घरफिचर्सदादा कोंडके आणि महेंद्र कपूर- एक रांगडी जोडगोळी!

दादा कोंडके आणि महेंद्र कपूर- एक रांगडी जोडगोळी!

Subscribe

एखाद्याला एखादं गाणं, एखादी कविता अथपासून इतिपर्यंत पाठ व्हावी तसं पुढे पुढे महेंद्र कपूूरना दादा कोंडके पाठ झाले होते, त्यांची स्टाईल पाठ झाली होती, त्यांना आपल्याकडून काय हवं ते माहीत झालं होतं. साहजिकच, आजच्या भाषेत सांगायचं तर दादा कोंडके आणि महेंद्र कपूर ही केमिस्ट्री तंतोतंत जुळून आली होती. हिंदी सिनेमात ज्याप्रमाणे राज कपूर आणि मुकेश ह्यांचे कलाकार म्हणून मनाचे धागे जुळले होते, अगदी तसाच मराठीत दादा कोंडके आणि महेंद्र कपूर ह्यांचा योग जुळून आला होता.

राज कपूरनी मुकेशदांचा आवाज पडद्यांवरच्या आपल्या व्यक्तिरेखांसाठी वापरला आणि आपली एक वेगळी प्रतिमा लोकांपुढे ठेवली. राज कपूरच्या चेहर्‍यावरचं कारूण्य मुकेशदांच्या आवाजात अगदी जसंच्या तसं यायचं. राज कपूरनी मुकेशदांचा आवाज पहिल्यांदा जेव्हा ऐकला तेव्हाच त्यांना तो पुरेपूर भावला होता. ‘आह’, ‘आवारा’, ‘अनाडी’ ह्यासारख्या सिनेमांमध्ये राज कपूरनी जो सर्वसामान्य माणूस रंगवला आणि त्याची सर्वसामान्य दु:खं रंगवली त्याला मुकेशदांच्या आवाजाने अगदी साजेशी साथ दिली. त्यामुळे सिनेमामध्ये राज कपूरची भूमिका ठरली की त्यांच्या पडद्यावरच्या गाण्यासाठी मुकेशदांचा आवाज तिथे येणार हे समिकरण ठरलेलं असायचं.

- Advertisement -

मराठीत तसंच समिकरण घडून आलं ते लागोपाठ ज्युबिली हीट सिनेमे देणार्‍या दादा कोंडकेंच्या बाबतीत. दादा कोंडकेंनी सुरुवातीच्या ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’ वगैरे सिनेमांचा अपवाद वगळला तर त्यांच्या सिनेमातल्या व्यक्तिरेखांसाठी महेंद्र कपूरच्या आवाजाची नियुक्ती करून टाकली होती. नंतर नंतर दादा कोंडकेंचा सिनेमा म्हटला की त्यात महेंद्र कपूरचा आवाज दादांच्या गाण्यासाठी येणं हा एक सहजधर्म झाला होता.

वास्तविक राज कपूर आणि दादा कोंडके ह्या दोघांच्या सिनेमाच्या निर्मितीच्या शैलीत अपघाताने की अनुकरण म्हणून ते सांगता येणार नाही, पण एक कमालीचं साम्य होतं. राज कपूर त्यांच्या सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ गाण्याच्या रेकॉर्डिंगने करत असत आणि दादा कोंडकेही त्यांच्या सिनेमाच्या चित्रीकरणाचा शुभारंभ गाण्याच्या रेकॉर्डिंगनेच करत असत. राज कपूरचा सिनेमा लोकांसमोर येण्याच्या खूप आधी त्यांच्या सिनेेमातली एकाहून एक सरस गाणी लोकांच्या कानावर यायची. दादा कोंडकेंच्या बाबतीतही तसंच व्हायचं. त्यांचीही गाणी त्यांचा सिनेमा रिलिज व्हायच्या खूप आधीपासून लोकांना ऐकू यायची. राज कपूरचं त्या बाबतीतलं गणित असं होतं की गाणी आधीच ऐकल्यामुळे लोक ती गाणी कोणत्या सिनेमातली आहेत ते विचारतात आणि त्यामुळे सिनेमाची आपसूक तोंडी प्रसिध्दी होते. दादा कोंडकेंचं त्या बाबतीतलं म्हणणं असायचं की माझ्या सिनेमातल्या गाण्यांद्वारे सिनेमाला तोंडी प्रसिध्दी मिळाली की मला माझ्या सिनेमाची जास्त प्रसिध्दी करावी लागत नाही.

- Advertisement -

असो, पण दादा कोंडकेंनी नंतर नंतर आपला पडद्यावरचा आवाज म्हणून महेंद्र कपूरचं नाव निश्चित करून टाकलं. खरं तर महेंद्र कपूर हे अमराठी. पंजाबी…आणि तद्दन रंगरंगिल्या हिंदी सिनेमासृष्टीतले. पण दादांनी त्यांची ‘मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती’, ‘ए निले गगन के तले, धरती का प्यार फले’, ‘निल गगन में उडते बादल आ आ आ’ ही गाणी ऐकली होती. त्यामुळे त्यांच्या आवाजाची जात सिनेमातल्या आपल्या गावरान व्यक्तिरेखेशी जुळेल असं त्यांना वाटलं आणि आपल्या सिनेमातल्या आपल्या भूमिकेनुसार होणार्‍या गाण्यांसाठी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून टाकलं.

त्याआधी महेंद्र कपूरनी काही मोजकी मराठी गाणी गायली आहेत, ह्याचा तपशील दादा कोंडकेंकडे होता. त्यापैकी ‘मधुचंद्र’मधलं ‘हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी’ हे महेंद्र कपूरचं गाजलेलं गाणं दादा कोंडकेंच्या लक्षात होतं, शिवाय त्या गाण्यातला ‘चिंचेचे’ ह्या शब्दाचा उच्चार त्यांच्याकडून नीट घोटवून घेतला होता, महेंद्र कपूर त्याचा उच्चार आधी ‘चिंच्येच्ये’ असा करायचे ह्याचीही माहिती दादांकडे होती. पण आपल्या सिनेमातल्या आपल्या त्या गावरान, धांदरट व्यक्तिरेखेला त्यांचा आवाज दादांना फिट वाटला. त्याआधी हृदयनाथ मंगेशकरांसारख्या कसबी संगीत दिग्दर्शकाकडे महेंद्र कपूर ‘ती येते आणिक जाते, येताना कधी कळ्या आणिते’ ही आरती प्रभूंची अनोखी कविता गायले होते. साहजिकच, मराठी भाषेत गाण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी होता. पण मराठी भाषेतल्या ‘ळ’, ‘ण’ या शब्दांच्या उच्चारांची समस्या त्यांनाही इतर अमराठी गायकांप्रमाणे अधेमधे भेडसावायची, पण तो जमाना गाण्यांच्या रिहर्सल्सचा होता, त्यामुळे त्या अक्षरांच्या उच्चारांची उजळणी होऊन होऊन महेंद्र कपूर ती अक्षरं गाण्यात योग्य प्रकारे उच्चारू लागले.

महेंद्र कपूर मराठी गाणं गाताना मराठी भाषेतल्या शब्दांबद्दल कोणत्याही अटी घालायचे नाहीत. अमूक एक मराठी शब्द आपल्याला उच्चारता येत नाही म्हणून त्याला पर्यायी, पण सहज उच्चारता येण्यासारखा शब्द द्या, अशी मागणी करायचे नाहीत. दादांच्या सिनेमासाठी गाताना त्यांनी दादांचं सिनेमातलं पात्रं पूर्णपणे समजून घेतलं. दादांची शाहिरी पार्श्वभूमी लक्षात घेतली आणि मगच दादांची गाणी गाण्यासाठी ते रेकॉर्डिंगला उभे राहिले.

‘गंगू, तारूण्य तुझं बेफाम, जसा इश्काचा अ‍ॅटम बाम’ हे गाणं गाताना त्यांनी दादांच्या पूर्ण स्टाइलला न्याय देत ते गाणं गायलं. ‘काशी गं काशी, तुझी सवय कशी, जरा हो माझ्यापाशी गं’ हे गाणं गाताना दादांनी ह्या गाण्यावर अलबेला फेम भगवानदादा नृत्य करणार आहेत हे महेंद्र कपूरना सांगितलं आणि महेंद्र कपूरनी त्याप्रमाणे हे गाणं पेश केलं. ‘तपस्येत दंग, करू नको भंग, गं भलताच रंग’ ह्या गाण्यात तर दादांच्या लोकनाट्यातल्या लोकगीतांचा ढंग महेंद्र कपूरनी अगदी अचूक पकडला. ‘मला एक चानस हवा’ ह्या गाण्यात तर त्यांनी दादांच्या व्यक्तिरेखेवरचा तो इब्लिस भाव अचूक पकडून दाखवला. ‘चल खेळ खेळू दोघं हूतूत्तूतू’ ह्या गाण्यातली ‘तुझी तंगडी कधी माझ्या हातात, माझी तंगडी कधी तुझ्या हातात’ ही ओळ गाताना महेंद्र कपूरनी दादांमधला रांगडा धटिंगणपणा हूबेहूब सादर केला…आणि ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं’ ह्या पराकोटीच्या डबल मिनिंग गाण्यात तर महेंद्र कपूरनी दादांच्या आधीच दादांना हवी तशी नखरेल करामत करून ठेवली. त्या काळात ते गाणं डबल मिनिंगमुळे असेल किंवा कमनीय चालीमुळे असेल, पण भलतंच हीट झालं होतं.

एखाद्याला एखादं गाणं, एखादी कविता अथपासून इतिपर्यंत पाठ व्हावी तसं पुढे पुढे महेंद्र कपूूरना दादा कोंडके पाठ झाले होते, त्यांची स्टाइल पाठ झाली होती, त्यांना आपल्याकडून काय हवं ते माहीत झालं होतं. साहजिकच, आजच्या भाषेत सांगायचं तर दादा कोंडके आणि महेंद्र कपूर ही केमिस्ट्री तंतोतंत जुळून आली होती. हिंदी सिनेमात ज्याप्रमाणे राज कपूर आणि मुकेश ह्यांचे कलाकार म्हणून मनाचे धागे जुळले होते, अगदी तसाच मराठीत दादा कोंडके आणि महेंद्र कपूर ह्यांचा योग जुळून आला होता.

दादा कोणत्या प्रकारच्या रांगड्या आणि मातीतल्या विनोदासाठी महाराष्ट्र मुलुखात प्रसिध्द आहेत हे महेंद्र कपूर जाणून होते. त्या अमराठी गायकाने आपल्या दादांकडल्या मराठी गाण्यातून तो रांगडेपणा अविरत पुरवला हेच दादा कोंडके आणि महेंद्र कपूर ह्या कलावंत जोडगोळीचं गमक होतं!

– सुशील सुर्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -