घरफिचर्सस्वातंंत्र्यदिनी, गाणी...तीच जुनी!

स्वातंंत्र्यदिनी, गाणी…तीच जुनी!

Subscribe

मुळात देशभक्तीपर गाण्यांचा तरुम पिढीला तुटवडा जाणवतो आहे का, हाही एक प्रश्न आहेच. 'आवाज वाढव, डिजे तुला आयची शपथ हाय,' असं म्हणणारी पिढी देशप्रेमाच्या गाण्याची संख्या एखाद्या नव्याकोऱ्या गाण्याने वाढवू शकत नाही का?

परवा सोसायटीत स्वातंत्र्य दिन साजरा झाला. यावेळी जुनी कमिटी जाऊन नवी कमिटी आली. ही नवी कमिटी नवी असल्यामुळे जोशात होती आणि त्यात तरुणांचा जास्त भरणा होता. साहजिकच वडील कमिटीत असल्यामुळे त्यांची मुलं सळसळत्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करायला खाली उतरली होती.

सकाळी सकाळीच त्यांनी एक भला मोठा स्पीकर आणला. त्या स्पीकरवर त्यांनी देशभक्तीपर गाण्यांची एक जोरदार लडी लावली आणि स्वातंत्र्य दिनाला हॉलिडे मानून बिछान्यात घोरत पडणार्‍यांना जाग आणली. देशप्रेमाविषयी जागृती आणण्याचे ते दिवस आता मागे पडले असतील, पण हल्ली कुणाला जाग आणणं हेही थोडंथोडकं नाही.

- Advertisement -

अर्धीअधिक सोसायटी झोपेत असताना स्पीकरवर लता मंगेशकरांनी दर्दिली, पण खणखणीत हाळी दिली – ‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आंख में भर लो पानी, जो शहीद हूए हैं उन की जरा याद करो कुर्बानी…’

ती संपते न संपते तोच लतादिदी पुन्हा दर्दिल्या सुरात गरजल्या – ‘वंदे मातरम, सुजलाम सुफलाम, मलयज शीतलाम. सस्य शामलाम, मातरम…..’

- Advertisement -

आता सोसायटी नक्कीच खडबडून जागी झाली असणार आणि तिच्या अंगावर नक्कीच शहारा आला असणार!

मग काय…‘ऐ वतन, ऐ वतन, तुज को मेरी कसम…’ ‘जहाँ डाल डाल पर सोने की चिडिया करती है वो बसेरा,’ ‘है प्रित जहाँ की रित सदा,’ ‘मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती…’ सोसायटीवर देशभक्तीत न्हाऊन निघालेल्या एकाहून एक गाण्यांचा वर्षाव सुरू झाला.

खरोखरच त्या गाण्यांनी सोसायटीच्या आवाराला देशप्रेमाचं एक सुरेख सुंदर आवरण घातलं. एखाद्या पुस्तकाला नेटकं आवरण घालावं ना तसं. खरोखरच दोन घटका मजा आली ती गाणी ऐकताना.

मध्येच मुकेशचं ‘छोडो कल की बाते, कल की बात पुरानी’ कानावर पडलं. मुकेशच्या आवाजातल्या कारूण्याने सचैल भिजलेलं ते गाणं. कान आणि मन लावून ते गाणं नीट ऐकलं की अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या दहा-पंधरा वर्षांतली गाणी असतील ती. लढून झगडून स्वातंत्र्य मिळवल्याच्या आणि त्याचं मोल काय ते कळल्याच्या उत्कट अनुभूतीतून ताजी ताजी उमललेली गाणी ती. जुनीच काय, जुनाट गाणी असतील ती. पण पापण्यांच्या कडा ओलेत्या करण्याची, काळजाचं पाणी पाणी करण्याची जबरदस्त ताकद होती त्या गाण्यांत.

मनात विचार आला, स्पीकरवर ही जुनी गाणी वाजवणारी मुलं आताच मिसरूड फुटलेली आहेत. त्यातही काही चांगली तरणीबांड आहेत. तर काही अगदीच कोवळी आहेत. त्यांचा जमाना वेगळा आहे. त्यांची भाषा वेगळी आहे. त्यांची बोलीभाषा, परिभाषा वेगळी आहे. पण मग ही मुलं स्वातंत्र्य दिनाची मागच्या काळातली किंवा त्यांच्या भाषेत आउटडेटेड झालेली गाणी का वाजवताहेत?

पण हा प्रश्न काही काळ्याचे पांढरे करणारा नव्हता. उत्तर अतिशय सोपं होतं.

ह्या कोवळ्या मुलांच्या काळातही दोन नाही, एकाच हाताच्या बोटावर मोजण्याइतकी देशभक्तीपर गाणी जन्माला आली असतीलही, पण ती त्यांच्या पचनी पडली नाहीत. ती त्यांना भावली नाहीत किंवा ती त्यांच्यात देशभक्तीचं स्फुल्लिगं निर्माण करू शकली नाहीत. नाहीतर त्यातलं एखादं गाणं त्यांनी डोक्यावर घेतलं नसतं का?

शंकर महादेवन मध्यंतरी, ‘सब से आगे होंगे हिदुस्तानी’ इतकं टाहो फोडून गायला, पण तरूण पिढीवर त्याचा म्हणावा इतका फरक पडलाच नाही. ए. आर. रेहमाननेही आळसावलेल्या सुरातलं ‘वंदे मातरम’ गाणं करून पाहिलं, पण त्यालाही तरूण पिढीकडून मिळायचे तेवढे मार्क मिळाले नाहीत. तसं काही खरंच घडलं असतं तर आमच्या सोसायटीतल्या त्या पोराटोरांनी त्या स्वातंत्र्यदिनाला शंकर महादेवन आणि ए. आर. रेहमान स्पीकरवर लावला नसता का?

वास्तविक अजय-अतुल, अवधुत गुप्तेच्या संगिताला नादावलेली ही पिढी. पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिला शंकर-जयकिशन, हेमंतकुमार, सी. रामचंद्रांची गाणी का ऐकावीशी वाटतात? हो, आणि मराठीतही ‘भारतीय नागरिकांचा घास रोज अडतो ओठी, सैनिकहो तुमच्यासाठी’, ‘अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे’, ‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हा चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे’ अशी मोजकीच गाणी स्वातंत्र्याची महती सांगतात. बाकी सगळीच सामसुम!

मुळात देशभक्तीपर गाण्यांचा तरुण पिढीला तुटवडा जाणवतो आहे का, हाही एक प्रश्न आहेच. ‘आवाज वाढव, डीजे तुला आयची शपथ हाय,’ असं म्हणणारी पिढी देशप्रेमाच्या गाण्याची संख्या एखाद्या नव्याकोर्‍या गाण्याने वाढवू शकत नाही का? त्यासाठी त्यांच्या चित्रपटाच्या पटकथेत तसा एखादा प्रसंग निर्माण करू शकत नाही का? करू शकते. पण ह्या क्षणाला तशी त्यांची इच्छाशक्ती दिसत नाही…आणि ती दिसत नाही तोपर्यंत आपल्या सोसायटीतल्या तरुणांना स्पीकरवर लतादिदींचं ‘ऐ मेरे वतन के लोगो’च ऐकवावं लागणार!…कारण ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे आजच्या तरण्याबांड पिढीसाठीही स्वातंत्र्य दिनाचा सांगितलेला लोगो झालेलं आहे..आणि तो त्यांनी त्यांच्या मनात टॅटू म्हणून कधीचाच गोंदवून घेतलेला आहे!

 


-सुशील सुर्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -