घरफिचर्सनिसर्ग कवी विल्यम वर्डस्वर्थ

निसर्ग कवी विल्यम वर्डस्वर्थ

Subscribe

विल्यम वर्डस्वर्थ हे थोर इंग्रजी निसर्ग कवी व इंग्रजी साहित्यातील स्वच्छंदतावादी काव्यसंप्रदायाचे एक प्रणेते होते. त्यांचा जन्म 7 एप्रिल 1770 रोजी कॉकरमथ, कंबर्लंड येथे झाला. वर्डस्वर्थचे आईवडील ते लहान असतानाच वारले. त्यांच्या दोन काकांनी त्यांचा सांभाळ केला. आरंभीचे शिक्षण हॉकशीड येथील ‘ग्रामर स्कूल’ मध्ये घेतल्यानंतर केंब्रिजच्या ‘सेंट जॉन्स कॉलेज’ मध्ये त्यांनी प्रवेश घेतला (१७८७). १७९१ मध्ये ते बी. ए. झाले. तत्पूर्वी, १७९० मध्ये, त्यांनी फ्रान्स, आल्प्स आणि इटलीचा दौरा पायी केला होता. १७९१ मध्ये ते पुन्हा फ्रान्सला गेले. फ्रेंच राज्यक्रांतीचा तो प्रकर्षकाल होता. फ्रान्समधील वर्षभराच्या वास्तव्यात या क्रांतीचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव पडला. फ्रान्समध्ये असतानाच आनेत व्हॅलाँ या युवतीच्या प्रेमात ते पडले. ते आनेतशी विवाह करू शकले नाहीत. मात्र, तिच्यासाठी त्यांना जेवढे करता आले ते सर्व त्यांनी केले. इंग्लंडचे फ्रान्सबरोबर सुरू झालेले युद्ध आणि फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समध्ये उसळलेला दहशतवाद यामुळे त्यांना नैराश्य आले. ‘द बॉर्डरर्स’ हे आपले शोकात्म पद्यनाटक वर्डस्वर्थने येथेच लिहून पूर्ण केले (१७९५-९६). १७९३-९५ या काळातील त्यांची निराश मनःस्थिती या पद्यनाटकातून लक्षणीयपणे व्यक्त झालेली आहे.

डॉर्सेट येथे राहत असतानाच श्रेष्ठ इंग्रज कवी आणि टीकाकार सॅम्युएल टेलर कोलरिज (१७७२-१८३४) यांच्याशी वर्डस्वर्थ यांचा आणि डॉरोथीचा परिचय झाला. पुढे या परिचयाचे घनिष्ट मैत्रीत रूपांतर झाले. वर्ड्स्वर्थ आणि कोलरिज ह्या दोघांच्याही काव्यनिर्मितीला या स्नेहातून चेतना मिळाली. कोलरिज व वर्डस्वर्थ या मित्रांनी आपल्या कविता लिरिकल बॅलड्स या नावाने १७९८ मध्ये प्रसिद्ध केल्या. या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाबरोबर इंग्रजी साहित्यात स्वच्छंदतावादाचा उदय झाला, असे मानले जाते. ‘द प्रीलूड’ (१७९९ -१८०५) हे त्यांचे काव्य याच दशकातले. १८१३ मध्ये त्यांना ‘डिस्ट्रिब्यूटर ऑफ स्टँप्स फॉर द काउंटी ऑफ वेस्टमोरलंड’ हे विनाश्रम पद देण्यात आले. अशा या थोर निसर्ग कवीचे २३ एप्रिल १८५० रोजी निधन झाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -