घरफिचर्सज्युलिया रॉबर्टस ५०! प्रिटी पलिकडची वुमन

ज्युलिया रॉबर्टस ५०! प्रिटी पलिकडची वुमन

Subscribe

कुणीतरी तिला विचारलं , तू सेक्सी आहेस असं तुला वाटतं का? त्यावर ज्ुयलियानं त्यालाच विचारलं की, तुला काय वाटतं? त्यावर तो म्हणाला, मला काय वाटतं याला काही महत्त्व नाही. त्यावर ती म्हणाली, तसं नाही, प्रत्येकाच्या मताला महत्त्व आहे, हे मला आता कळून चुकलंय. मी सेक्सी? नाही. चांगली? हो आहे. मी माणूस म्हणून चांगली आहे. आणि असं चांगलं असणं माझ्या दृष्टीनं सेक्सी असण्यापेक्षा खूपच महत्त्वाचं आहे. कारण शरीर हे सुकतं. थकतं. सेक्सीपण हे एकेकाचं मत असतं. ते वेगळं असू शकतं. कदाचित त्यामुळंच लिबरमन म्हणतात तशा, ती बायकांच्या मनात धास्ती निर्माण करत नाही. तरीही ती आकर्षक वाटते. सर्वांना हवीहवीशी वाटते, हे महत्त्वाचंच. कारण जे एका दृष्टिक्षेपात का सहज हावभावानं सांगता येतं, त्यासाठी अनावृतपणाचा आधार घेण्याची आवश्यकताच काय?

आज रविवार. २८ ऑक्टोबर. म्हणजे ज्युलिया रॉबर्टसचा वाढदिवस! ज्युलिया रॉबर्टस -प्रिटी वुमन- आज ५० वर्षांची झाली! खरं वाटत नाही नं? कसं वाटणार? कारण आपल्याकडं महिला कलाकारांच्या वयाची मोजदाद ठेवायची रीत नाही. कदाचित काही अपवाद असतीलही. पण आठवणीत तरी कुणाचा ५० वा वाढदिवस वगैरे साजरा झाल्याचं ऐकिवात नाही. खरं ना? पण ते झालं आपल्याकडचं. पण हॉलिवूडमध्ये मात्र असे प्रसंग आवर्जून साजरे केले जातात. कदाचित त्यांना वयाचं ओझं वाटत नसेल, किंवा त्यात लपवण्यासारखं काय आहे. असंही वाटत असेल. कारण प्रेक्षक, चाहते तसे चाणाक्ष असतात. ते साधारण अंदाज करतात. ते जिचे चाहते असतात, त्या अभिनेत्रीचा पहिला चित्रपट त्यांना चांगलाच आठवत असतो. त्यावरून ते साधारण अंदाज करतात आणि बहुतेक वेळा तो जवळपास अचूकच असतो. म्हणजे त्यावेळी तिचं वय खूप कमी, कमी म्हटलं तरी नायिका व्हायचं म्हणजे दिसायला तर किमान सोळा तर असेल, मग त्यावरून सध्याचं वय शोधणं थोडंच अवघड? … ते जाऊ दे. आपण बोलतोय ज्यिुलयाबाबत.

ज्युलियाचा पहिला चित्रपट होता मिस्टिक पिझ्झा. तो आला होता १९८८ मध्ये. म्हणजे तीस वर्षांपूर्वी .(त्या आधी काही वेळा ती दूरचित्रवाणीवर दिसली होतीच. तसंच तिनं फायरहाऊस नावाच्या चित्रपटात काम केलं होतं.) त्यात तिची भूमिका डेसी अरौजोची होती. त्यानंतर त्याच वर्षी सॅटिस्फॅक्शन आला. त्यात तिच्याबरोबर होता लिआम निस्सेन (शिंडलर्स लिस्ट मधला ऑस्कर शिंडलर) पुढच्या वर्षी स्टील मॅग्नोलियाज आला. गाजला. १९९० मध्ये पाठोपाठ तीन म्हणजे फ्लॅटलायनर्स, ब्लड रेड आणि प्रेटी वुमन आले.

- Advertisement -

त्यातल्या प्रिटी वुमन नं कमालच केली. सारं सारंच बदलून गेलं त्यानंतर. त्या नावानंच आता ज्युलिया ओळखली जाऊ लागली. कारण त्या चित्रपटात रिचर्ड गियर सारखा समर्थ कलाकार असूनही संपूर्ण चित्रपटात ज्युलियाचा तिनं रंगवलेल्या व्हिव्हियनचा प्रभाव सतत जाणवत राहिला होता. किंबहुना सर्वत्र तिच्यासाठीच तो चित्रपट पाहिला जात होता. त्यातील तिची भूमिका होती देहविक्रय करणार्‍या तरुणीची. पण एक गडगंज श्रीमंत तरुण तिच्या आयुष्यात येतो आणि त्यानंतर तो तर बदलतोच, पण तीही पूर्णपणे बदलून जाते. अशी ही काहीशी माय फेअर लेडीशी जरासं साधर्म्य असणारी कथा. पण ऑड्री हेपबर्नची कुठंही नक्कल न करता ज्युलियानं ही भूमिका रंगवली, संस्मरणीय केली.

तशी नक्कल तरी कशी करायची .. साधी फुलवाली आणि देहविक्रय करणारी यांच्यात साम्य ते काय असणार? तसं थोडंफार होतं म्हणा. माणसाला स्वाभिमान आणि आत्मसन्मान म्हणून काहीतरी असतंच ना? त्यामुळंच उगाचंच जवळीक साधू पाहणार्‍यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं प्रत्येकाचं वेगळं तंत्र असतं, ते या दोघींनीही ते परिणामकारकपणे दाखवलं होतं. तिचा फणकारा आणि चीड चांगल्या प्रकारे व्यक्त झाली होती. ऑस्करसाठी शिफारस मिळाली तिला त्यासाठी, पण ऑस्कर मिळालं नाही. ऑड्री प्रमाणंच!

- Advertisement -

हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि ज्युलिया चित्रपट शौकिनांच्या दिल की धडकन बनली. फक्त अमेरिकेतच नाही तर जगभर. संपूर्ण जगभर प्रिटी वूमन हीच तिची ओळख बनली. तो चित्रपट गाजला आणि अर्थातच त्यानं प्रचंड कमाई केली. प्रचंड म्हणजे किती, तर ४६ कोटी ४० लाख डॉलर. त्यानंतर ज्युलिया देखील भक्कम मानधन घेणारी (त्या काळी दोन कोटी डॉलर, अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक) आघाडीची कलाकार बनली. अचानक सर्व निर्मात्यांना, दिग्दर्शकांना ती आपल्या चित्रपटात हवीशी वाटू लागली. तिच्याबाबत सतत काही ना काही लिहून येऊ लागलं. सर्वत्र तिचंच नाव ऐकू येऊ लागलं.

बेव्हर्ली हिलच्या एक सायकॅट्रिस्ट कॅरॉल लिबरमन म्हणतात की ज्युलियाचं हसणं असं मोठं दिसतं की, खरं तर तिच्या चेहर्‍याच्या आकाराच्या दृष्टीनंही ते बेढबच वाटाकं. पण तसं होत नाही. तिचं प्रसन्न, मनापासूनचं हास्य तुमच्यात तिच्याबद्दलचा विश्वास निर्माण करतं. त्यामुळं तिच्याबाबत आपलेपण वाटायला लागतो. नकळतच तुम्ही तिला प्रतिसाद देता. ते हास्य तुमच्यातलं आदिम असं काहीतरी जागं करतं. याला मानववंशशास्त्राचा पुरावा आहे. विचार करा. या हसर्‍या चेहर्‍यानं काही वर्षांतच सार्‍या जगाला भारून टाकलं. याचं प्रमुख कारण होतं प्रिटी वूमन. त्यातील तिची भूमिका काही प्रमाणात, काही प्रकारे सिंड्रेलाशी जवळीक साधणारी आहे. तिला तिचा राजकुमार भेटतो. प्रत्येक माहिलेला आपण सिंड्रेला बनावं आपल्याला प्रिन्स चार्मिंग मिळावा आणि पुरुषाला आपण प्रिन्स चार्मिंग बनावं, आपल्याला सिंड्रेला मिळावी असं वाटत असतं. कदाचित कुणाला तिच्यात सिंड्रेला दिसली असेलही.

काहींना तिच्यात शेजारची मुलगी म्हणजेच गर्ल नेक्स्ट डोअर दिसते. अगदी साधी, तुमच्या आमच्यासारखी. तिनं साकारलेल्या भूमिका, तिचं रूप, वागणं यांमुळं हे घडलंय असं त्यांना वाटतं. पण याहीपेक्षा एक अतिशय महत्त्वाचं कारण त्या सांगतात. ज्युलिया बायकांच्या मनात धास्ती निर्माण करत नाही. शॅरॉन स्टोन किंवा पामेला अँडरसन यांच्याप्रमाणं. बेसिक इन्स्टीक्ट ज्यांनी पाहिला असेल त्यांना शॅरॉन स्टोन ही काय चीज आहे हे नक्कीच उमगलं असेल. आणि अर्थातच त्यांना लिबरमन यांचं म्हणणं चटकन समजलं असेल.

ज्युलियाला एक भाऊ आणि बहीण, दोघंही तिच्याहून मोठे. तिचं बालपण सुखाचं नव्हतं. परिस्थिती साधारण गरिबीची. त्यात ती चार वर्षांची असतानाच आई-वडलांनी घटस्फोट घेतला होता. शाळकरी ज्युलिया मुलींच्या टिंगलीचाच विषय होती. कारण तशी त्या लहान वयात ज्युलिया अगदी अगली डवलिंग म्हणजे कुरुप वेडं पिल्लु म्हणावं अशीच होती. मुलं तिला तिची उंची, चष्मा, लांबलचक पाय आणि मोठं हास्य या वरून चिडवायची. सुरुवातीला तिला ते सारं सहन होत नसे. पण नंतर मात्र तिनं याचा फारसा त्रास कधीच करून घेतला नाही. उलट या सार्‍या गोष्टीचं आपलं वैशिष्ठ्य ठरतील, हे जणू तिला तेव्हाच कळलं होतं.

आपल्या अशा दिसण्याचाच फायदा करून घ्यायचा निश्चय तिनं केला. आणि मग मनानं तो पक्का केला. आज लोक ज्याची टिंगल करताहेत तेच सारं माझ्या कौतुकाचा विषय होईल. त्या खुणेनंच मी ओळखली जाईन, असा निर्धार तिनं केला. त्या वयातच आपलं सामर्थ्य कशात आहे. हे तिनं ओळखलं होतं. मग काय .. तिनं चष्मा काढून कॉन्टॅक्ट लेन्स वापरायला सुरुवात केली. प्रिटी वुमनमध्ये आपल्या लांबलचक पायांचा उपयोग तिनं विशिष्ट पद्धतीने चालण्याचा ढंग निर्माण करण्यासाठी केला. तिच्या उंचीनंच (ती पाच फूट नऊ इंच उंच आहे) तिला आणि त्या चालीला डौल प्राप्त करून दिला. त्यासाठी तिनं मुद्दामच जरा जास्तच उंच टाचांचे बूट वापरले. आणि तिचं हसणं .. ते तर आता तिची ओळखच बनलीय आणि तिची जिवणी रुंद आहे. हेही लोकांना जाणवेनासं झालंय -तिच्या खास हास्यामुळं. अन्य कशामुळं नाही.

ज्युलिया म्हणते…एखाद्या गोष्टीनं तुम्हाला आनंद होणार असेल, तर कोणतीही असली, तरी ती गोष्ट तुम्ही केलीच पाहिजे. प्लॅस्टिक सर्जरी असो का पहाटे धावायला जाणं असो. तिच्या या मताप्रमाणंच तिची वागणूक असते. ती बर्‍याचदा जीन्स-टीशर्ट अशा अगदी साध्या वेशात असते. कधी कधी तर गबाळ्या म्हणाकं अशा वेशात. केस विस्कटलेले असले, तरी तिला त्याची फिकीर नसते.

लोकांना वाटतं मी नेहमी सेटवर असल्यासारखंच असायला हवं. पण ते काय म्हणतात याची दखल घ्यावी, असं मला वाटत नाही. मन सांगेल त्याप्रमाणंच ती वागते. त्यामुळं १९९२ मध्ये ती मदर तेरेसा यांना भेटण्यासाठी, त्यांचं काम पाहण्यासाठी थेट भारतात येऊन दाखल झाली. ती म्हणते की तो अनुभव जबरदस्त होता. जीवन म्हणजे काय असतं याची जाणीव अशा वेळी नव्यानं होते. तशी मी त्यापासून दूर कधीच गेलेली नाही. माझं आयुष्य ही काही मनोरंजक बाब नाही. त्यामुळंच ती वृत्तपत्रांना आवडण्यासारखी नाही.

त्यानंतर मदर तेरेसांचं काम पुढं चालवायचा तिचा निर्धार आहे. त्यांचा आत्मा माझाच एक भाग बनून राहावा अशी माझी इच्छा आहे, असं ती म्हणाली होती. त्यामुळं माझ्या आत्म्याला दिलासा आणि ताकद मिळत राहील. ती उदार आहे, पण त्याचा गाजावाजा करत नाही. मदतीचं मोल गरिबीमुळं तिनं अनुभवलं आहे. त्यामुळं युनिसेफ आणि अन्य संस्थांसाठी तिनं वेळ आणि मदतही दिली आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील ९-११ च्या हल्ल्यानंतर तिनं मदत म्हणून दहा लाख डॉलर दिले. स्वतःचे. कुठला कार्यक्रम करून, लोकांच्याच खिशातून काढून नव्हे!

तिच्या भूमिकांत खूपच वैविध्य आहे. होकार देण्यासाठी ती भूमिका नायिकेचीच हवी असा तिचा आग्रह नसतो. आपल्याला आवडायला हवी एवढीच तिची अट असते. पटकथा वाचताना तिला जी भूमिका आवडते तीच ती स्वीकारते. त्यामुळंच कित्येकदा ती अशी भूमिका निवडते की, तिच्याकडे प्रस्ताव घेऊन येणारा थक्क होतो. आता अमेरिकाज स्कीटहार्ट्स या चित्रपटाचंच उदाहरण बघा. त्यात पटकथेतील नायिका ही चित्रपटातली नायिकाच असते. तिचं पतीबरोबर बिनसलेलं असतं. विवाह तुटण्याची ते दोघं वाट बघतायत. पण परिस्थितीची गरज म्हणून नायक-नायिकेला प्रेमाचं नाटक करावं लागणारा असतं. त्यासाठी नायकाला तयार करायची जबाबदारी जिच्यावर सोपवलेली असते ती नायिकेची बहीण. साधीसुधी, अगदी चष्मा वगैरे. जराशी बावळट वाटाकी अशी. तशी ही दुय्यम व्यक्तिरेखा. पण त्याच रूपात ती नायकाला आवडते. आपल्या पत्नीवर प्रेम असल्याचं तो नायक नाटक करत असला तरी त्याचं प्रेम असतं या बावळट मुलीवर.

ही पटकथा वाचून तिनं होकार कळवला. निर्माता खुश झाला. पण नंतर तिनं त्याला सांगितलं की ती नायिकेची नाही, तर तिच्या बहिणीची भूमिका करेल, एरवी त्या चित्रपटात कामच करणार नाही. तेव्हा त्याला धक्काच बसला. त्यानं बिचार्‍यानं हो म्हटलं. २००१ मध्ये आलेला हा चित्रपट चांगला चालला. त्यानंतरही तिनं चित्रपट केले. अजूनही करील. गेल्याच वर्षी तिचे स्मर्फः द लॉस्ट व्हिलेज आणि वंडर हे दोन चित्रपट आले. तिचा पहिला विवाह लइल लोव्हेट, अल्पकाळ टिकला (१९९३-९५), दुसरा विवाह २००२ मध्ये डॅनियल मोडरसोबत झाला आणि सध्या ती दोघं आपल्या एक जुळे हेझल आणि फिनाउस आणि धाकटा हेन्यी डॅनियल यांच्यासह सुखानं राहात आहेत.

यापुढं ती काय करेल हे कुणीही ठामपणं सांगू शकणार नाही. पण ते काहीतरी वेगळंच असेल, असा अंदाज मात्र करता येईल. ती तेरेसांचं काम पुढं चालवील किंवा एरीनसारखी कार्यकर्ती बनेल हे आपण फक्त बघत राहायचं.

-आ. श्री. केतकर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -