घरफिचर्सनिसर्गाच्या कुशीतला गणेशोत्सव...

निसर्गाच्या कुशीतला गणेशोत्सव…

Subscribe

गणपती सोहळा म्हणजे सृजनशीलतेचा सोहळा. गणपती बनवण्यापासून ते विसर्जनापर्यंत एक निसर्गाचं आदिमरूप त्यात सामावलं आहे. गणपती शाळेतून घरात गणपती आणेपर्यंतचा तो अनोखा सोहळा डोळ्यात साठवण्यासारखा असतो. घरातला यजमानी डोक्यावर गणपतीची मूर्ती घेऊन शेतातून, पानंदीतून वाट काढत मधेच आलेल्या साकवावरून सावकाश पावलं टाकत तो घरी पोचतो आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने वातावरण दुमदुमून जाते. वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता असते. हे वातावरण पुन्हा पुन्हा मिळावे म्हणून चाकरमानी गावाकडे धाव घेतात.

श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ संपून आता भाद्रपद सुरू होतोय. गावागावातून वाहणार्‍या नद्यांचं पात्र आता काहीसं संथ वाहत आहे. पाऊसपाणी पिऊन तृप्त झालेली झाडं टवटवीत दिसत आहेत. चालताना रस्त्यावरची लाल माती चपलीला लागून पाय पुढे टाकताना जड वाटू लागलंय. संपूर्ण निसर्ग आपलं रूप पालटून स्वागताला सज्ज झाल्यासारखा वाटतो. त्यालाही ओढ लागली आहे. ही ओढ या मातीची आहे… झाडाफुलांची आहे ..अगदी संथ वाहणार्‍या पाण्याची …..ही ओढ गणपतीच्या आगमनाची आहे.

गणपती म्हणजे गणांचा अधिपती. गौरी गणपतीच्या या सणाला लोक कोकणात जायला एवढे आतुर का होतात याचं उतर उत्तरेकडच्या पालघरपासून ते दक्षिणेकडे पसरलेल्या सावंतवाडीपर्यंत एक फेरफटका मारल्याशिवाय लक्षात येणार नाही. लोक एसटीची आणि रेल्वेची तिकिटे मिळवण्यासाठी का धडपड करतात हे समजून घ्यायला त्या देशी जन्मच घ्यावा लागतो. हा गणेशोत्सव अंगी मुरवून घ्यावा लागतो. या गणेशोत्सवात सतत एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे हा गणेशोत्सव ईको फ्रेंडली असतो, संपूर्णता नैसर्गिक, कृत्रिमतेचा लवलेशसुद्धा नसतो.

- Advertisement -

मुंबई-गोवा महामार्गाने जाताना एकदा पनवेल सोडलं की, गणपती उत्सवाचे ढोल-ताशे वाजताना दिसतात. प्रत्येक पावलोपावली गणपती उत्सवाचे पडसाद आपल्याला बघायला मिळतात. वर्षातून एकदा केवळ गणपतीसाठी म्हणून गावी जाणारे चाकरमानी आपल्याबरोबर तयारीचे सामान घेऊन जाताना दिसतात; पण गणपतीची खरी तयारी कोकणातल्या छोट्याछोट्या गावातून एक वेगळ्याच धुंदीत होताना दिसते. या तयारी मागे परंपरा आहेच; पण त्याबरोबर एक प्रकारचा नैसर्गिक दृष्टीकोनदेखील आहे. बारा बलुतेदार ही संस्था बहुतांशी मोडीत निघाली; पण कोकणातल्या गावात ही संस्था, ही परंपरा काही अंशी टिकून आहे. यामागे कारण देखील तसंच आहे. गावचं गावपण जपणार्‍या या काही गोष्टी त्या प्रदेशाचा वेगळेपणा अधोरेखित करतात.

कोकणातल्या गणपती उत्सवाचं वेगळेपण काय? ते हेच, इथला गणेशोत्सव भपकेदार नसतो. तो गणेशोत्सव फक्त धार्मिकतेशी जोडला गेला आहे. त्याला सामाजिकतेचा रंग आहे; पण तो गावकीच्या प्रमाणात बदलत जातो. आजही कोकणात विशेषतः तळकोकणात गावातला सुतार समाज गावाचा गणपती बनवतो. प्रत्येक गावात सुतारशाळेच्या बाजूलाच गणपती बनवण्यासाठी खास गणपतीशाळा असते. या गणपतीसाठी माती गावातलीच, शेतातली लालमाती, ही माती पाण्यात विरघळायला अगदी सोप्पी. त्यात कोणी रासायनिक द्रव्ये मिसळताना आढळत नाही. ही माती तशी चिकट असल्याने मूर्तीचे सांधे एकावरएक बसवून मूर्ती करायला सोपी जाते. श्रावण महिना सुरू व्हायच्या आत गावातले लोक गणपतीशाळेत जाऊन गावच्या सुताराकडे आपला गणपती नोंदवतात. हल्ली मुंबईत राहणारा चाकरमानी व्हॉट्सअ‍ॅपवरून गणपतीचं चित्र पाठवून आपल्याला यावर्षी असा गणपती हवा अशी मागणी करतो. पूर्वीचे लोक तर म्हणे मे-महिन्यात चाकरमानी मुंबईहून गणपतीचं चित्र असणारं कॅलेंडर घेऊन यायचा आणि या चित्रातला गणपती आहे तसा गणपती गावातल्या सुताराला बनवायला सांगायचा. त्या माणसाच्या भोळेपणाचं कौतुक करावं तेवढं थोडंच ! त्याचा उद्देश हाच असायचा की, इतरांपेक्षा आपल्या घरातला गणपती उजवा दिसायला हवा.

- Advertisement -

गणपती येणार म्हणून आधी आठ दिवस घरात झाडलोट सुरू होते. कोणी तरी मायबहीण गणपतीच्या स्वागतासाठी येणार्‍या पाहुण्यासाठी, चाकरमान्यांसाठी घरात काही गोडधोड करण्यासाठी लगबग करत असते. भजनाला येणार्‍या माणसांसाठी म्हणून करंज्याचं पूरण करायची तयारी करून ठेवते. कोकणातील गणपतीचं हे एक वैशिष्ठ्य आहे, भजनासाठी येणार्‍या मंडळींसाठी भजनानंतर देण्यात येणार्‍या फराळाची पध्दत तालुक्यानुसार बदलत जाते. आमच्या कणकवली तालुक्यात भजनानंतर पुरणाची करंजी वाटतात तर वेंगुर्ल्याजवळील गावात वाटाण्याची उसळ देतात. मला वाटतं त्या त्या भागातील नैसर्गिक समृद्धीचा तो भाग असावा. ज्या भागात जे मुबलक प्रमाणात पिकतं ते त्या प्रदेशाची खाद्यसंस्कृती अधोरेखित करतं.

आज कोकणात जांभ्या दगडाची घरं आढळतात. पण जेव्हा मातीची घरं होती तेव्हा शेतातला लालमातीचा गिलावा करून ती भिंत रंगवली जायची. एकदा भिंत रंगवली की, त्यावर कोकणातल्या मातीशी साधर्म्य साधणारे चित्र काढले जाई, ते चित्र म्हणजे कोकणाचा निसर्ग अभिप्रेत करत असे त्यात नारळाची झाडं, फुलणारे मळे, शेतकरी जीवनातला एखादा प्रसंग चित्रीत केलेला असे. ज्या खोलीत गणपती विराजमान होणार त्यासमोर म्हणजे पूर्व दिशेच्या भिंतीवर एखादे खास चित्र काढले जाई, तळकोकणात त्याला कमळ मोडणे म्हणतात. ते चित्र काढताना त्या कारागिराची कमाल बघत राहावी. कंपासमधील कर्कटक घेऊन एखादी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढून त्यात रंग भरून एखादी काढलेली फुलदाणी त्या भिंतीवर शोभून दिसते. कमळ मोडण्याची परंपरा आजही तळकोकणात काही गावात आहे याचं कारण म्हणजे नवीन जांभ्या दगडाची कौलारू घरं जरी बांधली गेली तसं प्रत्येक कुटुंबाचं एक जुनं मूळ घर असत. ते जुन्या पारंपरिक पद्धतीप्रमाणे बांधलेले असते. त्या भिंतीवर एखादं नागाचं चित्र काढलेलं असतं. कोकणातल्या खेडेगावामध्ये नागाची पूजा केली जाते, त्याला देवाचं स्थान दिलं जातं. सर्पदंशापासून कुटुंबाचं रक्षण व्हावे म्हणून नागाची पूजा करण्याची पद्धत येथे आहे.

अष्टमीच्या दिवशी गणपती शाळेत घरच्या गणपतीसाठी पाट दिला जातो. तिथे पाटपूजन करायचं असा काही भपकेबाज प्रकार नसतो; पण घरातला यजमानी सुताराजवळ आपल्या गणपतीचं काम कुठवर आलं आहे याची आपुलकीने चौकशी करतो. गणपती येणार म्हणजे घराचा कोणी सदस्य येणार एवढी ओढ त्यामागे असते. वाडीतल्या प्रत्येक घरात गणपती बसतो. काही ठिकाणी तर दहा-बारा बिर्‍हाडाचा सामूहिक गणपती बघायला मिळतो. गणपतीच्या दिवसात मिरगात पेरलेले भात आता साधारण पोसावले असते. त्या भाताच्या केसराचा वास नाकात भरून घ्यावा. शेताच्या मेरेवरून जाताना त्या केसरांचा स्पर्श हवाहवासा वाटतो. शेतात संपूर्ण हिरवाई पसरलेली असते तर घरासमोरच्या मांडवात निरनिराळ्या वेली आकाशाशी स्पर्धा करताना आढळतात. या वेली तर कसल्या …? काकडी ज्याला कोकणात तवसा म्हणतात. मांडवातल्या तवशी रात्री भजनाच्या वेळी लंपास करण्यात खूप मजा येते. त्या कोवळ्या काकड्यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. शिवाय दोडकी, शिराळी, पडवळ यांच्या वेलीतर धरलेल्या असतात. झाडांची पानं पाण्याचे थेंब निथळत असतात. कुठेतरी वेलीवर चिबूड बघायला मिळतो. तर कुठेतरी भोपळा दृष्टीला पडतो. ही फळावेलींची समृद्धता कोकणात प्रकर्षाने बघायला मिळते.

अशा या वातावरणात हरतालिकेची पूजा सुरू होते. घराघरात हरतालिकेची पूजा करायची पद्धत आहे. त्यादिवशी उपवास म्हणून शहाळ्याचं पाणी एकमेकाला द्यायची पद्धत सुरू झाली असावी. कोकणात नारळाची झाडं मुबलक असतात. त्यामुळे शहाळ्याच्या बाबतीत कोकण समृद्ध. गेल्यावर्षी वेंगुर्ल्यात मित्राकडे गेलो तेव्हा हरतालिकेचा दिवस होता. घरात शहाळ्याचा ढीग पडला होता. त्या ढिगाकडे बघून मी मित्राला विचारलं, अरे एवढी शहाळी कोणाक?

तुमी त्याका शहाळी हुंतास, आमी त्याका अडसरा हुंताव, तालुक्यानुसार शाब्दिक भेद कसा असतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे तळकोकण….. . तिथली खाद्यसंस्कृती हा एक संशोधनाचा विषय आहे. हरतालिकापूजन झालं की, मग दुसर्‍या दिवशीचे वेध लागतात. त्यादिवशी रात्री मांडावर सर्वजण जमतात आणि हरतालिकेच्या भजनाने या गणपती उत्सवाला सुरुवात होते. कोकणातली घरं दूरवर पसरलेली असतात. त्यामुळे प्रत्येक वाडीत एक मुख्य घर नेमून ठेवलेलं असतं. त्या घराला मांड म्हणतात. गावातल्या भजनाची किंवा इतर धार्मिक कार्याची सुपारी, आमंत्रण याठिकाणी दिली जातात. या मांडावर भजन झालं की, उद्याच्या कार्यक्रमाची आखणी होते. गणपती कधी आणायचा, भटजी कोणाकडे किती वाजता येणार याची आखणी झाली की, गणपतीच्या गजाली करत ती रात्र सरते.

दुसर्‍या दिवसाची म्हणजे गणेश चतुर्थीची सुरुवात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने होते. सकाळी पहिलं काम म्हणजे रानातून रानफुलं घेऊन यायची. गणपतीच्या वरती मंडपी बांधणं हे एक कलाकुसरीचं कामच. रानातली पायवाट तुडवत असताना आजूबाजूला पिवळीजर्द हरणाची फुलं दृष्टीला पडतात. ती पिवळी फुलं त्या मंडपीला खरी शोभा आणतात. ही मंडपी म्हणजे निसर्गाचा खरा आविष्कारच म्हणावा लागेल. निसर्गाने दिलेले हे पानाफुलांचं दान परमेश्वराच्या दारात मुक्तपणे मांडून ठेवायचा हा प्रयत्न असावा. रानातली हरणाची फुलं, तेरड्याची फांदी, कवंडळाची फळे, सुपार्‍याची शेपटा, आटका, तोरणा या रानफुलांनी सजलेली मंडपी बनवतात. यजमानी आपल्या अंगातली कलाकुसर पणाला लावतात. यातील प्रत्येक रानातल्या वनस्पतीचं एक विशेष महत्त्व आहे. या प्रत्येकामागे एक लोककथा प्रचलित आहे. त्या प्रचलित लोककथेचा लोकांच्या मनावर एवढा परिणाम आहे की, या रानफुलांचा आधार घेतल्याशिवाय हा सोहळा पूर्ण होतच नाही.

गणपती सोहळा म्हणजे सृजनशीलतेचा सोहळा. गणपती बनवण्यापासून ते विसर्जनापर्यंत एक निसर्गाचे आदिमरूप त्यात सामावले आहे. गणपती शाळेतून घरात गणपती आणेपर्यंतचा तो अनोखा सोहळा डोळ्यात साठवण्यासारखा असतो. घरातला यजमानी डोक्यावर गणपतीची मूर्ती घेऊन शेतातून, पानंदीतून वाट काढत मधेच आलेल्या साकवावरून सावकाश पावलं टाकत तो घरी पोचतो आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजराने वातावरण दुमदुमून जाते. वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता असते. हे वातावरण पुन्हा पुन्हा मिळावे म्हणून हे चाकरमानी गावाकडे धाव घेतात. गणपती घरात आल्याबरोबर स्वयंपाकघरातून फोडणीचा घमघमाट सदरेपर्यंत येतो; पण भटजी आल्याशिवाय गणपतीची पूजा होत नाही. पूजा, नैवेद्य झाल्याशिवाय जेवण नाही. पोटात कावळे काव काव करतात. जेव्हा पाच गावचे गणपती पुजून भटजी काका येतात तेव्हा जीव भांड्यात पडतो.

दुपारच्या साग्रसंगीत भोजनाला लांब केळीचं पान ठेवून त्यावर अकरा भाज्या वाढून मध्ये भाताचा मुद एवढा हा खाद्यप्रकार क्वचितच कुठेतरी बघायला मिळतो. या भाज्यादेखील अगदी घरातल्या नव्हे तर दारासमोरच्या मांडवातल्या. तळकोकणातला हा सण समोरच्या निसर्गाच्या संगतीनेच साजरा केला जातो. त्यात कुठेही कृत्रिमतेचा लवलेश नसतो. कुठलाही बाजारूपणा नसतो. या सोहळ्यासाठी बाजारातून आणलेली एकच वस्तू ती म्हणजे फटाके. रात्रभर भजने करून दुसर्‍या दिवशी सकाळी कोकणी माणूस एका वेगळ्याच उत्साहाने उठतो आणि ऋषीपंचमीच्या तयारीला लागतो. यादिवशी खास अळूची भाजी केली जाते. वास्तविक या ऋषीपंचमीच्या सोहळ्याला एक सांस्कृतिक संघर्षाची बाजू आहे. वास्तविक सांस्कृतिकदृष्ठ्या हा दिवस म्हणजे ऋषभ पंचमी म्हणून ओळखला जायचा. ऋषभ म्हणजे बैल. पूर्वी कष्टाची कामे स्त्रियांना करावी लागत. पुढे स्त्रियांच्या कष्टाच्या कामांची जबाबदारी बैलाने घेतली, म्हणून त्यादिवशी बैलाचे ऋण म्हणून त्याच्या कष्टाचे काही खात नाहीत. ऋषीपंचमीला केलेल्या अळूची चव इतर वेळी का येत नाही, याचं कारण मला अद्याप कळलं नाही. या ऋषींच्या अळूवात आमच्याकडे एखादं मक्याचं कणीस मुद्दाम टाकतात. त्यामुळे त्या आळवाची रुची अधिक वाढते.

गौरी आगमनाचा दिवस तर कोणी कोकणी माणूस चुकवणार नाही. त्या दिवशी घरातील ज्येष्ठ स्त्री विहिरीवरून रोवळीतून गौरी घेऊन येते. तोपर्यंत घरातील पुरुष मंडळी कोवळा चिव्याचा बांबू घेऊन गौरीच्या आकाराचा सांगाडा बनवतात. प्रथम चिव्याचा बांबू गोल फिरवून खाली रिंगण करतात, मग बाजूने एक चिव्याची काठी टाकून हात लावतात. त्यात गवत भरून गवर तयार करतात. गावी गौरीला गवर म्हणण्याची पद्धत आहे. मग घरातील स्त्रिया त्या बांबूच्या सांगाड्यावर साडी नेसवून गौरीचा मुखवटा लावून गौरीला पूजनासाठी तयार करतात. यादिवशी मात्र मांसाहार वर्ज्य नाही. गौरी माहेरवाशीण म्हणून आली असल्याने तिचं विसर्जन हे तेवढ्याच दणक्यात करायची पद्धत आजही कोकणात आहे.

तळकोकणात रात्रीची भजनं आणि स्त्रियांसाठी रंगलेल्या फुगड्या या आजच्या मितीला तेवढ्याच प्रसिद्ध आहेत. एरवी गावात कितीही तंटे होवोत; पण चतुर्थीच्या दिवसात रात्री भजनाची परंपरा आजही कोकणी माणसाने जपली आहे. हल्ली गावातली नवीन मुलं भजन शिकतात. तबला-मृदुुंग शास्त्रोक्त पद्धतीने वाजवतात. भजनात गण सुरू झाल्यापासून गजर होईपर्यंत पायाची मांडी न हलवता बसणारे अनेक गावकरी आजही गावात आहेत.

रात्रभर जागून फुगड्या खेळायची परंपरा ही तितकीच जुनी. पूर्वीच्याकाळी मनोरंजन म्हणून या फुगडीकडे बघितलं जायचं; पण राहून राहून वाटतं की या फुगड्या म्हणजे सांसारिक समस्या गणपतीपुढे सांगायचं ते एक साधन असावं. कारण फुगडीतील लोकगीतं ऐकली की, हे कारण आपल्याला पटेल. मागे कणकवलीच्याजवळ असणार्‍या फोंडाघाट इथे गेलो असता स्त्रियांच्या फुगड्या बघायला आणि फुगडीगीते ऐकायला मिळाली. काही फुगडी गीतं मी मोबाईलमधून रेकॉर्ड केली होती. ती गीतं म्हणजे स्त्रीने व्यक्त केलेल्या भावना होत्या. तेव्हा जाणवलं हा गणपती या स्त्रियांशी कुठेतरी आदिम नातं सांगतोय. एक फुगडीगीत मला लख्ख आठवतं ते असं…

ऐका गे गवळ्याची बाई
उठली कोण्या फाटफटी
केला केर नि वारा
धुतले रांजण ताकाचे
ओतले घडे दह्याचे
लावू गेली रवीची दोरी
दोरी गे म्हणून नाग ओढीला
त्याने हाताचा अंगठा फोडला

त्यावर ती स्त्री सासूला उठवू लागली आणि सांगू लागली
सून म्हणे अवो सासूबाई जाग्या व्हया,
सासू – एवढ्या रातीचा मजकडे काय
सून – दोरी म्हणून नाग ओढीला त्याने हातीचा अंगठा फोडीला
सासू – खिलरच्या भिंती नि चंदनाचे खांब
जायला नाय मुंगीला वाव
तिथे गे कैसा येईल नाग

सून- अवो अवो भ्रतार
तुम्ही तरी जागे व्हा.
पती – एवढ्या रात्री तुझं काय गे काम

पत्नी – दोरी म्हणूनी नाग ओढीला
त्याने वो हातीचा अंगठा तोडीला

भ्रताराने बत्ती लावली
भ्रतारा पाहुनी प्राण सोडीला

अशी गाणी रचत जाऊन स्त्री आपलं दुःख मांडत होती. यातून दुःखं तर कमी व्हायची. गणपतीची आरती आणि थाट याचा वेगळा बाज कोकणात बघायला मिळतो, याचं कारण ती माती या उत्सवाला पोषक आहे. कोकणात सुबत्ता आली, आर्थिकदृष्ठ्या कोकण समृद्ध होत आहे. सजावटीची नवी पद्धत आली तरी आजही कोकणातला गणपती गावातल्या गणपती शाळेत तयार केला जातो. त्यासाठी लागणारी माती शेतातून घेतली जाते. गणपतीच्यावर नैसर्गिक मंडपी बांधणारे गावकरी आजही गावात आहेत. परंपरा या एका पिढीने दुसर्‍या पिढीकडे सुपूर्द करायच्या असतात. कोकणी माणसाने निसर्गाने दिलेली ही परंपरा जपली. अगदी मर्मबंधातल्या ठेवीसारखी ….

कोकणातील कोणा माणसाला विचारले की, काय एवढा गणपतीला गावी जाण्यासाठी धडपडतोस. तर त्याचं उत्तर त्याच्या गावचा गणपती हा त्या मातीशी आपलं नातं सांगतो …जे आदिम काळापासून चालत आलं आहे. ते नातं समजण्यासाठी कोकणात जावं लागतं. त्या परंपरेशी जुळवून घ्यावं लागतं. तिथल्या मातीत मन रमवावं लागतं, मग ती धडपड कळते.

– प्रा. वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -