घरफिचर्सक्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रेटिंगचे महत्व!

क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रेटिंगचे महत्व!

Subscribe

बँकेच्या किंवा बिगर-बँकिंग कंपन्या कर्ज देताना अंतर्गत कामकाज, म्हणून जी प्रक्रिया असते त्यात कर्ज मागणार्‍याचे पूर्ण पृथ:करण केले जाते. त्यात ‘क्रेडिट स्कोअर’ हा एक ठळक मुद्दा असतो, आज आपण अर्थ-साक्षरतेचा भाग म्हणून अधिक माहिती करून घेणार आहोत. कारण उद्या असा स्कोअर अनिवार्य केला गेला, तर आपणास काहीच माहिती नाही असे व्हायला नको. किंबहुना आजही काही वित्त कंपन्या अशा प्रकारे संभाव्य कर्जदारांच्या ‘स्कोअर’ तपासून पाहतात, खात्री पटली तरच कर्ज देण्याचा निर्णय नक्की करतात.

आपल्याला स्कोअर म्हणजे एकच माहिती आहे, तो म्हणजे क्रिकेटच्या सामनात होणारा स्कोअर, मराठीत शुद्ध सांगायचे तर धावफलक. दोन संघामधील हार-जीतचे भवितव्य ठरते ते त्यांनी रचलेल्या धावांच्या स्कोअरवरून. पण आपल्या जीवनात असा एखादा ‘स्कोअर’ असतो का? तसे पाहिले तर दहावीचे -बारावीचे मार्क्स, पुढे पदवी-उच्च शिक्षण ह्यात मिळणारे मार्क्स, शिवाय नोकरीच्या परीक्षेत मिळणारे मार्क्स आणि स्कोअर कलाटणी देणारे असतात. पुढे लग्न जमवताना पत्रिकेतील ‘गुण’ हाही एक प्रत्यक्ष स्कोअर असू शकतो. याहीपलीकडे जाऊन अर्थ-बँकिंगबाबत क्रेडिट म्हणजे पत ही कर्ज पुरवठा करताना आर्थिक निर्णय घेताना एक महत्वपूर्ण घटक मानला जातो. पण याबाबत खातेदार-कर्जदार म्हणून आपल्याला तितकी माहीत नसते, जाहिरात करताना किंवा नवीन ग्राहकांना आकर्षित करताना व्याजदर किती कमी आहे, जास्त आहे हे अधिक प्रमाणात सांगितले जाते.

बँकेच्या किंवा बिगर-बँकिंग कंपन्या कर्ज देताना अंतर्गत कामकाज, म्हणून जी प्रक्रिया असते त्यात कर्ज मागणार्‍याचे पूर्ण पृथ:करण केले जाते. त्यात ‘क्रेडिट स्कोअर’ हा एक ठळक मुद्दा असतो, आज आपण अर्थ-साक्षरतेचा भाग म्हणून अधिक माहिती करून घेणार आहोत. कारण उद्या असा स्कोअर अनिवार्य केला गेला, तर आपणास काहीच माहिती नाही असे व्हायला नको. किंबहुना आजही काही वित्त कंपन्या अशा प्रकारे संभाव्य कर्जदारांच्या ‘स्कोअर’ तपासून पाहतात, खात्री पटली तरच कर्ज देण्याचा निर्णय नक्की करतात. कर्ज देणारे व घेणारे यांना अतिशय उपयुक्त शिवाय देशातील अनेक प्रकारचे आर्थिक व्यवहार निष्कलंकीतपणे होण्यासाठी अशी सिस्टीम असणे हिताचे आहे.

- Advertisement -

पार्श्वभूमी – क्रेडिट स्कोअर आणि क्रेडिट रेटिंगचे महत्व
एखाद्याची पत शोधणे, त्याचे मूल्यांकन करून मगच कर्ज देणे या प्रकारची सुरवात झाली ती 1950 च्या दशकांत. जेव्हा पेशाने इंजिनिअर असलेल्या बिल फेअर याने गणितज्ञ अर्ल इसाक यांच्या सोबतीने या संकल्पनेचा पाठपुरावा केला, त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी अशा प्रकारची योजना तयार करून विकायला सुरवात केली. हळूहळू अशी व्यवस्था उपयुक्त आहे हे पटू लागले.

क्रेडिट स्कोअरची आवश्यकता – मुळात अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीचे वा कंपनीचे ‘पत’ तपासण्याची गरज का पडते? हे आपण पाहूया. पूर्वीचा काळ वेगळा होता गावपातळीवर सर्व व्यवहार होत होते. बारा बलुतेदार व गावातलाच सावकार असायचा, म्हणून कर्जे घेणारा कोण? त्याचा कौटुंबिकसंस्था इतिहास चांगला ठाऊक असायचा. त्यात फायदेही होते अन तोटेसुद्धा. पण वस्ती वाढली, शहरीकरणाने अठरा पगडचे लोक वस्तीस आले. व्यापार-व्यवसाय वाढला, अधिक नफ्यासाठी विस्तार आवश्यकच होता. कर्ज-देणारे सावकार होतेच परंतु बँक, क्रेडिट सोसायटीज -पतपेढ्या विविध प्रकारची कर्जे देऊ लागल्या. तसे करताना कर्ज मागायला येणार्‍या माणसाची माहिती घेताना त्यावर विश्वास ठेवला जायचा. परंतु यातून फसवणुकीचे प्रकार वाढत गेले. कर्जाचे हफ्ते न भरणे, व्याज बुडवणे, मुद्दल न देणे असे काही प्रकार घडू लागले. हे रोखण्यासाठी काही लिगल कागदपत्रे मागितली जाऊ लागली. परंतु त्यातही बनावटगिरी आढळू लागली. कर्जे बुडणे हे प्रकार रोखण्यासाठी संभावित कर्जदाराची आर्थिक माहिती, पार्श्वभूमी कर्ज-मंजुरी आधी जाणून घेणे हे गरजेचे बनले. हे काम एखाद्या त्रयस्थ संस्थेने निःपक्षपातीपणे करणे आवश्यक होते. म्हणून तर आर्थिक क्षेत्रात ‘क्रेडिट’ म्हणजे कर्ज-पुरवठा करणार्‍या बँका व वित्त संस्थांच्या मदतीसाठी पतमापन करणार्‍या संस्था अस्तित्वात आल्या.

- Advertisement -

अशा संस्थेकडून खालील प्रकारे काम व्हावे अशी अपेक्षा असते-

शास्त्रीय पद्धतीने पृथ:करण – केवळ आकडेवारी मांडून न पाहता त्यांचे परस्पर संबंध पाहून आर्थिक प्रगतीचा योग्य पद्धतीने आढावा घेतला गेला पाहिजे.

निःपक्षपाती – अनेक प्रकारच्या कर्जदारांची पार्श्वभूमी, आर्थिक कुवतीबाबत आकडे व माहिती घेताना कोणा एकाची बाजू न घेता, स्वतंत्र व तटस्थपणे ‘मत’ नोंदवता आले पाहिजे. हे जर संशयास्पद पद्धतीचे असेल तर विश्वासार्हता कशी राहील?
प्रमाणित – जी काही मेथड असेल ती प्रमाणित असली पाहिजे, त्यात पळवाटा किंवा तडजोड केली जाऊ नये.

हितसंबंध – कोणाचे तरी हितसंबंध जपण्यासाठी ‘सोयीचा’ अहवाल देणे किंवा कर्ज-मंजुरीस सोयीस्कर होईल असे गुणांकन दिले जाऊ नये. एखाद्याचे हितसंबंध जपण्यासाठी सिस्टीमचा गैरवापर केला जाऊ नये. तरच अशा पतमापन संस्थेची ‘पत’ आणि विश्वासार्हता टिकून राहते. अशीच मानांकन संस्था प्रस्थापित व सर्वमान्य होऊ शकते.

अनोळखी व्यक्ती /संस्था-यांच्याशी प्रथम व्यवहार करताना पूर्वइतिहास माहीत नसल्यास पुढे कसे जायचे?ही अडचण सोडवण्यासाठी कोणीतरी अधिकृतरीतीने आजवरची कामगिरी, उत्पन्न-खर्चाची आकडेवारी, एकूण मालमत्ता, कर्ज उभे करणे व परतफेड करण्याची आर्थिक व मानसिक क्षमता, कर्ज-रकमेचा विनियोग कसा करणार? इतर अनुषंगिक माहिती अधिकृतपणे देणारी कोणी तरी मान्यवर -विश्वासू एजन्सी-संस्था असायला हवी, तरच व्यापार आणि व्यवहार सुकरपणे होऊ शकतो.

फसवणुकीस आळा – अर्थव्यवस्थेत बनावट व्यवहार होऊ नयेत म्हणून अधिकृत माहिती देणारी यंत्रणा असणे हे आरोग्यदायी अर्थव्यवस्थेचे लक्षण मानले जाते.

व्यापार व्याप्ती वाढणे – स्थानिक व्यापारापासून ते थेट आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंत मजल गाठायची असेल तर फक्त परिचित व्यक्ती -संस्था ह्यांच्यापुरते व्यवहार करून चालत नाही. लोकल ते ग्लोबल होणे हेच तर जागतिकीकरणाचे खरे प्रयोजन. त्यासाठी समोरच्या पार्टीची संपूर्ण माहिती उपलब्ध असणे महत्वाचे.

थकवणारे -ठकवणारे जाहीर होणे- क्रेडिट रेटिंग असल्याचा फायदा जे आधीच डिफॉल्टर्स आहेत ते कळू शकतात. त्यांच्याशी नवीन व्यवहार करणे गैर आहे असा सावधगिरीचा इशारा मिळू शकतो. फसगत टाळली जाते.

रेटिंगमध्ये सुधारणा – एखाद्याची मागील काही वर्षांची कामगिरी निराशाजनक असेल म्हणून रेटिंग खाली गेले असेल तर ते कळू शकते. मात्र त्या व्यक्तीची वा कंपनीची आर्थिक स्थिती सुधारत राहिली, नफा वाढला म्हणून मागील देणी फेडली गेली तर ‘रेटिंग’ सुधारू शकते. परिणामी इतरांना त्यांच्याशी नव्याने व्यवहार करण्यास तितकी जोखीम वाटणार नाही. हा सुधारित रेटिंगचा सकारात्मक परिणाम म्हणू शकतो. किंवा उलट परिणामही दिसू शकतो, म्हणजे एखादी कंपनी जिला काही कालावधीत उत्तम रेटिंग मिळाले असेल, परंतु नंतरच्या काळात आर्थिक कामगिरी निराशाजनक झाली तर रेटिंग घसरू शकते. अर्थात हे तात्कालिक असू शकते किंवा दीर्घकालीन धोरण किंवा व्यावसायिक चुकीचं दुष्परिणाम असू शकतो. अर्थात हे अधिक खोलात जाऊन पाहिल्यावरच कळू शकते. रेटिंग हे अंकात्मक असते. अधिक माहिती घेतल्यास संपूर्ण चित्र उभे राहू शकते.

जगातील अनेक प्रगत व विकसनशील देशात अशी पद्धत कार्यरत आहे आणि त्यांचा एकूणच कर्ज वाटप व परतफेड या कामी चांगल्या पद्धतीने उपयोग होतो आहे. अमेरिका, ब्रिटन, ब्राझील, जर्मनी, चीन, डेन्मार्क अशा अनेक देशात वेगवेगळ्या पद्धतीने पतमापन करणार्‍या व शास्त्रीय पद्धतीने क्रेडिट स्कोअर काढून देणार्‍या संस्था निर्माण झाल्या आहेत. आज त्यांच्या तटस्थ -नि:पक्षपाती कामामुळे उद्योग-व्यवसायाला तसेच व्यक्तिगत स्तरावर कर्ज देण्याची परिपूर्ण प्रक्रिया कार्यरत आहे. तरीदेखील काही डिफॉल्ट होतात, कर्जबुडवे निघतात हीदेखील विदारक अशी वस्तुस्थिती आहे.

क्रेडिट रेटिंग कोणासाठी उपयुक्त- असे रेटिंग किंवा क्रेडिट रिपोर्ट हा फक्त बँका, बिगर बँकिंग कंपन्या किंवा शेअर्स वा सोन्याच्या तारणावर कर्ज देणार्‍या वित्त कंपन्या यांच्याच कामाचे आहे असे नाही. अन्य व्यवहारात अशा रेटिंग -रिपोर्टचा चांगला उपयोग होऊ शकतो.

खालील कार्यक्षेत्रात -व्यावसायिक विभागात रेटिंग वापरले जाते-
1) बँकिंग तसेच कर्ज देणार्‍या बिगर बँकिंग कंपन्या -कर्ज-विषयक निर्णय घेण्यापूर्वी कर्ज घेऊ इच्छिणार्‍या अर्जदाराने आपली माहिती दिल्यावर त्याबाबतची शहानिशा करणे, आर्थिक स्थिती इत्यादी माहितीचा आढावा घेणे व नंतरच व्यावसायिक निर्णयापर्यंत येणे. याकरिता रेटिंग व अर्जदाराची पार्श्वभूमी ज्ञात असणे गरजेचे असते. अंदाजपंचे किंवा ओळखी-पाळखीवर कर्जे-वाटप दिल्यानेच बँकांमध्ये आजवर ‘महाघोटाळे’ घडलेले आहेत व त्याची सजा संपूर्ण अर्थव्यवस्थेला भोगावी लागते आहे.
2) विमा व्यवसायातील कंपन्या -विमा कंपन्यादेखील आपल्या व्यवसायाची निकड म्हणून अशा माहितीचा वापर करून व्यावसायिक निर्णय घेतात.
3) मोबाईल कंपन्या -मोबाईल सेट विकणार्‍या कंपन्यांनादेखील अशी क्रेडिट रेटिंगची माहिती लागते. कारण कोणी ग्राहकांनी फोन घेतल्यावरच हफ्ते थकवले आहेत का, शिवाय फोन बिलाचा भरण्याबाबत थकबाकी आहे की नाही? हे कळण्यासाठी यादी उपयोगी पडते. अशी ‘काळी यादी’ निश्चितच मोलाची असते.
4) जमीन तसेच रिअल इस्टेटबाबत व्यवहार करणारे-जमिनीचे मोठे व्यवहार करताना मोठ्या आकड्यांची उलाढाल असल्याने पेमेंटबाबत घोळ होऊ नये वा साशंकता राहू नये म्हणून पत-माहिती कळणे व्यावहारिक असते.
5) सरकारी खाती -विभाग- जिथे जिथे पैशांचे व्यवहार असतात, तिथे प्रतिबंधक उपाय करणे सुरक्षेचे असते, अन्यथा जोखमींना सामोरे जावे लागते. आर्थिक भुर्दंड पडू शकतो.
6) डिजिटल फायनान्स कंपनी -जे ऑनलाईन पद्धतीने लेन्डिंगचे काम करतात, त्यांना असा डेटाबेस उपयोगी पडतो.

क्रेडिट रेटिंग थोडक्यात महत्वाचे – हा निर्देशांक तीन आकडी असतो. सर्वसाधारणपणे लोएस्ट -खालचा म्हणजे 300 असतो आणि उत्तम रेटिंग 900 इतका असू शकतो. एखाद्याचे क्रेडिट स्कोअर-रेटिंग काढण्यासाठी किमान 18 ते 36 महिन्याची माहिती, डेटा जमा करावा लागतो. तरच एखाद्याची कर्ज घेण्याची कुवत, परतफेड करणे, कधी हफ्ता न भरणे किंवा काहीकाळ कर्जाचे हफ्ते बुडवणे याची कारणमीमांसा कळू शकते. त्यातूनच नेमका स्कोअर काढणे शक्य होते. आपण जशा बीपी, कोलेस्ट्रॉल, डायबेटीससाठी अनेक वैद्यकीय चाचण्या करतो आणि त्यांचा एकत्रित रिपोर्ट आल्यावर त्यांचा परस्पर संबंध व अन्वयार्थ लावून आपले डॉक्टर ‘निदान’ करतात व त्यानुसार ट्रीटमेंटमध्ये बदल करतात. आरोग्याइतकेच आता आपल्या आर्थिक उलाढाली व व्यवहारांना महत्व आहे, म्हणून तर आता विदेशात जसा क्रेडिट स्कोअर-रेटिंगला अनन्यसाधारण महत्व व उपयोग केला जातो, तसेच आपल्या अर्थ-व्यवहारात, कर्ज-वाटप प्रक्रियेत होणे हे अत्यावश्यकच आहे.

आपल्या देशातील क्रेडिट रेटिंग -रिपोर्टबाबतची स्थिती
भारतीय अर्थव्यवस्था तशी आधुनिक व प्रगतीशील मानली जाते, म्हणूनच आपल्याकडे असे मूल्यांकन करणारी निःपक्षपाती संस्था असावी हे मध्यवर्ती बँकेने मान्य केले. परिणामी रिझर्व्ह बँकेने काही वर्षांपूर्वीच क्रेडिट रेटिंग कंपन्यांना मान्यता दिली, त्यांची नावे पुढीलप्रमाणे-

देशातील महत्वाच्या क्रेडिट रेटिंग कंपन्या –
1) सिबील
2) एक्सपीरियन
३) ईक्विफ्याक्स
४) क्रिफ् हाय मार्क

पुढे आपण अशा रेटिंग कंपनीच्या कामाची अधिक माहिती घेऊ. विशेषतः ‘सीबील’ ही क्रेडिट रेटिंग कंपनी जे काम करते ते आपल्यासारख्या व्यक्तिगत खातेदार शिवाय गृहकर्ज, अन्य कर्ज घेणार्‍यांसाठी कशा प्रकारे रेटिंग व आर्थिक उत्पन्न-खर्च याची माहिती जमवतात. अपडेट करतात हे कळू शकते. शिवाय त्याचा आपल्याला व कर्ज देणार्‍या वित्त संस्थांना -बँकांना कशा रीतीने वापर होतो हे आपण जाणून घेणे अधिक सोयीचे होऊ शकेल. कारण अर्थ-विश्व हे महासागराइतके व्यापक आहे व त्यात रोज काहींना काही बदल होत असतात. प्रत्येकाची माहिती मिळवणे व स्वतः अपटुडेट राहणे आवश्यक आहे. आज अनेक प्रकारची माहिती ‘गुगल’वर मिळू शकते. पण आपल्याला काही बेसिक गोष्टी समजत असतील, तरच गुगल-माहितीचा संदर्भ लागू शकतो. हेच तर आपल्या आर्थिक साक्षरतेचे मिशन आहे.

-राजीव जोशी – बँकिंग व अर्थ अभ्यासक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -