गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करताना असावे वास्तवभान!

आपल्या कमाईतले पैसे बाजूला काढणे म्हणजे बचत ही झाली एक सोप्पी व्याख्या. बचतीतून गुंतवणूक करता येते. गुंतवणूक म्हणजे तुम्ही तुमच्या बचतीचा वापर करून केलेले आर्थिक नियोजन व त्यातून अधिक उत्पन्न मिळवणे, जमल्यास आहे ते भांडवल (म्हणजेच गुंतवलेली मुद्दल रक्कम) कसे वाढेल हे पाहणे जरुरीचे आहे. आपलेच पैसे व्याज किंवा अन्य माध्यमातून कसे वाढतील ही एक आर्थिक गरज आहे कारण चलनवाढ, महागाई अशा कारणांनी पैशाचे ‘मूल्य’ कमीकमी होत असते.

आपल्याला पैसे मिळवणे जरुरीचे वाटते कारण खर्चाची अनेक तोंडे आ वासून उभी असतात. जमा-खर्चाची तोंडमिळवणी करताना सर्वसाधारण संसारी माणसांची त्रेधातिरपीट होत असते. पूर्वी म्हणजे आपल्या आजोबांच्या काळात कमावणारा एक आणि खाणारे अनेक असायचे ! पण आता कमावणारे दोन व खाणारे एकूण दोन किंवा तीन असतात, तरीदेखील मासिक उत्पन्न काही पुरत नाही. मग बचत, गुंतवणूक आणि कर वाचवणे हे सर्व करण्यासाठी किती व कशी कसरत करावी लागत असेल, हे ज्याचे त्यालाच ठाऊक. या अशा विवंचनेत आपल्या बचत व गुंतवणुकीतून काही असेट निर्माण होणे जरुरीचे असते.

असेट म्हणजे फक्त घर नव्हे ! इतर अनेक प्रकारची असेट्स असतात. आज आपण त्यांची माहिती घेता-घेता महतीदेखील जाणून घेणार आहोत. असेट उभे करणे ही काही टाटा-बिर्ला किंवा अंबानी यांची मिरासदारी नाही. तुम्ही-आम्हीदेखील छोट्या -मोठ्या स्वरूपातील ‘एसेट’ निर्माण करून आपला वर्तमानकाळ व भविष्य सुखावह व सुरक्षित करू शकतो. केवळ आजचे उत्पन्न व आजची चिंता या चौकटीतून बाहेर पडू शकतो. आपल्याकडे असा दृष्टीकोन असेल तर मोठ्या कमाईची गरज नाही, छोट्या गुंतवणुकीतून छोटी संपत्ती उभारू शकता. पाहूया एसेटस व त्यांचे प्रकार.

पार्श्वभूमी -आपल्याला पैसा कमवावा लागतो कारण खर्च हे अमर्याद असतात, महागाई वाढत असते. बचत करणे आणि गुंतवणूक करणे हेही तसे गरजेचे होते. कारण आकस्मिक खर्च, मोठे खर्च यासाठी तजवीज करायला हवी म्हणून कमाईतले ‘चार पैसे’ बाजूला ठेवावे लागतात. हे सगळे जरी असले तरी मराठी माणसाने आपले असेट म्हणजेच संपत्ती निर्माण करायचा सहसा विचार केलाच नाही. पुढे जेव्हा आर्थिक उत्पन्न वाढले, घरातील कमावते हात वाढले तेव्हा कर्ज न काढता काही मालमत्ता घेण्याचा विचार होऊ लागला. असेट निर्मिती ही व्यक्तिगत पातळीवर जसे असते, तसे कंपनी, फर्म, पार्टनरशिप किंवा अन्य बिझनेस संस्था, एनजीओ, धर्मादाय संस्था, शैक्षणिक संस्था अशा सर्वानाच व्यवसाय किंवा सेवा यासंदर्भात कोणत्या ना कोणत्या प्रकारची मालमत्ता उभी करावी लागते.

असेट निर्माण करणे हा कोणत्याही अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असतो. उद्योग व्यवसायाला त्याकरिता भांडवल व कर्ज उभारणी करावी लागते शिवाय असेटद्वारे रोजगार व उत्पन्न निर्मिती व्हावी म्हणजे नफा व कर्जाची परतफेड अपेक्षित असते. आज आपणदेखील संपत्ती उभी करताना असाच काहीसा विचार करतो. उदाहरणार्थ – घर घेतले तर एका भावाची सोय होईल. स्कुटर घेतली की, कॉलेजला किंवा नोकरीवर जाण्यास सोयीचे होईल. अशा प्रकारे सोय व आर्थिक कुवत यांची सांगड घालून संपत्ती निर्माण करणे हे केव्हाही चांगले. त्यादृष्टीने आपण सकारात्मक विचार केला पाहिजे.

बचत, गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण – आपल्या कमाईतले पैसे बाजूला काढणे म्हणजे बचत ही झाली एक सोप्पी व्याख्या. बचतीतून गुंतवणूक करता येते. गुंतवणूक म्हणजे तुम्ही तुमच्या बचतीचा वापर करून केलेले आर्थिक नियोजन व त्यातून अधिक उत्पन्न मिळवणे, जमल्यास आहे ते भांडवल (म्हणजेच गुंतवलेली मुद्दल रक्कम) कसे वाढेल हे पाहणे जरुरीचे आहे. आपलेच पैसे व्याज किंवा अन्य माध्यमातून कसे वाढतील ही एक आर्थिक गरज आहे कारण चलनवाढ, महागाई अशा कारणांनी पैशाचे ‘मूल्य’ कमीकमी होत असते. म्हणजे दहा रुपयाला मिळणारी वस्तू काही वर्षांनी पंधरा रुपयाला मिळते, तेव्हा आपण वैतागून म्हणतो की, किती महागाई वाढलेली आहे. व्याजदर खाली येतात म्हणून व्याजरूपी कमाई कमी होते. यावर मात करायची असेल तर आपली नियमित कमाई वाढली पाहिजे, आहे ती गुंतवणूक अधिक उत्पन्न देणारी झाली पाहिजे, आपल्या खर्चाची तोंडमिळवणी होईल इतके उत्पन्न निर्माण झाले पाहिजे. याकारिता संपत्ती निर्माण करणे हे जरुरीचे आहे. उत्पन्न वाढल्यास हे शक्य असल्याने त्याकडे लक्ष पुरवले पाहिजे, त्यानंतर नेमकी कशी व कोणती संपत्ती घ्यायची याबाबत योग्य ‘निवड’ करता आली पाहिजे. संपत्तीचे नेमके किती प्रकार आहेत, कोणता आपल्या सोयीचा हेही जाणून घेणार आहोत.

संपत्तीचे अनेकविध प्रकार – संपत्ती हा तसा मोठा शब्द वाटतो, परंतु प्रत्यक्षात आपल्या अवतीभवती पाहिले किंवा आपल्या आप्त-मित्र वर्तुळात डोकावले तरीही अनेक प्रकारची संपत्ती आपल्याला दिसून येते. पण घेताना मात्र मिळकत व किंमत यांचा विचार करावा लागतो. म्हणून आपल्याला किती प्रकार आहेत व त्यांची उपयोगिता, मूल्यांकन व पुनर्विक्री असे काही व्यावहारिक मुद्दे पहावे लागतात. त्यानंतर घेतलेली संपत्ती ही लाभदायक व अर्थदायी होऊ शकते.

व्यक्तिगत पातळीवरील एसेटस -१) रोकड – एखाद्याकडे असलेली रोख रक्कम ही एक महत्वाची संपत्ती मानली जाते. कारण रोख पैशाचा सहाय्याने खर्च करता येतो व काही प्रमाणात संपत्तीची खरेदी करता येते.
२) वस्तू स्वरूपातील संपत्ती – यात अनेक प्रकारच्या मालमत्ता – घर, वाहन, जमीनजुमला, वापर करता येईल अशा काही वस्तू म्हणजे दागदागिने, मोटार इत्यादी वस्तू यांचा समावेश होतो.

कंपनी वा संस्था यांच्याबाबत संपत्तीचे मुख्य प्रकार-१) चालू संपत्ती – जिचे रूपांतर अल्पकाळात रोखीत करता येईल अशी काही संपत्ती असते, तिला ‘करंट एसेट’ असे संबोधित केले जाते.
२) फिक्स असेट – स्थावर संपत्ती म्हणजेच ऑफिस व कारखान्याची इमारत, वाहने,जमीन, अनेक प्रकारची गुंतवणूक
असेटसचे अजून दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते, ते म्हणजे –

१) निश्चित प्रकारची दृश्य स्वरूपातील मालमत्ता – यात जमीन, मोटारगाड्या, ठोक गुंतवणूक, दागिने, रोकड यांचा समावेश होतो.
२) अदृश्य स्वरूपातील मालमत्ता – वारा जसा दिसत नाही, अशा प्रकारची मालमत्ता ही मौल्यवान असते, त्याचे मूल्य हे अनेकदा अमूल्य असू शकते. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या कंपनीचे ‘गुडविल’ म्हणजे आजवर एखाद्या कंपनीने लोकांमध्ये, ग्राहकांमध्ये निर्माण केलेले नाव -नावलौकिक हे काही एका रात्रीत निर्माण होत नाही. ग्राहकांचा विश्वास, माल व सेवेचा दर्जा अशा अनेक घटकांवर कंपनीचे नाव हे मोठे होत असते. ‘टाटा ’ हे नावच पुरेसे बोलके आहे, पण हे काही वस्तुरूपात दाखवता येण्याजोगे नसते. असाच मुद्दा कंपनीने घेतलेल्या वस्तूच्या ‘पेटंट’ बाबत मांडला जातो, ज्याचा नावलौकिक व पेटंटच्या मदतीने निर्माण होणारे उत्पादन हे अमूल्य असू शकते. पेटंटचे हक्क व मालकी ही खूप मोलाची असते.

व्यक्ती व कुटुंबाबाबत असेट व त्यांचे प्रकार –
१) रोख रक्कम – नोटा व नाणी स्वरूपातील
२) व्यक्तिगत वापराच्या वस्तू – सायकल, स्कुटर, मोटार, कम्प्युटर-प्रिंटर, दागिने, रत्ने -हिरे
३) स्थावरजंगम स्वरूपातील-जमीन, शेती-बागायत, विहीर, शेतीची अवजारे-ट्रॅक्टर इत्यादी, मालकीचे घर -आंगण, मळा-फार्म हाऊस
४) विविध साधनातील गुंतवणूक – शेअर्स, बॉण्डस, विमा पॉलिसीज, कमोडिटीज व अन्य प्रकारातील गुंतवणूक

गुंतवणूक व संपत्तीबाबत काही मूलभूत बाबी-
१) वेळ -हा घटक महत्वाचा, तुम्हाला हंगामीरूपात हवी आहे की, दीर्घकालीन. त्यानुसार तुम्ही निवड करू शकता.
२) हेतू- तुमच्या प्रत्येक कृतीला काही अर्थ असावा लागतो, पैसे गुंतवताना किंवा संपत्ती उभी करताना नेमके काय व कशासाठी करता आहात, हे जर स्पष्ट असेल तर चूक किंवा गडबड होत नाही. निर्णय घेताना जे अन्य मुद्दे असतात, त्यात हेतू फार महत्वाचा आहे.
३) जोखीम – तुमची जोखीम घेण्याची क्षमता काय आहे? तुम्ही कितपत सहन करू शकता? उदाहरणार्थ – एखादा शेअर किंवा म्युच्युअल फंडाची योजना आज समजा तोट्यात वा अल्प किंमतीत असेल, म्हणून पॅनिक होण्याची गरज नाही. असे बाजारातील चढ-उतार सोसण्याची आर्थिक कुवत व मानसिकता असणे जरुरीची आहे. जोखीम ही अनेक प्रकारची असते. आर्थिक जोखीम ही अधिक नुकसानकारक किंवा लाभदायक होऊ शकते अर्थात याचा योग्य अंदाज-योग्यवेळी येणे महत्वाचे असते.
४) गरज – तुमच्या एकूण गरजा व त्यासाठी केलेली निधीची तरतूद यांचे नियोजन आवश्यक असते. गरजेला सपोर्ट देणारी गुंतवणूक किंवा गरज भागवणारी संपत्ती उभी करणे हे सोप्पे काम नव्हे.
५) वैविध्य – माणसाला जीवनात व्हरायटी लागते. आपण बुफे जेवण का पसंद करतो? कारण त्यात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य पदार्थ खाता येतात. एकच पदार्थ-विशेषतः गोड गुलाबजाम आवडतो, म्हणून कोणी जेवताना फक्त गुलाबजामच खात नाही. पैसे गुंतवताना हे भान ठेवणे मस्ट आहे, एकाच कंपनीचे हजार शेअर्स घेऊन भरमसाठ नफा किंवा दणदणीत तोटा असे टोकाचे परिणाम भोगण्यापेक्षा ‘समतोल’ गुंतवणूक करावी म्हणजे तोटा व मनस्ताप सोसावा लागत नाही. संपत्ती घेतानादेखील अमुक ठिकाणी विमानतळ येणार !! जमिनीला सोन्याची किंमत येणार !! अशा मोहापायी आपला सगळा पैसे एकाच ठिकाणी जमीन खरेदीत घालू नये. उद्या काही विपरीत घडले तर मुद्दल मिळेल की नाही ? असे काही घडल्यास धक्का सहन करण्याची क्षमता आहे का? म्हणून मालमत्ता उभी करताना सोने असो किंवा घर, तुमची सावधपणे पैसे गुंतवावेत.
६) उत्पन्न की उपभोग-मालमत्ता घेताना हा निकष फार क्रिटिकल मानला जातो. मग तुम्ही कोकणात ‘सेकण्ड होम’ घेत असाल आणि भाड्याने देवून पैसे कमावणार असाल तर ठीक. अन्यथा घरच्यांची अपेक्षा तिथे राहण्याची व मौजमजा करण्याची असेल तर हेतू व अपेक्षांची गल्लत होऊ शकते. गाडी घेतली व भाड्याने दिली, तरीही हीच समस्या उदभवू शकते. म्हणून संपत्ती घेण्याआधी विचार करा की उपभोग हवा आहे की उत्पन्न ? आणि मग पुढे जा !!
७) उत्पन्नातून की कर्ज काढून – तुम्ही घेत असलेली मालमत्ता तुमच्याकडे असलेल्या पैशातून विकत घेणार की कुठून कर्ज काढून ? हादेखील मुद्दा आर्थिकदृष्टीने अभ्यासाचा आहे कारण काही संपत्ती ही केवळ तुमच्या बचत वा गुंतवणुकीवर नाही उभी करता येत. त्यासाठी अतिरिक्त निधी हा कर्जरुपात उभा करावा लागतो. मग तुमचा हेतू राहण्यासाठी घर घेण्याचा असेल, तर कर्ज अपरिहार्य ठरते. अशी चिकित्सा आर्थिक निर्णय घेताना अपेक्षित असते. पण बहुतांश घरात असे महत्वाचे निर्णय आकस्मिकपणे, भावनिक कारणांनी किंवा मोहात पडून घेतले जातात. तसे करण्यापेक्षा तुलना करणे, व्यापक दृष्टीने पाहणे आणि मग ठरवणे असे पद्धतशीरपणे घडायला हवे.

असेट्स असण्याचे सर्वसाधारण फायदे-तोटे
फायदे – १) मूल्य-बाजारमूल्य वाढू शकते परिणामी तुमची अमुक मालमत्तेतील किंमत दुप्पट किंवा अधिकपट होऊ शकते.
२) तुम्हाला तुमच्या मालमत्तेवर कर्ज घेता येते, जसे घर-जमीन तारण ठेवता येते. घर व अन्य मालमत्ता भाड्याने देवून, तू उत्पादित करता येते. कारण निद्रिस्त म्हणजे हे अर्थ-दृष्टीने निरुपयोगी असतात. अर्थात ज्यांना वापर वा उपभोगासाठी घ्यायची आहे, त्यांना अमुक मालमत्ता असण्याचे वेगळे समाधान शिवाय उपभोगणे आनंददायी असू शकते.
३) मालकी असल्याचे फायदे मिळतात
४) आर्थिक आणीबाणी निर्माण झाल्यास तुम्ही तुमची मालमत्ता विकून पैसे उभा करू शकता.
५) विकास -पुनर्विकास -वाडा किंवा जुने घर असेल तर तुम्हाला रिडेव्हलप करून त्याचे मूल्य वाढवून अधिक कमाई करता येते.
६) वारसाने देता येते. दान केल्याचे पुण्य मिळू शकते.
७) रिव्हर्स मॉर्गेज अशा प्रकारचे बँक कर्ज एखाद्या घर मालकाला उतारवयात मासिक पातळीवर पैसे उभे करण्याच्या कामी उपयोगी पडू शकतात.

तोटे – १) पैसे अडकून राहतात २) बाजारभाव -किंमत घसरली तर पंचाईत होऊ शकते.
३) तुमची अचल संपत्ती म्हणजे घर, बंगला यांची किंमत जरी बाजारभाव वाढल्याने वाढत राहिल्या तरी जोवर तुम्ही प्रत्यक्षात विकत नाही, तोवर तुम्हाला काही लाभ नाही. केवळ काल्पनिक नफा आणि मानसिक समाधानावरच तृप्त व्हावे लागते. कारण तुम्ही राहत असलेली वास्तू काही तुम्ही उठसूट विकू शकत नाहीत. याउलट शेअर्स किंवा तत्सम गुंतवणूक तुम्ही बाजारभाव वाढल्यावर तात्काळ विकून भरघोस कमाई करू शकता. हा फरक लक्षात घेतला पाहिजे.

आपल्या व्यक्तिगत जीवनात, कंपनी व सरकार अशा अनेकांना संपत्ती निर्माण करावी लागते, कारण एका सोप्या व्याख्येनुसार असेट म्हणजे अशी वस्तू किंवा संपत्ती की भविष्यात वा गरज भासेल तेव्हा त्याचे रोखीत रूपांतर करता आले पाहिजे. ही मालमत्ता चल किंवा अचल स्वरूपात असते. दोन्ही प्रवृत्तीतली मालमत्ता चोरली किंवा लोटली जाणायची, नष्ट केली जाण्याचे भय असते. म्हणून विमा संरक्षण अपरिहार्य असते. मालमत्ता विकून पैसे कमवता येतात, भाड्याने देऊन नित्य-नियमित उत्पन्न कमावता येते किंवा तारण ठेवून कर्ज काढता येते. आपण जेव्हा मोटर सायकल, कार किंवा फ्लॅट-सेकंड होम घेतो हे सर्व ‘असेट क्रिएशन’ मध्येच मोडते. आपण बचत ते गुंतवणूक या मार्गाने असेट निर्माण करण्याचा विचार सातत्याने करूया की जेणेकरून आपल्याला विविध एसेट उपभोगता येतील व प्रसंगी विकून ऐनवेळी पैसे उभा करून आर्थिक विवंचना दूर करता येतील. भक्कम एसेटसचे पाठबळ असेल तर आपल्याला लायबिलिटीज व जोखिमा यांचे काल्पनिक भय वाढणार नाही. येणार्‍या दिवसाला हसतमुखाने सामोरे जावू, इतके आत्म-सामर्थ्य व अर्थशक्ती प्राप्त होऊ शकेल.

-राजीव जोशी -बँकिंग व अर्थ-अभ्यासक