घरफिचर्सशिवसेनेचो उलट्या पिसाचो कोंबडो!

शिवसेनेचो उलट्या पिसाचो कोंबडो!

Subscribe

काल वामनराव परबांका भोवलो, आता सोमय्याक नायसो केल्यान

अनेक लटपट्या आणि खटपट्या करून सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणार्‍या किरीट सोमय्या या तरुण नेत्याला वामनराव परबांना डावलून त्यावेळी प्रमोद महाजन यांनी आमदारकीची तिकीट दिली. याला शिवसेनेचा परबांवरील राग कारणीभूत होता. परबांनी रक्ताचे पाणी करून बांधलेल्या मुलुंड मतदारसंघावर सोमय्या हे आयत्या बिळावर नागोबा असल्यासारखे बसले. झगामगा आणि मला बघा छाप सोमय्या यांच्यासारखे नेते हवेत की प्रामाणिक परब हवेत यात सोमय्या यांचा विजय झाला होता आणि पार्टी विथ डिफरन्स, अशी फुशारकी मानणार्‍या भाजपचा राज्यातील तो पहिला नैतिक पराभव होता. पण आता त्याच किरीट सोमय्यांचे तिकीट शिवसेनेच्या रोषामुळे कापण्यात आले आहे. शिवसेनेच्या उलट्या पिसाच्या कोंबड्यान सोमय्याक नायसो केल्यान.

सध्या टीव्हीवर ‘रात्रीस खेळ चाले’ जोरात सुरू आहे. अण्णा, शेवंता आणि नाईकांचो वाडो यांनी प्रेक्षकांची मती गुंग केली आहे. रात्री 10 वाजले की ताई, माई, दादा, मामा हातातील सर्व कामे बाजूला सारून अंधश्रद्धेचा खेळ बघण्यात गुंग असतात. याचा पोराटोरांवर काय परिणाम होईल यापेक्षा अण्णा आणि शेवंताची दिलखेच प्रेमकहाणी, वाडा, लिंबू, मिरची, आत्मा, भूत, प्रेत, विहीर, पिंपळ यात आपली मती गुंग करून बसले आहेत. पोरांनी हे सारे बघू नये, म्हणून त्यांच्या डोळ्यावर हात ठेवले जातात, पण पोरे बघायची काही राहत नाहीत.

- Advertisement -

आयांच्या पदराआड लपून मालिका डोळे फाडून बघत आहेत. टीव्ही मालिकेचा टीआरपी वाढत चालला असून कोकण म्हणजे भानामती आणि करणी ही अंधश्रद्धा लोकांच्या डोक्यात फिट्ट बसवण्याचे काम जोरात सुरू आहे. मालिका चालवणार्‍यांना टीआरपीचे गणित जुळवून पैसे कमवायचे असतात, पण ही मालिका बघणार्‍यांचे डोके ठिकाणावर आहे का? आपण काय बघतोय आणि मुलांवर कोणते संस्कार करतोय, याची थोडी तरी चाड बाळगायला हवी की नाही… कोकणावर आणि तेथील निसर्गावर प्रेम करून पर्यटनाला येणार्‍या कोकणच्या बाहेरील लोकांना आपण असे बिनडोक कोकण दाखवणार आहोत का, याचा आपल्या मनाशी प्रश्न विचारून टीव्हीचे बटन बंद करायला हवे… थोडे विषयांतर झाले, पण याच मालिकेला धरून शिवसेना आणि भाजपने अफझल खान, कोथळा, शायिस्ते खान, वाघाचे दात, पटक देंगे, चलो अयोध्या असे दिवसा खेळ दाखवून राज्यातील जनतेचे वशीकरण करण्याचे प्रकार चालवले आहेत आणि आता त्यात खासदार किरीट सोमय्या यांना नायसो (अस्तित्व नाहीसे करणे) करण्याच्या खेळाची भर पडली आहे.

मालवणी भाषेत सांगायचे झाले तर शिवसेनेच्या उलट्या पिसाच्या कोंबड्यानं सोमय्याक नायसो करून टाकल्यान. सेनेनं ह्या काय ता बारा पाचाचा केल्यानं ता बघत रवन्याशिवाय भाजपच्या हातातसुद्धा काय रवलेला नाय… आता एकाच वाड्यात रवाचा ठरवल्यावर असे खेळ करुचेच लागतत… युती असाना! असाच एक खेळ भाजपचे माजी आमदार वामनराव परब यांच्या बाबतीत शिवसेना आणि भाजपने केला होता.

- Advertisement -

वामनराव परब हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि राजकीय पक्ष म्हणून जनसंघाचे काम करताना त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. वसंतराव भागवत यांच्या बहुजन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन सतत पुढे जाण्याचा मार्ग दाखवण्याच्या प्रयोगातील वामनराव हे प्रमुख नाव होते. सुरुवातीच्या काळात खिशात दातावर मारायला पैसे नाहीत, पण निष्ठा आणि प्रामाणिकपणा घेऊन समाज कार्यासाठी घराबाहेर पडलेल्या परबांना कशाची कमी नव्हती. कारण त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालणारी माणसे होती. हाशू अडवाणी, जयवंतीबेन मेहता असे विश्वासू सहकारी होते. जनता पार्टीत असले तरी एस.एम.जोशी, मृणाल गोरे असे राजकीय मित्र होते. डाव्या विचारसरणीच्या नगरसेवक मणिशंकर कवटे आणि अहिल्या रांगणेकर यांच्या सोबतीने रस्त्यावर उतरून सत्ताधारी काँग्रेसला जाब विचारण्याची परबांमध्ये हिंमत होती. भारावलेला काळ होता आणि राजकारणात मूल्यांना किंमत होती.

इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरोधात सारा देश पेटला असताना मुंबईत मात्र नुकत्याच उदयाला येत असलेल्या शिवसेनेने मात्र बरोबर उलटी भूमिका घेत आणीबाणीचे समर्थन केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आणीबाणीला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर चारी बाजूंनी रान उठले होते. याच दरम्यान शिवाजी पार्कवर साथी जयप्रकाश नारायण यांची आणीबाणीविरोधात भव्य सभा आयोजित करण्यात आली होती. ‘अंधरे में एक प्रकाश… जयप्रकाश, जयप्रकाश’ करत पार्कात लाखोंची गर्दी झाली होती. जनता पार्टी आणि जनसंघाचे म्हणजे आताचे भाजपचे कार्यकर्ते पेटून उठले होते. लोकांच्या मनातही इंदिरा गांधी आणि शिवसेनेवर प्रचंड राग होता.

हा राग शेवटी 1977 साली इंदिरा गांधींचे सरकार बुडवून शांत झाला. जयप्रकाश यांची सभा झाल्यानंतर आणीबाणी विरोधात घोषणा देत कार्यकर्ते घरी निघाले असताना शिवसेना भवनजवळ त्यांच्यावर दगडफेक झाली. त्यावेळी शिवसेना भवनचे काम सुरू होते. या क्षणी कार्यकर्ते घाबरून जाऊ नयेत म्हणून परबांनी पुढे राहून त्यांना शांत तर केले, पण न घाबरता हातातीत जनता पार्टीचा झेंडा बांधकाम सुरू असलेल्या शिवसेना भवनवर फडकावला. परबांविरोधातील हा राग शिवसेनेच्या मनात कायम राहिला. दरम्यानच्या काळात जनता पार्टी आणि कम्युनिस्ट पक्षाच्या नगरसेवकांसह मुंबई महापालिकेत सत्ताधार्‍यांना हैराण करून सोडणार्‍या परबांनी मुलुंडमध्ये आपली चांगली पकड मिळवत १९९० मध्ये थेट आमदारकीपर्यंत मजल मारली. १९९५ मध्येही तेच आमदार होणार होते. पण भाजप आणि शिवसेना युती परबांच्या मुळाशी आली.

परब हे शिवसेनाविरोधक असून त्यांना कुठल्याही परिस्थितीत उमेदवारी मिळता कामा नये, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आणि त्याला खतपाणी घालताना त्यांच्या विरोधात शिवसैनिकांना मोर्चे काढण्यास भाग पाडले. युती करण्यामागे आता जसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे आहेत, तसा त्यावेळी प्रमोद महाजन यांनी युतीसाठी पुढाकार घेतला होता. महाजन हे बाळासाहेबांच्या शब्दाबाहेर नव्हते. फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मैत्री सध्या बहरात आहे तसेच. बाळासाहेबांनी याच मैत्रीचा हवाला देत आणि शिवसेना भवनवर जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचा राग मनात ठेवून महाजन यांना परबांचे ठरलेले तिकीट कापण्यास भाग पाडले. आपल्याला विश्वासात न घेता तिकीट कापल्याचे मोठे दुःख परबांना झाले. जनसंघ आणि भाजपसाठी खस्ता खाऊन हेच दिवस बघायचे होते, असे मनोमनी रुदन करत परब गप्प बसले. मात्र त्यांच्या मनात भाजप सोडून काँग्रेसला मिठी मारण्याचा विचारही डोकावला नाही.

कारण, त्यांच्या लेखी व्यक्ती नाही, भाजप पक्ष मोठा होता. याच काळात अनेक लटपट्या आणि खटपट्या करून सतत प्रसिद्धीच्या झोतात राहणार्‍या किरीट सोमय्या या तरुण नेत्याला परबांना डावलून महाजन यांनी आमदारकीची तिकीट दिली. परबांनी रक्ताचे पाणी करून बांधलेल्या मुलुंड मतदारसंघावर सोमय्या हे आयत्या बिळावर नागोबा असल्यासारखे बसले. झगामगा आणि मला बघा छाप सोमय्या यांच्यासारखे नेते हवेत की प्रामाणिक परब हवेत यात सोमय्या यांचा विजय झाला होता आणि पार्टी विथ डिफरन्स, अशी फुशारकी मानणार्‍या भाजपचा राज्यातील तो नैतिक पहिला पराभव होता. आज लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा, संजय जोशी यांना बाजूला सारून नरेंद्र मोदी यांनी जे केले तेच प्रमोद महाजन यांनी परबांच्या बाबतीत केले. काँग्रेसच्या घराणेशाहीवर बोलण्यापूर्वी भाजपने आपला चेहरा जरा आरशात बघावा. व्यक्तीकेंद्रित हुकूमशाहीचा मोदी चेहरा त्यांना दिसेल. काँग्रेसची ६० वर्षांची घराणेशाही आणि भाजपची ५ वर्षांतील हुकूमशाही हाच काय तो पार्टी विथ डिफरन्स म्हणता येईल.

गंमत बघा जे पेरले तेच शेवटी उगवते. परबांची उमेदवारी कापून आपण आमदार झाल्याचे पेढे वाटणारे सोमय्या आता शिवसेनेच्या उलट्या पिसाच्या कोबड्याने घायाळ झाले आहेत. गेल्या विधानसभेत युती तुटल्यानंतर सोमय्या यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर माफियागिरीचे आरोप केले होते. महापालिका निवडणुकीच्या काळात तर सोमय्या यांनी पालिकेतील अनेक भ्रष्टाचार उघड केल्याचा दावा करत ‘मातोश्री’वर हल्ला चढवला. कंत्राटदारांच्या साथीने महापालिकेची कोटींची तिजोरी लुटण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत, असे जळी स्थळी आरोप करत एकच राडा केला. यावेळी काठावर बसून फडणवीस, खडसे, दानवे गंमत बघत होते. काट्याने काटा काढला जात होता. वाजपेयी आणि अडवाणी यांच्या काळातील विवेकशील भाजप सवंग लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार झाली आहे. सत्ता भल्याभल्यांची रात्रीस खेळवाल्या अण्णासारखी मती गुंग करते हे भाजपने दाखवून दिले.

विधानसभेनंतर पुलाखाऊन बरेच पाणी वाहून गेले आहे. बहुमत मिळणार नाही, या भीतीने ५६ इंच छातीची ३६ इंच झाली आणि थेट अफझल खान मातोश्रीवर आले आणि मांडवली झाली. झाले गेले विसरून गळा भेटी झाल्या आणि ही गळा भेट घेताना मातोश्रीच्या एका हातात एक उलट्या पिसांचा कोंबडा होता आणि कोणावर ओवाळून टाकायचा हे २०१४ लाच ठरले होते. २०१९ एप्रिल उजाडले. मातोश्रीवरून आदेश निघाले. होऊ दे विरोध. कार्यकर्ते सज्ज होतेच, जोरदार विरोध सुरू झाला. सोमय्यांचे कुठल्याही परिस्थितीत निवडणुकीत काम करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आणि अखेरीस शेवटच्या १६ व्या यादीत सोमय्या यांना डच्चू देत मनोज कोटक यांना उमेदवारी जाहीर झाली. एक वर्तुळ पूर्ण झाले. शिवसेनेचो उलट्या पिसाचो कोंबडो काल परबांका भोवलो होतो, आज त्या कोंबड्यान सोमय्याक नायसो केल्यानं! खेळ जोरात सुरू आसा…!!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -