घरफिचर्सकरोनाने जग दाखवले!

करोनाने जग दाखवले!

Subscribe

वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे…
रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो…आरश्यावर आता, आरश्यात पाहिलेली माणसे गेली कुठे?
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा.. प्रत्येक माणसाचा तो चेहरा असावा…

इलाही जमादार यांची ही गझल करोनाच्या काळात अधिक गडद होऊन उभी राहते तेव्हा पुन्हा एकदा माणसांचा माणसांवरील विश्वासाचे काय? असा प्रश्न जीवघेणा ठरतो. गेले दोन दिवस दारूच्या दुकानासमोर उडालेली झुंबड आता या जगाचा जणू अंत झाल्यासारखी दाखवणारी आहे. दारुशिवाय माणूस जगू शकत नाही, असे वाटणारे हे चित्र त्रासदायक आहे, तितकेच हा देश रामभरोसे हिंदू हॉटेल आहे, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते. येथे कशाचा काहीच भरवसा नाही. आज आहे आणि उद्या नाही म्हणून… आज मिळत आहे त्यावर उड्या मारून जितके काही आपल्या वाट्याला येईल ते ओरबाडून घेऊ. उद्याचे उद्या आणि आजूबाजूला असलेल्यांचे परवा बघू… असा हा निलाजरेपणा आहे. लाजेच्या पलीकडे गेलेला.

- Advertisement -

यात फक्त तळीरामांची चूक नाही, त्यासाठी सरकारही तितकेच जबाबदार आहे. महसूल मिळणारे एक मोठे साधन असतानाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. गर्दीमुळे करोनाची भीती हे जरी कारण सांगितले जात असले तरी अशी गर्दी राज्य आणि देशभर कुठे नव्हती. साध्या भाजीसाठी लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचे जे काही तीनतेरा वाजवले त्यावरून ते आधी दिसून आले होते. भाजी, किराणा मालाची दुकाने, अधे मधे उघडणारे मासे बाजार यावर लोकांनी सुरुवातीला मारलेल्या उड्या हेच तर दाखवत होत्या… लोकांनी जगण्यासाठी करोनाला उडवून लावत खरेदी केली. हा लोकांच्या मानसिकतेचा प्रश्न आहे. काही मिळत नाही किंवा मिळणार नाही, असे वाटू लागले की साठवणूक करण्याच्या मागे माणूस लागतो. आता भाजी मिळते, अत्यावश्यक वस्तू मिळतात, असा विश्वास वाटू लागल्याने लोक बिनधास्त झाली आहेत… पण, दारूच्या दुकानांमुळे पुन्हा एकदा गर्दी आणि संसर्गाचा नवा विषय उपस्थित झाला आहे. पण, दोन चार दिवस गेले की येथेही शांतचित्त होऊन जाईल. आता भीतीमुळे लोकांनी दोन चार ऐवजी पाच दहा दारूच्या बाटल्या नेऊन रात्रीची सोय केली आहे. उलट ही सोय झाल्याने ते आता उगाच रस्त्यावर येणार नाहीत. रात्र जागवावी असे आज वाटे, तृप्त झोप यावी पहाटे पहाटे… असे त्यांना वाटणार नाही. त्यांचे जग काल होते तसे आज आणि उद्याही सुरू राहील… दारू ही काही आपली संस्कृती नाही तो नागडा नाच आहे, हे करोनाने दाखवून दिले.

दारूपायी माणूस माणूस राहत नाही, त्याचा राक्षस होतो, म्हणून दारूबंदी हवी हे घासून पुसून पुन्हा एकदा सिद्ध होते. महात्मा गांधींना ते माहीत होते म्हणून त्यांनी मायलेकरांचा जीव वाचवा, शांतता नांदावी आणि खेड्यापाड्यातला भारत सुखी राहावा म्हणून दारू वेशीबाहेर ठेवली. पण, आज त्याच गांधींच्या गुजरातमध्ये दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणावर दारू तेथेच ढोसली जाते आणि चोरीच्या मार्गाने तिथूनच सर्वत्र जाते. त्या महात्म्याला हे कधी अपेक्षित नव्हते. गांधीजींचे वास्तव्य असलेल्या वर्ध्याचीही तीच कहाणी. बंदी असून या जिल्ह्यात दारूचा नुसता धुमाकूळ सुरू आहे. बाजूच्या चंद्रपूर जिल्ह्यातही हाच बाजार झालाय…आदिवासी आणि समाजाने नाकारलेल्या लोकांच्या आयुष्यात आशेचा किरण फुलवणारे आणि नशाबंदीसाठी आपले आयुष्य वेचणारे डॉ. अभय बंग यांनी पुढाकार घेऊन चंद्रपूरमध्ये दारूबंदी आणली, तेथे आयाबाया त्यांना आशीर्वाद देत असताना चोरट्या दारूने एकच हाहा:कार उडवला आहे. दारू पिणारी लोक आता मिळत नाही म्हणून तेथे काहीही करायला तयार आहेत.

- Advertisement -

हे सारे लक्षात आल्यावर आता सरकारने दारूची दुकाने उघडण्याचा आपला निर्णय मुळीच बदलू नये. दारू पिणारे हे कुठूनही मिळवून पिणार, विदेशी दारूची तहान देशीवर भागवतील, देशीची गावठीवर आणि ती सुद्धा मिळाली नाही तर विषारी दारूही प्यायला कोणी मागे पुढे पाहणार नाही. त्यातून आणखी मोठे अराजक उभे राहील… ‘दारू पिऊ नका’, असे हस्तिदंत मनोर्‍यात बसून आणि रात्र चढत जाईल तसे दोन विदेशी पेग मारून सांगणारे या देशात कमी नाहीत. पण, वास्तव भयानक आहे. मलमूत्राच्या टाकीत उतरणारा श्रमिक आणि तुमचा आमचा कचरा घाण साफ करून गाडीतून घेऊन जाणारा कष्टकरी सकाळी दूध पिऊन ही कामे करणार नाही. त्याला देशी दारूचे दोन पेग मारावेच लागणार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुचले ते आधी सरकारला सुचायला हवे होते.

पण त्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते आणि कोणाला काय वाटेल याची तमा न बाळगता हे राज्य चालले पाहिजे, असा हिंमतवान स्वभाव लागतो… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संयमी स्वभावाला साजेसा असा निर्णय घेत अखेर दारूची दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला हे बरे झाले… महिन्याला दोन अडीच हजार कोटी तिजोरीत जमा झाले तर करोना नंतरच्या भयानक काळात जगण्यासाठी हेच पैसे उपयोगी ठरणार आहेत. शेवटी राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे, ‘मी काही दारुचे गुत्ते उघडायला सांगितले नाहीत. आहेत ती दुकाने सुरू करा, एवढेच माझे म्हणणे आहे’. कृष्णकुंज मातोश्रीच्या मदतीला धावून गेली हे चित्र हे दोन भाऊ एकत्र यावेत, अशी इच्छा बाळगणार्‍या सैनिकांना सुखावणारी बाब असेल. करोनाने ही न होणारी गोष्ट सुद्धा करून दाखवली, हे लक्षात घ्यायला हवे.

दारूची दुकाने उघडी होत असताना मजूर आपापल्या गावी जात आहेत, त्यांना विशेष ट्रेन आणि बसमधून गावी पोहचवले जात आहेत, हे चित्र सुखावणारे आहे. किमान आपल्या गावी जाऊन मीठ भाकरी खाऊन दिवस काढतील, भुकेने त्यांचा शहरांमध्ये जीव जाणार नाही, याचा मार्ग निघाला, हे बरे झाले. हे सुद्धा उशिरा सुचलेले शहाणपण आहे. ज्यांची त्यांची राज्ये आपापल्या लोकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न सोडवतील आणि तो त्यांनी सोडवायलाच हवा, त्यांच्या जगण्याचा ठेका एका महाराष्ट्राने घेतलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधीच्या पाच वर्षांत हरवलेला विकास आता शोधून काढून उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा विकास करून दाखवावा. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे भाजपची असतील तर आता काँग्रेसने मागील ६० वर्षांत काय केले, हे ऐकण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिलेले नाही, याचे चिंतन करावे. हवे तर करोनाच्या काळात मोकळा वेळ असेल तर ऑनलाईन चिंतन शिबिरे घ्यावीत; पण बिमारु राज्यांचा प्रश्न सोडवावा. करोनाने हे करून दाखवण्याची मोठी संधी दिली आहे.

मुंबई, पुणे, नाशिक आणि ठाण्यात नोकरीनिमित्त राहणार्‍या लोकांना, चाकरमान्यांना त्यांची रक्ताची लोक या काळात तुम्ही गावाला येऊ नका असे म्हणतात आणि आमच्या लोकांना गावी पाठवा, त्यांची कशी काळजी घ्यायची ती आमची आम्ही बघू, अशी मागणी सरकारकडे करत नाही हे पाहून करोनाने हे सुद्धा दिवस रक्ताची नाती असलेल्या लोकांना दाखवले. स्वतः करोनाबाधित असूनही आपल्या करोनाने मरण पावलेल्या बापाच्या प्रेताला हात लावून ते महापालिकेच्या गाडीत घालायला तयार नसणारी मुले याच करोनाने दाखवली… इरफान सारखा गुणी अभिनेता हे जग सोडून जातो तेव्हा त्याला करोनामुळे आपल्या मृत आईला दफन करता आले नाही याचे शल्य बोचते आणि ‘माझी आई गेली नाही, ती बघ माझ्या बाजूला बसली आहे. ती मला घेऊन जायला आली आहे,’ हे शेवटच्या काळात सेवा करणार्‍या आपल्या बायकोला त्याला सांगावे लागते तेव्हा काळीज चिरले जाते… अतीव दुःखाने. प्लेगचे दिवस कसे होते हे माहीत नाही; पण करोनाने भयानक जग दाखवले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -