घरफिचर्सभारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते

भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते

Subscribe
भारतीय राजकारणातील भीष्माचार्य दादाभाई नौरोजी. (जन्म : वर्सोवा-मुंबई, ४ सप्टेंबर, इ.स. १८२५; मृत्यू : महालक्ष्मी-मुंबई, ३० जून, इ.स. १९१७) हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी ॲन्ड ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसद सदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले.

 

भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात. ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक. जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हाउस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते रा.गो. भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते. मुंवईच्या गिरगांव भागात जेथे दादाभाई रहात होते त्या रस्त्याला नौरोजी स्ट्रीट म्हणतात. याच रस्त्यावर स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटीची कमळाबाईंची शाळा आहे. १८४५ – स्टुडंट्स लिटररी सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यात सहभाग. १८८५ – भारतीय राष्ट्रीय कॉ्ंग्रेसचे संस्थापक सदस्य. १८८६, १८९३ व १९०६ – भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. ज्ञान प्रसारक मंडळासह बॉम्बे असोसिएशन, लंडन इंडियन असोशिएशन, आणि ईस्ट इंडिया असोशिएशनची स्थापना केली.

- Advertisement -

एक समाजसुधारक म्हणून दादाभाईंचा लौकिक होता. जातिनिष्ठ मर्यादा पाळणे त्यांना मान्य नव्हते. स्त्रीपुरुष-समानता, स्त्रीशिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला. ‘द स्ट्यूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ ह्या संस्थेच्या वतीने त्यांनी मुलींसाठी तीन मराठी व चार गुजराती शाळा उघडल्या. दादाभाईंच्या ह्या समाजकार्याला जगन्नाथ शंकरशेट यांसारख्यांनी मोठा हातभार लावला. दादाभाई हे प्रखर राष्ट्रवादी वृत्तीचे होते. कलकत्ता काँग्रेसमधील केलेल्या आपल्या भाषणास त्यांनी सर हेन्‍री कँपबेल बॅनरमनच्या पुढील वाक्याने प्रारंभ केला होता : “चांगले सरकार हे काही जनताप्रणीत सरकारला पर्याय ठरू शकत नाही”. याच भाषणात त्यांनी असे घोषित केले, की “आम्ही कोणत्याही कृपेची याचना करीत नाही, आम्हाला फक्त न्याय हवा. सर्व गोष्टी सारांशरूपाने ‘स्वराज्य’ या एकाच शब्दाने सांगता येतील. ते स्वराज्य कसे, तर युनायटेड किंग्डमचे किंवा वसाहतींचे”. दादाभाई हे मवाळ पक्षाचे असून घटनात्मक राज्यपद्धतीवर त्यांचा दृढ विश्वास होता. दादाभाई हे प्रभावी वक्ते होते. इंग्रजी व गुजराती या दोन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते.

सर दिनशा वाच्छा यांनी म्हटल्याप्रमाणे दादाभाई नवरोजी हे भारतीय राज्याशास्त्र आणि अर्थशास्त्र यांचे जनकच मानले जातात. परकीयांच्या वर्चस्वाखालील भारतातील आर्थिक घटनांच्या विशदीकरणाची किती नितांत आवश्यकता आहे, ते दादाभाईंनी आपल्यानंतरच्या अर्थशास्त्रज्ञांना दाखवून दिले. आर्थिक प्रक्रियेचे वास्तव व परिपूर्ण चित्र त्यांनी उभे केले. न्यायमूर्ती रानडे व नामदार गोपाळ कृष्ण गोखले ह्या आर्थिक विचारवंतांनी दादाभाईंच्या परिपूर्ण चित्रातील काही भाग जरी सुधारले, तरीही त्या चित्राचा मूळचा आकृतिबंध अढळच राहिला. ‘भारताचे श्रेष्ठ पितामह’ हे सार्थ बिरुद त्यांना लावण्यात येते. भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाच्या इतिहासात त्यांचे नाव आणि कार्य चिरंजीव स्वरूपाचे आहे. दादाभाईंचे मुंबई येथे निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -