घरफिचर्सराष्ट्रपिता महात्मा गांधी

राष्ट्रपिता महात्मा गांधी

Subscribe

महात्मा गांधी यांचा आज स्मृतिदिन. मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णव वाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठन करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. त्या वेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत; ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बाळपणी सातआठ वर्षांचे असताना रंगून जात. हरिश्चंंद्राच्या अद्भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली.

१८८७ साली ते मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. बॅरिस्टर होण्याकरिता ते १८८८ मध्ये इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये असताना गांधींनी शाकाहारी मंडळ स्थापन केले. वडिलांच्याच पायापाशी बसून हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती मित्रांच्या संवादांमध्ये अनेक धर्माच्या तत्त्वांचे जे विचार त्यांनी वारंवार ऐकले, ते इंग्लंडमध्ये गीता, बुद्धचरित्र व बायबल यांच्या वाचनाने अधिक दृढ झाले.
ते १० जून १८९१ रोजी बॅरिस्टर झाले. भारतात आल्यावर त्यांनी मुंबई येथे वकिली सुरू केली; पण जम बसेना. या वेळी इंग्रजी पद्धतीचा पोषाख ते करीत होते. पोरबंदराच्या एका मुसलमान व्यापार्‍याने दक्षिण आफ्रिकेतील कज्जासाठी गांधींची गाठ घेतली व एका वर्षाच्या कराराने, १८९३ च्या एप्रिलमध्ये दक्षिण आफ्रिकेत नेले.

- Advertisement -

दक्षिण आफ्रिकेत प्रसिद्ध तत्त्वज्ञ, सेनापती व सत्ताधारी जनरल स्मट्स यांच्याशीच गांधींनी अनेक वेळा सत्याग्रही संग्राम केला. त्या वेळी नाताळ, ट्रान्सवाल व ऑरेंज फ्री स्टेट या तीन स्वतंत्र राज्यांत हिंदी लोकांची स्थिती अस्पृश्यांपेक्षाही वाईट होती. सर्वांनाच कुली म्हणत. गोर्‍या वस्तीत राहण्याचा त्यांना प्रतिबंध होता. वर्णद्वेषाचे थैमान सुरू होते. वर्णभेदावर आधारलेले अनेक प्रकारचे जुलमी कर लादले होते. वर्णद्वेषावर आधारलेले नियम मोडले, तर गोरे लोक व पोलीस मारहाण करीत.

गांधींनी स्वतः अनेक वेळा असा अपमान व मारहाण सोसली. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथील विधिमंडळात १८९४ मध्ये आले. गांधी त्या वेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते. परंतु आयत्या वेळी परत येण्याचा बेत रहित करून तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. १८ डिसेंबर १९१३ रोजी गांधींना स्मट्सने बंधमुक्त केले व २१ जानेवारी १९१४ रोजी वर्णविद्वेषाच्या कायद्याच्या बाबतीत गांधी व स्मट्स यांच्यात तडजोड झाली. गांधी दक्षिण आफ्रिकेला कायमचा रामराम ठोकून इंग्लंडमार्गे ९ जानेवारी १९१५ रोजी मुंबईस परत आले. अहमदाबाद येथे साबरमती तीरावर २५ मे १९१५ रोजी सत्याग्रहाश्रम स्थापन केला. हा सत्याग्रहाश्रम तेव्हापासून हळूहळू भारताच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र बनला.

- Advertisement -

गांधींनी १९१७ मध्ये शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बिहारमधील चंपारण्यास भेट दिली. त्या परिसरात गोर्‍या लोकांचे उसाचे व निळीचे मळे होते व तेथील हिंदी शेतकरी त्यांची कुळे होती. हे मळेवाले शेतकर्‍यांना छळीत, लुबाडीत, मारीत व त्यांची आर्थिक पिळवणूक करीत. १३ जून १९१७ रोजी सरकारला चौकशी समिती नेमावी लागली. समितीच्या शिफारशीप्रमाणे सरकारने शेतकर्‍यांकडून खंड कमी घेतला जाईल, वेठबिगार रद्द होईल व इतर जुलमी प्रकार होणार नाहीत, असे १८ ऑक्टोबर रोजी जाहीर केले. अशा या महान राष्ट्रपित्याचे ३० जानेवारी १९४८ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -