घरफिचर्समायमहानगर ब्लॉगगुजरातमध्ये काँग्रेसी चिंतन!

गुजरातमध्ये काँग्रेसी चिंतन!

Subscribe

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये रविवारी घेतलेल्या चिंतन शिबिरात अतिशय आक्रमक पवित्रा घेत काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची कानउघाडणी केली. काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत, एक जे लोकांमध्ये जाऊन काम करतात तर दुसरे असे आहेत, जे एसीमध्ये बसून मजा मारतात, मोठी मोठी भाषणे ठोकतात. ते काम करत नाहीत. कामात खोडा घालतात, अशा लोकांनी भाजपमध्ये जावे, अशी समज राहुल गांधी यांनी दिली. काँग्रेस केंद्रात सत्तेपासून ७ वर्षे दूर आहे, तर गुजरातमध्ये २५ वर्षे सत्तेपासून लांब आहे. गुजरातमध्ये या वर्षांच्या शेवटी विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे आतापासूनच तयारीला लागायला हवे. काँग्रेसची केंद्रातील सत्ता गेली असली तरी काही राज्यांमध्ये मजबूत परिस्थिती आहे, असे सांगून राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या गुजरातमधील पदाधिकार्‍यांमध्ये नवा आशावाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये तीन वेळा मुख्यमंत्रिपदाची हॅट्ट्रिक केलेली होती. गुजरात भाजपचा बालेकिल्ला होऊन बसला होता. तेथील काँग्रेसचे महत्व अगदी नाममात्र उरले होते. मोदी गुजरातचे विकास पुरुष झाले होते. विकासाच्या गुजरात मॉडेलचा डंका देशभर नव्हे तर जगभर गाजत होता. त्यावेळी मोदी म्हणजे विकास असे समीकरण झाले होते. तर दुसर्‍या बाजूला भाजपकडे केंद्रात देशभर प्रभाव टाकू शकेल, असा नेता नव्हता. अगोदर लालकृष्ण अडवाणींच्या रथयात्रेमुळे आणि मंदिर वही बनांयेंगे, या घोषणेमुळे भाजप आणि मित्र पक्षांचे एनडीएचे सरकार केंद्रात सत्तेत आले होते. तेव्हा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते. २००४ ची लोकसभा निवडणूक भाजपने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली लढवली, त्यात भापजची सत्ता आणता आली नव्हती. अडवाणींनी २००९ साली पुन्हा आपल्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढवली.

- Advertisement -

तेव्हा त्यांचे निवडणूक व्यूहरचनाकार अमित शहा होते, तरीही भाजपला केंद्रातील सत्ता मिळवता आली नव्हती. अडवाणी नाराज झाले होते. त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला, त्यावर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत घातली. अडवाणींचा काळ संपत आला आहे, हे आता भाजपच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांना समजून चुकले होते. भाजपला केंद्रात एका मोठ्या नेत्याची गरज होती. पण तो राष्ट्रीय पातळीवर नव्हता, त्यामुळे भाजपच्या प्रादेशिक पातळीवरील नेते आणि कार्यकर्त्यांनी जोर लावून गुजरातचे विकास पुरुष नरेंद्र मोदी यांचे नाव पुढे आणले. जो विकास आणि त्यांनी गुजरातमध्ये केला तसाच ते देशपातळीवर करतील, अशी आशाही लोकांमध्ये निर्माण होऊ लागली. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीएच्या केंद्रातील राज्य कारभाराला जनताही कंटाळली होती. त्या सरकारमधील बरेच मंत्री भ्रष्टाचारात गुंतले होते. घटक पक्षांचे सरकार असल्यामुळे सरकार पडण्याची भीती होती, त्यामुळे पंतप्रधान असलेले मनमोहन सिंग काही करू शकत नव्हते. २०१४ ची लोकसभा निवडणूक जवळ येत होती. काँग्रेसला राहुल गांधी यांना पुढील पंतप्रधान बनवायचे होते. पण राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींचा प्रवेश झाल्यावर परिस्थिती बदलली.

मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘काँग्रेसमुक्त भारता’ची घोषणा दिली. लोकांनी ती मान्य करून मोदींच्या पारड्यात आपले वजन टाकले. त्यामुळे भाजपची पहिल्यांदाच केंद्रात बहुमताची सत्ता आली. मोदी केंद्रात आल्यानंतर काँग्रेसची पार वाताहत झाली. त्यांंना लोकसभेत विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी जेवढ्या जागा लागतात, तेवढ्याही जिंकता आल्या नाहीत. सोनिया गांधींचा जो २००४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रभाव होता, तो ओसरला होता. त्यांच्याविषयी लोकांना जे नावीन्याकर्षण वाटत होते, ते संपले होते. राहुल गांधी यांना काँग्रेसकडून पुढे करण्यात येत आहे, पण त्यांचा प्रभाव पडत नाही, असे वाटत असतानाही २०१७ साली गुजरातमध्ये जी विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी नरेंद्र मोदींना काही वेगळेच चित्र पहायला मिळाले.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी गुजरातमधील सगळ्या हिंदू देवीदेवतांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा सपाटा लावला. त्यांंचे नवपरिवर्तन गुजरातमधील लोकांना रुचेल असे वाटत नव्हते, पण ते लोकांना भावले असावे. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असे वाटत होते, पण आतील हवा काही वेगळीच होती. त्यामुळे मोदी आणि भाजपचा हुकमी एक्का असलेल्या गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदी स्वत: ताकदीने उतरले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस आणि काही अन्य भाजप राज्यांमधील मुख्यमंत्री उतरले, तरीही भाजपचा घामटा फुटला. बहुमताला ९१ जागा हव्या होत्या. काँग्रेस ७७ जागांपर्यंत पोहोचली होती. भाजपला कसेबसे बहुमत मिळाले होेते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये गुजरातमध्येच काँग्रेसला लक्षणीय यश मिळाले होते, त्यामुळे गुजरातमध्ये आपली चालते हे राहुल गांधी यांच्याही आता लक्षात आले आहे. त्यामुळेच या वर्षाच्या शेवटी होणार्‍या गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तयारी ते आतापासून करत असावेत.

गुजरातमधील गेल्या वेळी थोडक्यात गेलेली सत्ता कशी मिळवता येईल आणि मोदींच्या बालेकिल्ल्यावर काँग्रेसचा झेंडा कसा फडकावता येईल, याचाही या चिंतन शिबिरात विचार झाला असावा. महाराष्ट्रासारखे महत्वाचे राज्य काँग्रेसमुळेच भाजपच्या हातून काढून घेता आले. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीला काँग्रेसची साथ मिळाली नसती तर महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले नसते. मोदींना राष्ट्रीय पातळीवर टक्कर देता येत नसेल तर ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे, ती घालवून मोदींचा प्रभाव कमी करता येईल, असाही विचार राहुल गांधी यांच्याकडून होत असावा. पण त्यासाठी राहुल गांधी यांना अगोदर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल.

कारण काँग्रेसची अवस्था सध्या नेतृत्वहीन झालेली आहे. त्यामुळे पक्षाची रचना विस्कळीत झाली आहे. ठिकठिकाणी गटबाजी उफाळली आहे. त्यामुळे पक्षाची हानी होत आहे. गांधी घराण्यातील व्यक्तीशिवाय काँग्रेस उभी राहू शकत नाही, हे आता त्रिकालाबाधित सत्य आहे. कारण काँग्रेसचा प्रमुख हा बिगरगांधी व्हावा, असे आवाहन राहुल यांनी करूनही कुणी पुढे आले नाही. इतकी गांधी परिवाराची सुप्त दहशत आहे. त्याचा विचार राहुल गांधींनी करायला हवा. मोदींच्या बालेकिल्ल्यात केवळ चिंतन करून चालणार नाही. कारण काँग्रेसला मोठा विजय मिळवायचा असेल तर मोदींना केवळ गुजरात नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर टक्कर द्यावी लागेल. त्यासाठी व्यापक रणनीती आखावी लागेल. काँग्रेसजनांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -