घरफिचर्सतत्वचिंतक रवींद्रनाथ टागोर

तत्वचिंतक रवींद्रनाथ टागोर

Subscribe

रवींद्रनाथ ठाकूर (बंगाली उच्चार रोबीन्द्रनाथ ठाकूर) ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते होते. त्यांंचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे पिरालीनामक ब्राह्मणांच्या ठाकूर उपनावाच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील देवेंद्रनाथ आणि आई शारदादेवी. त्यांच्या एकूण पंधरा अपत्यांपैकी रवींद्रनाथ चौदावे.

११ व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडिलांसोबत १४ फेब्रुवारी १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कोलकाता सोडले. या भ्रमंतीत त्यांनी विविध ठिकाणे पाहिली. वडिलांची शांतिनिकेतन येथील मालमत्ता (येथे आता आजचे विश्वभारती विद्यापीठ आहे), अमृतसर व हिमालयातील थंड हवेचे ठिकाण डलहौसी इत्यादी. येथे रवींद्रनाथांनी विविध व्यक्तींची आत्मचरित्रे वाचली, इतिहास, खगोलशास्त्र, विज्ञान, कालिदासाचे काव्य व संस्कृत आदींचे अध्ययन केले.

- Advertisement -

१८७७ साली प्रकाशित झालेल्या रचनांमुळे रवींद्रनाथ प्रथम लोकांसमोर आले. यात मैथिली कवीच्या विद्यापतीप्रवर्तित शैलीत रचलेल्या काही दीर्घ कविता होत्या. विनोदाने रवींद्रनाथांनी प्रथम ह्या भानुसिंह नामक वैष्णव कवीने १७ व्या शतकात रचलेल्या व नंतर गहाळ झालेल्या रचना आहेत, असा आविर्भाव केला व नंतर त्यांचे कवित्व मान्य केले. याच काळात त्यांनी संध्या-संगीत (१८८२), बंगाली भाषेतील पहिली लघुकथा ‘भिकारिणी’ व सुप्रसिद्ध कविता ‘निर्झरेर स्वप्नभंग’ आदी रचना लिहिल्या.

१९०१ साली रवीन्द्रनाथ सियाल्दा सोडून शांतिनिकेतन येथे राहण्यास आले. एका आश्रमाची स्थापना करणे हा त्यांचा उद्देश होता. या आश्रमात त्यांनी एका प्रार्थना-गृहाची, प्रयोग-शील शाळेची, बागबगिचा व ग्रंथालयाची स्थापना केली. या काळात त्यांचे साहित्य बंगाली व विदेशी वाचकांचे आधिकाधिक लक्ष खेचू लागले होते. नैवेद्य (१९०१) व खेया (१९०६) या रचना या काळात प्रकाशित झाल्या. १९१३ रोजी स्वीडिश अकादमीचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी रवींद्रनाथांना समजली. गीतांजली या रचनेबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. गीतांजलीचे भाषांतर स्वतः रवींद्रनाथांनीच केले होते. १९१५ साली त्यांना ब्रिटिश सरकारने ‘सर’ ही पदवी दिली. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांनी ती सरकारला परत केली.

- Advertisement -

१९२१ साली रवीन्द्रनाथ व कृषी-अर्थतज्ज्ञ लिओनार्ड के एल्महिर्स्ट् यांनी शांतिनिकेतन जवळील सुरुल येथे एका ग्रामीण पुनर्निर्माण संस्थेची स्थापना केली. याच संस्थेचे रवींद्रनाथांनी पुढे ‘श्री-निकेतन’ असे नामकरण केले. श्री-निकेतनच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या प्रतिकात्मक स्वराज्य चळवळीला पर्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. ज्ञानसंवर्धनातून अज्ञानी व असहाय्य ग्रामीण भागाची सुटका होईल या उदेशाने त्यांनी विविध देशातील विद्वान, दाते व अधिकार्‍यांस या उपक्रमात सहभागी करून घेतले. १९३० सालापासून त्यांनी भारतातील पराकोटीच्या जातीयतेविरुद्ध प्रचार सुरू केला. नाट्य-कविता यांद्वारे जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा या महान तत्वचिंतकाचे 7 ऑगस्ट १९४१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -