घरमुंबईशिवतीर्थावरून सेनेची रामलीला!

शिवतीर्थावरून सेनेची रामलीला!

Subscribe

आज उद्धव ठाकरेंकडून रामाचा जागर

मुंबई:- अयोध्येतील राम मंदिराचा विषय भारतीय जनता पक्षाने ९०च्या दशकात प्रथमच राजकीय पटलावर आणला आणि देशभरात भाजपने कट्टर हिंदुत्ववादी म्हणून प्रतिमा बनवली. त्याआधारे दोन वेळी केंद्रात सत्ता मिळवली, मात्र आज भाजपच्या अजेंड्यातून राम मंदिराचा मुद्दा विलुप्त झाल्यानंतर शिवसेनेने लागलीच राम मंदिराचा मुद्दा हायजॅक करून दसर्‍यानंतर अयोध्येत राम मंदिर बांधणार असल्याची घोषणा मागच्या महिन्यात केली.अशा प्रकारे शिवसेनेने देशभरात भाजपची कट्टर हिंदुत्त्ववादी पक्ष म्हणून असलेली ओळख पुसून टाकण्याचा राजकीय खेळी खेळली आहे. उद्याच्या दसरा मेळाव्याच्या जाहिरातीतही सेनेने ‘हिंदुत्वाची वज्रमुठ’ अशी ठसठशीत ओळ टाकून शिवसैनिकांना एक प्रकारे आगामी निवडणुकांचा संदेश दिला आहे. या मेळाव्यात पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी शिवसैनिकांनी आता कारसेवक होण्याचे आदेश देतील.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून शिवसेनेसाठी या दसरा मेळाव्याचे महत्त्व अधिक आहे. एक प्रकारे सेना या मेळाव्यातून प्रचाराचा नारळ फोडणार आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक शिवतीर्थावर किमान ५ लाख शिवसैनिक जमवून दमदार शक्तीप्रदर्शन करण्याचा निर्धार सेनेने केला आहे. त्यासाठी जिल्हा, तालुका, गाव पातळीवर शिवसैनिकांना दसरा मेळाव्यात सहभागी होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्याच्या वातावरणात भाजपच्या विरोधात बर्‍याच प्रमाणात वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे २०१४ प्रमाणे भाजपला स्वतःच्या हिंमतीवर निवडणूक लढवणे अशक्य होणार आहे. त्याकरता भाजप आतापासूनच घटक पक्षांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचाच फायदा घेऊन शिवसेना आतापासूनच ताठर भूमिका घेत भाजपसाठी हिंदुत्वाच्या मुद्यावर देशभर प्रतिस्पर्धक बनून लोकसभा आणि विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांत सहभाग घेण्याची तयार सुरू करणार आहे. त्यामुळे शिवतीर्थावरून उद्धव ठाकरे भाजपच्या कारभाराचा वाभाडे काढणार हे निश्चित!

- Advertisement -

शिवसेना राज्याचे सीमोल्लंघन करणार

या मेळाव्यात केरळ, गोवा, तामिळनाडू, उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यातील शिवसैनिकांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या माध्यमातून शिवसेना पुढील वर्षी होणार्‍या या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे या मेळाव्यात बिगुल वाजवून महाराष्ट्र राज्याचे सीमोल्लंघन करणार आहे. अन्य राज्यांत शिवसेना प्रखर हिंदुत्वाचे कार्ड खेळणार असून तसा कार्यक्रम शिवसैनिकांना दसरा मेळाव्यातून दिला जाण्याची शक्यता आहे.

या मुद्यांवर उद्धव ठाकरे घेतील समाचार

पेट्रोल आणि डिझेल भाववाढ, महागाईचा भडका, महिलांवरील वाढते अत्याचार, दुष्काळाचे सावट, अयोध्या मंदिर, सनातन संस्थेच्या साधकांची झालेली अटक, राफेल घोटाळा, गोवा राज्यातील भाजपचे फोडाफोडीचे राजकारण, शेतकर्‍यांची आत्महत्या, मराठा, धनगर आरक्षण, नोटाबंदी निर्णयाचा झालेला फियास्को.

- Advertisement -

भाजपवर दबावतंत्र अवलंबणार

यंदाच्या निवडणुकीत भाजपचा जनाधार घटलेला आहे. हे जाणूनच शिवसेना राज्यातही भाजपवर दबावतंत्र अवलंबण्याची शक्यता आहे. त्यामुळेच उद्याच्या दसरा मेळाव्यात राज्याच्या भाजपलाही संदेश देण्याचा प्रयत्न सेनेकडून होणार आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करून आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही आतापासूनच तयारी लागा, असाही आदेश उद्धव ठाकरे यांच्याकडून दिला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसेना या मेळाव्यात स्वबळाची भाषा करून आगामी निवडणुकीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, अशी गर्जना उद्धव ठाकरे करतील, ज्यायोगे उद्धव राज्याच्या भाजपवर दबाव टाकण्याचा शक्य तितका प्रयत्न करतील.

राममंदिर उभारणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील हिंदू विजयादशमीनंतर अयोध्येला कूच करणार आहेत. रामलल्लाला वनवासातून बाहेर काढण्याची तयारीही सुरू झाली आहे. मंदिर निर्मितीसाठी कानाकोपर्‍यातील हिंदू बांधव, शिवसैनिक, वारकरी, धारकरी एकवटू लागले आहेत. आता त्यांना प्रतीक्षा आहे ती उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची.
– शिवसेना नेते संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -