घरफिचर्सस्थानिक बियाणांची लोकचळवळ

स्थानिक बियाणांची लोकचळवळ

Subscribe

काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. मित्र नवीन घरात राहायला गेला. रात्री जेवणासाठी आम्हाला बोलावलं. जेवणाच्या वेळापर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. चर्चा फळ, भाज्या यांच्या चवीच्या बाबत सुरू झाली. परवा आणलेली पपई खाल्ली का गं?, एक फोड खाऊन बघितली, बाकी फेकली, अजिबात गोड नव्हते. निहार आणि ऋचा मधील हा संवाद, मग हल्ली पपई कशी बेचव मिळते यावर सर्वांनी आपापले अनुभव सांगितले. पपईवरून सुरू झालेली चर्चा, गाजर, टोमॅटो, बोरं, काकडी व वेगवेगळ्या भाजीपाला यामधील चव कशी गायब झाली आहे यावर पुढे तासभर सुरू राहिली.

हा काही एक-दोघांचा अनुभव नाही. सार्वत्रिक अनुभव असा आहे की, हल्ली आपण वेगवेगळे फळ, फळभाज्या, पालेभाज्या, धान्य यामधील चव हरवून बसलो आहोत. बाजारात भाजीपाला घ्यायला गेल्यावर भाजीविक्रेत्याला अनेकदा विचारतो ही गावरान आहे का? भाजी विकणाराही आपल्याकडील भाज्या कशा गावरान आहेत, हे पटवून देत त्या विकत असतो. घरी आणल्यावर त्या भाज्यांना चव असतेच असे नाही. मग भाजीविक्रेत्याकडून फसवले गेल्याची भावना. पण आपण नेमके कोणाकडून फसवले जात आहोत? भाजी विकणारा विक्रेता? भाज्या पिकवणारा शेतकरी? की अजून कोण? नेमकं कोण कोणाला फसवतंय? ह्या प्रश्नाचा नीट मुळातून विचार व्हायची गरज आहे.

मकर संक्रांतनिमित्त गावी जाणे झाले. संक्रांत रोजी शेतीत जाऊन जेवण्याचा सण तेलंगण व कर्नाटक सीमाभागात साजरा केला जातो. काही लोकं हेच सण वेळो अमावाशा रोजी करतात. शेतीत कडब्याच्या पेंढीपासून खोपी तयार केली जाते. खोपीमध्ये चिखलापासूनचे पांडव व लक्ष्म्या तयार करून त्यांची पूजा केली जाते. शेतीतील पिकांची पूजा केली जाते. मग सर्वजण एकत्र बसून गोडधोड जेवण करतात. या जेवणात दोन महत्त्वाचे पदार्थ असतात. एक म्हणजे आंबवण टाकून बनवलेलं आंबील, दुसरे वेगवेगळ्या फळ, शेंग व पालेभाज्यांच्या एकत्रित मिश्रणातून बनवलेली भजीची भाजी. ह्या दिवशी आंबील प्यायल्यावर पोट मोठं होतं. म्हणजे भूक वाढते. चैत्र पाडव्याला कडूलिंबाचे फूल चावून पोट लहान होते, म्हणजेच भूक कमी होते. हे पिढ्यान्पिढ्या चालत आलेलं आईकडील ज्ञान. जेवून झाले. आंबील पिऊन झाले. मग स्वतःची शेती, जवळपासच्या लोकांची शेती फिरून पाहण्याचा कार्यक्रम केला. वेगवेगळ्या शेतामधील हरभर्‍याचे डहाळे खाऊन बघितले.

- Advertisement -

एकाही शेतातील डहाळ्याला चव नाही. सगळीकडे हायब्रीड हरभरा पेरलं होतं. दिसायला टवटवीत. मोठमोठे दाणे. चव मात्र नुसता वातड. शेतभर हरभरा असून मुठभरही कुणी खात नाही. हरभरा पिकवला जातो ते फक्त विकण्यासाठी. हरभर्‍यासारखेच इतर बहुतांश पिकांचे झाले आहे. पिके ही खाण्यासाठी नसून विकण्यासाठी. म्हणजे ते सर्व क्रय वस्तू बनले आहेत. हायब्रीडमधील अधिक उत्पन्नाचे मिथक अनेकदा असा दावा केला जातो, की हायब्रीड बियाणे हे अधिक उत्पन्न देते. हा समज वेगवेगळ्या माध्यमातून जनसामान्यात खोलवर रुजवला गेला आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा आणि प्रचारकी आहे. हरितक्रांतीच्या नावाखाली देखील नेमके हेच झाले आहे. हरित क्रांती नंतर उत्तरेत गव्हाचे उत्पन्न वाढले असल्याचा दावा केला जातो. प्रथमतः हे खरे वाटते. जर बारकाईने याकडे पाहिले तर असे लक्षात येईल की, गहू पिकाखालील एकूण क्षेत्रात वाढ

झाली असल्यामुळे गव्हाचे उत्पादन वाढले आहे. गव्हाऐवजी घेतली जाणारी इतर असंख्य भरडधान्य, कडधान्य यांना आपल्या शेतीतून हद्दपार केले गेले. मग ह्या पिकांची जागा गव्हानी घेतली. मग यातून गव्हाचे उत्पन्न वाढणे साहजिकच होते. सोबतच तननाशके, खते यांचा प्रचंड वापर यामध्ये करण्यात आला. एकसुरी पीकपद्धती, तननाशके यातून पंजाब, हरियाना भागातील लोकांचे भवितव्य धोक्यात घालण्यात आले. कॅन्सर एक्स्प्रेस ट्रेन सुरू झाली. जोधपूर पॅसेंजरने पंजाबमधील मालवा भागातून आठवड्याला 60 ते 70 कॅन्सरचे रुग्ण राजस्थानच्या बिकानेर कॅन्सरवरील उपचारासाठी प्रसिद्ध असलेल्या दवाखान्यात येत होते. यामुळे या ट्रेनचे नावच ‘कॅन्सर एक्स्प्रेस’ पडले. पंजाब हरित क्रांतीने अनेक लोकांना ट्युमर, अल्सर आणि कॅन्सरसारखे रोग दिले. त्यातील कैक लोकं दगावली आहेत. हे चित्र डोळ्यांसमोर असूनही पंजाब हरित क्रांतीचे अतिरेकी समर्थन करणारे नेते आजही पाहायला मिळतात.

- Advertisement -

दुसरा एक दावा असतो की, हायब्रीड पीक हे वातावरणातील बदल सहन करू शकतात. हाही दावा तितकाच खोटा आहे, जितका अधिक उत्पन्नाचा दावा. उलट ही बियाणे एका विशिष्ट नियंत्रित परिस्थितीमधेच चांगले येऊ शकतात. याउलट स्थानिक पारंपारिक बियाणे ही वेगवेगळ्या परिस्थितीत विकसित झाले असल्यामुळे ती वातावरणातील बदलात देखील टिकणारी असतात. ओरिसा येथिल देबल देब आणि महाराष्ट्रातील जव्हार भागातील मावजी पवार ह्यांनी भाताचे असे अनेकानेक वाण आपल्याकडे जतन करून ठेवले आहेत. जी अतिशय कमी पाण्यात येतील. पाण्याच्या आतमध्ये वाढतील. उंचीला कमी असलेले तसेच साधारण एक माणूस उंच असलेले. रंगाने गडद लाल, काळे. असे शंभरहून अधिक भाताचे वान जतन केले आहेत.

आता शहरातून लोकांची गावरान धान्याची मागणी वाढू लागली आहे. त्या-त्या ठिकाणी व्हॉटस अ‍ॅप ग्रुप्स, फेसबुक पेजस सुरू झाली आहेत. ह्यामध्ये गावरान भाजीपाला, धान्य पुरविणार्‍या शेतकर्‍यांचे पत्ते, संपर्क दिले जातात. ह्या गटाकडून पुढाकार घेऊन अशा शेतकर्‍याला एखाद्या विशिष्ट दिवशी शहरात धान्य घेऊन बोलाविले जाते. गावागावात देखील गावरान पारंपारिक बियाणे जतन करून शेती करणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात राहीबाई पोपेर हिने शंभरहून अधिक गावरान गावे जतन केली आहेत. त्याची शेती ती स्वतः करते. याची दखल बीबीसी मराठीने देखील घेतले आहे. वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवरही त्यांना बोलाविले जाते. अकोले तालुक्यातच राघोजी भांगरे या अधिवासी नायकाच्या गावात ममताताई भांगरे राहतात. त्यांनी आपले घराच्या

परिसरात साठ सत्तर प्रकारचे भाजीपाला लागवड केली आहेत. अतिशय दुर्मीळ अशा कांद्याची लागवड देखील त्यांनी केली आहे. घरी गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याकडे एका जेवणात किमान पाच सहा प्रकारच्या भाज्या सहज खायला देतात. त्यांच्याकडे गावरान वनाचे बियाणे देखील विक्रीला उपलब्ध आहेत. अकोले मध्येच धामनवण नावाचे एक गाव आहे. तेथील सकुताई व त्र्यंबक भाऊकडे देखील गावरान वाणाचे जतन व संवर्धन केले जाते. सकुताई धराडे यांनी तर महिला बचत गटाच्या माध्यमातून गावात एक बीजबँक उभे केले आहेत. त्यामध्ये बियाणांची विक्री, देवाणघेवाण होते. सुरुवातील या पुढाकाराला महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्पातून लोकपंचायत संस्थेने मदत केली आहे. मात्र या महिलांना हे मदत जास्त दिवस घ्यायचे नाही. त्यांना बीजबँकेला स्वावलंबी बनवायचे आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा या गावात लता माणिक सोनावणे ह्या शेतकरी महिला आहेत. त्यांचे घर गावाच्या बाहेर एका टेकडीवर आहे. गावरान वाल, भुईमुगाच्या शेंगा, वेगवेगळ्या रानभाजी यांची लागवड ते हौसेने करतात. त्या सर्व त्यांच्या खाण्यात असतात. त्यांच्याकडील जेवण अतिशय चवदार असते. साधे शेंगदाणे टाकून केलेल्या मिरचीच्या ठेच्याला खूपच चव असते. शंभर किलोमीटरच्या परिघात ही सगळी मंडळी आहेत. असेच वेगवेगळ्या ठिकाणचे

लोकं आता पुढाकार घेत आहेत. जाणकार शेतकरी जर मोठ्या प्रमाणात हायब्रीड शेती करीत असला तरी, स्वतःला खाण्यापुरते म्हणून काही गुंटे तरी गावरान बियाणांची शेती करीत असतो. हा शेतकरी जर त्याच्या संपूर्ण शेतीत गावरान बियाणांची लागवड करायला हवं असे वाटत असेल तर, लोकांची त्यासाठीची मागणी वाढली पाहिजे. निव्वळ उत्पन्न वाढीचे गाजर दाखवून बियाणांच्या खाजगी कंपन्या त्यांच्या नफेखोरीसाठी आपल्या सर्वांचे अन्न, त्याची चव, कस हे धोक्यात घालत आहेत. आपण वेळीच सावध व्हायला हवं. जुनी आपली बियाणे टिकवून ठेवण्याची पद्धत, त्यांची देवाण-घेवाण करण्याची व्यवस्था सुरू करायला हवं. ह्या गोष्टीला बाहेरून कुठून मदत मिळेल याची वाट पाहत बसायची गरज नाही. काही पुढाकारातून, छोट्या मोठ्या प्रकल्पातून थोडेफार मदत होत असेलही. मात्र ह्यावर पूर्ण विसंबून न राहता आपल्या भावी पिढीचे अन्न सुरक्षित करण्यासाठी स्थानिक पारंपारिक बियाणांची लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे.

बसवंत विठाबाई बाबाराव-

लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -