घरफिचर्सगुजराती बाणा!

गुजराती बाणा!

Subscribe

प्रियकर-प्रेयसीच्या मुग्धमधूर प्रीतीवर नव्हे तर एका आईच्या पोटी जन्म घेतलेल्या भावाबहिणीच्या मायेच्या अतूट नात्यावर लिहिलेली कविवर्य भा.रा. तांबेंची ’तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा’ ही भावमधूर कविताही त्यांच्या नाचण्याचं साधन ठरते.

ह्या नवरात्रीच्या दिवसांत संध्याकाळनंतर आपल्याकडे आपला मराठी बाणा विसरला जातो आणि गुजराती बाणा दिसतो. जिकडेतिकडे दांडिया आणि गरबा सुरू असतो. हे पीक येतं गुजराती टिपर्‍यांचं! नऊ दिवस आपल्याकडल्या बालगोपाळांना नाचण्याबागडण्यासाठी एक नवं व्यासपीठ खुलं झालेलं असतं. रंगपंचमीला रंग अंगावर फवारताना जसं ’होली हैं’ म्हणतात तसं ह्या दांडियांच्या दिवसांत मध्येच कुणीतरी विनाकारण ’नाचो’ म्हणतो. मग शेतकरी जसा घाम गाळेपर्यंत शेतात राबतो तशी आपल्या शेजारपाजारची पोरंबाळं (आणि पोरीबाळीसुध्दा) घाम गाळेपर्यंत नाचतात.

नाचताना त्यांना पार्श्वभुमीवर गाणी वाजावी लागतातच. ती गुजरातीच असली पाहिजेत, असं काही पथ्य नसतं. अगदी गरब्याचीच गाणी असली पाहिजेत, असाही दंडक नसतो. ’हम होंगे कामयाब’ हे गाणंही त्यांना दांडिया खेळायला पुरतं. कुणीतरी काहीतरी गातोय आणि वाजवतोय ना, मग आपल्याला पाय थिरकवायला आणि टिपरी उडवायला काय हरकत आहे, असा एकूण मामला असतो. सगळीकडे सगळी मजा मजा चाललेली असते. कुणी कुणाला कसल्या शंका, कसले प्रश्न विचारायचे नसतात आणि कुणी कुणाला उत्तर द्यायला बांधिल नसतं.

- Advertisement -

ह्या अशा वातावरणात कोणे एके काळी ’सरस्वतीचंद्र’ नावाच्या सिनेमात कुणातरी एका थोर गायिकेने ’मै तो भुल चली बाबुल का देस, पिया का घर प्यारा लगे’ असं नितांत सुंदर, नितांत मधूर गरबा-गीत गायलं होतं, त्यातला ठेका आपल्याला थिरकण्यासाठी ऑल टाइम ग्रेट होता, हे कुणाच्याही गावी नसतं. नूतनसारख्या अभिनयसंपन्न अभिनेत्रीने त्यावर आपल्या अंगप्रत्यंगाला कोणत्याही प्रकारचे हिडिस हिसके न देता मोजक्याच हालचालीत देखणं गरबा नृत्य पेश केलं होतं, ह्याचीही कुणाला काही पडलेली नसते. ते आपल्याच धुनकीत नाचत असतात.

 भावाबहिणीचे प्रेमळ नातेसंबंध मध्यवर्ती ठेवून लिहिलेल्या त्या आपल्या कवितेचा वापर आज गरब्याच्या मंडपात कसा होतो आहे हे पाहून त्या आशयघन कविता लिहिणार्‍या कविवर्यांना काय वाटलं असतं, असा विचार करणार्‍याला तर आज मानसोपचारतज्ज्ञाकडेच पाठवून देतील! कारण कुणी कोणत्या हेतूने कोणतं गाणं लिहिलं आहे हे लक्षात घेण्यापेक्षा ’नाचो’ हा मूलमंत्र मंडपात महत्वाचा. त्यातून वेळ मिळालाच तर मग कविवर्य भा.रा.तांबेंचा विचार!

- Advertisement -

पूर्वीच्या काळात गुजराती मंडळी गरब्याचं गाणी गात गात नाचायची, तसं आता कोण गात बसणार आहे?…कुणाला वेळ आहे तेवढा? ’महेंदी ते वावे माळवे ने एने रंग गयो गुजरात रे, महेंदी रंग लाग्यो’ हा वर्षानुवर्षांचा प्रसिध्द गरबा तर आता आउटडेटेड म्हणजे साफ कालबाह्यच करून ठेवला आहे. त्याच्या वाटेला आता कुणीही जात नाही. कालपरवा आलेल्या ’ढोली तारो ढोल बाजे’ आता कापूर जळून खाक झाल्यासारखं आउटडेटेड होतं तिथे कित्येक वर्षांपूर्वीच्या त्या ’महेंदी रंग लाग्यो’चा काय पाड!

असो, तर काळ बदलला की इतरही परिमाणंही बदलतात. गरबा बदलतो, दांडिया बदलतात, दांडियाची गाणी बदलतात, गाणी गाण्याच्या नव्हे, वाजवण्याच्या पध्दती बदलतात. खेळात जसे जुने विक्रम मोडले जातात तसे जुने रिवाज खोडले जातात…आणि उरतो काय तर टिपर्‍यांचा आवाज!

– सुशील सुर्वे
(लेखक संगीतविषयाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -