घरफिचर्सविशाखापट्टणम वायुगळतीने व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह

विशाखापट्टणम वायुगळतीने व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह

Subscribe

करोनाच्या काळजीने संपूर्ण देशाची झोप मोडलेली असताना आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या वायुगळतीच्या घटनेने चिंतेत वाढ केली आहे. विशाखापट्टणम शहर गाढ निद्रेत असताना एल.जी. पॉलिमर कारखान्यात विषारी वायुगळती झाली आणि किड्या-मुंगीप्रमाणे माणसे मेली. या दुर्घटनेतील बळींचा आकडा वाढत आहे. वायुगळतीची झळ आजूबाजूच्या गावांना पोहोचली आहे. त्यामुळे खबरदारी घेत ही गावे खाली करण्यात आली आहेत. करोनाचे संकट असल्याने येथेही लॉकडाऊन सुरू होते. मात्र, ग्रीन झोनसाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केल्यानंतर पहाटे ही कंपनी पुन्हा सुरू करण्यात आली. त्यावेळी काही कामगार कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असतानाच अचानक विषारी वायुगळती झाली. यामुळे अनेक कामगारांना वायुगळतीचा त्रास जाणवून लागला. काही जण गुदमरलेत. तर काही बेशुद्ध पडलेत. आतापर्यंत शेकडो जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती गंभीर आहे. वायुगळतीचा त्रास लहान मुलांना आणि अनेक ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. या सर्वांना श्वास घेण्यास समस्या येत आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांच्याशी चर्चा केली. त्यावरून घटना किती गंभीर आहे हे स्पष्ट होते.

या कंपनीतून स्टायरिन गॅसची गळती झाल्याचे पुढे आले आहे. स्टायरिनचा प्राथमिक उपयोग हा पॉलिस्टिरिन प्लास्टिक आणि राळ अर्थात रेसिन्स बनवण्यासाठी होतो. स्टायरिन गॅस हा एक ज्वलनशील पदार्थ आहे. या गॅसला स्टिरॉल किंवा विनिल बेन्झिन म्हणूनही ओळखले जाते. बेन्झिन आणि इथिलिनपासून या वायुची कारखान्यांसाठी निर्मिती केली जाते. कंटेनर, पॅकेजिंग, सिंथेटिक मार्बल, फ्लोअरिंग, तसंच टेबलवेअर आणि मोल्डेड फर्निचरमध्ये वापरण्यात येणार्‍या प्लास्टिक आणि रबराच्या निर्मितीसाठी तो वापरला जातो. हवेतल्या स्टायरिन वायूमुळे डोळे जळजळणे, घशात घरघर, खोकला आणि फुफ्फुस जड होतात. हा वायू जास्त प्रमाणात माणसाच्या संपर्कात आला तर त्याला स्टिर्न सिकनेस होतो. या वायूचा केंद्रीय मज्जासंस्थेवर परिणाम होतो तसेच श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यामुळे लूकेमिया आणि लिम्फोमा होण्याचा धोका वाढतो असे साथीच्या रोगाचे संशोधन सांगते. या वायूची निर्मिती करणारी एल. जी. पॉलिमर्स कंपनी नवी आहे असेही नाही. भारतात पॉलिस्टरीन आणि एक्सपॅन्डेबल पॉलिस्टरीन क्षेत्रात ही आघाडीची कंपनी आहे. तिची स्थापना १९६१ मध्ये हिंदुस्तान पॉलिमर्स या नावाने झाली. ही कंपनी पॉलिस्टायरेन आणि त्याचे को-पॉलिमर्सची निर्मिती करते. या ठिकाणी असे उत्पादन केले जातात ज्याच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक फॅनचे ब्लेड, कप, कंटेनर, सौंदर्यप्रसाधने यांची निर्मिती होते. १९७८ मध्ये यूबी ग्रुपच्या मॅकडॉव्हल अ‍ॅण्ड कंपनी लिमिटेडमध्ये हिंदुस्तान पोलिमर्सचे विलिनीकरण झाले. त्यानंतर १९९७ मध्ये दक्षिण कोरियन कंपनी एलजी केमिकल्सने ही कंपनी टेक ओव्हर केली. त्यानंतर तिचे नाव एलजी पॉलिमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड करण्यात आले. कच्चा माल म्हणून या कंपनीत स्टरिनचा वापर केला जातो. ते खूप लवकर आग पकडते आणि आग लागल्यावर त्यातून विषारी वायू निघतो. या वायुगळतीच्या घटनेने अन्य शहरांना सावध केले आहे. विशेषत: महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास कल्याण, डोंबिवली, पालघर, तारापूर, बोईसर, नागोठाणे, रोहा या शहरांतील रासायनिक कंपन्यांसाठी हा धोक्याचा इशारा आहे. या सर्वच कंपन्यांना आतापासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजनांची चाचपणी करावी लागणार आहे. काही महिन्यांपूर्वीच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या वाघाडी गावात एका रसायनाच्या कंपनीत बॉयलरचे स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत १५ पेक्षा अधिक कामगारांचा जीव गेला तर ६० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. त्यानंतर आता विशाखापट्टणम येथील घटनेने व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या घटनेने ३६ वर्षांपूर्वी झालेल्या भोपाळ दुर्घटनेची आठवण करून दिली. अर्थात भोपाळच्या दुर्घटनेचे स्वरुप विशाखापट्टणमच्या तुलनेत अतिशय व्याप्त होते. भोपाळमध्ये युनियन कार्बाईट कंपनीच्या प्लांटमधून मिथाईल आयसोसायनाईट वायूची गळती झाली होती. त्यामुळे कंपनीतील कर्मचार्‍यांसह परिसरातील नागरिक सैरावैरा धावू लागले. परंतु काही वेळातच विषारी गॅसने अनेकांना आपल्या कवेत घेतले आणि रात्रीतच तब्बल ५ हजार लोक मृत्युमुखी पडले. परंतु त्याचा परिणाम कायम राहिला आणि या दुर्घटनेत तब्बल १५ हजार लोक मृत्युमुखी पडले. याबरोबरच अनेकांना अपंगत्व आले आणि त्यांना आयुष्यभर हलाखीचे जीवन जगण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर आली. एवढी भीषण घटना घडूनही अद्याप गुन्हेगार मोकाट आहेत. तसेच अनेकांना अद्याप न्यायही मिळालेला नाही.

- Advertisement -

दुसर्‍या महायुद्धानंतर भारतात रासायनिक उद्योग वाढीला लागले आणि ते प्रत्येक कारखानदाराच्या मनाप्रमाणे चालू लागले. ना त्यांना कोणते नियम ना कोणती शिस्त. त्यातूनच ३६ वर्षांपूर्वी भोपाळ आणि आता विशाखापट्टणममध्ये दुर्घटना घडली. अर्थात भोपाळ दुर्घटनेनंतर भारत सरकारने केलेल्या सर्व कारखान्यांच्या तपासणीअंती सुरक्षिततेच्या अंगाने कारखान्यांवर बरीच बंधनं आली आणि ती कामगार व आजूबाजूच्या वस्तीच्या दृष्टीने काहीशी उपकारक ठरली. तरीही देशात वायुगळतीच्या छोट्या-मोठ्या दुर्घटना घडतच असतात. अशा वायुदुर्घटनांनंतर तरी आपण भविष्यात काळजी घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. भारतात काही छोट्या औद्योगिक दुर्घटना नंतरही घडल्या, त्यांना आपण ‘मिनी भोपाळ’ असे म्हणतो. विषारी रसायने जमिनीत मिसळण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रणात आपण यशस्वी ठरलेलो नाही. आपल्याकडे घातक कचरा अजूनही अनेक भागांत आहे, या विषारी कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची कुठलीही विश्वासार्ह पद्धत आपल्याकडे नाही व त्यातच आपण कचर्‍यावर कचरा निर्माण करीत चाललो आहोत. विशाखापट्टणम दुर्घटनेसाठी आता जबाबदारी निश्चित होणे गरजेचे आहे. दोषींवर कठोर कारवाई झाल्यास त्यातून इतरांना धडा मिळत असतो. भोपाळच्या बाबतीत मात्र दोषींना राजाश्रय मिळाला. त्यामुळे अपेक्षित कठोर शिक्षा होऊ शकली नाही. विशाखापट्टणमच्या बाबतीत तरी या चुका सुधारण्यात याव्यात. केवळ कंपनीला दोषी धरण्याऐवजी प्रदूषण नियंत्रण महामंडळ काय करत होते, वेळच्या वेळी तपासण्या झाल्या नाहीत का, मॉकड्रीलव्दारे आजूबाजूच्या गावकर्‍यांना प्रशिक्षण का देण्यात आले नव्हते, आपत्कालीन व्यवस्थापनाचे नियम का पाळले गेले नाहीत, पाळले गेले असते तर मृत्यू होणार्‍यांची संख्या इतकी का वाढली, दुर्घटना घडल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत वैद्यकीय उपचार मिळू शकतील अशी व्यवस्था का नव्हती असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या दुर्घटनेतील पीडितांना भोपाळप्रमाणे वार्‍यावर सोडता कामा नये. ही आपल्या भूतकाळाची गोष्ट नाही तर आपल्या भविष्याची कहाणी आहे हे उद्योजकांसह सरकारनेही लक्षात घ्यावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -