घरताज्या घडामोडीTokyo Olympics 2020: अजी सोनियाचा दिनू!

Tokyo Olympics 2020: अजी सोनियाचा दिनू!

Subscribe

गेली अनेक वर्षे मी भारतीय हॉकी फॉलो करत आहे. माझा हा सर्वात आवडीचा खेळ. कारण तो राष्ट्रीय खेळ आहे. या भारतीय मातीचा खेळ असून आपण एकेकाळी याच खेळाच्या माध्यमातून जगावर राज्य केले होते. मेजर ध्यानचंद यांचा वारसा सांगणाऱ्या भारतीय संघाने याआधी ८ सुवर्ण पदके मिळवली होती… पण, तो इतिहास होता. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण मिळवल्यानंतर भारतीय संघाची झोळी रिकामी होती… ती २०२१ मध्ये शेवटी भरली. मनप्रीतच्या संघाचे हे सुवर्ण पदक नसले तरी त्याला सुवर्णाची झळाळी आहे… कारण ब्रॉंझपदक ही आता त्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. आणि म्हणूनच ५ ऑगस्ट २०२१ हा दिवस भारतीय हॉकीसाठी सोनियाचा दिनू आहे.

मनप्रीतचा भारतीय संघ जगात या घटकेला तिसऱ्या क्रमांकावर असून ब्रॉंझ पदकाने त्यांच्या या स्थानावर शिक्कामोर्तब झाले… १९८० च्या नंतर परगट सिंग, मुकेश कुमार, दिलीप तिर्की, धनराज पिल्ले यांच्या भारतीय संघाला जे जमले नाही ते मनप्रीतने करून दाखवले. मनप्रीचे हे तिसरे ऑलिम्पिक. यापुढे तो जगातील या मोठ्या स्पर्धेत खेळू शकेल की नाही याची काहीच खात्री नाही… पण आता भारतीय मुकुटात शिरपेच खोवण्याची हीच वेळ आहे, असे समजून त्याने स्वतःसह आणि आपल्या संघाचा आत्मविश्वास वाढवला. आणि मनप्रीतच्या मागे उभे होते ते प्रशिक्षक ग्रॅहम रीड. जगातील पहिल्या क्रमांकाचा संघ असलेल्या बेल्जियम ने उपांत्य फेरीत पराभूत केल्यानंतर भारतीय संघ नेहमीप्रमाणे निराशेच्या खोल डोहात जाऊन ब्रॉंझ सुद्धा मिळवू शकणार नाही, असा निराशेचा सूर होता. रिड यांनी या संघात आत्मविश्वास भरला… हा विजय फक्त भारतीय हॉकीसाठी महत्वाचा नाही, तर या खेळावर प्रेम करणाऱ्या लाखो भारतीय हॉकीप्रेमींचा उत्साह वाढवणारा आहे. मुख्य म्हणजे हॉकीच्या मैदानावर उतरणाऱ्या नव्या पिढीचा आत्मविश्वास वाढवणारा आहे.

- Advertisement -

तुम्ही जेव्हा सतत पराभूत होता, तेव्हा आजूबाजूचे लोक तुम्हाला विचारत नाही. मग निराशेचे क्षण असे काही येतात की हे जग नकोसे वाटते. पण, रिड यांनी या संघात प्राण फुंकले. बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाचे ते माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. आधुनिक हॉकीच्या विश्वाचे ते साक्षीदार असून तोच बदल त्यांनी मनप्रीतच्या भारतीय संघात घडवून आणला. भारतीय हॉकीपटुमध्ये गुणवत्ता भरपूर आहे, पण मैदानावरील ती ६० मिनिटे ही जीवघेणी असतात, तुमच्या तनामनाची परीक्षा घेणारी असतात. माणूस तनाने मोठा असेल तर सक्षम मन त्याच्याबरोबर नसेल तर तो आपल्याला उंचावणार कसा? हाच प्रश्न इतकी वर्षे सतावत होता. त्याचे उत्तर रिडने भारतीय संघाला मिळवून दिले. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यावर त्यांनी मनप्रीत आणि त्याच्या टीमच्या मनात प्राण फुंकले. ‘ पराभव हा गेला तो दिवस होता. उद्या येणारा दिनू हा आशेचा नवा किरण घेऊन आलाय. तोच तुम्हाला ब्रॉंझ मिळवून देईल. निराशेचे क्षण फेकून द्या’. आणि तेच भारताने केले. पिछाडीवर पडून या संघाने भरारी घेतली. दादा संघांसमोर यापुढे नमणार नाही, अशा जिद्दीने हा संघ मैदानात उतरला आणि इतिहास घडवला… कॉमेंट्री बॉक्स मध्ये मुंबईकर आंतर राष्ट्रीय हॉकी पटू विरेन रासक्युन्हा समालोचन करत होता. मैदानावरून निवृत्त झाल्यावर हा गुणी खेळाडू ऑलिम्पिक खेळाडूंना मदत करण्यासाठी जे काही प्रयत्न होत आहेत त्याचा एक भाग आहे. त्याच्या आनंदाला आज पारावार उरला नव्हता…, तीच भावना आज प्रत्येक भारतीयाची आहे.

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -