घरफिचर्ससोन्याच्या किमतीची तेजीतली वाटचाल

सोन्याच्या किमतीची तेजीतली वाटचाल

Subscribe

सोन्याची दरवाढ होण्यामागे स्थानिक ते जागतिक अशी अनेक कारणे असू शकतात. मात्र रोकडसुलभता आणि आर्थिक संरक्षण यादृष्टीने सोन्याचे मोल कमी झालेले नाही. त्यामुळे वैयक्तिक ग्राहकांची पावले दिवाळीसारख्या निमित्ताने सोन्याकडे कमीअधिक प्रमाणात वळतात.

देशात दिवाळीपूर्वीच्या आठवड्यात सोन्याच्या किमती पुन्हा वाढताना दिसल्या. जगातही गेले कित्येक महिने सोन्याची तेजीतील वाटचाल सुरू आहे. त्यासाठी अनेक कारणे चर्चेत आहेत.भारतात दिवाळीतला धनतेरस किंवा धनत्रयोदशीचा दिवस सोने खरेदीसाठी चांगला मुहूर्त मानला जातो. विशेषतः उत्तर आणि पश्चिम भारतात या मुहूर्तावर सोने खरेदीची प्रथा आहे. गेल्या वर्षी दिवाळीत ग्राहकांची सोने खरेदी आधीच्या वर्षीपेक्षा घटल्याच्या बातम्या होत्या. हा त्यापूर्वी झालेल्या नोटबंदीचा परिणाम आहे अशी चर्चा झाली. २०१६ च्या दिवाळीनंतर नोटबंदी झाली होती. त्यानंतर तिचा परिणाम दीर्घकाळ राहिला. तशा काही गोष्टींचा परिणाम यंदाही देशात दिवाळीच्या सुमारास होणार्‍या सोने खरेदीवर होईल, अशी शंका माध्यमांत काही ठिकाणी व्यक्त होताना पहायला मिळते.

सोने हा न गंजणारा, अंगभूत झळाळी असलेला धातू. भारतात त्याला मोठी मागणी आहे. सोन्याच्या जगातल्या सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी आपण एक आहोत. सोन्याच्या दागिन्यांची आपली हौस हे त्यामागचे एक कारण आहेच. शिवाय, वैयक्तिक गुंतवणुकीचे एक साधन म्हणूनही सोन्याकडे पाहिले जाते. ही दुसरी गरज लक्षात घेऊन भारतात गेली काही वर्षे गोल्ड बॉन्डसची योजना नागरिकांसाठी सुरू आहे. काही ठराविक वर्षे मुदतीची ही बॉन्डस असतात. त्यांची नोंद सोन्याच्या वजनात ठेवली जाते. बॉन्ड होल्डरना या मुदतीत एका निश्चित दराने व्याज दिले जाते आणि मुदत समाप्तीच्या वेळी त्यांचे विमोचन करून (रिडीम) रोख मिळवता येते. ही रोकड देण्याच्या वेळच्या सोन्याच्या प्रचलित दरावर आधारित एक दर त्यासाठी निश्चित केला जातो. गोल्ड बॉन्ड योजनेचे साधारण स्वरूप असे असले तरी त्याचे तपशील वेळोवेळी निश्चित केले जातात. सोन्याचा दर सतत वाढतो असे एक गृहितक आहे आणि हे खोटे ठरल्याचे फार कधी दिसत नाही. सध्या ठराविक कालावधीनंतर गोल्ड बॉन्ड सीरिज खरेदीसाठी उपलब्ध केल्या जात आहेत. गोल्ड बॉन्डचा एक लाभ असा की निव्वळ गुंतवणुकीचा हेतू असेल तर प्रत्यक्षात सोने खरेदी करणे आणि बाळगण्यातली जोखीम अशा बॉन्डमुळे टाळता येऊ शकते.

- Advertisement -

सोन्याचा जगातल्या सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी भारत हा एक देश आहे. मात्र सोने मिळवण्यासाठी आपल्याला आयातीवर अवलंबून रहावे लागते. आयातीत परकीय चलनाचा दर मोठी भूमिका बजावत असतो. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आणि अन्य काही मजबूत चलनांच्या तुलनेत अलीकडे रुपयाची किंमत कमी होते आहे. अशा घसरणीमुळे आयात महाग होते. परिणामी, देशात येणारे सोने महागते. अलीकडच्या काळात अशी स्थिती देशात आहे. याचा परिणामही सोन्याच्या देशांतर्गत किमतीवर होऊ शकतो आणि सोने महागते.

अलंकारांची खरेदी, वैयक्तिक गुंतवणूक आणि औद्योगिक वापरापलीकडेही सोन्याचा उपयोग इतर अनेक कारणांसाठी होतो. विशेषतः बहुराष्ट्रीय संस्थात्मक गुंतवणूक त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशांतल्या सरकारांची वेगवेगळ्या कारणाने होणारी गुंतवणूक सोन्याच्या जागतिक दरांवर प्रभाव टाकण्यात सक्षम असते. जगातल्या बड्या गुंतवणूकदार संस्था इतर क्षेत्रांपेक्षा चांगला परतावा हवा असेल तर तशा काळात गुंतवणूक करण्यासाठीचे साधन म्हणून सोन्याकडे पाहतात. जागतिक बाजारपेठेत गुंतवणुकीच्या इतर क्षेत्रांतून मिळणारा परतावा कमी झाला किंवा कमी होण्याची शक्यता निर्माण झाली की सोन्यातली गुंतवणूक वाढते, असे अनेकदा दिसले आहे. जगात २००८ च्या मंदीसदृश स्थितीसारखी एखादी घटना पुन्हा होण्याची शक्यता, हे एक सध्या कारण चर्चेत आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणुकीला पसंती देत आहेत. अलीकडे काही महिन्यांच्या काळात सोन्यात आलेल्या तेजीकडे या दृष्टीकोनातूनही पाहिले जाते.

- Advertisement -

काही देशांनीही अलीकडच्या काळात अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी सोन्याचा साठा स्वतःकडे राखण्यावर, वाढवण्यावर भर देणे सुरू केले आहे. स्वतःच्या अर्थव्यवस्थेचे इतर देशांवरचे अवलंबित्व कमी करण्याकडे कल अशा बातम्यांवरून स्पष्ट होतो. देश अशा स्वरुपाची पावले उचलतात तेव्हा सोन्याच्या आंतरराष्ट्रीय दरांवर त्याचा परिणाम होणे अपरिहार्य असते. सोन्याची मागणी त्यामुळे वाढू शकते.कुठल्याही देशाच्या तिजोरीतील सोन्याचा साठा त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम आधार देण्याची ताकद राखून असतो असे मानले जाते. भारतही टप्प्याटप्प्याने रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा वाढवताना दिसून येत आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर २००९ मध्ये सुमारे दोनशे मेट्रिक टन सोने खरेदी केले होते तर यंदा ३० जूनला संपलेल्या वर्षातही ८.४६ मेट्रिक टन सोने खरेदी केल्याची नोंद बातम्यांमधून आली आहे. कुठल्याही देशाकडून होणारी अशी खरेदी त्या देशाच्या चलनाला आणि दीर्घकाळात एकूण अर्थव्यवस्थेला मजबुती देण्यात वाटा उचलते.

सोन्यामधली गुंतवणूक परतावा मिळण्याच्या दृष्टीने कशी अनाकर्षक होत आहे किंवा झाली आहे या विषयी अनेकदा मते व्यक्त झाली आहेत. निव्वळ परताव्याच्या दृष्टीकोनातून ती कदाचित योग्य असतीलही; पण सोने लगेचच रोखीत रुपांतरीत होऊ शकण्याची त्याची ताकद आणि त्याद्वारे मिळू शकणार्‍या आर्थिक संरक्षणाकडेही दुर्लक्ष करता येत नाही. वैयक्तिक ग्राहक असो की मोठमोठे देश, सोने हा आर्थिक सुव्यवस्था राखण्याचा एक राजमार्ग आजही मानला जातो. त्यामुळे आर्थिक सुबत्तेची दिवाळी साजरी होण्यात सोन्याची महत्त्वाची भूमिका यापुढेही राहील यात संशय वाटत नाही.

– मनोज तुळपुळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -