घरताज्या घडामोडीआरेवरून पुन्‍हा संघर्षाचे वारे

आरेवरून पुन्‍हा संघर्षाचे वारे

Subscribe

मेट्रो-३ कारशेड १०० टक्‍के आरेतच होणार -देवेंद्र फडणवीस ,मुंबईकरांच्या काळजात कट्यार खुपसू नका-उद्धव ठाकरे

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारच्या मेट्रो कारशेड आरेमध्येच होईल या पहिल्याच निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. माझी त्यांना हात जोडून विनंती आहे की कृपा करून माझा राग मुंबईवर काढू नका. माझ्या पाठीत सुरा खुपसला, आता मुंबईकरांच्या काळजात कट्यार खुपसू नका. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका. कांजूरमार्गचा जो प्रस्ताव आम्ही दिला त्यात कुठेही अहंकार नाही. आरेचा आग्रह उगाच रेटू नका असे म्हणत ठाकरेंनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती शिंदे सरकारला केली, परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची ही विनंती स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत कारशेडचे काम आरेतच होणार हे ठामपणे सांगितले. यासंदर्भात आम्ही उद्धव ठाकरेंचा पूर्ण मान ठेवत योग्य तो निर्णय घेऊ. कारशेड संदर्भात मुंबईकरांचे हित हेच आहे की जिथे कारशेड २५ टक्के तयार झाले तिथेच ते १०० टक्के तयार व्हावे. कारण त्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आहे, असेही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना शिवसेना भवन येथे बसणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे हे शुक्रवारी शिवसेना भवन येथे आले आणि त्यांनी शिवसैनिक तसेच पदाधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या. त्याचबरोबर पत्रकार परिषद घेत स्थापन झालेल्या नवीन सरकारबाबत आपली भूमिका मांडताना जनतेत निर्माण झालेला संभ्रम दूर केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या पद्धतीने सरकार स्थापन झाले आहे आणि त्यांच्या मते शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. मग हेच तर मी अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. माझ्यात आणि अमित शहा यांच्यात शिवसेना-भाजपने मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ वाटून घेण्याचे ठरले होते. तसे झाले असते तर आज अडीच वर्षे झाली आहेत. जे काही घडले ते शानदारपणे झाले असते. या जोडगोळीने अशाच पद्धतीने अडीच वर्षे पूर्ण केली असती. मग त्यावेळी नकार देऊन आता भाजपने असे का केले, असा सवाल त्यांनी केला.

- Advertisement -

आरेत पुढे जाण्याचा विचार केला तरी त्यांना जाता येणार नाही. कारण आम्ही मुंबईतील जवळपास ८०० एकरचे जंगल राखीव करून टाकले आहे. कांजूरमार्गची जमीन महाराष्ट्राची आहे. ती महाराष्ट्राच्या, मुंबईच्या हितासाठी वापरा. आरेचा मर्यादित वापर होणार होता. कांजूरला कारशेड गेल्यानंतर मेट्रो बदलापूर-अंबरनाथपर्यंत जाऊ शकेल. त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी हाच पर्याय निवडावा. मी पर्यावरणवाद्यांसोबत आणि पर्यावरणासोबत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

कारशेड आरेतच १०० टक्के तयार व्हावे
आरेमधील जंगल वाचवण्यासाठी मेट्रो ३चे कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय उद्धव ठाकरे सरकारने घेतला होता, मात्र आता हा निर्णय शिंदे सरकारने फिरवला असून हे कारशेड कांजूरमार्गऐवजी आरेमध्येच होईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला केलेले आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहे. यासंदर्भात आम्ही उद्धव ठाकरेंचा पूर्ण मान ठेवत योग्य तो निर्णय घेऊ. मला असे वाटते की कारशेडसंदर्भात मुंबईकरांचे हित हेच आहे की जिथे कारशेड २५ टक्के तयार झाले तिथेच ते १०० टक्के तयार व्हावे. कारण त्याला सर्वोच्च न्यायालयाची मान्यता आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.

- Advertisement -

हा सेनेचा मुख्यमंत्री नाही -पक्षप्रमुख

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही, अशी रोखठोक भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी घेतली. ठाकरे यांनी लोकशाहीचे धिंडवडे थांबवा, अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे नाव न घेता फटकारले.शिवसेना अधिकृतपणे तुमच्यासोबत होती. लोकसभा, विधानसभेत आम्ही एकत्र होतो. निवडणुकीच्या आधी हेच ठरले होते . मग मला कशाला मध्ये मुख्यमंत्री होण्यास भाग पाडले. तसे घडले असते तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. जे आता भाजपसोबत जाऊ इच्छित आहेत किंवा गेलेत त्यांनी हा प्रश्न स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे. अडीच वर्षांपूर्वी ज्यांनी शब्द मोडला आणि अशा पद्धतीने पाठीवर वार करून पुन्हा शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सेनेचा मुख्यमंत्री झाला, असे म्हणत आहेत, तर हा सेनेचा मुख्यमंत्री नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मातोश्री निवासस्थानी अमित शहा यांनी दिलेल्या वचनाची आठवण करून दिली. ते म्हणाले की, अमित शहा यांनी मातोश्रीवर दिलेला शब्द पाळला असता तर हे सरकार शानदारपणे आले असते. अडीच वर्षे झाली आहेत. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेचा किंवा भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. मी तर तेव्हाही सांगितले होते की, पहिला शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता तर एक पत्र तयार करून त्यावर मुख्यमंत्र्यांची सही, पक्षप्रमुख म्हणून माझी सही केली असती. आज शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असून आमच्यात ठरलेल्या कराराप्रमाणे या दिवशी पायउतार होईल असा मजकूर लिहिला असता. मी तर म्हणालो होतो हे पत्र मंत्रालयाच्या दाराशी होर्डिंग करून लावा म्हणजे हा करार कोणापासून लपून राहिला नसता, असे ठाकरे म्हणाले.

माझ्याशी अशा पद्धतीने वागले याचे दु:ख झाले आहे. माझ्या पाठीत सुरा खुपसला. मला दिलेला शब्द पाळला असता तर निदान अडीच वर्षे भाजपचा मुख्यमंत्री झाला असता. आता पाचही वर्षे भाजपचा मुख्यमंत्री नसणार. यात भाजपला आणि त्यांच्या मतदाराला काय आनंद आहे माहिती नाही, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिलेल्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले की, गेल्या ८-१० दिवसांत मला अनेकांचे मेसेज आले. सोशल मीडियावरून अनेकांच्या भावना कळाल्या. त्याबद्दल मी ऋणी आहे. एखाद्याने पद सोडल्यावर लोक रडतात असे क्वचित होते. ही माझ्या आयुष्याची कमाई आहे, असे सांगताना तुमच्या डोळ्यांतील अश्रूंशी कधी गद्दारी, हरामखोरपणा करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. अशा विचित्र पद्धतीने शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्रीपदावरून उतरवून स्वत: मुख्यमंत्री होण्याचा जो अट्टाहास केला आहे हा आवडला की नाही हे जनतेने ठरवायचे आहे. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही, असेही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -