घरफिचर्सअर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी

अर्थशास्त्रज्ञ दादाभाई नौरोजी

Subscribe

दादाभाई नौराजी यांचा आज स्मृतिदिन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, थोर नेते व अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १८२५ रोजी मुंबईत एका पारशी कुटुंबात झाला. वडील नौरोजी पालनजी दोर्दी आणि आई माणेकबाई. दादाभाई चार वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. प्रतिकूल परिस्थितीतही माणेकबाईंनी दादाभाईंचे संगोपन केले आणि शिक्षण पार पाडले. वयाच्या अकराव्या वर्षी दादाभाईंचे शोराबजी श्रॉफ यांच्या सात वर्षांच्या गुलाबीनामक कन्येबरोबर लग्न झाले. दादाभाईंना एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन अपत्ये झाली. एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूशन आणि एल्फिन्स्टन महाविद्यालय यांमधून शिक्षण घेऊन १८४५ मध्ये ते पदवीधर झाले. १८५० साली एल्फिन्स्टन महाविद्यालयात दादाभाईंची गणित व तत्त्वज्ञान या विषयांचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. या महाविद्यालयात प्राध्यापकपदावर नेमलेले दादाभाई हे पहिले भारतीय होत.

दादाभाई १८५५-५६ च्या सुमारास कामा यांच्या लंडनमधील व्यवसायातील एक भागीदार म्हणून लंडनला गेले तेथे त्यांचा ‘मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन’, ‘कौन्सिल ऑफ लिव्हरपूल’, ‘अथेनियम’, ‘नॅशनल इंडियन असोसिएशन’ इ. संस्थांशी जवळचा संबंध आला. १८६५-६६ पर्यंत त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून काम केले. १८६५-७६ या काळात व्यवसायानिमित्त दादाभाईंच्या इंग्लंडला अनेकदा वार्‍या झाल्या. १८६५ साली लंडनमध्ये डब्ल्यू. सी. बॅनर्जी यांच्यासमवेत दादाभाईंनी ‘लंडन इंडिया सोसायटी’ ही संस्था स्थापली. १९०७ पर्यंत ते तिचे अध्यक्ष होते. १८६२ मध्ये दादाभाई ‘कामा अँड कंपनी’ तून बाहेर पडले आणि त्यांनी ‘दादाभाई नौरोजी अँड कंपनी’ अशी स्वतःचीच कंपनी उभारली. १८६६ मध्ये त्यांनी लंडनमध्ये ‘ईस्ट इंडिया असोसिएशन’ या संस्थेची स्थापना केली ते तिचे सचिवही होते. १८७३ मध्ये भारतीय अर्थकारणाविषयी नेमलेल्या संसदीय समितीपुढे (फॉसेट कमिटी) दादाभाईंनी साक्ष दिली.

- Advertisement -

ही समितीदेखील त्यांच्या परिश्रमांचेच फलित होते. भारतीय अर्थशास्त्रीय विचारधारेमधील दादाभाईंचे मौलिक कार्य म्हणजे त्यांनी केलेले भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाचे निर्धारण. निरनिराळी मंडळे, समित्या व संस्था ह्यांमधून त्यांनी दिलेली व्याख्याने दादाभाई नौरोजीज स्पीचेस अँड रायटिंग्ज ह्या शीर्षकाने ग्रंथनिविष्ट झाली आहेत. एक समाजसुधारक म्हणून दादाभाईंचा लौकिक होता. जातिनिष्ठ मर्यादा पाळणे त्यांना मान्य नव्हते. स्त्रीपुरुष-समानता, स्त्रीशिक्षण यांचा त्यांनी सतत पुरस्कार केला. ‘द स्ट्यूडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ ह्या संस्थेच्या वतीने त्यांनी मुलींसाठी तीन मराठी व चार गुजराती शाळा उघडल्या. दादाभाईंच्या ह्या समाजकार्याला जगन्नाथ शंकरशेट यांसारख्यांनी मोठा हातभार लावला. परकीयांच्या वर्चस्वाखालील भारतातील आर्थिक घटनांच्या विशदीकरणाची किती नितांत आवश्यकता आहे, ते दादाभाईंनी आपल्यानंतरच्या अर्थशास्त्रज्ञांना दाखवून दिले. आर्थिक प्रक्रियेचे वास्तव व परिपूर्ण चित्र त्यांनी उभे केले. ‘भारताचे श्रेष्ठ पितामह’ हे सार्थ बिरुद त्यांना लावण्यात येते. भारताच्या राष्ट्रीय आंदोलनाच्या इतिहासात त्यांचे नाव आणि कार्य चिरंजीव स्वरूपाचे आहे. अशा या महान अर्थशास्त्रज्ञाचे ३० जून १९१७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -