घरफिचर्सजगण्याच्या स्वातंत्र्याचा लढा

जगण्याच्या स्वातंत्र्याचा लढा

Subscribe

आज भारताचा स्वातंत्र्य दिन. आज आपल्याला अनेक मोठमोठ्या गोष्टी ऐकायला, वाचायला मिळणार. दरवर्षी तीच साजरेपणाची सवय आता आपल्या अंगी जडली आहे. झेंडा फडकवणे, नेत्यांची देशप्रेमावरची प्रवचने ऐकणे किंवा एकमेकांना त्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यापासून स्वातंत्र्य चिरायू होवो असे बोलणे नवे राहिलेले नाही. एकप्रकारची औपचारीकता त्यात आलेली आहे. बहुतांश वेळी स्वातंत्र्य योद्धे वा स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण व त्यांचे फोटोही झळकवण्याची स्पर्धा चालते. पण व्यवहारतः त्यातून आपल्याला देशाचे उद्धारक म्हणून पेश करण्याची एक नाकर्ती आपमतलबी प्रवृत्ती अधिक ओंगळवाण्या पद्धतीने सादर होण्याचा दिवस, यापेक्षा अशा दिवसाची महत्ता आपण शिल्लक ठेवलेली नाही. सामान्य नागरिक म्हणून आपण देशाविषयी किती आस्था बाळगतो वा थोर स्वातंत्र्य सैनिकांचे किती प्रामाणिक अनुकरण करतो? या स्वातंत्र्य दिनावर कोरोनाचे संकट आहे. कोरोनाने भारतातील लहान-थोर, गरीब-श्रीमंत, हिंदू-मुस्लीम, सवर्ण-बहुजन अशा प्रत्येकाचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. जगण्याच्या स्वातंत्र्याला आपल्यापैकी अनेकजण आतापर्यंत मुकले आहेत. हा कोरोना अद्यापही थांबलेला नाही.

रोज देशात दोन-तीन हजारांपेक्षा जास्त माणसांचा तो जीव घेतोय. अशावेळी आपला स्वातंत्र्य लढा निदान यावर्षी तरी कोरोना नावाच्या डोळ्यालाही न दिसणार्‍या विषाणुशी आहे. आतापर्यंत आपण केवळ स्वातंत्र्य सैनिकांच्या गोष्टी ऐकल्या. त्यांनी दिलेला लढा, सोसलेल्या हालअपेष्टा वाचल्या, ऐकल्या. हे सर्व करताना आपल्याला मात्र स्वातंत्र्यासाठी त्यातले काहीच करावे लागले नाही. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्याचे महत्त्वही आपल्यापैकी अनेकांना फार मोठे वाटण्याची शक्यता नाही. उलट आपल्यातल्याच अनेकांसाठी स्वातंत्र्य दिन हा सुट्टीचा म्हणजे फिरण्याचा दिवस केला तर अशाप्रकारे सुट्टी साजरी करणार्‍यांना नावं ठेवून स्वत:ला देशभक्त सिद्ध करणारेही मग मागे राहिले नाहीत. पण यावेळचा स्वातंत्र्य दिन वेगळा आहे. यावेळी आपल्या प्रत्येकाला काहीतरी करावे लागणार आहे. मग तुम्ही त्याला देशभक्तीचा मुलामा द्या अथवा अन्य काही. कारण हे करणे म्हणजेच आपले जगणे आहे. जगण्याचे स्वातंत्र्य आहे. एक विषाणू आपले हे स्वातंत्र्य हिरावून घ्यायला टपला आहे.

- Advertisement -

स्वातंत्र्य दिन वा तत्सम कुठला दिवस उजाडतो आणि आपल्यासमोर इतिहासकालीन भगतसिंग, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक वा तसलेच चेहरे पेश केले जातात. त्यांच्या मागे आजचे लहानमोठे स्वातंत्र्य सैनिक वा खरे देशभक्त आपल्याला विसरायला भाग पाडले जातात. आज आपल्यादृष्टीने खरे देशभक्त अथवा स्वातंत्र्य सैनिक आहेत ते कोरोनाविरोधात प्रत्यक्ष लढा देणारे डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस आणि प्रत्येक नागरिक जो आपल्याकडून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आत्यंतिक कामाशिवाय घराबाहेर पडत नाही. तोंडाला मास्क लावतो. रस्त्यावर थुंकत नाही. गर्दी टाळतो. सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करतो. असे हजारो लाखो कर्तव्यदक्ष भारतीय आज आपल्या आसपास वावरत आहेत. राष्ट्रीय कर्तव्याची जितीजागती उदाहरणे पेश करीत आहेत. ज्यांच्या पायावर खरे म्हणजे आज आपला भारत नावाचा खंडप्राय देश एकात्म टिकून उभा आहे. घरदार, संसार सोडून किंवा त्यावर तुळशीपत्र ठेवून ज्यांनी स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करले, तसाच जीव धोक्यात घालून डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ आज कोरोनाग्रस्तांना जीवनदान देण्यासाठी कार्यरत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत सरकारी नियम न पाळता केवळ प्रश्न उपस्थित करून गैरसोय होतेय म्हणून बोंबा मारणारे प्रत्यक्षात अनेकांचे मारेकरी ठरू पहात आहेत. मला काय होत नाही ना मग मी कशाला नियम पाळू, ही गैरजबाबदार वृत्ती प्रत्यक्षात अनेकांच्या आरोग्याला मारक ठरत आहे. त्यांच्यामुळेच जगण्याचे स्वातंत्र्य बुलंद होत नाही तर दुबळेपांगळे होऊन जाते आणि जेव्हा असले दुबळे अशक्त लढवय्ये म्हणून स्वातंत्र्याचे रक्षण करायला पुढे येतील तेव्हा कोणीही विषाणू तुमच्या समाज देशाच्या स्वातंत्र्यावर हल्ले करायला धजावत असतो. कोरोना विषाणू आणि देशातील प्रत्येक नागरिक यांच्यामध्ये आज कोरोना योद्धे ढाल म्हणून उभे आहेत. एक सैनिक म्हणून लढा देत आहेत. स्वातंत्र्य दिनाने आम्हाला यंदा नवे व आजचे असे खंदे स्वातंत्र्य सैनिक बघायची बुद्धी दिली, यापेक्षा त्याची दिवसाची अन्य कुठली महत्ता असू शकेल?

कुठलाही समाज किंवा देश काही श्रद्धा व समजुतीच्या आधारे उभा राहतो किंवा टिकून राहतो. त्या श्रद्धा हाच त्याचा भरभक्कम पाया असतो आणि त्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावणारे त्याचे रक्षण करीत असतात. आज कोरोनाविरुद्ध लढणारा प्रत्येक व्यक्ती ही देशाची श्रद्धास्थाने आहेत. असा लढा देणारी व्यक्ती स्वत:चे जीवन पणाला लावून अन्य कोणाचे तरी जगणे वाचण्यासाठी प्रयत्नशील आहे. आपण तसा लढा देऊ शकत नसू अथवा आपली तितकी क्षमता नसेल तर कोरोना सैनिकांचे काम वाढेल असे कृत्य करणे तरी थांबवायला हवे. निदान आपल्यामुळे अन्य कोणाला कोरोनाची बाधा होणार नाही, याची काळजी घेऊ शकतो. आपण म्हणजेच समाज आणि जेव्हा समाज सतर्क होतो तेव्हाच कुठलाही लढा जिंकणे सोपे होते. मात्र, हाच समाज जेव्हा अलिप्त वा नाकर्ता होतो, तेव्हा कितीही सज्ज कोरोना योद्धे आपले संरक्षण करू शकत नाहीत, तेव्हा मग त्या शायराच्या ओळी आठवतात. तो म्हणतो, शत्रू व परक्यांमध्ये कुठे दम होता? आम्हाला लुटले वा मारले आमच्याच जवळच्यांनी. आमच्या देशाची वा समाजाची नौका तिथे बुडाली, जिथे पाणी कमी होते. मित्रांनो! कमी पाणी असते तिथे नौका बुडाण्याची बिलकुल शक्यता नाही, हीच वस्तुस्थिती आहे ना? पण आपल्याच सोबत बसलेला कोणी नौका उलटून पाडण्याचे उद्योग करीत असेल, तर त्याला आपण रोखले पाहिजे. तो असले उद्योग राजरोस करत असताना आपण निमूट बघत बसणार असू; तर वादळवारा किंवा महापुराचे संकट येण्याची गरज नसते. आपणच बुडायच्या प्रतीक्षेत असतो आणि आपला सोबतीच आपल्याला हसत हसत बुडवतो. जर आजुबाजूला बघितले तर कोरोना योद्ध्यांच्या जबरदस्त लढ्यानंतरही कोरोना का वाढतोय याचे उत्तर आपल्याला नक्की मिळेल.

- Advertisement -

आपल्यासोबत राहणारे, वावरणारे कोरोनाबद्दल सरकारने घालून दिलेले नियम बेधडक मोडताना दिसतात. मास्क न लावता बाहेर फिरत असतात. गर्दी नको म्हटली तरी गर्दी करतात. रस्त्यावर थुंकणे वारंवार सुरू असते. पण आपण त्यांना टोकण्याची, त्यांना जाब विचारण्याची हिंमत करत नाही. आपल्याला काय त्याचे? असे मनात म्हणून आपण गप्प असतो. हे जर होत असेल तर कोरोनाला आपण हरवणार कसे? आज कोरोना सैनिकांनी लढाई तीव्र केली असताना हे नियम न पाळणारे नतद्रष्ट आपली नौका बुडवणार असतील, तर त्यांना रोखणे हेच आपले जगण्याचे स्वातंत्र्य आहे. ते बहाल करायला कोणताही स्वातंत्र्य सैनिक येणार नाही. आपणच आज आपले स्वातंत्र्य सैनिक होण्याची गरज आहे. आज आपण नाकर्ते ठरलो तर कोरोना आपल्या जगण्याचे स्वातंत्र्य हिरावून घ्यायला सज्ज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -