घरफिचर्सनोकरी म्हणजेही एक जबाबदारीच...

नोकरी म्हणजेही एक जबाबदारीच…

Subscribe

सरकारी नोकरी म्हणजे ऐशोआराम, ढीगभर पगार आणि सारख्या मिळणार्‍या सार्वजनिक सुट्ट्या असा भ्रम असणार्‍यांसाठी महावितरणात कार्यरत असणार्‍या कोकण परिमंडळाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे यांचं कार्य म्हणजे डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं असेल.

गेल्या ३० वर्षांपासून महावितरणाच्या विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या पदावर कार्यरत असणार्‍या रंजना पगारे यांनी ज्युनिअर अभियंता ते मुख्य अभियंता पदापर्यंतचा प्रवास केला आहे. सरकारी कामात एक महिला अधिकारी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःसोबतच राज्याच्या प्रगतीत आपलं काम कशा पद्धतीने करू शकते, याचे त्या उत्तम उदाहरण आहेत. डिसेंबर १९८९ साली महावितरण विभागात रुजू झालेल्या रंजना पगारे यांचा हा प्रवास नक्कीच आजच्या करिअर करू इच्छिणार्‍या महिलांसाठी प्रेरणादायी ठरावा असाच आहे.

सरकारी नोकरी म्हणजे बांधिलकी, जबाबदारी, स्वतःच समजून काम करण्याची जाण महत्वाची असल्याचे रंजना पगारे सांगतात. हे माझं आहे. ही जाणीव जेव्हा होते तेव्हा झोकून काम केलं जातं. माझं काम, माझा विभाग याबाबत एक आत्मियता असते. शिवाय लोकांपर्यंत पोहोचणं, लोकांशी संवाद साधणं, लोकांना सेवा देणं यापेक्षा दुसरं सामाजिक कार्य नाही. आम्ही हे सामाजिक कार्यच करत आहोत, असं रंजना मानतात.

- Advertisement -

महावितरणाच्या कोकण परिमंडळात जून २०१८ पासून मुख्य अभियंता पदावर कार्यरत असणार्‍या रंजना पगारे यांच्याकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे येथील वीज व्यवस्थापन आणि त्याचे नियोजन यावर भर देणे प्राथमिक जबाबदारी असल्याचे ते सांगतात. जिल्ह्यातील प्रत्येक माणसापर्यंत वीज पोहोचवणे, वीज बिल भरणा, थकबाकी यासंदर्भात काम पाहणेदेखील त्यांच्या कार्याचा भाग आहे. कोकणातील बहुतांश वीज ग्राहक त्याबाबतीत जागरूक असल्याचे रंजना सांगतात. त्यामुळे महावितरण विभागाला ग्राहक सहकार्यही करतात. परंतू ग्राहकांनी वेळेत पैसे भरण्याची भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्या आवर्जून सांगतात. “वीज ही अशी गोष्ट आहे, जी आपण साठवून ठेऊ शकत नाही. त्यामुळे ग्राहकांनी त्याची कुठेतरी एक जाणीव ठेऊन आपापल्या नैतिक जबाबदार्‍या पार पाडण्याची काळजी घ्यायला हवी”, असे रंजना पगारे सुचवतात.

ग्राऊंड लेवलवर काम करताना आपण प्रत्येक वीज ग्राहकापर्यंत पोहोचू शकणार नाही. हे सांगतानाच आपल्या विभागातील सेक्शन ऑफीसर मात्र प्रत्येकापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. यातही त्यांच्या झोनमध्ये येणार्‍या ३ वाडीपाड्यात त्यांनी स्वतःहून लोकांपर्यंत पोहोचून संवाद साधल्याच त्या नमूद करतात. आपल्या झोनमध्ये सेंट्रल बिलिंग सिस्टमला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही रंजना सांगतात.

- Advertisement -

कोकण विभागात येण्यापूर्वी रंजना पगारे या दीड वर्ष नाशिकमध्ये ट्रेनिंग सेंटर विभागात कार्यरत होत्या. याठिकाणी त्या महावितरणच्या प्रशिक्षण व सुरक्षा, एकलहरे (नाशिक) येथील मुख्य महाव्यवस्थापक म्हणून काम पाहत होत्या. नाशिकमध्ये त्यांनी प्रत्येक कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांमध्येही वीज वापर आणि वीज सुरक्षेबाबत भरीव कामगिरी केली. जिल्हापातळीवर या विभागाचे कर्मचारी जागरुकता करत असून शाळा, कॉलेज, आठवडा बाजार, उत्सव, जत्रा या ठिकाणी जाऊन वीज बचत, सुरक्षित वापराविषयी माहिती दिली जाते.

“दरवर्षी विभागातर्फे जानेवारी महिन्यात सेफ्टी सप्ताहचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यामध्ये वीज सुरक्षेचे सर्व उपाय आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे माध्यम यावर भर दिला जातो. शिवाय कर्मचार्‍यांना सूचना, मार्गदर्शन, प्रशिक्षणही दिले जाते. माझ्या कारकिर्दीत ५६ ते ५७ हजार कर्मचारी या ट्रेनिंगखाली तयार झाले आहेत.” असं त्या सांगतात.रंजना पगारे यांच्या करिअरला पुढील वर्षात ३० वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र त्यांचा प्रवासही सोपा नव्हता. ज्युनिअर अभियंता म्हणून महावितरणात रुजू झालेल्या रंजना पुढे एक एक टप्पा पार करत सहाय्यक अभियंता (असिस्टंट), नंतर उप अभियंता (डेप्युटी), त्यानंतर मुख्य महाव्यवस्थापक (ए.ई.) आणि प्रमोशनमध्ये आता थेट म्हणजेच मुख्य अभियंता (सी.ई.) पदावर कार्यरत आहेत.

गेल्या वर्षी केंद्र सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या तिसर्‍या वर्धापन दिनाचे औचित्य साधून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते महावितरण विभागाला चॅम्पियन ऑफ चेंज हा पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी विभागाने रंजना पगारे यांची निवड केली होती. हा पुरस्कार म्हणजे महावितरणावर वाढलेली जबाबदारी असल्याचे त्या सांगतात. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी महावितरण विभागाने माझी निवड केली. हीदेखील अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

नोकरी आणि कुटुंबाची जबाबदारी ही कोणत्याही महिलेसाठी कसरतीचे काम असते. एक महिला म्हणून विविध भूमिका, वेगवेगळ्या जबाबदार्‍या आपण पार पाडत असतो. कुटुंबाची तसेच आई म्हणून मुलांची जबाबदारी असते. मात्र कमाच्या स्वरुपानुसार जबाबदार्‍या बदलतात. त्यामुळे एखाद्या क्षेत्रात अभियंता पदावर काम करताना महिला की पुरुष हा भेदभाव आपण ठेवत नाही. जबाबदारीने काम केल्यास सगळेच तुम्हाला सहकार्य करतात, असे रंजना पगारे यांनी स्पष्ट केले.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -