घरफिचर्सजयवंत दळवींच्या आरवलीत

जयवंत दळवींच्या आरवलीत

Subscribe

लेखक भेटला नाही तरी त्याच्या साहित्यातून त्याने उभी केलेली व्यक्तीरेखा, स्थलनिर्मिती या मनात कुठे तरी तो साहित्यिक भेटल्याची प्रचीती देतात. अशाच ओढीने २०१४ च्या मे महिन्यात मी जयवंत दळवींच्या गावाला म्हणजे आरवलीला भेट द्यायला सकाळीच निघलो. वेंगुर्ल्याहून जाताना फारतर अर्ध्या पाऊन तासात आरवलीला पोचता येते. विचारत विचारत आम्ही दळवींच्या घरासमोर येऊन उभे राहिलो.

१९९४ सालचा सप्टेंबर महिना होता. त्यावर्षी नुकताच मी कॉलेजला जाऊ लागलो होतो. पहिली चाचणी संपली, आता गणपती उत्सवाचे वेध लागले होते. तेवढ्यात वर्तमानपत्रात बातमी आली की, येत्या रविवारी म्हणजे ४ सप्टेंबर रोजी जयवंत दळवींचा कोमसापतर्फे बोरिवलीच्या गोखले हायस्कूलच्या हॉलमध्ये सत्कार होणार होता. त्यांच्या साहित्यसेवेचा तो गौरव होता. त्यावेळी मी विक्रोळीला राहत होतो. मी कार्यक्रमाला जायचे ठरवले. रविवारी सकाळी कार्यक्रम होता. तरी हॉलमध्ये दळवींचे अनेक चाहते, वाचक आले होते. हॉल तुडुंब भरला होता. यापूर्वी जयवंत दळवींची सारे प्रवासी घडीचे, महानंदा इत्यादी वाचलं होतं. दळवींचे नाव माझ्या आवडत्या लेखकांच्या यादीत समाविष्ट झालं होतं.

- Advertisement -

आपला गाववाला लेखक म्हणून एक अप्रूप मनात होतं. या लेखकाला बघावं या एका उद्देशाने मी कार्यक्रमाला हजर होतो. मी पुढेच बसलो होतो, तेवढ्यात स्टेजवर सर्व मान्यवर आले. सोबत दळवी होते. त्यावेळी दळवींची तब्येत बरी नव्हती, ते डायलिसीसवर होते. सत्कार समारंभ झाला. त्यांनी आपण लिहून आणलेले भाषण वाचून दाखवले. कार्यक्रम संपला तसा चाहत्यांनी आणि फोटो ग्राफरनी त्यांना वेध घातला. दळवींना भेटायचं राहून गेलं. त्यानंतर कधीतरी भेटू असं मनात ठरवून हॉलमधून बाहेर आलो. कार्यक्रम झाला आणि बरोबर बारा दिवसांनी पेपरातून कळलं, दळवी गेले. दळवींना भेटायचंच राहिलं.

लेखक भेटला नाही तरी त्याच्या साहित्यातून त्याने उभी केलेली व्यक्तीरेखा, स्थलनिर्मिती या मनात कुठे तरी तो साहित्यिक भेटल्याची प्रचीती देतात. अशाच ओढीने २०१४ च्या मे महिन्यात मी जयवंत दळवींच्या गावाला म्हणजे आरवलीला भेट द्यायला सकाळीच निघलो. आरवलीला जायचे म्हणजे वेंगुर्ल्याहून जावे लागते. वेंगुर्ल्याहून जाताना फारतर अर्ध्या पाऊन तासात आरवलीला पोचता येते. विचारत विचारत आम्ही दळवींच्या घरासमोर येऊन उभे राहिलो. दळवींचे घर म्हणजे चौसोपी वाडा होता. मूळ घर आवश्यकतेनुसार बाजूने वाढवून ते मोठे करण्यात आले असावे. याच घरात दळवींचा जन्म झाला. थोडे प्राथमिक शिक्षणदेखील या गावच्या शाळेत झालं. येथूनच एखाद किलोमीटरवर शिरोडा. वि. स. खांडेकरांची कर्मभूमी. वि. स. खांडेकर हे दळवींचे गुरू. खांडेकरांच्या लिखाणाचा प्रभाव दळवींच्या लेखनावर प्रत्यक्ष नाही, पण अप्रत्यक्ष दिसून येतो. ‘धर्म’मधील कथांची पार्श्वभूमी या गावातलीच दिसून येते. ‘सारे प्रवासी घडीचे’मधील व्यक्तीरेखा आणी स्थलवर्णन याच गावतील किंबहुना याच घरातील. घरात एका बाजूला जुन्या भांड्यांची ठेवण आढळते. एवढी मोठी भांडी कशाला?हा प्रश्न पडताच त्याचे उतर या घरातच सापडते.

- Advertisement -

दळवींच्या या घरात एकत्र कुटुंबपद्धती होती. जवळपास पन्नास माणसांचं एकत्र कुटुंब होतं. हे घर बघितल्यावर ‘धर्मानंद’मधील घर, तो परिसर आणि आजूबाजूची विहीर या सर्व गोष्टी इथल्या परिसराशी साधर्म्य साधतात. पडवीतून माडीकडे जाणारा जिना दळवींच्या कथेत आणि कादंबरीत आहे, त्याची उत्पत्ती याच घरातली असावी. या घरातील माडीसमोर असणारा परिसर जसाच्या तसा ‘धर्मानंद’मध्ये उतरला आहे. याच माडीला असणार्‍या खिडकीला तर दळवींनी आपल्या लेखणीत अमर करून ठेवले आहे, त्यांची अनेक पात्रे या खिडकीतून बघतात. हे वर्णनदेखील याच घरातले. संपूर्ण घर बघितल्यावर मग गाव बघायचं ठरवलं. प्रथम आम्ही त्या प्राथमिक शाळेजवळ आलो. याच शाळेत दळवींचं पाचवीपर्यंतच शिक्षण झालं. ही शाळा तर ‘सारे प्रवासी घडी’चे मध्ये उतरली आहे. ही शाळा बघितली आणि अपूची आठवण झाली. दळवींच्या घरापासून जवळच वि. स. खांडेकर रहात असत. दळवींच्या घरासमोर जी विहीर आहे. त्या विहिरीवर खांडेकर आंघोळीसाठी यायचे. तेव्हा स्वतः दळवी रहाटाने पाणी काढून खांडेकरांना देत असत. या विहिरीचा संदर्भ जयवंत दळवी लिखित ‘अंधाराच्या पारंब्या’त सापडतो.

आरवलीला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. ‘महानंदा’ मध्ये जो किनारा आहे तो हाच. येथेच मानू, बाबुलला भेटत असावी. इतका सुंदर समुद्र किनारा, कोंडुराशिवाय अजून कोठे नाही. समुद्रापासून जवळच सुप्रसिद्ध वेतोबाचे म्हणजेच रवळनाथाचे मंदिर आहे. हेच मंदिर ‘महानंदा’ कादंबरीत जसंच्या तसं आलं आहे. याच्या आजूबाजूलाच पूर्वी भाविनींची घर असतील. दळवींनी ‘महानंदा’मध्ये जे वर्णन केलं आहे, आजपासून सत्तर पंच्याहत्तर वर्षापूर्वीचं आहे. तेव्हाची ग्रामसंस्कृतीत देवाधर्माला आणि भावीन समाजाला जे स्थान होतं ते कादंबरीत आलं आहे. या देवळाभोवती असणार्‍या भाविनी. त्यांचा उपभोग घेणारे देवळाचे मानकरी, हे वर्णन या परिसराशी निगडित आहे. महानंदात वर्णन केल्याप्रमाणे बाबुल देवळात येतो त्यावेळी त्याची गाठ मानुच्या आईशी म्हणजे कल्याणीशी पडते. यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. देवळाच्या आत गेल्यावर फणसाच्या लाकडापासून बनवलेली वेतोबाची मूर्ती दिसते. या वेतोबावर दळवींची खूप श्रध्दा होती. दळवी म्हणत मी विमानातून प्रवास करताना स्वतः वेतोबा विमानाच्या पंखावर बसून माझे रक्षण करतो.

आरवलीहून अगदी हाकेच्या अंतरावर शिरोडा. १९२८ च्या मिठाच्या सत्याग्रहात या गावाने हिरीरीने भाग घेतला. अन्यायाविरुद्ध हे गाव तेव्हा उभं राहिलं. दळवींनी आपल्या कारकिर्दीची सुुरुवात पत्रकारितेने केली. वास्तविक दळवी पेशाने इंजिनिअर व्हायचे. त्यासाठी त्यांनी व्हीजेटीआयमध्ये प्रवेशदेखील घेतला होता, पण इंजिनिअरिंगवरून गाडी आर्ट्सकडे वळली. अमेरिकन सरकारच्या नोकरीत असूनदेखील दळवी सश्रद्ध होते. गावच्या वेतोबा इतकीच त्यांची आपल्या मित्रांवर श्रद्धा होती. दळवी गावी गेले की, हातात पिशवी घेऊन स्वतः मासे घेऊन येत आणि आपल्या मित्रांना जेवणासाठी आमंत्रण देत.

आपल्या गावच्या आठवणी पाठीवर घेऊन फिरणार्‍या दळवींनी पुढील काळात ‘चक्र’ सारखी काहीशी बोल्ड वाटणारी कादंबरी लिहिली. त्याचप्रमाणे स्त्री-पुरुष संबंधावर आधारित ‘अधांतरी’चा घाट काही वेगळाच. पण त्यातदेखील नियतीचा भाग हा अविभाज्य मानला पाहिजे. ‘अधांतरी’मधील सावित्रीची आई म्हणजे अम्मा तबलजीचा हात घरून पळून जाते. त्यानंतर खूप वर्षांनी अम्मा सावित्रीला भेटते. तेव्हा कफल्लक अवस्थेत असणार्‍या अम्माला सावित्री विचारते की, तू आम्हाला का सोडून गेलीस? त्यावर अम्माने दिलेलं उत्तर ही इथलीच स्पष्टीकरणं. अम्मा म्हणते चकवा गो, तो सावू, चकवा, या चकव्याची प्रतिमा ही आरवलीच्या सश्रद्ध कुटुंबातून आलेली आहे. दळवी तसे निर्विष साहित्यिक होते, पण त्यांच्या ‘ठणठणपाळ’ने बर्‍याच जणांना शाब्दिक घायाळ केलं. आरवली मनात साठवून दळवींचं साहित्य, ती कथानकं मनात ठेऊन आम्ही भिके डोंगरीकडे गेलो. तिथे एक खडक आहे. तिथे वि. स. खांडेकर बसून समोरच्या समुद्राकडे बघून आपल्या लिखाणाचे चिंतन करत. या ठिकाणीच खांडेकरांना फुरशाने दंश केला. त्याचे विष त्यांना आयुष्यभर छळत राहिले.

लेखकाची भूमी त्याला केवढं काय देऊन जाते, त्याची भूमी त्याला एक थीम देऊन जाते, जगण्याची आणि लिखाणाची उर्मी देऊन जाते. दळवी हयात होते तेव्हा मी लहान होतो. त्याचं साहित्य समजण्याचं वय नव्हतं. तरी त्यांच्या कादंबरीवर आधारित ‘अधांतरी’ही दूरदर्शन मालिका सुरु झाली होती. ‘महानंदा’ कादंबरीवर आधारित मराठी चित्रपट निघाला तेव्हा जयवंत दळवी हे नाव मला कळले. त्यातून मग लायब्ररीतून त्यांची पुस्तके आणून ती वाचून काढली. त्यावेळी दळवींनी चितारलेली भूमी ही आपल्या गावाशी साधर्म्य साधणारी वाटली. त्यामुळे जयवंत दळवी आपले वाटले. मला कळायला लागलं तेव्हा दळवी या जगात नव्हते. पण आरवली बघितल्यावर जयवंत दळवींची पात्र भेटली, ती कर्मभूमी बघायला मिळाली. लेखकाची भूमी ही त्याच्या लेखनाचा आरसा असतो.

हाच अनुभव देवगडच्या बाजूला असणार्‍या श्रीपाद काळेंच्या वाड्यात आला. त्या लेखकाच्या सात्विक लेखनाला ही भूमी कारणीभूत होती. त्याचप्रमाणे दळवींना मिळालेली आरवली सारखी भूमी. त्यात खांडेकरांचा सहवास, या गोष्टी त्यांच्या लेखनाला पोषकच होत्या. आरवली बघितल्यानंतर पुन्हा दळवींच्या घरी आलो, पुन्हा दळवींचं घर बघितलं, त्यांच्या लेखनाच्या अस्तित्वाच्या खुणा शोधत राहिलो. त्यांच्या लेखनातून दळवी शोधायचा प्रयत्न करत होतो. दळवी सापडणं तसं कठीणच. त्यांच्या लेखणीतून अखंडपणे वाहत राहिलेला वारा कोणता?…..आरवली, शिरोडा परिसरातला. नवा आयाम देणारा… लेखनाला नवी थीम अखंड देणारा. वाचकाला अखंड खिळवून ठेवणारा.

– वैभव साटम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -