घरफिचर्सप्रसिद्ध उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर

प्रसिद्ध उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर

Subscribe

१९१० साली औंध संस्थानाधिपतींकडून सर्व प्रकारच्या सवलती मिळाल्याने लक्ष्मणरावांनी कुंडलच्या निर्जन व निर्जल माळावर ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ या नावाने कारखाना उभारला व किर्लोस्करवाडीच्या वसाहतीस प्रारंभ केला. या कारखान्यातून लोखंडी नांगर, चरक, मोटा, रहाट वगैरे कृषी अवजारांचे उत्पादन सुरू झाले.

लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर हे किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक होते. त्यांचा जन्म 20 जून 1869 रोजी गुर्लहोसूर येथे झाला. धारवाड व कलादगी येथे प्राथमिक शिक्षण झाले. अठराव्या वर्षी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून चित्रकलेचा अभ्यास पूर्ण केला. पुढे व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये प्रथम चित्रकला-शिक्षक व नंतर बाष्प-अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून काम केले. १८९७ मध्ये ते मुंबई सोडून बेळगावला आले. थोरल्या भावाच्या मदतीने त्यांनी सायकल, पवनचक्की, कडवा कापणीयंत्र, लोखंडी नांगर वगैरे वस्तूंच्या उत्पादनास प्रारंभ केला.

१९१० साली औंध संस्थानाधिपतींकडून सर्व प्रकारच्या सवलती मिळाल्याने लक्ष्मणरावांनी कुंडलच्या निर्जन व निर्जल माळावर ‘किर्लोस्कर ब्रदर्स’ या नावाने कारखाना उभारला व किर्लोस्करवाडीच्या वसाहतीस प्रारंभ केला. या कारखान्यातून लोखंडी नांगर, चरक, मोटा, रहाट वगैरे कृषी अवजारांचे उत्पादन सुरू झाले. भांडवल वाढविण्यासाठी १९२० साली कारखान्याचे मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यात आले. त्यामध्ये विविध प्रकारचे हात पंप, लहानमोठे यांत्रिक पंप, घरगुती लोखंडी फर्निचर, लेथ इत्यादींचे उत्पादन होऊ लागले. १९३४-३८ मध्ये लक्ष्मणराव औंध संस्थानचे दिवाण होते. १९४५ मध्ये ते कारखान्याच्या संचालकपदावरून निवृत्त झाले. १९५३ साली प्रथमच ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’ चे सन्माननीय सदस्यत्व लक्ष्मणरावांना देण्यात आले.

- Advertisement -

औद्योगिक कारखाने चालविण्याचे व्यावसायिक शिक्षण घेतलेले नसताही लक्ष्मणरावांनी सर्व गोष्टी अतिशय परिश्रमाने साध्य केल्या. विश्वासू व कर्तबगार सहकारी निर्माण करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. लक्ष्मणरावांच्या यशाचे रहस्य म्हणजे ग्राहकांच्या गरजांची पूर्वजाणीव आणि वस्तूच्या उत्कृष्ट गुणवर्त्तेचा आग्रह. कणखर शिस्त, पद्धतशीर काम, जगभर आपला माल लोकप्रिय करण्याची तीव्र आकांक्षा, हे त्यांचे वर्तनसूत्र होते. १९६९ साली भारत सरकारने लक्ष्मणरावांची जन्मशताब्दी देशभर साजरी केली त्यानिमित्ताने टपाल खात्याने वीस पैशांचे एक तिकीटही काढले. अशा या कर्तृत्ववान उद्योजकाचे २६ सप्टेंबर १९५६ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -