घरफिचर्सविवेकनिष्ठा आणि स्त्री

विवेकनिष्ठा आणि स्त्री

Subscribe

भारतातील स्त्रियांची एकंदर परिस्थिती विचारात घेऊनच आपल्याला त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांचा विचार करावा लागतो. त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची मुळे ही एकंदर समाजाच्या घडणीतच गुंतलेली आहेत. या स्तंभातून जेव्हा मी स्त्रियांच्या विवेकनिष्ठेचा उहापोह करणार आहे. तेव्हाही या सामाजिक परिस्थितीबद्दलचे विश्लेषण करीतच स्त्रियांचे मानसिक रोग, भयगंड, विकलता, आणि त्या पोटी विवेकनिष्ठेचा र्‍हास कसकसा होतो. याची मांडणी करणार आहे. विवेकनिष्ठा नसलेल्या स्त्रियांना एकंदरीतच मूर्खात काढले जाऊन त्यांची अप्रतिष्ठा करणे सोपे असते. समाजातील स्त्रीचे स्थान दुय्यम ठेवण्याची अनेक साधने बाद झाल्याच्या या नव्या काळात कोणते मार्ग स्त्रीच्या प्रगतीला बाधक ठरतील हे लक्ष देऊन पाहावे लागेल.

प्रथमोपचार कसा द्यावा यासबंधीची एक कार्यशाळा सुरू होती. बेशुद्ध पडणे, मूर्च्छा येणे यातील फरक सांगताना शिकवणारे डॉक्टर म्हणाले होते की अनेकदा स्त्रिया बेशुद्ध पडतात तेव्हा ती खरी बेशुद्धी नसते. थकव्याने आलेली मूर्च्छा किंवा चक्कर असेल किंवा अगदी काहीच झालेले नसतानाही त्या बेशुद्ध असल्यासारख्या पडून रहातील. पाणी शिंपडण्यामुळे खरी बेशुद्धी जात नाही. पुढे डॉक्टरांनी सांगितलं- असे जरी असले तरीही तुम्ही लगेच आजुबाजूच्यांना ही बेशुद्धी खरी नाही वगैरे सांगण्याची गरज नाही- कारण तुम्हाला माहीत आहे. आपल्या देशात स्त्रियांना, विशेषतः गावातल्या स्त्रियांना किती कमी विश्रांती मिळते. अंगमेहनतीची कामे पुष्कळ, खाणेपिणे जरा दुय्यम दर्जाचेच आणि समाज पुरुषप्रधान मानसिकतेचा असल्यामुळे मानसिक त्रासही भरपूर असतो. अशा वेळी स्त्रिया अजाणता अशा प्रकारे विश्रांती शोधतात. देह आणि मन एकत्र येऊन ही पडून रहाण्याची विश्रांती खेचून घेते. त्यांचे त्यांनाही ते कळत नसते. तेव्हा कृपा करून प्रथमोपचारक म्हणून तिथे हजर असल्यास ती स्त्री बेशुद्धीचे नाटक करत होती वगैरे विधाने करू नका.

- Advertisement -

त्या डॉक्टरांचे मला फार कौतुक वाटले होते. भारतातील स्त्रियांची एकंदर परिस्थिती विचारात घेऊनच आपल्याला त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नांचा विचार करावा लागतो. त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्याची मुळे ही एकंदर समाजाच्या घडणीतच गुंतलेली आहेत. या स्तंभातून जेव्हा मी स्त्रियांच्या विवेकनिष्ठेचा उहापोह करणार आहे. तेव्हाही या सामाजिक परिस्थितीबद्दलचे विश्लेषण करीतच स्त्रियांचे मानसिक रोग, भयगंड, विकलता, आणि त्या पोटी विवेकनिष्ठेचा र्‍हास कसकसा होतो. याची मांडणी करणार आहे. विवेकनिष्ठा नसलेल्या स्त्रियांना एकंदरीतच मूर्खात काढले जाऊन त्यांची अप्रतिष्ठा करणे सोपे असते. समाजातील स्त्रीचे स्थान दुय्यम ठेवण्याची अनेक साधने बाद झाल्याच्या या नव्या काळात कोणते मार्ग स्त्रीच्या प्रगतीला बाधक ठरतील हे लक्ष देऊन पाहावे लागेल.

ज्या अविवेकी वर्तनाची किंवा विचाराची बळी माणूस ठरतो त्याच अविवेकाचा आधार माणूस कसा काय घेऊ लागतो हा प्रश्न आपल्याला अनेकदा पडतो. स्त्रियांच्या बाबत हे अधिकच खरे आहे कारण संस्कार, संस्कृती, सामाजिक प्रथा, चालीरीती, कुळाचार या नावांखाली अनेक अविवेकी, अविचारी बंधनांचे सोसणे याचे नाव भारतीय स्त्री. हे या देशातील एका लहानशा मर्यादित कप्प्यातल्या चिमूटभर स्त्रियांबाबत खरे नसेल, पण सर्वसाधारण चित्र हेच आहे. ते जाती, वर्ग, धर्म या सर्व स्तरांतून दिसते. शैक्षणिक पात्रता वाढत गेल्यानंतर स्त्रिया बर्‍याच अंशी या जुनाट अविवेकाच्या प्रथांतून काही अंशी सुटल्याचे दिसते, पण ती मुक्तता पूर्ण झालेली नाही. किंबहुना, आधुनिकतेच्या नव्या मूल्यांसोबत तथाकथित सांस्कृतिक मूल्ये आम्ही टिकवून ठेवतो हे म्हणण्याच्या सोसापायी शिक्षित आधुनिक स्त्रीची कुतरओढ चाललेली संपन्न वर्गातून, जन्मतःच लाभलेल्या तथाकथित उच्च जातींमधून सातत्याने दिसते.

- Advertisement -

मनु काय, कौटिल्य काय आणि स्त्रियांसाठी सदाचार मुक्तावली लिहिणारे मध्वाचार्य काय, हे सारेच भारतीय स्त्रियांच्या मानगुटीवर आजतागायत स्वार झालेल्या पुरुषप्रधान संस्कृतीचे रचनाकार होते. त्यांच्या काळातील रूढ प्रथा किंवा समाजरचनेला बळकटी देणारे दंडक त्यांनीही रचले आणि राजांकरवी त्या दंडकांची अंमलबजावणी होत राहिली.

मात्र आजच्या लोकशाही भारतात त्या पूर्वीच्या दंडकांना कायद्याचे थेट अधिष्ठान नसले तरीही भारतीय मानसात हेच दंडक रुजलेले आहेत. आणि हे दंडक स्त्रियांच्या मनात खोलवर रुजल्यामुळे त्यातील अन्यायकारक मूल्यव्यवस्थेविरुद्ध ब्र काढणार्‍या किंवा ते झुगारून देणार्‍या स्त्रिया म्हणजे रोल मॉडेल न बनता खलप्रवृत्तीच्या असल्याचा एक अंतःप्रवाह सर्वत्र संचार करत असतो.

या जोडीलाच स्त्रियांचे माणूसपण खच्ची करणार्‍या इतरही अनेक गोष्टी संस्कृतीच्या साच्यात घडलेले स्त्रीपुरुष करत असतात. स्त्रियांकडे विनोदबुद्धी कमी असते, स्त्रिया नीट विचार करू शकत नाहीत, स्त्रिया भावनेने विचार करतात- तर्काने नव्हे- हृदयाने करतात, मेंदूने नव्हे, अखेर बाईची अक्कल ती केवढी असणार, सोबत अखेर कुणीतरी पुरुष हवाच, शेवटी बाईनेच पडतं घ्यावं लागतं, पुरुषाचा अहं दुखावला तर तो काम तरी कसं करणार वगैरेंच्या सोबत- स्त्रियांमध्ये सहनशक्ती जास्त असतेची फोडणी बसते. आपल्या संपूर्ण परिसरात, बालपणापासून हेच अगदी सहज ऐकत झेलत असलेल्या स्त्रिया नकळत विकल होत जातात. आपण वेगळ्या पडू, आपले कुटुंबीय आपल्यावर प्रेम करेनासे होतील, आईबाबांना आवडणार नाही, अखेर कुटुंबाच्या पलिकडे काय आहे वगैरे चिंतांच्या जंजाळात स्त्री आपल्या विवेकबुद्धीचा स्वहस्ते भुगा करत रहाते.

स्वतःच स्वतःची विवेकबुद्धी अशा तर्‍हेने तडजोडीच्या दलदलीत फसू देणे हे काही फक्त स्त्रिया करतात असे नाही. स्त्री, पुरुष आणि भिन्नलिंगी अशी सारीच माणसे हे करू शकतात. या स्तंभातून स्त्रियांच्या विवेकनिष्ठेची विशेषत्वाने दखल घेतली जाईल कारण त्यांच्या वैचारिकतेवर या देशात सामाजिक उतरंडीत खालच्या समजल्या जाणार्‍या जातींप्रमाणेच ब्राह्मणवादी पुरुषी वर्चस्ववादाचा वरवंटा फिरत राहिलेला आहे.

नवीन युगाच्या आव्हानांना सामोरे जाताना, बुद्धीजीवी असताना आपण स्त्रियांनी नाहक कुठल्यातरी जुनाट पुरुषप्रधान संस्कृतीचे ओझे बाळगून पावले रखडत चालत राहू नये याची काळजी आपली आपण वाहिली पाहिजे.

रोजचे आयुष्य जगताना, कुटुंबासोबत जगताना, आपल्या माणूस म्हणून जबाबदार्‍या सच्चेपणाने निभावताना, पुढे जाताना बुद्धीचे, प्रतिभेचे पंख पसरू पाहाताना आपल्या पायातल्या बेड्या निघाल्या आहेत पण कोळीष्टके चिकटून राहिली आहेत याचे भान आणायची स्त्रियांना- मुलींना, तरुणींना, प्रौढांना, वृद्धांनाही गरज आहे. आणि ही कोळीष्टके साफ करण्यासाठी परखड सत्याचा, विवेकनिष्ठेचाच व्हॅक्यूम क्लीनर वापरावा लागेल. कोळीष्टके विणणारे कोळीही गारद करावे लागतील आणि पुन्हा कुठे नवी जळमटे निघू नयेत म्हणून मनाचे कानेकोपरे नेहमीच लख्ख ठेवावे लागतील.

हे रोज करावे लागणारे काम आहे. स्थित्यंतराचा काळ तसा कधीच संपत नसतो. समाजाची उत्क्रांती होणे ही सततची प्रक्रिया आहे. आणि ती आपोआप होत नसते तर त्या उत्क्रांतीचा कारक समाजाचा प्रत्येक घटक असू शकतो. मागे खेचणारे कारक जसे असतील तसेच पुढे नेणारेही असतात. विवेकनिष्ठा म्हणजे अखेर काय? सामाजिक उत्क्रांतीमध्ये तिचा सहभाग कसा असू शकतो.

फार पूर्वीच्या, अगदी प्राचीन काळातील अनुभवांवर, गरजांवर आधारित असे जे नियम असतात ते जेव्हा कालबाह्य ठरतात तेव्हा ते सोडून देणे म्हणजे विवेक. त्या कालबाह्य गरजांभोवती बेतलेल्या प्रथा परंपरा सोडून देणे म्हणजे विवेक. आणि आपल्याला जे पटले आहे ते लोकमताची, आप्तमताची पर्वा न करता अंमलात आणणे म्हणजे विवेक निष्ठा. हे प्रत्येक बदलत्या कालखंडात व्हावेच लागते.

कालबाह्य परंपरा, नियम, आणि संस्कार बुद्धीच्या निकषांवर उतरत नसतानाही केवळ संस्कृतीजतनाच्या नावाखाली पाळणे, कुळाचार म्हणून पाळणे हा अविवेकच.

कधीकधी लोक, विशेषतः स्त्रिया या परंपरा पालनामुळे आपल्याला आनंद मिळतो, स्नेहसंमेलने, आप्तभेटी होतात अशा लंगड्या सबबी देताना पाहायला मिळते. पण इथे मला खरोखरच आठवतो कोळीष्टकाच्या एखाद्या धाग्याला अडकून जोरजोरात फडफडणारा एखादा कीटक. तो फडफडतो म्हणजे तो काही जोरात उड्डाण करीत नसतो. तो हतबल होऊन थकत जातो. आणि अखेर शक्तीहीन लटकत रहातो. त्याला खायला कोळी आला नाही तरीही तो केवळ थकूनच मरून जातो.

स्नेहभेटींना विवेकी पर्याय असतात, नटण्यासजण्यासाठी, सुग्रास अन्न खाण्यासाठी इतर योग्य कारणेही मिळू शकतात. पण आपण ज्यात केवळ ओझ्याचे शिंगरू बनून सांस्कृतिक येरझार्‍यांनीच हेलपाटणार असू, आणि आपल्या व्यक्तिमत्वात त्यामुळे काहीही चांगला फरक पडणार नसेल तर मग हा सांस्कृतिक अविवेक सोडायलाच हवा.

या सदरातून विवशतेने विवेकी विचार करण्याचा प्रयत्नही न करणार्‍या स्त्रियांसाठीच नव्हे सर्वच लोकांसाठी प्रासंगिक महत्त्वाचे विषय घेऊन लिहिणार आहे. कठीण वाटले तरीही बुद्धीच्या कसोटीवर आपली कृती तपासून पाहात मगच त्यावर वेळ, पैसा आणि मुख्य म्हणजे स्वतःचे कष्ट खर्च करणेच श्रेयस्कर आहे. माणूसपणाचे आहे. उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवी समाजांचे विचार एका विशिष्ट काळात अडकून पडतात हे खरे आहे. पण त्यावर मात करून पुढे जाणे हीच सामाजिक आणि बौद्धिक उत्क्रांतीची योग्य दिशा आहे.

मुग्धा कर्णिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -