी माणूस एकटा असतो, त्यावेळी तो कृती करताना विचार करतो, पण जेव्हा तो समूहात असतो, त्यावेळी त्यांच्याकडे एकीच्या बळाची भावना निर्माण होेते. त्यातून ते आक्रमक कृती करतात. त्यामुळे सध्या करोनाच्या प्रसाराच्या कालावधीत विविध प्रकारच्या अफवांपासून सावध राहण्याची गरज आहे. सध्या फेसबूक आणि व्हॉट्स अ‍ॅप ही प्रसारमाध्यमे अनेकांच्या चोवीस तास हातात आहेत. काही लोक तर कळीचे नारद असतात, त्यांना कळी लावण्यात खूप मजा वाटते. एखाद्या ठिकाणी आग लावून वणवा पेटवायचा आणि त्यात लोक कसे होरपळतात, त्याची मजा बघायची अशी विकृत हौस काही जणांना असते. त्यातून हा अफवेचा शंकासूर अगोदरच घाबरलेल्या माणसांच्या मानगुटीवर बसतो आणि त्यांच्याकडून अघोरी कृत्ये करून घेतो.

- Advertisement -

मध्यंतरी मुंंबईत मंकी मॅन फिरतो, रात्रीच्या वेळी छपरावरून उड्या मारतो. घरात घुसतो, अशी अफवा पसरली होती. त्यामुळे रामन राघवनच्या वेळी लोक जसे रात्रीच्या वेळी पहारा द्यायचे तसेच लोक मुंबईत मंकी मॅनला पकडण्यासाठी पहारा देत असत. अशा वेळी मग एखादा गरीब निराश्रीत कुणी सापडला की, त्याला धरून सगळे चोप देत असत. अशा वेळी आजूबाजूचा जमाव फक्त पाहत राहतो. मारणार्‍यांना कुणी अडवत नाही. कारण तोही जमाव त्या अनामिक भीतीने ग्रासलेला असतो. त्यामुळे तो केवळ बघ्याची भूमिका घेतो. सध्या करोना या विषाणूची दहशत पसरलेली आहे. दिवसागणिक रुग्ण वाढत आहेत. या आजाराला आळा घालण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्नांची शर्थ केली जात आहे. लोकांना या विषाणूपासून वाचण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे.

घरातच बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू नका, एकमेकांपासून अंतर ठेवा, गर्दी करू नका, त्यामुळे संसर्ग टाळता येईल, असे सांगण्यात येत आहे. जे लोक सांगूनही न ऐकता रस्त्यावर येत आहेत, त्यांना पोलीस आपला हिसका दाखवत आहेत. पण इतके करूनही मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये विषाणू आवाक्यात येताना दिसत नाही. त्याचा फैलाव वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे ही आर्थिकदृष्ठ्या महत्त्वाची शहरे आहे. त्यांची उलाढाल थांबली तर त्याचे अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम होतील. त्यामुळे करोनाला रोखणे आवश्यक आहे. पण जसा हा लॉकडाऊनचा कालावधी वाढत जात आहे. तसेच लोकांच्या मनात संशयपिशाच्चही घर करू लागले आहे. त्यापासून सावध राहण्याची गरज आहे.

अगोदरच बरेच लोक लॉकडाऊनमुळे बेकार झालेले आहेत. उलाढाल ठप्प झालेली आहे. घरात राहून लोक चिडचिडे झालेले आहेत. विषाणूची लागण होणारे रुग्ण वाढत असल्यामुळे आपले पुढे काय होणार याची लोकांना चिंता वाटू लागली आहे. अशा स्थितीत काही लोक वर्क फ्रॉम होम करतात, पण शेवटी थेट उलाढाल ही व्हावीच लागते. तो फारशी होत नसल्यामुळे आर्थिक व्यवहारांना गती मिळत नाही. आज देवळे बंद असल्यामुळे, तसेच सण, समारंभ बंद असल्यामुळे फुलांचा काहीच उपयोग होईनासा झाला आहे. त्यामुळे गावाकडे फुलशेती करणार्‍या शेतकर्‍यांना फुले फेकून द्यावी लागत आहेत. गावापासून ते शहरांपर्यंत सगळ्याच क्षेत्रांची हिच परिस्थिती झालेली आहे. सगळेच जण टेकीला आलेले आहेत, त्यामुळे एक विचित्र अस्वस्थता आणि अनिश्चितता प्रत्येकाच्या मनात भरलेली आहे.

ही स्थिती म्हणजे फुगलेल्या फुग्यासारखी आहे. त्याला कुणी छोटीशी टाचणी मारण्याची खोटी की, त्याचा मोठा स्फोट होतो. आपल्याकडे करोना आणि त्यातून आलेला लॉकडाऊन यामुळे लोकांच्या मनाची परिस्थिती या फुगवलेल्या फुग्यासारखी झालेली आहे. त्यामुळे अशा स्थितीत कुठल्याही प्रकारचे संशयाचे वातावरण पसरणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. विषाणू पसरणार नाही, याची काळजी घेताना संशय पसरणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण पालघरमधील दोन घटना अशाच संशयातून घडल्या आहेत. देशभरात अशा घटनांचा प्रसार होणार नाही, यासाठी लोकांनी दक्ष राहायला हवे. करोना तर घातक आहेच, तो आपल्या शरीराचा ताबा घेणार नाही, याची काळजी घ्यायला हवी; पण मानवी मनाचा ताबा घेणारा हा संशयाचा करोना महाभयंकर आहे, तो आपल्या मनाचा ताबा घेणार नाही, यासाठी जागरुक रहायला हवे. कारण करोनाच्या नावाखाली काळ सोकावता कामा नये.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -