आये

Subscribe

आये. खरंतर ही आमच्या बाबांची आई. म्हणजे आमची आजी. पण आम्ही सगळेच तिला आए म्हणायचो. तशी ती सगळ्यांची आएच होती. कामासाठी काटक, जेवणात सुगरण तशीच शिस्तीतही कठोर असायची आए. तशी ती रोज मऊच बोलायची. प्रेमाने, मायेने आम्हाला, घरच्यांना समजून घ्यायची. शांतपणे समजूत काढायची. पण एकदा काय पाणी डोक्यावरून गेलं, की तिचं बिनसायचं. मग कुणाची गय नसायची.

‘ए बाबल्या, हय रे ये. वायच ही टीवी लावून दि. सात धा चे बातमे आयकाचे हत. त्या पावसाचा काय फिरता की नाय ता कळाक होया रे बाबा.’

असा आवाज आला, की पळत जावून पहिला टीव्ही चालू करायचो आणि ‘सह्याद्री’ लावायचो. तसंही तेव्हा एकच चॅनेल लागायचा टीव्हीवर. आमचा ऐंटेना तेव्हा पणजी केंद्राचा होता. त्यामुळे संध्याकाळच्या काही वेळ कोकणी कार्यक्रम असायचे. मग सात वाजता मुंबई केंद्र सुरू झालं, की ‘हसण्यावारी घेऊ नका’, ‘टिवल्याबावल्या’ यासारखे करमणुकीचे कार्यक्रम लागायचे आणि त्यानंतर सात दहा वाजता सह्याद्रीवर मराठी बातम्या लागायच्या. आमची आए त्या बातम्या रोज न चुकता बघायची. तिचा वेळ ठरलेला असायचा. हातातलं कोणतंही काम असेल, तर ते बाजूला ठेवून आधी बातम्या लावल्या जायच्या. तिला सगळ्या ठिकाणची माहिती असायची. आज पावसाची दिशा काय इथपासून राजकारणाची स्थिती काय इथपर्यंत इत्यंभूत बातम्या तिच्या पोथीत बंद असायच्या. आम्हा चिल्लर पार्टीसाठी तेव्हा हेच मोठं ‘जनरल नॉलेजचं’ दुकान होतं.

- Advertisement -

आए. खरंतर ही आमच्या बाबांची आई. म्हणजे आमची आजी. पण आम्ही सगळेच तिला आए म्हणायचो. तशी ती सगळ्यांची आएच होती. कामासाठी काटक, जेवणात सुगरण तशीच शिस्तीतही कठोर असायची आए. तशी ती रोज मऊच बोलायची. प्रेमाने, मायेने आम्हाला, घरच्यांना समजून घ्यायची. शांतपणे समजूत काढायची. पण एकदा काय पाणी डोक्यावरून गेलं, की तिचं बिनसायचं. मग कोण नीट उभाही राहू शकत नसायचा तिच्यासमोर. मग शिव्या काय नि खानदान काय, जे असेल ते उद्धारणं सुरू. तसं म्हटलं, तर आमच्या मालवणी माणसांच्या तोंडात शिव्या नसतील तर ती मालवणी वाटणारच नाहीत. ही एक निशाणी आहे इथल्या माणसांची.

पण या शिव्या कधी मनाला लागत नाहीत. कितीही शिव्या घातल्या, घेतल्या तरी मन कधी भरत नाही. कारण इकडच्या शिव्यांतही एक प्रेमाचा गोडवा रसरसून वाहत असतो. पण आएने आम्हा लहान मुलांना शिव्या घातलेल्या कधी आठवत नाहीत. ती प्रेमानेच समजूत काढायची. कधी ऐकलंच नाही, तर पाठीवर दोनचार छोटेछोटेसे दणके मात्र द्यायची. मी तर भयंकर द्वाड होतो तेव्हा. काहीना काही कसरती चाललेल्याच असायच्या. त्या जेव्हा हाताबाहेर जायच्या तेव्हा आए माझा पाय आमच्या ओट्यावर असलेल्या बाकाला दोरीने नाहीतर साडीच्या फॉलने बांधून ठेवायची. मी खूप रडायचो. ओरडायचो. बाजूच्या आज्या, ताया, आत्या, काकू भांडायला यायच्या.

- Advertisement -

‘गे नानी, सोड आधी आमच्या झिलाक. कित्याक बांधून ठेवतस? न्हान हा. कायतरी करतलोच. म्हणान काय पाय मोडून टाकशीत तेचो. पायाक वळ बग कसले इलेत ते.’

असं म्हणत त्या सोडायला जायच्या. मग खुद्द आमच्या मातोश्रीच त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभ्या ठाकायच्या.
‘काय्येक सोडू नको तेका. लय ताप दिल्यान हा डोक्याक. उंडगाक होया तेका नको थय दिवसभर. अशीच शिक्षा देव्क होई तेका.’

असं म्हणत पाठीवर परत एक दणका देऊन ती निघून जायची आणि मी कुळीध खाऊन बोंबलत बसायचो. कधीतरी मग पाच दहा मिनिटांनी आए पाय सोडायची आणि कपभर दूध आणि दोन पारलेची बिस्किटं आणून द्यायची. मी मग रडत रडत नाक पुसत ते खावून टाकायचो. दोन बिस्किटांवर अधिक बिस्कीट कधी मिळालेच नाही. तिने ठरवून दिलेला तो बिस्किटांचा मापदंड मी अजून पाळतो.

पावसाळा सुरू झाल्यावर एक मज्जाच असायची लहानपणी. चिखलात खेळणं, मासे पकडणं, जोतामागून फिरणं, गुट्यावर बसून ‘हिय्यो, हिय्यो हे…’ करणं सगळीच मज्जाच मज्जा. तेव्हा कोप़र्‍यातून घरी आलो, की आए भुईमूगाच्या शेंगा, फणसाच्या गोट्या, करांदे चुलीत भाजून ठेवायची नाहीतर मीठ घालून सोरकुलात उकडून ठेवायची. मग मी आणि ताई त्यावर तुटून पडायचो. आए जी कुळधाची पिटी, अंड्याची पोळी करायची त्याची चव तर अजूनही जिभेवर रेंगाळत असते. भात कापणीला सुरुवात झाली, की इकडे पिकलेल्या भातावर एक भयंकर प्राणी सर्वत्र आढळतो. त्याला आम्ही ‘कुसुरुंडो’ असं म्हणतो. त्याच्या अंगावरील काट्यासारखे केस हातापायाला लागले, की भयंकर खाज सुटते. सुज येते आणि तो हमखास लागतोच.

मग घरी गेल्यावर त्याचा दाह कमी होण्यासाठी आणि सूज मावळण्यासाठी आए कुड्याच्या पानाचे गाठवे करायची. ते चुलीत निखार्‍याखाली भाजायची. ते गाठवे नंतर खाज सुटलेल्या भागावर दाबून धरल्यावर त्यातून येणार्‍या रसामुळे खाज कमी व्हायची आणि दुसर्‍या दिवशी हातपाय परत पहिल्यासारखे व्हायचे, पण एके रात्री झोपतेवेळी आएच्या अंथरुणावरच असलेला एक कुसुरुंडा तिला लागला. तोही उजव्या डोळ्याला अगदी बुब्बुळापर्यंत. म्हातारपणामुळे तिला सरळ दिसलं नाही. पण त्यावेळापासून तिचा तो डोळा कायमचा अधू झाला. त्याची वेदना फक्त आएच सहन करू शकली. आम्ही तो बघितला तरी वेदना काळजाचं पाणी पाणी करायच्या.

आएचं पंचांगाचं ज्ञान बर्‍यापैकी होतं. ‘ह्यो म्हयनो मघा नक्षत्र हा. वर बांडकाचा वाहन. म्हंजे पाव्स जोरदार होय्त या येळाक. कामाक जरा घाय करुक होयी. उशीर होता नये.’ आए असं कायकाय बडबडत असायची. दरवेळी गुढीपाडव्याला नवीन पंचांग आणायचा आग्रह करायची. दरवर्षी नवं कशाला आणायचंं? तेच वापरायचं ना गेल्या वर्षीचं. मला काही त्यातलं कळायचं नाही. पण तिने पंचांग वाचून बांधलेले अंदाज अगदी अचूक असायचे. हल्लीच्या हवामानखात्यासारखा साशंक कारभार तिच्याकडे नव्हता. आए मला अनेक गोष्टी सांगायची. पुराणापासून शिवाजी महाराजांपर्यंत तिला माहिती होती. खरंतर तिच्यामुळेच मला इतिहासात आणि एकंदर सा़र्‍याच विषयांत आवड निर्माण झाली. हातात खडू देऊन ‘हा आता अ काढ, आ काढ, इ गिरव’ असं शिकवत बसायची. तिला अभ्यासाची खूप आवड होती. जुन्याकाळच्या चौथीपर्यंत आए शिकली होती. स्वतःची मोडकीतोडकी सहीदेखील करायची. मोडीभाषाही तिला थोडीफार यायची. नावही लिहायची. माझी जडणघडण होण्यामागे माझ्या आएचा वाटा मोठा आहे.

पण तिचा शेवटचा काळ खूप वाईट गेला याचंं दुःख मनाला अजून सलतं. तिची लग्न करून गेलेली मुलगी जेव्हा कायमची घरी राहायला आली, तेव्हा आएनं सगळी बाजू आपल्यावर घेऊन तिला पोसलं. आत्या काहीच काम करायची नाही. भटकत असायची. म्हणून घरातलेही वैतागले होते. पुन्हा लग्नालाही तिचा होकार नव्हता. बारावीपर्यंतचं शिक्षण घेऊन आता दारिद्य्रात जगणं तिनं ओढवून घेतलं होतं. पण आए मरेपर्यंत तिच्या मागं राहिली. प्रसंगी वेगळी चूल करून तिला पोसू लागली. पण त्या मुलीनं मात्र कधीच तिचा चांगला मान ठेवला नाही. अशातच एका दिवशी एकाकी आए गेली. पोटात काहीतरी बिघाड होऊन संडासला होऊ लागलं तेच निमित्त. जातेवेळी मात्र एक काम न चुकता मला देऊन गेली. ‘राजू, देवाची बती लावायची हा रोज न चुकता नि कोंबडी मोजून ढाकायची रोज.’ तिचा आदेश प्रमाण मानून मी होय बोललो. ती गेली. पण मनात खूपकाही ठेवून दिलं तिने.

आजही अनेकदा सातच्या बातम्या लागल्या, की आएची आठवण होते. मग कपभर चहा आणि दोन पारलेची बिस्किटं देणारे थरथरणारे हात आठवत राहतात.

– श्रेयश अरविंद शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -