घरफिचर्सकलावंतांची चटका लावणारी एक्झिट!

कलावंतांची चटका लावणारी एक्झिट!

Subscribe
पंडित जसराज आणि लेखक-दिग्दर्शक निशिकांत कामत यांची एक्झिट चटका लावणारी ठरली. पंडित जसराज यांनी आठ दशके भारतीय अभिजात शास्त्रीय गायकीने आपले सर्वांचे जीवन समृद्ध केले होते. जणू परमेश्वराचा ते अंश वाटत होते. माणसांमध्ये वावरत असूनही जणू देवाशी त्यांचा संवाद सुरू असल्याचे वाटे…आणि देवाशी एकरूप झालेला त्यांचा स्वर आपल्याला अलौकिकाशी जोडत होता. आपणही त्यांच्यासोबत एका वेगळ्या विश्वात रमत होतो आणि प्रत्येक मैफलीत त्यांच्या तोंडून निघालेला ‘जयहो’ हा एक आशीर्वाद होता…एका तपस्वीने दिलेला. पृथ्वीतलावरील मर्त्यमानवाच्या पदरी असलेले दुःख हरण करून त्याला देवाशी जोडणारे त्यांचे गाणे म्हणजे एक स्वर्गीय आनंदाचा भाग होता. कदाचित देवच त्यांच्याकडून हे करून घेत असावा. अशी त्यांची गायकी अनुभवताना भास होत असे. म्हणूनच त्यांची मुलगी दुर्गा जसराज सांगून जाते,‘आम्ही प्रार्थना करतो की, भगवान श्रीकृष्ण त्यांचे प्रेमाने स्वर्गात स्वागत करेल. तिथे आता पंडितजी ‘ओम नमो भागवते वासुदेवाय’ हे गाणे फक्त त्यांच्या प्रिय देवासाठी गातील’, तेव्हा पंडितजींचा सूर अवकाशात भरून उरतो.

मेवाती घराण्याची संगीत शैली रसिकप्रिय करणारे पं. जसराज यांचा जन्म संगीत परंपरा असलेल्या कुटुंबात झाला. शास्त्रीय संगीताचे प्राथमिक धडे कुटुंबातच गिरवल्यानंतर त्यांनी गुरू महाराज जयवंतसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिकण्यास प्रारंभ केला. स्पष्ट शब्दोच्चार, सुरेल आवाज, लयीवरील प्रभुत्व ही त्यांच्या गायकीची वैशिष्ठ्ये होती. भारतातील आणि परदेशातील प्रत्येक संगीत महोत्सवात हमखास आपली कला सादर करणारे जसराज हे अतिशय लोकप्रिय कलावंत होते. मेहनतीने त्यांनी आपली कला साकार केली.

संगीतातील ख्याल गायकीबरोबरच अन्य अनेक प्रकारही त्यांनी लोकप्रिय केले. भावसंगीत, भक्तिसंगीत या संगीत प्रकारांतही त्यांनी आपले वेगळेपण सिद्ध केले होते. पं.जसराज यांनी भारतीय संगीत विश्वात ‘जसरंगी’ ही नवी संकल्पना रुजवली. ‘हवेली संगीता’विषयी त्यांचा सखोल अभ्यास होता. यातून त्यांनी काही दुर्मीळ रचनांवर आधारित भक्तिसंगीत सादर केले.पं. जसराज यांनी केलेली देशभक्तीपर रचना जयहिंद, तिरंगा, एड्सबाबत ‘बीबीसी’साठी केलेली रचना आणि जागतिक तापमानवाढी बाबतचे ‘पंचतत्व’ या रचना त्यांच्या कारकीर्दीतील काही वेगळ्या आणि महत्त्वाच्या रचना होत. भारतीय संगीताला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘इंडियन म्युझिक अ‍ॅकॅडमी’ची स्थापना केली. त्यातून त्यांनी तरुण कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. शिवाय गरजू संगीतकार, गीतकार यांना वैद्यकीय मदतही केली. पं.जसराज यांनी दुर्गा जसराज, रतन मोहन शर्मा, संजीव अभ्यंकर, तृप्ती मुखर्जी यांसारखे दिग्ग्ज गायक शिष्य घडवले. आपल्या गुरुविषयी भावना व्यक्त करताना संजीव अभ्यंकर सांगतात तेव्हा गुरु- शिष्य नात्याचे मोठेपण अधोरेखित होते. ‘कोट्यवधींमधील एक आणि शतकातील एक असे पं. जसराजजी हे माझ्यासाठी दैवतच होते. वयाच्या १३ व्या वर्षांपासून मी त्यांच्याकडे शिकत होतो. त्यांचा ३८ वर्षांचा सहवास मला लाभला. केवळ समोर बसवून नव्हे तर स्वरसाथीतून शिक्षण होऊ शकते याची प्रचिती त्यांनी मला दिली. गुरुजींच्या चारशेहून अधिक मैफिलींमध्ये मी स्वरसाथ केली’.

- Advertisement -

नव्या पिढीचा गायक राहुल देशपांडे याचे मनोगत तर खूप काही सांगून जाणारे आहे. ‘डॉ. वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, पं. जितेंद्र अभिषेकी, किशोरीताई आमोणकर यांच्यानंतर पं. जसराज यांच्या निधनामुळे देवांची दुनिया श्रीमंत झाली आणि आपली उजाड झाली, असे वाटते. समर्थ गायक असलेल्या पं. जसराज यांचे सांगीतिक विचार ऐकण्याची संधी मला मिळाली. ते परीक्षक असलेल्या एका स्पर्धेत माझे गाणे झाल्यानंतर त्यांनी प्रेमाने जवळ घेऊन माझे कौतुक केले होते. त्यांच्या आशीर्वादाने मला ऊर्जा मिळाली होती’. पंडितजी ऋषितुल्य तर होतेच पण विशाल हृदयी होते. म्हणूनच आरती अंकलीकर टिकेकर सांगतात, ‘दुर्गा, शारंग आणि मी एकाच वयाचे असल्याने त्यांच्याकडे माझे जाणे-येणे होते. आमच्या कार्यक्रमांना ते उपस्थित राहून मोठ्या मनाने ऐकून प्रोत्साहन द्यायचे.‘एकावातीने दुसरी वात प्रज्वलित होते,’ त्याप्रमाणे पं. जसराज शरीराने आपल्यातून गेले असले, तरी त्यांचे गाणे आपल्या मनात आणि शिष्यांच्या गळ्यात कायम राहणार आहे. तर पंडित भीमसेन जोशी यांचे चिरंजीव आणि गायक श्रीनिवास जोशी पंडितजी यांची आठवण सांगतात. ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवामध्ये दरवर्षी ते गात असत. आमच्या कुटुंबाशी त्यांचे प्रेमाचे संबंध होते. १९९८-९९च्या महोत्सवात त्यांची मैफील झाली. माझी आई वत्सलाबाई जोशी या त्या वेळी आजारी असल्याने येऊ शकल्या नव्हत्या. दुसर्‍या दिवशी सकाळीच पंडितजी आमच्या घरी आले. संवादिनी मागवून घेतली आणि त ेआई समोर गायला बसले. मनस्वी आणि प्रेमळ स्वभावाच्या पं. जसराज यांचे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्याशी प्रेमळ नाते होते. ‘बिरबल माय ब्रदर’ या चित्रपटात त्या दोघांनी जोडीने पार्श्वगायन केले होते.

निशिकांत कामतसारखा वेगळ्या दृष्टीचा लेखक दिग्दर्शक वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी हे जग सोडून जातो तेव्हा वाटणारी चुटपुट रसिक प्रेक्षकांच्या काळजाला घर पाडून जाते. आशय, विषय, पटकथा, मांडणी यावर उत्तम पकड असलेला हा दिग्दर्शक होता. निशिकांत कामत यांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहताना त्यांनी केलेला विषयाचा अभ्यास त्यातून दिसायचा. दिग्दर्शक होण्याआधी निशिकांत कामत एक अभिनेता होते. संजय सूरकर यांच्या ‘सातच्या आत घरात’ चित्रपटात त्यांनी कॉलेजमधल्या युवकाची साकारलेली भूमिका आजही लक्षात आहे. कॉलेजच्या दिवसात मजा-मस्ती सुरु असताना एक घटना घडते. त्यानंतर या चित्रपटात एक टर्निंग पॉईंट येतो. प्रेयसीला बलात्कारापासून वाचवता न आल्याची खंत आणि नंतर तिचा स्वीकारही करु शकत नाही, ही घुसमट निशिकांत यांनी पडद्यावर उत्तमरित्या साकारली होती. मराठीमध्ये फार कमी असे दिग्दर्शक आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्वतंत्र स्थान, वेगळी ओळख निर्माण केली. निशिकांत कामत यांनी बॉलिवूडमध्ये फक्त बस्तानच बसवलं नाही तर त्यांनी बॉलिवूडचा मराठी चित्रपट सृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.२००५ साली दिग्दर्शित केलेल्या ‘डोंबिवली फास्ट’ चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. या चित्रपटातून त्यांचं टॅलेंट, वेगळेपण अधोरेखित झालं. या माणसामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं, आणि नंतर निशिकांत कामत यांनी फोर्स, लय भारी, दृश्यम, मदारी, रॉकी हॅण्डसम या चित्रपटातून त्यांचे वेगळेपण सिद्धही केलं. ‘डोंबिवली फास्ट’मध्ये डोंबिवली ते मुंबई या प्रवासात सर्वसामान्य माणसाची होणारी घुसमट, मनोवस्था त्यांनी अप्रतिमरित्या टिपली आहे. संपूर्ण चित्रपट पाहताना दिग्दर्शक म्हणून त्यांनी अत्यंत बारकाईने केलेला अभ्यास जाणवतो. पंडित जसराज आणि निशिकांत कामत यांचं वेगळेपण रसिकांच्या नेहमीच लक्षात राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -