घरफिचर्सऑर्केस्ट्रांचे दिवस!

ऑर्केस्ट्रांचे दिवस!

Subscribe

एक दिलखेचक संगिताचा तुकडा पेश करायचे आणि तो वाजत असतानाच रंगमंचावरचा पडदा सरकायचा. हा ऑर्केस्ट्रा म्हणजे सुदेश भोसले ह्यांचं होमपीच असायचं. ह्या ऑर्केस्ट्रातून सुदेश भोसले नावारूपाला आले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

मेलडी मेकर्स ह्या ऑर्केस्ट्राचं त्यांच्या जाहिरातीपासूनच वेगळेपण असायचं. ड्रमसेट, गिटार वगैरे वाद्यांचं प्रतिकात्मक चित्र असलेली त्यांची वेगळीच जाहिरात असायची. ते एक दिलखेचक संगिताचा तुकडा पेश करायचे आणि तो वाजत असतानाच रंगमंचावरचा पडदा सरकायचा. हा ऑर्केस्ट्रा म्हणजे सुदेश भोसले ह्यांचं होमपीच असायचं. ह्या ऑर्केस्ट्रातून सुदेश भोसले नावारूपाला आले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

ते दिवस वेगळे, सोनेरी, मंतरलेले होते असे भावनांचे कढ काढण्यात काही अर्थ नाही. कारण परिवर्तन हा सृष्टीचा एक नियम असल्याचं आपण आधीच मान्य करून टाकूया. पण तरीही मनोरंजनाच्या क्षेत्रातलं परिवर्तन हे तर परिवर्तनातलं परिवर्तन वाटत राहावं अशी एक वेगळी सृष्टी जन्माला आली आहे, ह्याच्याकडे डोळेझाक कशी करता येईल?
आता आपल्या संगित सृष्टीचंच बघा…एक काळ असा होता जेव्हा ऑर्केस्ट्रा नावाच्या प्रकाराचं बाजारात अमाप पीक आलेलं असायचं. तेव्हा मराठी वर्तमानपत्रात नाटकांच्या जाहिरातींना ऑर्केस्ट्रांच्या जाहिरातींचा शेजार लाभायचा. नाटकवेडा मराठी प्रेक्षक ऑर्केस्ट्रासाठीही तेवढाच जीव टाकायचा. नाटकांप्रमाणे ऑर्केस्ट्रांनाही तुडुंब गर्दी लोटायची. ऑर्केस्ट्राच्या तिकिटबारीवरसुध्दा मराठी नाटकांसारखाच हाऊसफुल्लचा बोर्ड झळकायचा. नाटकांइतकीच प्रतिष्ठा ऑर्केस्ट्रांना मिळायची. ऑर्केस्ट्रावाल्यांनाही मिळायची.
पण ते दिवस इतके आणि असे इतिहासजमा होतील असं कधीच वाटलं नव्हतं. त्या दिवसांत चंद्रलेखा, नाट्यसंपदा आणि कलावैभव ह्या आघाडीच्या नाट्यसंस्थांच्या स्पर्धेत ऑर्केस्ट्राही पाय रोवून उभा असायचा. अशोककुमार सराफांचा ‘मेलडी मेकर्स‘, प्रमिला दातारांचा ‘सुनहरी यादे‘, महेशकुमारचा ‘महेशकुमार अ‍ॅन्ड हिज ऑर्केस्ट्रा‘ ही त्यातली काही आघाडीची नावं थिएटरवर दिमाखात झळकायची.
सिनेसंगिताची वेगळी दुनिया होती ती. शंकर-जयकिशन, मदनमोहन, सलिल चौधरी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी वगैरे संगितकारांच्या लखलखत्या कलाकुसरीने नटलेला काळ होता तो. ‘मधुमती’मधलं ‘आ जा रे परदेसी’, ‘पारसमणी’मधलं ‘हँसता हुवा नुरानी चेहरा’,‘जागते रहो’मधलं ‘जागो मोहन प्यारे’, ‘चोरी चोरी’मधलं ‘आ जा सनम मधुर चांदनी में’, ‘मेरा नाम जोकर’मधलं ‘जाने कहाँ गये वो दिन’ अशा मनाला भुरळ पाडणार्‍या एकाहून एक सरस गाण्यांचा तो अनोखा काळ होता.

- Advertisement -

अशा गाण्यांशिवाय त्या वेळच्या ऑर्केस्ट्राचं पान हलायचं नाही. महेशकुमार अ‍ॅन्ड हिज ऑर्केस्ट्रातला महेशकुमार पुरूष आणि स्त्रीचं द्वंद्वगीत एकटाच सादर करायचा. त्याची गाण्यातली ही चमत्कृती हे त्या ऑर्केस्ट्राचं खास आकर्षण असायचंच, पण त्यातही लोक त्याचं खास गाणं ऐकायला यायचे ते म्हणजे ‘कुहू कुहू बोले कोयलया.’ त्याच्या ऑर्केस्ट्रात चाकं लावलेलं एक टेबल असायचं, त्यावर त्याच्यासाठी एक हार्मोनियम असायची.चाकं लावल्यामुळे ते टेबल आणि ती हार्मोनियम स्टेजभर गरागरा फिरत बसायची. ह्या हार्मोनियमवर बोटं फिरवत महेशकुमार हे गाणं गायचा. हे गाणं संपलं की हटकून वन्समोअर यायचा. हा वन्समोअर येणार हे त्यालाही व्यवस्थित माहीत असायचं.

प्रमिला दातारांच्या ‘सुनहरी यादें’ याऑर्केस्ट्राची गोष्ट वेगळी असायची. त्या त्यांच्या ऑर्केस्ट्राचा एक वेगळा आब राखून असायच्या.‘ये जिंदगी उसी की हैं’, ‘शिशा हो या दिल हो’, ‘अपलम-चपलम’ वगैरे गाणी त्या नजाकतीत पेश करायच्याच; पण आपलं मराठीपण दाखवताना त्या काही मराठी चित्रपटांतली गाणी तर पेश करायच्याच; पण काही वेळेस नाही कशी तुला म्हणते रे गीत सारखं मराठी भावगीतही पेश करून मराठी-अमराठी रसिकांची वाहवा मिळवायच्या. त्यांच्या ऑर्केस्ट्राचा समारोप मात्र मनाला स्पर्श करून जायचा. ऑर्केस्ट्रा संपवताना मात्र त्या त्यांना गुरूस्थानी असलेल्या वसंत देसाईंचं ‘दो आँखे बारह हात’मधलं ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ हे प्रार्थनागीत ऐकवायच्या. प्रमिला दातार ते गाणं इतक्या समरसून, इतक्या भक्तिभावाने ऐकवायच्या की प्रेक्षकांमध्ये अफाट शांतता पसरायची. प्रेक्षक ती शांतता मनात घेऊनच थिएटरबाहेर पडायचे. प्रमिलाताईंच्या ऑर्केस्ट्राचा तो शेवट खरोखरच लक्षात राहण्याजोगा असायचा.

- Advertisement -

मेलडी मेकर्स ह्या ऑर्केस्ट्राचं त्यांच्या जाहिरातीपासूनच वेगळेपण असायचं. ड्रमसेट, गिटार वगैरे वाद्यांचं प्रतिकात्मक चित्र असलेली त्यांची वेगळीच जाहिरात असायची. ते एक दिलखेचक संगिताचा तुकडा पेश करायचे आणि तो वाजत असतानाच रंगमंचावरचा पडदा सरकायचा. हा ऑर्केस्ट्रा म्हणजे सुदेश भोसले ह्यांचं होमपीच असायचं. ह्या ऑर्केस्ट्रातून सुदेश भोसले नावारूपाला आले असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. ह्या ऑर्केस्ट्रात मॅन्युअल फ्रान्सिस नावाचे एक गायक होते. रंगाने काळेसावळेच होते. पण ते माइकसमोर आले की आपल्या खड्या आवाजात ‘जाने कहाँ गये वो दिन’ हे मुकेशचं करूण रसातलं गाणं असं काही जीव ओतून गायचे की अख्खं थिएटर जिवाचे कान करून ते ऐकायचं. हेच मॅन्युअल फ्रान्सिस ‘चढता सुरज धीरे धीरे ढलता हैं ढल जायेगा’ ही अझिझ नाझाची कव्वाली गातानाही थिएटर खरोखरच मंत्रमुग्ध होऊन जायचं.

ह्या तीन ऑर्केस्ट्रांबरोबरच इतरही अनेक ऑर्केस्ट्राज तेव्हा आजुबाजूला असायचे, दिदारसिंग अ‍ॅन्ड ऑर्केस्ट्रातल्या पंजाबी दिदार सिंगांचं वैशिष्ट्य असं होतं की पब्लिक त्यांच्याकडे ‘शोधिसी मानवा राऊळी मंदिरी’ ह्या गाण्याची मागणी करायचे. रसिकही ते गाणं मराठी बाज राखत छान गायचे. राणी वर्मा ‘सप्तक’ नावाचा ऑर्केस्ट्रा सादर करायच्या. त्यात इतर कोणत्याही ऑर्केस्ट्रात गायली न जाणारी संपूर्णपणे वेगळी गाणी गाण्यावर त्यांचा भर असायचा. त्यातलंच एक गाणं असायचं ‘शिकारी’मधलं – ‘तुम को पिया दिल दिया कितने नाझ से…’

याच काळातली एक गंमत सांगायलाच हवी, ऑर्केस्ट्राच्या या व्यवसायाची जेव्हा छान चलती होती तेव्हा एक ऑर्केस्ट्रा आला होता त्याचं नाव होतं ‘साधू मंडळी!’ त्या ऑर्केस्ट्रातल्या सगळ्या गायक-वादकांनी साधूमंडळींचा वेष परिधान करून म्हणे ऑर्केस्ट्रा पेश केला होता. तो ऑर्केस्ट्रा लोकांच्या पचनी पडला नाही हा भाग अलाहिदा, पण हे सगळं सांगण्यामागचा हेतू हा की त्या काळची गाणी वातावरणात प्रदीर्घ काळ टिकायची म्हणून तो एक काळ ऑर्केस्ट्राचा होता. आजच्या गाण्यांची प्रकृती तशी नसते म्हणून त्या गाण्यांचा तसा ऑर्केस्ट्रा होत नसावा…बघा पटलं तर!


– सुशील सुर्वे
(लेखक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -