घरफिचर्ससाठ तासांचा अनोखा रंगोत्सव!

साठ तासांचा अनोखा रंगोत्सव!

Subscribe

नाट्य परिषदेवर निवडून आलेल्या ‘आपलं पॅनेल’ आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे हे पहिलेच नाट्य संमेलन. त्यात नाट्य संमेलन सुरू होण्याआधीच वादाची नांदी झाली होती. निमित्त झाले ते ज्येष्ठ नाट्य निर्मात्या लता नार्वेकर यांच्या निर्णयाचे. त्यांनी संमेलनाला हजर न राहण्याचा निर्णय घेतलाय. संमेलनाची पत्रिका फक्त व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठवली. तसेच संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत नाट्य परिषदेच्या कार्यकारी समितीपेक्षा भाजप नेत्यांची नावे अधिक आहेत असे त्यांचे म्हणणे होते. शिवाय सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे सलग ४ वर्षं नाट्य संमेलनाला आले नाहीत. आणि निमंत्रण देताना ते फक्त राज ठाकरेंकडे गेले. उद्धव ठाकरेंकडे गेले नाहीत अशीही तक्रार त्यांनी बोलून दाखवली. त्यामुळे सर्वांचेच ९८व्या ‘अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलना’कडे लक्ष लागले होते. आतापर्यंतच्या नाट्य संमेलनाची परंपरा मोडीत काढत यंदाचे ९८वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन मुंबईतील मुलुंडमधील महाकवी कालिदास नाट्य मंदिरात १३ जून ते १५ जून असे सलग तीन दिवस अथक ६० तास मोठ्या उत्साहात पार पडले. नाट्य संमेलन यशस्वी करून नव्या कार्यकारिणीनं राजकीय वर्तुळातील मंडळींपासून कलाकारांपर्यंत सर्वांच्याच कौतुकाची थाप मिळवली.

यंदाचे नाट्य संमेलन वैविध्यपूर्ण लोककलेने नटलेले होते. तसेच नाट्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीची नवीन संकल्पना असलेले सलग साठ तासांचे नाट्य संमेलन कसे पार पडणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र या अथक नाट्य संमेलनाला नाट्यप्रेमींचा भरघोस प्रतिसाद मिळाला. सकाळच्या कार्यक्रमांसह रात्रीपासून पहाटेपर्यंत नाट्यगृह तुडूंब भरलेलं होतं. पहिल्या दिवसाची सुरुवात ‘चौरंग’च्या ‘मराठी बाणा’ कार्यक्रमानं झाली. सकाळी साडेसहा वाजता असलेल्या ‘मराठी बाणा’ला मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. खरी संमेलनाची सुरुवात सायंकाळी चार वाजता नाट्य दिंडीनं झाली. पाऊस न पडल्यामुळे लोककलावंत सुखावले होते. नाट्य दिंडीत मुलुंडकरांचे लक्ष वेधून घेतले ते कोंबडा, वयोवृद्ध लेझीम खेळणारी मंडळी, वासुदेव, संत गाडगेबाबा व ढोलताशा पथकांनी. या नाट्य दिंडीत महाराष्ट्रातल्या कानाकोपèयातून आलेल्या लोककलावंतांनी आपली कला सादर करून सर्वांना थक्क केलं. नाट्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा नाट्यगृह परिसरातील प्रियदर्शनी क्रीडा संकुलात सुधा करमरकर रंगमंचावर ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते पार पडला. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली.
ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांनी नाट्य संमेलनाध्यक्षांची सूत्रे जयंत सावरकर यांच्याकडून स्वीकारली.

- Advertisement -

यंदाच्या नाट्य संमेलनात एकाही व्यावसायिक नाटकाचा समावेश नव्हता. ‘संगीत सौभद्र नाटक,’ ‘पंचरंगी पठ्ठेबापुराव,’ ‘लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर’ यांना समर्पित ‘रंगबाजी,’ ‘प्रात:स्वर,’ ‘बालनाट्य’ ‘तेलेजू’ व ‘जंबा बंबा बू’, ‘इतिहास गवाह है’ एकांकिका, ‘तुका म्हणे’ नृत्यनाटिका, लोककला जागर, झाडीपट्टी नाटक, फाटका संसार, दंडार महिषासूर वध तसेच दशावतार, नमन, आराधी लोकनृत्य, शिकस्त-ए-इश्क प्रायोगिक नाटक व एकपात्री महोत्सव अशा मनोरंजनपूर्ण कार्यक्रमाची मेजवानी नाट्य संमेलनात मिळाली. तसेच पुण्याच्या अंध कलाकारांनी सादर केलेले दोन अंकी नाट्यप्रयोग अपूर्व मेघदूत पाहताना सगळे प्रेक्षक अवाक् झाले होते. संमेलनाध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्या मुलाखतीतून त्यांची कारकीर्द उलगडण्यात आली व त्यांनी स्वरसम्राज्ञी नाटकातील प्रवेश आणि ‘कशी केलीस माझी दैना’ हे लावणीवजा पद सादर करून या संमेलनाची शोभा आणखीन वाढवली. तसेच नाटकाच्या सद्यस्थितीवर आयोजित केलेला ‘सांस्कृतिक आबादुबी’ हा परिसंवादही उत्तम पार पडला. त्यात नाटकातील अनेक समस्या आणि मुद्यांवर चर्चा करण्यात आली. परिसंवादालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

नाट्य संमेलनाच्या फलकांऐवजी राजकीय मंडळींच्या स्वागतासाठी अनेक फलक परिसरात लावलेले पाहायला मिळाले. इतकेच नाही तर संमेलनाचे स्वागताध्यक्ष विनोद तावडे तसेच स्वागत समितीचे उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांचेही फलक लागलेले होते. संमेलनाच्या नियोजनामध्ये राजकीय कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतल्याने आपापल्या नेत्याचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची चढाओढ पाहायला मिळाली.

- Advertisement -

नाट्य संमेलनात गो. ब. देवल स्मृती पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री विद्या पटवर्धन आणि ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच नाट्य परिषदेच्या प्रायोगिक, व्यावसायिक, संगीत रंगकर्मी आणि रंगभूमीसाठी झटणाऱ्या इतर रंगकर्मींचा सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी बाल आणि समांतर रंगभूमीची आज दुर्दशा झाली असून त्याला आपण जबाबदार आहोत. त्यामुळे रंगभूमीला उभारी देण्यासाठी सगळ्यांनी पुढे येण्याची गरज असल्याचे विद्या पटवर्धन यांनी सांगितले. तर रमेश भाटकर यांनी नाटक हे विश्वासावर तग धरून असलेला व्यवसाय असल्याचे म्हटले. समारोप सत्रात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या सत्रात कोकण, पुणे, नागपूर, सोलापूर, धुळे, जळगाव, मराठवाडा, अहमदनगर येथील काही निवडक रंगकर्मींना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. नाट्य संमेलनाला कोणत्याही वादाची झालर न लावता मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पाडण्याची जबाबदारी प्रसाद कांबळी व त्याच्या कार्यकारिणी सदस्यांनी यशस्वीपणे पेलली आहे. या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने लोप पावत चाललेली लोककला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आणि नाटक ही कला समृद्ध करणारी असल्याची जाणीव झाली.

तेजल गावडे

(लेखिका ‘आपलं महानगर’ च्या प्रतिनिधी आहेत.)

[email protected]

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -