घरमुंबईकागदपत्रांचा गैरवापर करून घर परस्पर विकले

कागदपत्रांचा गैरवापर करून घर परस्पर विकले

Subscribe

वृद्ध दाम्पत्याच्या घरांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांचे घर परस्पर दुसर्‍याला विकून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वाशी पोलिसांनी काँग्रेसचा कार्यकर्ता सुरेश शिंदे याच्यासह वृद्ध दाम्पत्याचे घर विकत घेणार्‍या सुदर्शन कदम या दोघांवर फसवणुकीसह बनवाटगिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे नाव बशीर पटेल, शिरीन पटेल असे असून, त्यांनी २००७ मध्ये राकेश अगरवाल यांच्या मालकीच्या वाशी सेक्टर ९ मधील जेएन १ मधील ए ७ आणि ए ८ या दोन सदनिका ११ लाख ९० हजार रुपयांमध्ये खरेदी केल्या होत्या.

सदर सदनिकांवर एलआयसी फायनान्सचे ३ लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज असल्याने उर्वरित ८ लाख १५ हजारांची रक्कम पटेल दाम्पत्याने टप्प्याने राकेश अगरवाल यांना दिली होती. त्यानंतर यातील एक सदनिका शिरीन पटेल यांच्या नावे,तर दुसरी बशीर पटेल यांच्या नावे करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात सदर घरावर असलेले एलआयसी फायनान्सचे कर्ज भरण्याकरिता पटेल दाम्पत्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी त्या भागातील कार्यकर्ता सुरेश शिंदे यांच्याकडे पैशांची मदत मागितली होती. त्यावेळी सुरेश शिंदे याने त्याच्या ओळखीच्या जायदा बेगम शेख या महिलेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेऊन पटेल दाम्पत्याला दिले होते. त्या बदल्यात बशीर पटेल यांच्या नावावर असलेल्या घराची कागदपत्रे स्वत:च्या ताब्यात घेतली होती. या व्यवहाराचे स्टँप पेपर तयार करून त्याच्यावर बशीर पटेल यांच्या स्वाक्षर्‍या घेतल्या होत्या. कालांतराने पटेल यांनी जायदा शेख यांच्याकडून घेतलेली रक्कम परत करून सुरेश शिंदे याच्या ताब्यात असलेली आपल्या घराची कागदपत्रे परत घेतली होती.

- Advertisement -

दरम्यान, २०१६ मध्ये बशीर पटेल हे आपल्या घराचे मेंटेनन्स चार्जेस भरण्यासाठी सोसायटी कार्यालयात गेल्यानंतर त्यांच्या नावे असलेली सदनिका सुदर्शन कदम यांच्या नावे झाली असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी सोसायटी कार्यालयात या व्यवहाराच्या कागदपत्रांची मागणी करून ती तपासली असता, ज्या कालावधीत त्यांच्या घराची कागदपत्रे शिंदे याच्या ताब्यात होती. त्या कालावधीत त्यांच्या घराच्या खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचे, तसेच बनवाट कागदपत्रांच्या सहाय्याने पटेल यांच्या बनवाट सह्या करून व्यवहार झाल्याचे पटेल दाम्पत्याच्या निदर्शनास आले. ही फसवणूक सुरेश शिंदे यानेच केल्याचे लक्षात आल्यानंतर पटेल दाम्पत्याने पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -